‘चांद्रयान २’ अंतराळातल्या एका स्वप्नाचा प्रवास (भाग १)…

भारताची पहिली चंद्र मोहीम सुरु होण्याआधीच भारताने चांद्रयान २ मोहिमेची आखणी सुरु केली होती. रशियाची ‘रॉसकॉसमॉस’ आणि भारताची ‘इस्रो’ ह्यांनी २००७ मध्येच एक करार केला. त्यानुसार ‘ऑरबिटर’ आणि ‘रोव्हर’ ची जबाबदारी इस्रो ने उचलली तर चंद्रावर उतरायला लागणाऱ्या लॅन्डर ची जबाबदारी ‘रॉसकॉसमॉस’ने उचलायची असं ठरलं.

पण ‘रॉसकॉसमॉस’ ला आलेल्या मंगळाच्या फोबोस- गृंट मिशनच्या अपयशानंतर त्यांनी भारतासोबत झालेल्या करारातून काढता पाय घेतला. २०१० च्या आसपास अपेक्षित असलेली चांद्रयान २ मोहीम २०१५ पर्यंत पुढे ढकलली गेली. रशिया ने असमर्थता दाखवल्यावर इस्रो ने लॅन्डर बनवण्याची जबाबदारी स्वतः उचलायचं ठरवलं. ह्या मिशन ला वेगवेगळ्या तांत्रिक चाचण्यातून पूर्ण पास करण्यासाठी पुढे अजून ४ वर्षाचा कालावधी लोटला. आता १५ जुलै २०१९ ला जवळपास १० वर्षानंतर पुन्हा एकदा भारत चंद्राकडे झेपावत आहे. चंद्रावर मानव जाऊन इतका कालावधी लोटल्यावर पुन्हा एकदा चंद्रावर का जायचं? किंवा भारताने चंद्राची निवड का करावी? चंद्रावर नक्की जाऊन इस्रो काय करणार? इस्रो च्या ह्या चांद्रयान मोहिमेचं जागतिक पटलावर महत्त्व हे सगळेच प्रश्न सामान्य माणसाच्या मनात येणं स्वाभाविक आहे.

चांद्रयान २

‘चंद्र’ पृथ्वीचा एकमेव उपग्रह ज्याचा अभ्यास अनेकवेळा केला गेला आहे. पण ह्याच चंद्राच्या अनेक बाबी आजही गुलदस्त्यात आहेत. २००८ साली भारताच्या चांद्रयान १ मोहिमेतून चंद्रावर पाणी असल्याच्या निष्कर्षावर शिक्कामोर्तब झालं होतं.

हा शोध २१ व्या शतकातील अवकाश संशोधनातील एक मैलाचा दगड मानण्यात येतो. ह्यावेळी इस्रो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर स्वारी करत आहे. चंद्राचा दक्षिण ध्रुव का निवडला ते तिकडे जाण्यातील तांत्रिक अडचणी? ह्याच्या उत्तरासाठी आपल्याला थोडं चंद्राच्या ह्या भागाची माहिती असणं गरजेचं आहे.

चंद्राचा दक्षिण ध्रुव रहस्यमयी आहे. कारण ह्याच्या काही भागात आजवर कधीच सूर्याचा प्रकाश पोहचलेला नाही तर काही भागात नेहमीच सूर्य तेजाने तळपत असतो. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या ज्या भागावर सूर्य आजवर कधीच उगवलेला नाही त्या भागात चंद्राचं पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असण्याची शक्यता आहे. चंद्राच्या पाण्याचं स्वरूप जर समजून घ्यायचं असेलं तर ह्या बर्फाचा अभ्यास वैज्ञानिकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

चंद्राच्या ह्याच भागात अनेक विवरं आहेत. जी उल्कापातामुळे तयार झाली आहेत. ह्या विवराला सूर्याचा प्रकाश स्पर्श करत नसल्यामुळे ह्या मधील अनेक महत्त्वाच्या गोष्टी ज्या भौतिक, रसायन आणि भूगोलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्या आजही जपल्या गेल्या आहेत. पुढल्या भविष्यात जर चंद्रावर आपलं दुसरं घर बसवायची वेळ आली तर चंद्राचा दक्षिण भाग हा सगळ्यात महत्वाचा असणार आहे. बर्फाच्या स्वरूपात असलेलं पाणी मानवाची प्राथमिक गरज भागवू शकेल. तसेच ह्या भागातील जमीन प्रचंड अश्या खनिजांनी ओतप्रोत आहे. ज्यात हेलिअम ३ चा ही समावेश आहे. हेलिअम ३ कडे मानवाच्या भविष्याचा उर्जेचा स्रोत म्हणून बघण्यात येते आहे. चंद्राच्या ह्याच भागात अनेक डोंगर असून इकडे असलेलं एपीसिलोन टोक हे पृथ्वीवर असणाऱ्या कोणत्याही डोंगरापेक्षा जास्ती उंचीचं आहे. चंद्रावर जास्तीत जास्त काळ सूर्यप्रकाश ह्याच भागात पडतो. त्यामुळे सगळ्यात जास्त काळ सौर उर्जा मिळवण्याचं ठिकाण पण दक्षिण ध्रुवच आहे. (विनीत वर्तक ©)

आजवर झालेल्या चांद्रयान मोहिमा ह्या चंद्राच्या मध्य भागाच्या आसपास झालेल्या आहेत. दक्षिण ध्रुव हा भाग पूर्णतः माहीत नसलेला भाग आहे. ह्यामुळेच इकडे उपग्रह यान किंवा रोव्हर उतरवणं प्रचंड कठीण काम आहे. सूर्यप्रकाश पोहचत नसल्याने इकडे ‘रोव्हर’चं आयुष्य ही खूप कमी असणार आहे. अश्या प्रचंड प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा इस्रो ने चंद्रयान २ मोहिमेचं स्वप्न बघून ती प्रत्यक्षात उतरवली आहे. ह्या मोहिमेत इस्रो आधी सांगितलं त्या प्रमाणे ऑरबिटर, लँडर आणि रोव्हर नेत असून ह्यातील ऑरबिटर चंद्राच्या कक्षेत फिरत राहणार आहे. तर लॅन्डर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार असून ह्यातील रोव्हर चंद्राच्या जमिनीवर विहार करणार आहे. ह्या तिन्ही गोष्टींवर वेगवेगळी उपकरण असून चंद्राच्या अनेक बाबींचा ती अभ्यास करणार आहेत.

चांद्रयान १ वर असलेल्या नासा (अमेरिका) च्या उपकरणाने चंद्रावर पाणी असल्याचा शोध लावला होता. हे उपकरण भारताने कोणतेही पैसे न घेता वैज्ञानिक दृष्टीने चंद्रावर नेलं होतं. ह्या वेळेसही चांद्रयान २ वर असलेल्या १४ उपकरणांपैकी १३ भारतीय असून १ उपकरण नासाचं असणार आहे. ह्याही वेळेस भारत कोणतेही पैसे न घेता नासा चं हे उपकरण नेतो आहे. ह्यासाठी नासा भारताला आपलं डीप स्पेस नेटवर्क वापरण्याची मुभा देणार आहे. नासाचं डीप स्पेस नेटवर्क जगात अग्रगण्य असून इंटर प्लॅनेटरी मिशन जसे की चांद्रयान २ च्या संपर्क आणि संवादासाठी भारताला ह्याची अत्यंत गरज भासणार आहे.

क्रमश:


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी किंवा तुमचे स्वतःचे लेखन मनाचेTalks वर प्रकाशित करण्याची इच्छा असल्यास येथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।