फास्ट लाईफ मध्ये हीच मोठी समस्या बनू पाहतेय. काही लोक नाईलाज म्हणून वृद्ध मंडळींना “ओल्ड एज होम” मध्ये ठेवणं पसंत करताना दिसतात. पण ही वृद्ध मंडळी तिथं खुश राहू शकतात का? ह्याचा विचार होत नाही. मग वृद्ध त्यात आणखीनच खचून जातात. मग त्यासाठी नक्की काय करायला पाहिजे ते जाणून घेऊ या लेखात.
वृद्ध म्हटलं की काठी टेकत खाली झुकून चालणारी व्यक्ती डोळ्यांपुढं येते. पण सगळेच वृद्ध शरीराने थकलेले दिसत नाहीत.
त्यांचे केस पांढरे दिसतात म्हणून ते वृद्ध वाटतात. काही लोक आपण वृद्ध वाटू नये म्हणून केस काळे करतात.
पण वृद्धत्व हे सगळ्यांनाच येणार असतं. पण काही लोकांना मानसिक त्रास, काळजी, एकटेपण, ह्या गोष्टींमुळे लवकर वृद्धत्व येतं.
मनाने ते खचून गेलेले दिसतात. त्यामुळे शरीर पण थकल्यासारखे दिसायला लागते. काही लोक नोकरीतून रिटायर्ड झाले की त्यांना रिकामपण खायला उठतं.
वयाच्या साठ वर्षापर्यंत ते चांगले कार्यरत असतात. पण रिटायर्ड झाले की लगेचच मनाने एकदम खचायला लागतात.
मनाने खचले की शरीराकडे पण दुर्लक्ष करतात आणि एकदम वृद्ध दिसायला लागतात त्यांचं शरीर दुर्बल होत जातं.
काही वृद्ध आपला जोडीदार आता नाही, आता कोणासाठी जगायचं?
ह्या एकाकी भावनेमुळे लवकर वृद्धत्वाकडे झुकतात. काही वृद्ध जोडपी एकटीच राहतात, त्यांची मुलं उच्च शिक्षणासाठी, किंवा नोकरीसाठी परदेशात गेलेली असतात.
मग असे वृद्ध एकाकी जीवन जगताना दिसतात, त्यांना मानसिक चिंता ग्रासून टाकते. अशी ही वृद्ध मंडळी आपल्याला नेहमी दिसतात… भेटतात.
आपल्याही घरात आपले आई वडील जर वृद्ध असतील तर त्यांना ह्या वृद्धत्वाच्या समस्येतून, उभारी आणण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे, ज्यामुळे वृद्धांच्या चेहेऱ्यावर हसू आणि मन अगदी उत्साहाने भरलेले दिसेल.
हा लेख खास वृद्धांच्या नात्याला खुलवण्यासाठी आणि त्यांची योग्य काळजी कशी घेतली जावी म्हणून तरुणांनाही काही सहज सोप्या टिप्स.
काळ जसजसा बदलत जातो तसतसा आपल्यात सुद्धा बदल घडवून आपण काळाच्या वेगात धावण्याचा प्रयत्न करतो आहोत.
आपली जीवनशैली गतिमान होत चालली आहे. आपला जास्तीतजास्त वेळ हा कामात व्यतीत होतो आहे.
हाती असलेली उच्च पदं, उच्च शिक्षण त्याचा भरपूर मोबदला मिळवण्याची सगळ्यांचीच धडपड चालू आहे. त्यासाठी आपला भरपूर वेळ खर्च होतोय.
ह्यात होतंय काय की आपल्याच घरातल्या किंवा नात्यातल्या वृद्ध मंडळींच्याकडे पाहिजे तसा वेळ द्यायला आपण कमी पडतो आहोत हीच समस्या निर्माण झाली आहे.
आपल्या वडीलधाऱ्या मंडळींबरोबर गप्पा, गोष्टी करायला, त्यांची काळजी घ्यायला, विचारपूस करायला आपल्याकडे वेळच उरत नाही.
म्हणजेच ह्या फास्ट लाईफ मध्ये हीच मोठी समस्या बनू पाहतेय. काही लोक नाईलाज म्हणून वृद्ध मंडळींना “ओल्ड एज होम” मध्ये ठेवणं पसंत करताना दिसतात. पण ही वृद्ध मंडळी तिथं खुश राहू शकतात का? ह्याचा विचार होत नाही.
मग वृद्ध त्यात आणखीनच खचून जातात. मग त्यासाठी नक्की काय करायला पाहिजे ते जाणून घेऊ आणि वृद्धांना पण आनंदी ठेऊ.
१:- आपण कितीही बिझी असलो तरी आपल्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी तासभर वेळ काढून व्यायाम करतोच ना? तसाच व्यायाम आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी पण करावा ह्यासाठी व्यायाम, किंवा योग करण्याची प्रेरणा आपण त्यांना सतत द्यावी.
व्यायामाने वृद्ध मंडळींमध्ये उत्साह, चैतन्य राहील, आणि त्यांचं मनोबल वाढेल. स्मरणशक्ती शाबूत राहील, आणि रोग प्रतिकार शक्ती वाढेल. त्यामुळे ते धडधाकट राहतील. कार्यरत राहतील.
२:- वडीलधाऱ्या मंडळींनी आपलं काही दुखलं खुपलं तर आपली जशी काळजी घेतलेली असते तशी काळजी आपण सुद्धा त्यांची घेतली पाहिजे.
म्हणजे शरीराला काही जखम वगैरे झाली तर ताबडतोब प्रथमोपचार करावेत. जास्त त्रास वाटल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा.
३:- व्यायाम करणाऱ्या वृद्ध मंडळींना सहसा जास्त त्रास होत नाहीत पण व्यायाम न करणाऱ्या वृद्धांना मानसिक दुर्बलता येते.
त्यातून अल्झायमर, डिमेन्शिया, अशा आजारांना सामोरं जावं लागतं. म्हणून मानसिक दुर्बलता येणार नाही ह्याची काळजी घेतली जावी.
फिरायला जाणे, स्मरणशक्ती वाढवणारे बैठे खेळ खेळणं. अशी सवय लावावी. म्हणजे मनाला उभारी येते.
४:- वृद्ध मंडळी जर सुदृढ असली तर त्यांना काही तरी काम करण्याची इच्छा असते.
जर त्यांना काही काम करावंसं वाटलं तर जरूर करू द्यावं. त्यांना थांबवू नाका. कारण ते त्यांच्या तब्येतीला ठणठणीत ठेवेल. उत्साही, आनंदी राहायला मदत होईल.
५:- वयस्क मंडळींना रिटायर्ड होण्यापूर्वी घरात जसा मान दिला जात होता तसाच मान रिटायर्डमेंट नंतर सुद्धा दिला गेला पाहिजे.
ते रिटायर्ड झालेत म्हणून कधीही अपमान होईल अशी वागणूक दिली जाऊ नये. मोठ्या कामासाठी त्यांचा सल्ला घेतला तर त्यांना आनंदच होईल.
६:- वडीलधारी मंडळी अनुभवी असतात. आपल्याला आलेले अनुभव कधी कधी ते एकत्र जमलेले असताना सांगतात.
ते जरुर ऐकले पाहिजेत. त्यांच्या त्या अनुभवाच्या गोष्टींमधून आपल्याला सुद्धा काही उपयोगी माहिती, सल्ला मिळून जातो तो आपल्यालाही आयुष्यात पुढे उपयोगी पडू शकतो.
अशा गप्पा गोष्टी झाल्या की वृद्धांना पण जरा उत्साह येतो. जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
७:- नेहमी नाही तरी आठवड्यातून एखादे वेळेस वृद्ध मंडळींच्या बरोबर बसून जेवण केलंत तर सगळेच खुश राहतील.
ह्यामुळे आपसातली प्रेम भावना वाढेल. कधी त्यांना आवडणारा पदार्थ करून खाऊ घातला तर त्यांना खूपच आनंद होईल, त्यांना एकटेपणा जाणवणार नाही.
८:- आपण एखादी पिकनिक किंवा एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायचा प्रोग्रॅम ठरवा.
आणि तिथे ह्या बुजुर्ग मंडळींना जरूर घेऊन जा. एक वेगळा अनुभव त्यांनाही अनुभवू द्या. ते खुश होऊन जातील. मनाला विरंगुळा मिळेल.
९:- तुमचा सेवाभाव असा जर चांगला आसेल तर ही वृद्ध मंडळी त्यांच्या मृत्युपत्राबद्दल तुमच्याशी अगदी दिलखुलास बोलू शकतील.
त्यांना कोणाला काही देणगी वगैरे द्यायची इच्छा असेल तर त्यासाठी जरूर मदत करावी.
आपली इस्टेट कोणाला काही प्रमाणात दान करायची असेल तरी त्यांना त्यासाठी पाठिंबा द्यावा. मदत करावी.
१०:- वडीलधाऱ्या मंडळींना कधी राग येईल अशी गोष्ट तुमच्याकडून होऊ देऊ नका.
राग आलाच तर तो सहन करा. किंवा तुम्हाला राग आला असेल तर कधी अपशब्द बोलून त्यांना दुखावू नका.
अशी आपल्या घरातल्या वृद्ध मंडळींची काळजी घेता येईल. त्यासाठी जास्त वेळ द्यावा लागणार नाही.
त्यांनाच आपण ते अजून वृद्ध झाले नाहीत ही जाणीव करून द्यायची आहे, त्यांच्या मनाला उभारी द्यायची आहे.
ते मनाने खचून जातील अशी एकही गोष्ट त्यांच्या समोर होऊ द्यायची नाही. मग काय होईल बघा.
वृद्धच तुमच्यापुढे तरुण असल्यासारखं वावरतील, अगदी उत्साहात, अगदी आनंदात. तुम्हाला काहीच चिंता राहणार नाही. फक्त जे काही कराल ते सेवा भावाने करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.