ह्या कोरोना विषाणूंच्या वादळात स्वतःच्या मनाला शांत कसे ठेवाल..?? पॉझिटिव्ह असणं आणि निगेटिव्ह असणं हे आपल्याला माहित आहेच. आता या लेखात जाणून घेऊ, कोरोना अपत्तिकडे पाहण्याचा कोणता दृष्टिकोन आपल्याला तारेल..
कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली की मनुष्यप्राणी किती हतबल होतो नाही का..??
आताच्या घडीलाही जगभरातल्या लोकांची काहीशी अशीच गत झालीये.. त्यातून ही आपत्ती नैसर्गिक आहे की मानवनिर्मित ह्या संशयाने सगळ्यांना ग्रासलेले आहे..
टीव्ही, सोशल मीडिया, मित्रमंडळी ह्यांच्याकडून कित्येक प्रकारची माहिती मिळतीये.. कोण म्हणतो ते खोटे आहे आणि हे खरे आहे..
कशावर विश्वास ठेवावा आणि कशावर दुर्लक्ष करावे हे देखील भल्याभल्यांना कळेनासे झालेय.. मनाची – बुद्धीची अवस्था देखील अशीच झालीये..
हे बाहेर चे वादळ कमी होते म्हणून की काय आता बुद्धिमध्येही द्वंद्व सुरू झाले आहे.. आपल्याला हे तर माहीतच आहे की ‘मन चिंती ते वैरीही ना चिंती’..
म्हणजेच स्वतःच्याच मनाचे जुमले इतके भन्नाट असतात की एखाद्या दुश्मनालाही असे काही सुचणार नाही..
आपल्याला माहीतच आहे की जगभरात कोरोना मुळे किती हाःहाकार माजला आहे.. चायना नंतर इटली, अमेरीका आणि स्पेन सारख्या प्रगत राष्ट्रात जीवांची, कंपन्यांची, पैशांची किती अपरिमित हानी झाली आहे..
किती वर्षे लागतील ह्या गर्तेतून त्यांना बाहेर यायला.. हे देवच जाणे..!!
भारत देश.. ज्याची लोकसंख्या जगात दुसऱ्या नंबर वर आहे तोही ह्या कोरोनाच्या कचाट्यातून सुटला नाहीये..
सगळ्यांना स्वतःच्याच घरात कैद्यांप्रमाणे बंदिस्त व्हायची वेळ आली आहे.. नशिबाने भारत आणि महाराष्ट्र सरकारतर्फे जीवनावश्यक वस्तू मिळण्याची शाश्वती मिळाली आहे..
पण तरीही असे जगापासून लांब राहणे माणसांसाठी खूपच अवघड असते.. मनुष्य हा अतिशय सोशल प्राणी आहे.. त्यामुळे एकलकोंडे होणे ही जणू शिक्षा..!!
त्यातून भारतीय माणसे तर एकटी राहूच शकत नाहीत.. सण समारंभ, गेट टू गेदर, गप्पा टप्पा ह्यांच्या बहाण्याने सतत लोकांशी भेटत राहणे हे भारतीयांच्या आवडीचे काम.. मग त्यांना घरात कोंडणे किती अवघड काम नाही का..??
पण हा कोरोना फारच निर्दयी आहे.. त्याने कोणलाही सोडले नाहीये.. सगळीकडे दहशत पसरवली आहे.. त्यामुळे अशा सगळ्या भीषण परिस्थितीत आपल्या मनाची तगमग होणे स्वाभाविकच आहे..
लॉक डाऊनचे काही दिवस मजेत काढले खरे.. पण आता काहीही सुचेनासे झाले आहे..
अशातच मन खंबीर ठेवणे गरजेचे आहे.. तसे बघायला गेलं तर मनाच्या परिस्थितीचे ३ प्रकार असतात..
एक – नकारात्मक, दुसरा – सकारात्मक आणि तिसरा- न्यूट्रल….
ह्या ज्या मनाच्या परिस्थिती किंवा माईंड सेट्स आहेत तेच तुम्हाला कोरोना नामक वादळात तुम्ही कसे वागावे हे सांगणार आहेत..
मग ज्या मानस्थितीत तुम्ही आहात त्यावरून तुम्ही योग्य वागणार की अयोग्य ते ठरेल..
जो नकारात्मक मनस्थितीत असेल तो काय विचार करेल..??
मुळात नकारात्मकता म्हणजे काय..?? अशी मानसिक स्थिती जी फक्त तुम्हाला संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करते पण ते नकारात्मक कार्यपद्धतीने..!!
नकारात्मक विचारसरणीचा माणूस काय काय करू शकेल ते पाहू..
सगळ्यात पाहिले तर तो माणूस आपल्या घरातला ६-७ महिने पुरेल इतका धान्यसाठा, साबण, अँटिसेप्टिक औषधे आणि असंख्य न लागणाऱ्या वस्तू सुद्धा भरून ठेवेल..
जे कधी लागणारही नाही असेही काहीबाही तो विकत घेऊन ठेवेल.. बँकेतले पैसे काढून घरी आणून ठेवेल..
ते सुद्धा कोरोनाची पहिली केस चीन मध्ये आली हे ऐकूनच त्याने हे काम करून ठेवले असेल.. कारण नकारात्मकता तुम्हाला कोणत्याही संकटापासून वाचवण्यासाठी सगळ्यात आधी कामाला लावते..
कोणालाही मदत करण्यास तयार नसेल.. स्वतःकडे १०० बाटल्या सॅनिटायझरच्या असल्या तरी गरजूला एक थेंबही सॅनिटायझर द्यायचे नाही हे मनाशी ठरवून बसेल..
कोण मरतय किंवा जगतंय ह्याची पर्वाही नकारात्मक मनाच्या व्यक्तीला असणार नाही..
तो सतत एकच विचार करत राहील की मी ह्यातून कसे वाचवू स्वतःला.. हवे तर शहर बदलेल..
अशा ठिकाणी जाऊन राहील जिथे कोणाला विषाणूचा संसर्ग नाही.. तिथे नंतर कोणाला झालाच तर पुन्हा तिथूनही पळून जाईल..
सतत कोणत्याही बातम्या पाहत राहून त्याची शहानिशा केल्याशिवाय त्या पसरवत राहील.. अगदी कोणी सांगितले की हवेतून हा विषाणू येतो तर सगळ्या खिडक्या दारं लावून घरात कोंडून घेईल.. सगळ्या वागण्यात अतिशयोक्ती असेल..
हे खरे आहे की कोरोना व्हायरस हा अत्यंत काळजी करण्यासारखा आणि काळजी घेण्यासारखाच विषय आहे..
पण अशा तऱ्हेने आपल्या अवतीभवती घबराटीचे वातावरण निर्माण करून देखील काय साध्य होणार आहे..?? अति नकारात्मकता वाईटच..!!
ह्याच्या बरोबर उलट असतील सकारात्मक माणसे.. सकारात्मकता हा खरे तर उत्तम गुण आहे..
पण नको तिथे सकारात्मक राहणे म्हणजे गाफील राहणेच आहे..
हा सकारात्मक मनस्थितीतला माणूस काय काय उद्योग करेल बुवा..??
अशा व्यक्तीला घरात राहणे ही एक नामी संधी वाटेल.. आयसोलेट करणे ह्याचा अर्थ तो असा लावेल की ऑफिस ला जायचे नाही, रस्त्यावर भटकायचं नाही.. पण पार्टी करायची नाही असे थोडीच आहे..??
बिल्डिंग मधल्या मित्रमंडळींना गुपचूप घरी बोलवून जोरदार पार्टी करण्याकडे त्याचा कल असेल.. खाली बागेत जाऊन व्यायाम करणे, सम विचारी मित्रांबरोबर मॅरेथॉन करणे अश्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्याच्या दिनचर्येत तो सुरू करेल..
कारण त्याला वाटेल की अशक्त, आजारी, वृद्ध व्यक्ती ह्यापैकी मी कोणत्याच वर्गात मोडत नाही तर असे कार्यक्रम करणे म्हणजे योग्यच आहे..
मी कशाला घरात स्वतःला कोंडू..?? मी धष्टपुष्ट आहे तर स्वतःकडे छान लक्ष देईन.. बाहेर फ्रेश हवेत व्यायाम करेन.. चार आठ लोकांना हेच समजावेन आणि घराबाहेर सगळे मिळून सुट्ट्यांचा आनंद घेऊ..
मी स्वतः ठणठणीत राहीन आणि त्यामुळे हा विषाणू मला काहीही करू शकणार नाही.. माझ्या आजूबाजूच्या लोकांपैकी कोणीच कोरोना पोसिटीव्ह नाही.. मग आम्ही का सोशल डिस्टंसिंग पाळावे..?? जर कोणी आजारी पडलेच तर तेव्हाचे तेव्हा बघता येईल..
फक्त सकारात्मक राहिलो तर मला कोरोना होणारच नाही.. त्यामुळे सध्यातरी मला चिंता करण्याची गरज नाही.. अशाच विचारधारेत तो वाहावत जाईल..
आता बघा.. अति सकारात्मकता तुम्हाला कुठे नेईल..?? त्यामुळे सकारात्मकतेच्या नादी लागून तुम्ही निश्चिन्त वाहवत जाल आणि ह्या प्रसंगाचे गांभीर्य ही विसरून जाल नाही का..??
त्यामुळे सद्य परिस्थिती नकारात्मक आणि सकारात्मक असे दोन्हीही माईंड सेट दूरच असायला हवेत.. पण मग तुम्हाला प्रश्न पडेल कि आता करावे तरी काय?
मंडळी तिसरा जो प्रकार आहे ना तो सगळ्यात उत्तम आहे.. निदान या परिस्थितीत तरी… तो म्हणजे न्यूट्रल असणे..
म्हणजेच मनाचा बॅलन्स साधणे.. नकारात्मकता आणि सकारात्मकता दोन्हीच्या मधल्या बिंदूवर पोचणे..
न्यूट्रल मनुष्य अशा परिस्थितीत अतिशय शांत असेल.. ना नकारात्मकतेने घाबरून जाईल ना सकारात्मकतेने फार उत्साहित होईल.. अतिशय संयमित आचरण ठेवेल.. कसे ते पाहूया..
स्वतःला आयसोलेशन मध्ये ठेवायचे आहे म्हणजे घरात घाबरून कुढत बसायचे किंवा बाहेर अंगणात जाऊन ४ मित्रांबरोबर क्रिकेट खेळायचे ह्यापैकी तो काहीही करणार नाही..
त्यापेक्षा शांतपणे घरात बसेल.. सरकार कडून आलेल्या नियमावलीचे पालन करेल.. घरातल्या घरात करता येण्याजोग्या सगळ्या सकारात्मक क्रिया जसे की घरात व्यायाम करणे, घरातल्यांबरोबर खेळणे, एकत्र घरातील कामे करणे, मदत करणे अशी सगळी कामे तो मजेने करेल..
गरजे पुरतेच समान, तेही सोशल डिस्टनसिंगच्या सगळ्या मर्यादा पाळूनच आणेल.. गरजूंना मदत करेल..
मित्रमंडळी, नातेवाईक ह्यांची आठवण आल्यास त्यांच्याशी फोन वरून, व्हिडीओ कॉल करून संवाद साधेल.. त्यांनाही अशीच काळजी घ्यायचा सल्ला देईल..
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः माहिती काढून, शाहानिशा करूनच कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवेल..
कोणीही अतिउत्साही माणसाने घरी बोलावल्यास त्याला आयसोलेशनचे महत्व समजावून देईल.. आपण हे सगळे का पाळलेले पाहिजे ह्याची स्वतःला आणि दुसऱ्यांनाही सतत जाणीव करून देईल.. गरजूंना मदत करतानाही सगळ्या प्रकारची खबरदारी घेऊनच ही व्यक्ती काम करेल..
मला काय होतंय..?? म्हणून बेफिकिरी नसेल किंवा सगळी काळजी घेतली तरी मला कोरोना होणारच अशी भीतीही नसेल..
परिस्थितीचा योग्य अंदाज घेऊन ही न्यूट्रल माईंड सेट असणारी व्यक्ती पाऊल पुढे टाकेल.. कधी ते पाऊल मागे घ्यावे लागले तरीही सारासार विचार करून ते देखील करायला कचरणार नाही.. न्यूट्रल असणे म्हणजेच आपल्या सद्सद्विवेकबुद्धीचा पुरेपूर वापर करणे..!!
म्हणून मित्रांनो ह्या क्रायसिस मध्ये आपल्याला न्यूट्रल मनस्थितीत राहणे फार गरजेचे आहे.. तीच मनस्थिती तुम्हाला तारेल कोणत्याही समस्येतून..
थांबा, विचार करा आणि मगच कृती करा.. ह्यातून पश्चातापाची वेळ कधीच येणार नाही.. हे कोरोना वादळही पुढे जाईल पण तुमचा विवेक तुम्हाला कायम साथ देईल..
कारण गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात की,
कोणत्याही वादळाला तुम्ही शांत करू शकत नाही.. पण स्वतःच्या मनाला नक्कीच शांत करू शकता.. वादळ तर एक ना एक दिवस पुढे निघून जाणारच, नष्ट होणारच आहे.. तुम्हाला मात्र उभं राहायचंय, न उन्मळून पडता.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.