मनोगत ज्याचं त्याचं….

मनोगत

हरकिशन मुंडा ….. कारखानदार

बरे झाले…. उद्या एकदाचा जाईल तो. दरवर्षी कमीतकमी पाच दिवस खूप ताप असतो डोक्याला. ही कोकणातील लोक त्याच्यासाठी बिनपगारी रजा घेतील पण गावी जाणारंच. आज इतकी वर्षे हा उद्योग संभाळतोय पण यांच्यावर कंट्रोल नाही करू शकलो मी. या दिवसात किती ओव्हरटाईम होतात… अनुपस्थिती आहेच. नुकसान होतेच. मेमो देतो असे सांगूनही ऐकत नाहीत. पण एक नक्की…. या दिवसात कारखाना कसा उत्साहाने भरलेला असतो. कसले भांडण नाही. तंटा नाही. आजपर्यंत बॅलन्सशिटमध्ये नुकसान कधीच दिसले नाही. ही कोकणातील माणसे कामात मात्र प्रामाणिक आहेत. असो उद्यापासून येतील कामावर.

अल्बर्ट पिंटो…. दारूच्या दुकानाचा मालक

चला आपली रजा संपली कालचा स्टॉक भरून ठेवलाय. गणपती आले की भलेभले बेवडे दारू बंद करतात. खूपच नुकसान होते या दिवसात. एरव्ही कधी बसायला वेळ मिळत नाही पण या दिवसात मोबाईल गेम खेळत बसतो. काय पण ह्याचा प्रभाव बघा… भले भले तळीराम विसर्जनापर्यंत दारूला स्पर्श करीत नाहीत. अरे या दिवसात स्कीम लावली तरी फारशी गर्दी होत नाही. पण मानले पाहिजे या बाप्पाला….. दहा दिवस का होईना दारूचे नाव ओठावर आणीत नाही काही जण. नंतर सर्व भरपाई करतील ती गोष्ट वेगळी…

सदानंद धुले…. मुंबई पोलीस

उद्याचा दिवस त्रास आहे अजून मग जाऊ सुट्टीवर. ह्या दिवसात खूप त्रास असतो. त्यात ट्रॅफिक आणि गर्दीची भर आहेच. ह्या गर्दीला कसा कंट्रोल करायचा तेच कळत नाही. नीट चाल म्हणून बोललो तर अंगावर येतात. हल्ली तर पटकन विडिओ काढून वायरल करतात. कोणाला काही बोलायची सोय नाही. दिवसेंदिवस गणेशोत्सवाची गर्दी वाढतेच आहे. त्यात आमचे कोकणातले बांधव गावी जाणारच त्यांचाही लोड आम्हीच घ्या. तसे तेही सहकार्य करतात हो…. त्यांना तरी काय कमी त्रास आहे. सर्व गाड्या भरभरून जातायत आणि याना सुट्टी आयत्यावेळी पास होते. कसे प्रवास करतात तो बाप्पाच जाणे… ते आल्यावर आम्ही जाऊ दिवाळीत गावी. पण तोपर्यंत काही घडायला नको हो…. हल्ली भाविकही समजूतदार झालेत. आमचे हाल कळतात त्यांना. सतत काहीतरी खायला देत असतात. मान ही देतात. बाप्पाने हळूहळू का होईना बुद्धी दिलीय त्यांना.

लक्ष्मी पाटील…. मासेमार्केट मधील कोळीण

संपला एकदाच उपवास. आता येतील उद्यापासून धावत मासे घ्यायला. ह्या श्रावणात धंद्याची वाट लागते. घर कसा चालवते माझे मलाच माहीत. हल्ली श्रावण पाळायची फॅशन आलीय. बाप्पाचे विसर्जन करूनच खाऊ असा ठरवतात. मेल्यानी असा विचार केला तर आम्ही काय खाऊचा…? कधी एकदा तो बाप्पा जाताय याची वाट बघता आम्ही. आता येतील उद्या पापलेट आणि सुरमाईचे भाव विचारत…

मंडपात बसलेला तो

हुश्शहह…निघालो शेवटी. हल्ली इथे येणे खरेच जीवावर येते. काय मिळते मला येऊन….? पाच मिनिटे विश्रांती नाही. हे सर्व आपल्या मनाप्रमाणे मला वागवतात. अरे नाचायला पाहिजे म्हणून दोन दिवस आधीच घेऊन येतात. आणि काहीजण तर एक दिवस नंतरच जाऊ देतात. लोकमान्य हेच दिवस दाखवायचे होते का मला ….?? बिचाऱ्या गरिबांची दुःखे बघवत नाहीत म्हणून त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या मी. पण त्यांनी परतफेड म्हणून मलाच पैसे दागिने दिले. सर्वच आपली दुःखे माझ्याकडे मांडतात पण दुसऱ्यांची दुःखे दूर करेन असे कोण बोलत नाही. तो एक गृहस्थ त्या दिवशी पैश्याचे बंडल पेटित टाकून गेला… पण भाऊ मला त्या पैश्याची गरज आहे का??? तुम्हीच त्याचा उपयोग गरजू लोकांसाठी करा ना… पण त्यासाठी वेळ नाही आमच्याकडे हो… पण नवस बोलायला/ फेडायला दहा तास रांगेत उभे राहायला वेळ आहे आमच्याकडे. दरवर्षी अंगावरील सोने वाढतेय…. वजन पेलवत नाही मला…. पण ऐकतोय कोण..? तरी नशीब हल्ली पेटित पडलेला पैसा सामाजिक कार्यासाठी वापरला जातोय. दरवर्षी असेच काहीतरी त्यांच्या मनात सोडले पाहिजे. इथल्यापेक्षा कोकणात बरे वाटते. अजूनही दशावतार, भजन, चालू आहेत. मन प्रसन्न होते. आज गेली कित्येकवर्षं कोकणवासीयांनी परंपरा जपलीय. पण सार्वजनिक ठिकाणी राहवत नाही हो. उद्या निघतोय पण दुःखाएवजी आनंदच का बरे होतोय….?


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!