मला दिसलेलं न्यूयॉर्क : मुंबई आणि न्यूयॉर्कची अनोखी तुलना

लेखक : बिपिन कुलकर्णी

संपूर्ण अमेरिका एका बाजूला तर फक्त न्यूयॉर्क दुसऱ्या बाजूला… अमेरिकेची इतर शहरे एकाच धाटणीची — म्हणजे खूप पसरलेली, गर्दीपासून कोसो मैल दूर, रस्त्यावर शिस्तीत धावणारी वाहने, मोकळी चाकळी घरं आणि मुख्य म्हणजे रस्त्यांवर अभावाने होणारे मनुष्य दर्शन!! याच्या अगदी विरुद्ध मला दिसलेलं न्यूयॉर्क… अमेरिकेची इतर शहरे स्केलवर मोजायची झाली तर न्यूयॉर्कला डेन्सिटीमध्ये मोजावे लागेल, म्हणूनच या अशा वेगळ्या शहराला अमेरिकेमधले आटपाट नगर म्हणायला हवं!!

न्यूयॉर्क म्हणजे मुंबईचं जुळं भावंड

मुंबईचं जुळं भावंडं वाटावं असं हे शहर… एकाला एक लागून असलेल्या असंख्य इमारती, रस्त्यावर दिसणारी वाहनांची आणि माणसांची प्रचंड गर्दी, रस्त्यावर होणारी ट्रॅफिक जॅम, मधूनच वाजणारे गाड्यांचे हॉर्न, धावणाऱ्या पिवळ्या टॅक्सिज, छोटी छोटी दुकाने, रेस्टॉरंट्स… पब्लिक ट्रान्सपोर्टचे जाळे — या सगळ्या गोष्टी पाहताना आपल्याला सतत मुंबईची आठवण करून देत राहतात.

न्यूयॉर्क शहर पाच मुख्य बेटांचे तर मुंबई सात बेटांचे… न्यूयॉर्कच्या पाच बेटांना जोडणारी सबवे आहे तर मुंबईला जोडणारी लोकल ट्रेन… प्रत्येक शहराच्या जडणघडणीत जेवढा वाटा श्रीमंतांचा असतो त्याहून किंचित जास्त वाटा गरीब जनतेचा असतो कारण गरीब लोकच शहरे घडवतात. त्यामुळे या अशा मोठ्या शहरात गरिबातल्या गरिबाला किंवा नवकोट नारायणाला त्याच्या ऐपतीप्रमाणे खाण्याची असंख्य ठिकाणे आपोआप निर्माण होत जातात.

वडापाव vs फूड ट्रक : दोन शहरांची खाद्यसंस्कृती

मुंबईमध्ये जागोजागी वडापावच्या गाड्या आहेत तर न्यूयॉर्कमध्ये फूड ट्रक आहेत… मुंबईमध्ये चहाचे ठेले आहेत तर न्यूयॉर्कमध्ये जागोजागी कॉफी शॉप्स आहेत… न्यूयॉर्कमध्ये मर्लिन मन्रोचे मादक सौंदर्य आहे तर मुंबईमध्ये मधुबालेचं अस्सल भारतीय सौंदर्य आहे… न्यूयॉर्क पाहताना तोंडातून “wow” निघते तर मुंबईमध्ये निघते “अबब”! नावीन्य, तारुण्य, बेहोशी, विविधता आणि मुख्य फॅशन — अशा या सगळ्या गोष्टी या दोन्ही शहरांना चिरतरुण ठेवतात.

न्यूयॉर्कच्या नावाभोवती असलेलं वलय

न्यूयॉर्क शहराच्या नावाभोवती एक वलय आहे… तिथे असलेल्या “लिबर्टी ताई”बद्दल लहानपणापासून ऐकलेले आणि वाचलेले असते, तिचे चित्र पुस्तकांतून पाहिलेलं असते, त्यामुळे उघड्या डोळ्यांनी स्टॅच्यूकडे पाहताना खूप साऱ्या गोष्टी आठवून जातात…

बॉलीवूडमध्ये अनेकदा पाहिलेला ब्रुकलिन ब्रिज पाहताना डोळ्यांसमोर “कल हो ना हो” सिनेमा तरळून जातो… एकेकाळी जगातली सगळ्यात उंच असलेली एम्पायर स्टेट बिल्डिंग पाहताना अमेरिकेच्या ऐश्वर्याची खात्री पटते. न्यूयॉर्कचा लक्ष्मी रोड म्हणजे Fifth Avenue हा पॅरिसच्या “शॉंझे लिझे”ला तोडीस तोड असतो… सगळ्यात happening place असलेलं आणि बॉलीवूडने ज्याचं ग्लॅमर आम्हाला फार पूर्वीच दाखवलेलं असते ते ठिकाण म्हणजे टाइम्स स्क्वेअर… अशा एक ना अनेक गोष्टींमुळे यापूर्वी न पाहता पण कळत नकळत सतत भेटत गेलेलं हे न्यूयॉर्क!!

मुंबई स्वप्ननगरी तर न्यूयॉर्क कुबेरनगरी

मुंबई स्वप्ननगरी आहे तर न्यूयॉर्क कुबेरनगरी… वॉल स्ट्रीटवर फिरणारे किंवा मॅनहॅटनवर लगबगीने चालणारे लोक पाहिले तर न्यूयॉर्क शहरावर कुबेराने केलेल्या मुक्त उधळणीची कल्पना येते… असे असले तरी एका बाजूला गर्भश्रीमंती तर दुसऱ्या बाजूला रस्त्यावर फिरणारे होमलेस — म्हणजे आपण ज्यांना भिकारी म्हणतो ते लोकही दिसतात.

एक लक्षात घ्यायला हवं — गरिबी हा शाप देश किंवा शहराला नसतो तर मनुष्याच्या भाळी जन्मतःच लिहिलेला असतो. त्यामुळेच कुठलाही देश कितीही प्रगत झाला तरीही गरिबी दिसत राहणारच.

दोन शहरांचा स्वॅग : रिचर्ड्स vs गावसकर

एकूण काय तर न्यूयॉर्कचा स्वॅग विवियन रिचर्ड्सच्या खेळासारखा दबंग तर मुंबईचा स्वॅग सुनील गावसकरच्या खेळासारखा — वरून शांत पण वेळ आल्यावर पेटून उठणारा… दोघेही आपापल्या जागी ग्रेटच!!

अमेरिका म्हणा किंवा न्यूयॉर्क म्हणा — त्यांची आणि आपली संस्कृती वेगळी. आपण भारतीय प्रत्येक ठिकाणी आपल्या संस्कृतीशी नकळत त्यांची तुलना करायचा अट्टाहास करतो… एक लक्षात घ्यायला हवे की आपण या देशाचे पाहुणे आहोत, म्हणून पाहुण्यासारखे राहात उगाच यजमानांच्या देव्हाऱ्यात आपलं कुलदैवत शोधायचा उद्योग करायला नको… तसं केलं तर अपेक्षाभंग होणारच.

पु.ल.नी फार पूर्वीच लिहून ठेवलं आहे — “त्यांची द्राक्ष संस्कृती तर आमची रुद्राक्ष संस्कृती” — त्यामुळे फरक तर असणारच… म्हणून चांगलं ते घ्यायचं आणि त्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा!

दोन शहरांची दुखरी जखम : ९/११ आणि २६/११

अशा या दोन शहरांमध्ये समानता तरी किती असावी?? दुर्दैवाने न्यूयॉर्कला ९/११ ने घायाळ केले तर मुंबईला २६/११ ने… या अश्वत्थाम्यासारख्या भळाळणाऱ्या जखमांचे व्रण घेऊनही दोन्ही शहरे धावतच आहेत… कारण शेवटी थांबला तो संपला!!!


या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment