थंडीचे दिवस जवळ आले, की आपल्या महाराष्ट्रीय घराच्या महिन्याच्या किराणा यादीत एका गोष्टीची हमखास वाढ होते, ती म्हणजे बाजरी.
थंडीच्या दिवसात आपण बाजरीची भाकरी, बाजरीची खिचडी, थालीपीठ असे पदार्थ करतो.
बाजरी ही ‘ग्लुटेन फ्री’ असल्याने गव्हापेक्षा किंवा तांदळापेक्षा जास्त आरोग्यपूर्ण असल्याने तिचा वापर आपण एरवी सुद्धा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करू शकतो.
पण तसे करण्याआधी बाजरी इतकी आरोग्यपूर्ण का आहे?
बाजरीचे आपल्या आरोग्यासाठी नेमके फायदे काय आहेत?
हे जाणून घेतले तर तिचा समावेश आपल्या आहारात आपण आनंदाने स्वीकारू शकतो.
चला तर मग, आज जाणून घेऊ बाजरीचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत.
१. प्रोटीन्स जास्त प्रमाणात आढळतात
बाजरी या धान्यात प्रोटीन्स जास्त प्रमाणात असतात.
खासकरून शाकाहारी लोकांसाठी बाजरी म्हणजे प्रोटीनचे चांगला स्त्रोत आहे.
आपल्याला प्रोटीनची गरज जशी शरीरातील झीज भरून काढण्यासाठी होते, तसेच आपले स्नायू बळकट करायला, म्हणजे शरीरातील मसल्स डेव्हलप करायला प्रोटीन गरजेचे असतात.
२. फायबर जास्त प्रमाणात असतात
आपण प्राशन केलेल्या अन्नाचा पचनासाठी फायबर हा सगळ्यात महत्वाचा घटक असतो.
फायबरमुळे आपल्या आतड्यात असणाऱ्या ‘गुड बॅक्टेरीया’ची वाढ होते ज्यामुळे आपली पचनशक्ती वाढते.
पचनशक्ती वाढल्याने पचनाचे किरकोळ त्रास, कॉन्स्टीपेशन इत्यादी होत नाहीत.
फायबरचे अजून दोन मुख्य फायदे आहेत.
आहारात फायबरचे प्रमाण जास्त असेल तर आपले पोट लवकर भरते आणि भूक लागायचे प्रमाण कमी होते.
यामुळे दोन जेवणांच्या मधले खाणे कमी होते.
म्हणूनच वजन कमी करण्यासाठी फायबर युक्त आहार फायदेशीर असतो.
वजन कमी करायचे असेल तर बाजरीची भाकरी खावी असे म्हणतात ते याच कारणासाठी.
पोळी किंवा भाताच्या ऐवजी जेवताना बाजरीची भाकरी खाल्ली तर वजन कमी करण्यासाठी उपयोग होतो.
३. मधुमेहींसाठी उपयुक्त
बाजरीमध्ये मॅग्नेशियम हे खनिज जास्त प्रमाणात आढळते.
आपल्या शरीरातील मॅग्नेशियमचे प्रमाण कमी झाले तर इन्शुलीनचे योग्य प्रमाणात उत्पादन होत नाही ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते.
म्हणूनच मधुमेहींसाठी मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असलेले पदार्थ उपयुक्त असतात आणि बाजरी त्यापैकीच एक आहे.
४. कोलेस्टेरॉल कमी करते
बाजरीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात.
यामुळे शरीरातील लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल, जे शरीरासाठी हानिकारक असते ते कमी होते आणि हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल, ज्याला गुड कोलेस्टेरॉल असे सुद्धा म्हणतात ते वाढते.
म्हणूनच ज्यांना कोलेस्टेरॉल किंवा इतर हृदयाचे विकार असतील त्यांच्यासाठी बाजरी हा एक चांगला पर्याय आहे.
५. हृदयाच्या आरोग्यासाठी लाभदायक
मॅग्नेशीयम आणि पोटॅशियम जास्त प्रमाणात आढळत असल्याने बाजरी हृदयासाठी लाभदायक असते.
आपल्या शरीरात सोडियम आणि पोटॅशियमचा समतोल असणे फार महत्वाचे आहे.
शरीरातील सोडियमची पातळी वाढली तर उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.
पोटॅशियम आपल्या शरीरातील सोडियमची पातळी कमी करते.
म्हणूनच ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी बाजरी अतिशय फायदेशीर आहे.
५. पित्ताचा त्रास कमी करते
पोटात काही कारणाने ऍसिडचे प्रमाण जास्त झाल्याने ऍसिडिटी म्हणजेच पित्ताचा त्रास होतो.
पोटात वेगवेगळ्या कारणांमुळे acid चे प्रमाण वाढू शकते जसे की वेळेत जेवण न करणे, पित्तकारक पदार्थ जास्त प्रमाणात खाणे.
बाजरी ही पित्त शमवण्यासाठी उपयुक्त असते कारण तिच्यात अल्कली गुणधर्म असतात.
म्हणूनच पित्ताचा त्रास होत असल्याच बाजरीची भाकरी किंवा खिचडी खाल्ल्याने त्वरित आराम मिळतो.
६. अँटिऑक्सिडंट्स चे प्रमाण जास्त असते
अँटिऑक्सिडंट्स आपल्या शरीरातील पेशींचे फ्री रॅडिकल्स या द्रव्यापासून रक्षण करत असतात.
निरोगी राहण्यासाठी आहारात जास्तीतजास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्सचा समावेश केला पाहिजे.
यामुळे आपली रोग प्रतिकारशक्ती सुद्धा वाढते.
बाजरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात त्यामुळे तिचा समावेश आपल्या आहारात केला तर आपल्या आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले असते.
थंडीच्या दिवसात आपल्याला सर्दी, खोकला यासारखे आजार पटकन होतात त्यामुळे विशेषतः थंडीच्या दिवसात बाजरीचे पदार्थ खाल्ले तर ते चांगले असते.
७. ऍनेमिया वर हमखास उपाय
आपल्या रक्तात दोन प्रकारच्या पेशी असतात, पांढऱ्या रक्तपेशी आणि तांबड्या रक्तपेशी.
या पैकी पांढऱ्या रक्तपेशी या विविध आजारांपासून आपले संरक्षण करण्यात कार्यरत असतात.
तांबड्या रक्तपेशी या हिमोग्लोबिनच्या मदतीने आपले शरीरातील इतर पेशींना प्राणवायूचा पुरवठा करत असतात.
पण काही कारणाने जर या रक्तपेशींची संख्या कमी झाली तर हिमोग्लोबिनची सुद्धा कमरता होते.
यालाच ऍनेमिया म्हणतात.
यामुळे थकवा जाणवू लागतो. आहारात तर आयर्न या खनिजाचे प्रमाण वाढवले तर रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते.
बाजरीमध्ये आयर्न जास्त प्रमाणात आढळते.
व्हिटामिन बी-9, म्हणजे फॉलिक ऍसिड हे शरीरात नवीन पेशी, खासकरून तांबड्या रक्तपेशी तयार करण्यासाठी मदत करते.
बाजरीमध्ये हे व्हिटामिन सुद्धा जास्त प्रमाणात असते.
या दोन्ही गोष्टींमुळे बाजरी ही ऍनेमियाचा त्रास दूर करण्यासाठी उत्तम असते.
८. हाडांच्या आरोग्यासाठी चांगली
बाजरीमध्ये फॉस्फरस हे खनिज अधिक प्रमाणात आढळते. हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शियम बरोबर फॉस्फरस सुद्धा गरजेचे असते.
ही दोन्ही खनिजे मिळून हाडांना बळकट करतात.
त्यामुळे आहारातून जास्तीतजास्त प्रमाणात काल्शियम आणि फॉस्फरस घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे.
बाजरीचे पदार्थ खाण्याचा हा एक महत्वाचा फायदा आहे.
९. त्वचेसाठी फायदेशीर
बाजरीमध्ये खनिजे जास्त प्रमाणात आढळतात.
बाजरीमध्ये असेच एक महत्वाचे खनिज, जे जास्त प्रमाणात असते ते म्हणजे झिंक.
झिंक हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते.
झिंकमुळे त्वचा टवटवीत दिसते तसेच त्वचेच्या तक्रारी जसे की पिंपल्स सुद्धा दूर होतात.
म्हातारपणामुळे चेहऱ्याला येणाऱ्या सुरकुत्या सुद्धा शरीरात झिंक योग्य प्रमाणात असेल तर कमी होतात.
निरोगी आणि टवटवीत त्वचा असेल तर नियमितपणे बाजरीचे सेवन अतिशय लाभदायक असते.
१०. डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगले
बाजरीच्या नियमित सेवनाने शरीरात व्हिटामिन ए तयार होण्यासाठी मदत होते.
व्हिटामिन ‘ए’ डोळ्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी असते. यामुळे डोळ्यांचे विकार दूर होतात.
रातांधळेपणाचा त्रास सुद्धा व्हिटामिन ‘ए’ चे प्रमाण योग्य असेल तर कमी होतो.
बाजरीचा एवढासा दाणा असतो पण किती बहुगुणी असतो, हे हा लेख वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेल.
या नंतर तुम्ही सुद्धा तुमच्या आहारात जास्तीतजास्त प्रमाणात बाजरीचा समावेश करालच, हो न?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.