निरागस विश्व्

काही दिवसांपूर्वी माझ्या परिचयाच्या जोग काकूंबरोबर एका विशेष मुलींच्या शाळेत म्हणजेच आनंदघनात गेले होते.माझ्या वयाचीच असलेली काकूंची मुलगी मुग्धा त्या शाळेत राहते त्यामुळे त्यांचे वरचे वर तिकडे जाणे होतच असते. या शाळेत वयाबरोबर बुद्धीची अथवा मेंदूची वाढ न झालेल्या मुलीच फक्त कायमस्वरूपी राहतात.
या आनंदघनाची स्थापनाच मुळात या विशेष मुलींच्या पालकांनी केली. बरीच वर्षे या मुलींचा लहान बाळासारखा सांभाळ केल्यानंतर काही कौटुंबिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे या विशेष मुलींना हक्काचे पण वेगळे घर मिळावे या हेतूने एकत्र जमून त्यांनी हे आनंदघन एका छोट्याशा वास्तूत चालू केले. पुढे मात्र पालकांचा हातभार आणि समाजातील काही दानशूरांच्या पुढाकाराने छोट्याशा घरात चालू झालेल्या आनंदघनाचे रूपांतर काही वर्षातच मोठ्या नोंदणीकृत संस्थेत झाले. येथे मुलींच्या मदतनीस म्हणून काम करणाऱ्या आया सुद्धा निराधारच आहेत हेही विशेष.
खरेतर जाण्याआधी मला जोग काकूंनी प्रारंभिक कल्पना दिली होती कि या मुली इथल्या आयांच्या मदतीने काही कलाकुसरीच्या वस्तू तयार करतात आणि या वस्तू मी चालवत असलेल्या ऑनलाईन स्टोअर मध्ये विकण्यासाठी ठेवता आल्या तर या मुलींना स्वतःच्या कामातून हातात स्वकमाई मिळेल असे काहीतरी बघता येईल.
आम्ही तिथे पोहोचलो तोच मुग्धा आणि तिच्या सर्व मैत्रिणींना प्रचंड आनंद झाला.ताई मी हे केले बघ…ताई माझा डान्स बघतेस का…..ताई माझा ड्रेस आवडला का?? …..वगैरे वगैरे …. खरे पहिले तर त्यात मुग्धाशिवाय इतर कोणी मला ओळखतही नव्हते. यांचे वय दिवसागणिक वाढले होते पण मन आणि मेंदू मात्र एखाद्या वर्षभराच्या बालकासारखाच निरागस राहून गेले होते.राग,अहंकार,द्वेष याला त्यांच्या जगात थाराच नव्हता. त्यांना कोणी भेटायला आले तर त्यांना असाच आनंद होतो हे हि तिथल्या संचालिका बाईंनी सांगितले. हेच मी एखाद्या “सबळांच्या” किंवा “अविशेषांच्या” ग्रुप मध्य गेले असते तर कोणी माझ्याकडे ढुंकूनही पहिले नसते 😉 किंवा हीच माझ्या वयाची मुग्धा जर माझ्यासारखीच शहाणी किंवा कदाचित अतिशहाणी असती तर जवळच राहून आम्ही कदाचित जास्त बोललोही नसतो !!
खरेतर हि कशी गम्मत आहे बघा आपल्या या शहाण्यांच्या जगात निरागस असणे हेच विशेष होऊन जाते. शहाण्यांना त्यांची अडगळ वाटून त्यांचे एक वेगळे जग उभे रहाते आणि सामाजिक नावाने एक मोठी संस्थाच नावारूपाला येते.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.