आज समोर तोच उधाणलेला समुद्र होता, तीच ती किना-यावरची ओलेती वाळू होती अन् तिच्यात बळेच पाय रोवून उभे रहाण्याचा तसाच निष्फळ प्रयत्न करत उभी असलेली प्रिती….
धिरगंभीर, त्या खवळत्या समुद्राच्या लाटांसारखीच, विचारांच्या लाटा मनात उसळत असलेली. वेगळाच हलकल्लोळ माजला होता तिच्या मनात विवीध प्रश्नांचा. म्हणून ती आलेली होती तिच्या या जिवलग सागरमित्राकडे, या आशेवर की कदाचित त्याच्याकडे असतील तिच्या गहन प्रश्नांची उत्तरे. सगळंच आवडीचं होतं तिच्या, हा सागरी किनारा, मावळतीचा सुर्य, बसण्यासाठी रुपेरी वाळूचा गालिचा. खूप आधार वाटायचा तिला त्याचा. त्याच्या लाटांकडे आश्वासक नजरेने बघताना तिच्या मनातल्या विचारांच्या लाटा कधी शमायच्या तिचं तिलाच कळायचं नाही. तशीच ती आज ही आलेली होती त्याच्याकडे हवालदिल होऊन.
प्रिती, एक पस्तिशीतील देखणी तरुणी. रुपाची खाणच जणू. निसर्गाने तिच्यावर सौंदर्याची मुक्तहस्ताने उधळण केली होती. तिची भेदक नजर, समोरच्याला क्षणात घायाळ करेल अशी मिठी छुरी, तिचा बोलका चेहरा, मनातले प्रत्येक भावविश्व उलगडणारा बिलोरी आरसा, तिचं लाघवी बोलणं, कुणालाही चटकन् आपलसं करणारं, तिचं आरसपानी सौंदर्य, एका दृष्टीक्षेपात वेड लावणारं. आणि भरीस भर म्हणून सरस्वतीने तिला अर्पण केलेला शब्दसंभार अन् त्यातून निघत असलेली असंख्य काव्यसुमने. जणु काही निसर्गातील सर्व चुंबकशक्ती तिच्यात सामावली होती. तिच्याशी मैत्री करायला, या ना त्या निमीत्ताने तिच्याशी संवाद साधायला, तिला आपलसं करायला, तिच्या सोबत विवाह करायला तर सगळे आतूर झाले होते. तिचा मेल बाॅक्स अशा आतुरलेल्या उनोळखी मेसेजेस् नी रोज वहात असायचा. पण तिने कुणालाही वाजवीपेक्षा जास्त जवळ येवू दिलं नाही. एका खाजगी बॅंकेत वरिष्ठ जागेवर प्रिती कार्यरत होती. पण एवढं सगळं असुनही एका अनाथ वयस्कर मावशीसोबत आलिशान ब्लाॅकमधे पण आपल्या रोगट भुतकाळासोबत जबरदस्तीचं एकाकी जीवन रेटत होती प्रिती. कारण ‘एक घटस्फोटीता’ असा क्रुर शाप माथी लागला होता तिच्या.
आणि त्यामुळे हे दुभंगलेल्या शापित जीवनाचं रहाटगाडगे हताशपणाने रेटत ती पुढील आयुष्य कंठीत होती, सोबतच्या मित्रमैत्रिणींचे फुलणारे प्रेमळ संसार हताश डोळ्यांनी बघत, निराशेचे सुस्कारे सोडत, पश्चात्तापाचे कडू घोट जबरदस्तीने रिचवीत. तिचं हे लग्न म्हणजे तिच्या आयुष्यातली घोडचूक होती. अवघ्या १.५ वर्षांचा तिचा संसार, पण वाटोळं केलं त्यानं तिच्या आयुष्याचं. किती सुंदर इमले रचले होते तिने सोनेरी चंदेरी सुखी स्वप्नांचे, पण सगळ्याची माती केली त्याने. भयानक मानसिक त्रास, प्रसंगी मारहाण, दारुचं व्यसन, पैशांचा हव्व्यास, चारित्र्यावरुन सतत संशय, एक ना हजार गोष्टी. शेवटी सगळं असह्य झालं आणि महत्प्रयासाने घटस्फोट मिळवून सुटली प्रिती त्या संसार नावाच्या नरकातून.
पण आत्ता तिच्या इथे येण्याचे कारण ही तसेच होते. तिच्या समोर एक यक्षप्रश्न उभा ठाकला होता आणि तो होता तिच्या जवळच्या मित्राचा, वरद चा प्रस्ताव. वरद, तिॆशीतलं उमदं, तडफदार, रुबाबदार व्यक्तिमत्व. उंचापुरा, देखणा तरुण. अतिशय हुशार, गणिताचा गोल्ड मेडलिस्ट आणि एका मल्टिनॅशनल कंपनीचा मालक. अजुनही अविवाहीत होता तो, कारण शिक्षण व करिअरच्या मागे धावता धावता त्याचं लग्नाचं वय कघी टळून गेलं त्याचं त्यालाच कळलं नाही. किती तरी मुलींच्या पालकांनी त्याच्या घराचे, आॅफिसचे उंबरठे झिजवले होते त्याला जावई करुन घेण्यासाठी. त्याच्याशी मैत्री करायला, जवळीक साधायला कित्येक मुलींनी फोन, मेसेजेस अगदी सोशल साईटस् पालथ्या घातल्या होत्या पण ह्या पठ्ठ्याने कुणालाही दाद दिली नाही.
पण हाच वरद प्रितीच्या प्रेमात वेडा झाला होता. तिच्या अतिसुंदर, नैसर्गिक, व्यक्ताव्यक्त, नवरस भावनांनी ओथंबलेल्या कवितांच्या कल्पनाविॆश्वात तो आकंठ बुडाला होता. त्यातल्या प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक व्यक्तिरेखेत तिला अन् स्वत:ला बघत होता. तिच्या अारसपानी सौंदर्याच्या मोहजाळात पुरता अडकला होताच पण तिच्या गोड लाघवी बोलण्याची, निष्पाप विचारांची, स्वच्छ खळखळून हसण्याची मोहिनी च पडली होती त्याच्यावर. पण हे तिच्या बाबतचे भावविश्व त्याने अजून व्यक्त केलं नव्हतं कधी तिच्याजवळ.
प्रिती आणि वरद मधली निर्भेळ निर्मळ मैत्री हळुहळु वाढत जात होती. एकमेकांचे वैयक्तीक जीवन एकमेकांकडे व्यक्त होत होतं. सुखदुःखाचे कोमल क्षण वाटले जात होते. कधी सोशल साईटवर तर कधी फोनवर. प्रत्यक्षात कधीही भेटले नव्हते ते आत्तापर्यंत एकमेकांना, तरी त्यांच्या ही नकळत ते मनाने एकमेकांच्या खुप जवळ आले होते आणि अशातच एक दिवस एका कातरवेळी वरद ने तिला फोन करुन खूप अदबीने तिच्या समोर प्रस्ताव ठेवला, “व्हर्चुअल रिलेशनशिप” चा. वरद प्रितीच्या प्रेमात एवढा आकंठ बुडाला होता की तिच्या साठी जन्मभर अविवाहित रहाण्याचा निर्धार केला होता त्याने.
का? तर एक तर तिच्या जागी कुठल्याही दुस-या मुलीला तो सहचारिणी म्हणून सहन करु शकत नव्हता व दुसरे म्हणजे असे की काही वर्षापुर्वी झालेल्या एका अपघाताचा परिणाम म्हणुन, पुरुषत्वाची सगळी कुवत असतानाही वरद पितृत्व उपभोगू शकत नव्हता आणि त्यामुळेच कोणत्याही स्त्रीला त्याला मातृत्वापासून वंचीत ठेवायचे नव्हते. वरद ने सरळ सरळ प्रितीला सांगितले, “मी तुझ्या शिवाय जगण्याचा विचार ही करु शकत नाही. माझ्या सभोवताली सगळीकडे मला तूच भासतेस. प्रत्येक श्वासागणिक मला तुझी आठवण येते. मी जगत नाही तर माझ्या श्वासांत तू जगतेस. जोपर्यंत तू आहेस, मी जगणार. पण अस असुनही, केवळ पत्नी बनवून ही तुझा मातृत्वाचा अधिकार मी तुला देऊ शकणार नाही, म्हणुन मला आपल्यात फक्त “व्हर्चुअल रिलेशनशिप” ठेवायची आहे. ज्या ज्या भावनिक तसेच शारिरीक संबंधांचं स्वर्गसुख आपण एक पती पत्नी म्हणून प्रत्यक्षात उपभोगलं असतं ते आपण ”शाब्दिक विश्वात’, फोन आणि मेसेजेस् च्या विश्वात उपभोगुया”.
प्रिती हे सगळं ऐकून निशब्द आणि अवाक च झाली. काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं तिला काही सुचत नव्हतं. हे कसले अतर्क्य विचार? हे असं नातं निभावणं ते ही आयुष्यभर एकमेकांना न भेटता, एकमेकांपासून लांब राहुन? जवळ जवळ अशक्य आहे. विचार करुन डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली तेव्हा तिने स्वतः ला सावरलं, पटपट आवरलं आणि ती तिच्या सागरमित्राच्या भेटीसाठी झपझप पावलं टाकतं चालू लागली. कधी एकदा मित्राला भेटतेय आणि त्याच्याशी हितगुज करतेय असं तिला झालं. पण का कोण जाणे, जसजशी ती सांजवेळच्या रुपेरी ओलेत्या वाळुवरुन चालत सागराच्या शितल लाटांमधे विसावली तसतसं तिच्या डोक्यातलं विचारांचं झंजावाती वादळ हळुहळु शमू लागलं.
आजवरच्या सगळ्या संवादांना व शाब्दिक सहवासाला तिने परत आठवलं आणि तिला हे जाणवायला लागलं की वरद चे हे सगळे विचार धाडसी, कदाचित आततायी वाटत असले तरी प्रामाणिक आहेत, पाण्यासारखे निर्मळ, पारदर्शक आणि फुलासारखे कोमल पवित्र आहेत, स्वार्थाचा लवलेश ही नाही त्यांत. तिला हल्ली चे काही दिवस आठवले आणि तिला हे जाणवायला लागलं की ती ही वरदकडे तिच्या ही नकळतच अलगद खेचली जाऊ लागली होती. त्याच्या मेसेजेस आणि बोलण्यातून ओथंबुन वहाणारं तिच्या विषयी चं अदृश्य प्रेम, शब्दागणिक दिसणारी, जाणवणारी त्याची तिच्या विषयीची काळजी, त्याच्या मधाळ आवाजातला गोडवा, त्याचं भारदस्त व्यक्तिमत्व आणि एकंदर त्याच्या सर्व अस्तित्वाचीच तिला भुरळ पडू लागली होती. त्याच्या मेसेजेस ची फोन काॅलस् ची ती वाट बघू लागली होती, मोबाईल कायम जवळ बाळगू लागली होती. तिला ही जाणवलं की ती ही त्याच्या प्रेमात पडली होती. तो आणि त्याचा सहवास तिला ही हवाहवासा वाटू लागला होता.
पण तरी ही, त्याचा हा प्रस्ताव तिला पटत नव्हता. चुकीच्या माणसाशी लग्न करुन तिचे सर्व मौल्यवान आयुष्य, तरुणाई ची सगळी दिवा स्वप्ने, सुखी संसाराचे मनात बांधलेले इमले, सगळच सरसकट धुळीला मिळालं. समस्त पुरुष जातीवरील तिचा विश्वास उडाला म्हणूनच दरम्यान पुनर्विवाहाच्या इतक्या संधी आल्या तरी ती अविवाहित राहिली होती. कुणालाही तिने जवळ येऊ दिले नाही. पण वरद तिला आवडला होता, तिला त्याचा “व्हर्चुअल” नाही तर प्रत्यक्ष सहवास हवा होता.
तिने जे पहिल्या लग्नाच्या घोडचुकीमुळे गमावलं, ज्या स्वप्नांची माती झालेली तिने स्वतः पाहिली, तीच स्वप्ने तिला परत वरद बरोबर बघायची होती. तिला जन्माचा साथीदार म्हणून वरद हवा होता. तिला ते अलौकिक प्रेम हवं होतं ज्याची ती एक माणूस म्हणून हकदार होती, ज्या प्रेमासाठी ती आसुसलेली होती. जे मधुर क्षण तिने गमावले ते तिला परत जगायचे होते. पण अचानक तिला वरद चा प्रस्ताव आठवला आणि ती एकदम भानावर आली. ती पुन्हां विचारांच्या जाळ्यात अडकत चालली होती, की त्याच्या ह्या जगावेगळ्या प्रस्तावाला स्विकारुन त्याला होकार द्यावा आणि “व्हर्चुअल रिॆलेशनशिप” मान्य करावी की त्या विचारांपासून त्याला परावृत्त करण्यासाठी शक्य तितक्या प्रयत्नांची बाजी लावावी, त्याला मनवावं?
शेवटी मनामधल्या ह्या विचारांच्या द्वंद्वाने उचल खाल्ली, विचारांशी एवढं झगडून ही उत्तर न मिळाल्याने हरलेली बिचारी प्रिती हिरमुसली आणि एका क्षणी अगतिकतेच्या अश्रूंच्या गंगाजमुना भरल्या डोळ्यांतून बरसू लागल्या. आता या वाळूत विसावावे आणि गालावरच्या खा-या डोहांना वाळूतच वाट करुन द्यावी, या सुलभ विचाराने प्रिती मागे वळणार, तोच तिच्या खांद्यांना एका अाश्वस्थ हाताचा स्पर्श जाणवला. का माहित नाही, पण प्रत्यक्षात कधीही न जाणवलेला तो हात तिला आज खूप परिचयाचा वाटला. तिने मागे वळून पाहिले तर तिच्या डोळ्यांना जे दिसले त्यामुळे तिला हर्षोल्हासामुळे वेड लागायचे फक्त बाकी राहिले होते.
तिचा तिच्या डोळ्यांवरच काय, पण नशिबावर पण विश्वास बसेना, कारण समोर वरद उभा होता. तोच वरद, जो आत्तापर्यंत व्हर्चुअल रुपातूनच तिच्या समोर आला होता तो प्रत्यक्षात तिच्या समोर उभा होता, त्याच्याच विचारांचे अभेद्य रण जिंकुन आलेला शुर योद्धा. वरद ने मंद हसून तिचा हात हातात घेण्यासाठी हात पुढे करायचा अवकाश, प्रिती च सगळं अवसान गळालं अन् आनंदातिशयाने तिने त्याला कडकडून मिठी मारली आणि आत्तापर्यंत च्या अव्यक्त भावनांना त्याच्या आश्वस्थ बाहुपाशांत वाट मोकळी करुन दिली व म्हणाली, “का रे असं वागलास तू? का मनातल्या माझ्याबद्दल च्या उत्श्रुंखल भावनांना असं दडपत दाबत आलास? या आधीच का नाही व्यक्त केलस हे अलौकिक प्रेम माझ्याकडे? का स्वतःच्या सुखी वैवाहिक जीवनाच्या हक्काला तिलांजली देत, स्वतःच्या पुरूषत्वाला अपूरं ठेवलस, माझ्यातल्या स्त्रीला पुर्णत्व देण्यासाठी? मला चालेल मातृत्व मिळालं नाही तरी, मी तुझ्यासाठी त्याचा ही त्याग करायला तयार आहे, पण मला तू हवा आहेस जीवनाचा साथीदार म्हणून. भागीदार म्हणून हवा आहेस, माझ्या अपुर्ण जीवनाला परिपुर्ण करण्यासाठी. माझ्या मर्त्य मनाच्या ओसाड वाळवंटात, प्रेमभावनांच्या अगणित सुवासिक फुलांचे ताटवे फुलवण्यासाठी. माझा श्वास बनून मला तुझ्यासवे जगण्यासाठी. एकदा हो म्हण ना? मी नाही रे असं नुसतं शब्दांच्या विश्वात जगू शकत. मला तुझा खराखुरा सहवास हवा आहे. शेवटच्या श्वासापर्यंत….. निरंतर”, असे म्हणून त्याच्या छातीवर डोकं ठेवलं, डोऴे मिटले आणि स्पुंदून स्पुंदून रडू लागली.
वरद बराच वेळ तिच्या पाठीवरुन प्रेमाने हात फिरवत तिला घट्ट मिठीत कवटाळून उभा राहिला. थोड्या वेळाने ती शांत झाल्यावर त्याने तिचा लाजेने लाल झालेला मुखचंद्रमा हनुवटी ला धरुन हलकेच उचलला, तिच्या कपाळाचे दिर्घ चुंबन घेतले आणि म्हणाला, “वेडाबाई, मी माझ्या प्राणांच्या पलीकडे तुझ्यावर जीव ओतून प्रेम करतो. तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम च नाहीस, माझ्या जगण्याच एकमेव कारण आहेस तू. मलाही तू माझ्या सहचारिणी च्या रुपात हवी आहेस. तुझ्या सुखदु:खांचा भागीदार व्हायचय मला, अगदी जवळून. तू माझ्या गात्रांतून वहाणारा माझा श्वास आहेस वेडे, मी तुला माझ्या पासून विलग कसा करेन? मरुन जाईन मी तुझ्यापासून विलग होण्याच्या नुसत्या विचारानेच. तुझ्यामधेच जगणार मी..शेवटच्या श्वासापर्यंत!!!”
मावळतीच्या सुर्याला कवेत घेतलेल्या प्रितीच्या सागरमित्राला आज आनंदाचे ऊधाण आले होते आणि लाटा व किना-याच्या मधुमिलनाच्या साक्षीने अजून एक गोड प्रेमकहाणी निसर्गाच्या पटलावर कोरली जात होती.
याही कथा तुम्हाला खूप आवडतील 🎁🎁
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Khup mast kharch prame asach Aste
खूप मनापासून आभार सखी