पित्ताशय आपल्या शरीरातील एक छोटासा पण अत्यंत महत्वाचा अवयव आहे. पित्ताशय एखाद्या छोट्या थैलीसारखे असते. पित्ताशयात जर खडे झाले तर रुग्णांना असह्य वेदना होतात तसेच वेळेवर उपचार केले नाहीत तर ते खडे काढून टाकण्यासाठी ऑपरेशन करण्याची आवश्यकता पडू शकते.
शरीरात कॉलेस्ट्रॉल जास्त प्रमाणात वाढले तर पित्ताचे खडे तयार होण्याचा त्रास वाढतो. अशा वेळी रुग्णाला तीव्र पोटदुखी आणि अन्नाचे अपचन असा त्रास होतो.
आपल्या शरीरात लिव्हरच्या खाली पित्ताशय असते. लिव्हर आणि पित्ताशयाच्या मध्ये एक छोटी नलिका असते. तिला ‘बाईल डक्ट’ असे म्हणतात. ह्या नालिकेतून लिव्हरमध्ये तयार होणारा अन्न पचनासाठी आवश्यक असणारा पित्त रस पित्ताशयाकडे पोचवला जातो. तेथून तो पित्त रस छोट्या आतडयाकडे पिचकारीप्रमाणे उडवला जाऊन पचनाची प्रक्रिया सुरु होते.
पित्ताशयातील खडे म्हणजे नक्की काय?
अन्नपचनासाठी आवश्यक असणारा पित्तरस शरीरात पोचवण्याचे काम पित्ताशय करते. परंतु काही कारणांमुळे ह्या पित्त रसाचा शरीरात नीट निचरा झाला नाही तर तो रस पित्ताशयात साठून राहतो.
अधिक काळ पित्तरस पित्ताशयात साठून राहिला की त्यातील द्रवाचे प्रमाण कमी होत जाते. त्यामुळे तो रस कोरडा पडून त्यातील क्षार एकत्र येऊन त्यांचे छोटे छोटे खडे तयार होऊन ते पित्ताशयात साचतात.
शरीरात कोलेस्ट्रॉल आणि बिलीरुबिन ह्या द्रव्यांचे प्रमाण जास्त असेल तर पित्ताशयात खडे होण्याची शक्यता वाढते.
पित्ताशयात खडे होण्याची कारणे
पित्ताशयात खडे होण्याची अगदी निश्चित कारणे अजून समोर आलेली नाहीत. तसेच असे खडे कोणत्या वयात होतात हे देखील सांगता येत नाही. ते कोणत्याही वयात होऊ शकतात.
परंतु खालील कारणांमुळे पित्ताशयात खडे होण्याची शक्यता वाढते हे संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. ती कारणे अशी
1) मधुमेह
2) स्थूलता
3) गर्भधारणा
4) मेद कमी करण्याची शस्त्रक्रिया
5) कोणत्याही दीर्घ आजाराने ग्रस्त असणे.
6) काही विविक्षित औषधे (उदा. गर्भनिरोधक गोळ्या) नियमित घेण्याचे साइड इफेक्ट
ह्याशिवाय आहारात काही गोष्टी जास्त प्रमाणात असतील तरीही असे खडे होऊ शकतात. त्या खालीलप्रमाणे
1) बेकरी उत्पादने जसे की ब्रेड, बिस्किटे, केक इत्यादी
2) जास्त मात्रेने प्राणीजन्य प्रोटीन असणारे पदार्थ जसे की मांसाहार
3) खूप गोड पदार्थ
4) कॉफी
5) सोडा
वरील पदार्थांचे कमीतकमी सेवन करावे.
पित्ताशयात खडे झालेले असण्याची लक्षणे
बरेच वेळा पित्ताशयात खडे झालेले कळून येत नाहीत. त्यांची काहीही लक्षणे दिसत नाहीत.
परंतु काही वेळा अशी लक्षणे आढळून येतात ज्यावरून पित्ताशयात खडे असू शकतात असे कळून येते. ती लक्षणे खालीलप्रमाणे –
1) अपचन
2) आंबट ढेकर येणे
3) पोट फुगणे
4) ऍसिडिटी
5) पोट जड होणे
6) उलट्या होणे
7) खूप घाम येणे
पित्ताशयात खडे होत असतील तर आहार कसा असावा?
उत्तम आहार आणि दिनचर्या पाळून पित्ताशयातील खडे कमी करणे शक्य आहे. पित्ताशयात खडे असणाऱ्या व्यक्तीने खालील आहार घ्यावा.
1) गाजर आणि काकडीचा रस प्रत्येकी १०० मिलि घेऊन एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्यावा.
2) सकाळी उठून रिकाम्यापोटी एक ग्लास पाण्यात ५०मिलि लिंबाचा रस मिसळून तो पिण्याने फायदा होतो.
3) पेअर ह्या फळाचे सेवन पित्ताशयातील खडे कमी करते.
4) विटामीन सीच्या गोळ्या नियमित घेण्यामुळे खडे कमी होण्यास मदत होते.
5) हिरव्या पालेभाज्या, फळे ह्यांचे सेवन जास्त प्रमाणात करावे.
6) धूम्रपान, मद्यपान, चहा कॉफीचे अतिसेवन पूर्णपणे टाळावे.
7) तेलकट, मसालेदार पदार्थांचे सेवन कमीतकमी करावे.
8) विटामीन सी युक्त फळे नियमित खावीत.
9) मांसाहार शक्यतो करू नये अथवा कमीतकमी असावा.
10) दररोज एक चमचा हळद घेण्याने पित्ताशयातील खडे कमी होतात.
पित्ताशयात खडे होत असतील तर काय खाऊ नये?
पित्ताशयात खडे होत असतील तर कोलेस्ट्रॉल वाढवणारे पदार्थ आहारात असता कामा नये.
1) अंडी – अंड्यांच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल वाढू शकते. त्यामुळे अंडी कमी खावीत.
2) मांसाहार – प्राणीजन्य आहारात प्रोटीन असले तरी त्यामुळे कोलेस्ट्रॉल देखील वाढते. त्यामुळे मांसाहार करू नये.
3) तेलकट पदार्थांमुळे पित्ताशयातील चिकटपणा वाढतो. त्यामुळे खडे होण्याचे प्रमाण वाढते. म्हणून वनस्पती तेल, तूप, बटर ह्यांचे सेवन प्रमाणात करावे. वारंवार तळलेले पदार्थ खाऊ नये.
4) ब्रेड आणि तत्सम बेकरी प्रोडक्टस पचायला जड असतात. त्यात मोठ्या प्रमाणात मैदा असतो त्यामुळे असे पदार्थ खाऊ नयेत. त्यामुळे वजन आणि शरीरातील कोलेस्ट्रॉल दोन्ही खूप वाढते.
5) प्रोसेसड् फूड मुळीच खाऊ नये.
पित्ताशयात खडे असतील तर काय खावे?
1) भरपूर फळे व भाज्या
2) लो फॅट डेअरी प्रॉडक्ट
3) चांगल्या प्रतीचे तेल, तूप कमी प्रमाणात
4) फायबरयुक्त आहार
5) भरपूर प्रमाणात पाणी आणि इतर द्रव् पदार्थ जसे की लिंबूपाणी, नारळाचे पाणी ई.
दिनचर्या व व्यायाम
पित्ताशयात खडे होत असतील तर व्यायाम करून वजन आटोक्यात ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित योगासने करणे फायद्याचे ठरते.
खालील आसने लाभदायक आहेत.
1) सर्वांगासन
2) धनुरासन
3) शलभासन
4) भुजंगासन
पित्ताशयातील खडे काढण्याची शस्त्रक्रिया
एखाद्या व्यक्तीच्या पित्ताशयात खडे असतील तरीही ते जोपर्यंत पित्ताशयात असतात तोवर त्या व्यक्तीला त्यांचा फारसा त्रास होत नाही.
परंतु आपण पाहिले की पित्तरस पित्ताशयातून पिचकारीप्रमाणे उसळून लहान आतड्याकडे पोचवला जातो. अशा वेळी त्या पित्तरसाबरोबर पित्ताशयातील एखादा खडा उसळून बाहेर येऊ शकतो. असा खडा बाहेर आला की व्यक्तीचे पचन बिघडते तसेच काविळीची लक्षणे दिसु लागतात.
अशा वेळी तो खडा काढून टाकण्यासाठी औषधोपचार केले जातात.
परंतु औषधांचा उपयोग झाला नाही तर तो खडा काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यावाचून पर्याय उरत नाही. पोटाच्या विकारांवरील तज्ञ डॉक्टर अशी शस्त्रक्रिया करतात.
शस्त्रक्रिया करण्याआधी डॉक्टर रुग्णाला अतिशय कमी तेल असलेले भोजन करण्याचा सल्ला देतात. तसेच नंतरही महिना दीड महिना पचण्यास हलका आहार घेणे उत्तम. ह्यासंदर्भात रुग्णाने डॉक्टरांचा सल्ला मानावा.
काही वेळा जास्त खडे झाले असतील तर रुग्णाचे पित्ताशय काढून टाकावे लागते. अशा वेळी पुढे कायमस्वरूपी पचण्यास हलके भोजन घ्यावे. अन्यथा अपचन, उलट्या, जुलाब असा त्रास होऊ शकतो.
ह्या शस्त्रक्रिया आता अतिशय सोप्या आणि दुर्बिणीतून करता येण्यासारख्या झाल्या आहेत आणि रुग्ण संपूर्णपणे बरा होतो. त्यामुळे घाबरून जाऊ नये. परंतु मुळात पित्ताशयात खडे होऊ नयेत ह्यासाठी लेखात सांगितलेली पथ्ये जरूर पाळावी.
सहसा पित्ताशयातील खड्यांचा थेट त्रास होत नाही परंतु बसूही शकणार नाही इतकी तीव्र पोटदुखी आणि डोळे, त्वचा पिवळे होणे अशी काविळीची लक्षणे दिसत असतील तर मात्र त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.