आज चांगलाच मूड बनवून त्याची पावले तिकडे वळली. नवीन पाखरू आल्याची साखरबातमी त्यालाही कळली होतीच. तिला बघायला, स्पर्शायला तो आतुर झाला होता. नेहमीप्रमाणे ऍडव्हान्स देऊन तो तिच्या वाटेकडे डोळे लावून बसला होता. तेवढ्यात कर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र आवाजाने दार उघडले तसे त्याचे डोळे चमकले.
खरे तर त्याला माहित होतेच की हे पाखरू नवं आहे त्यासाठीच तर तो आला होता. पण त्याला काहीतरी वेगळंच जाणवत होतं आज. ती ह्या वातावरणाला रुळली नाही हे तर स्पष्ट कळत होते. पण तरीही काहीतरी वेगळं त्याला सतत जाणवत होतं. ती कोपऱ्यात बसून होती.
“नई हो ….”?? त्याने नजर रोखून विचारले. तिने फक्त मान डोलावली.
नवीन मुलगी जशी गयावया करते “मुझपे रहम करो, मुझे यहासे निकलने में मेरी मदद करो” म्हणून पाय धरते तसेच काहीसे त्याला अपेक्षित होते. पण तसे काहीच न घडता तीही नजर रोखून त्याच्याकडे पहात होती. तसा आता तो अवघडला. का कोण जाणे पण आता त्याची इच्छा मरून गेली. कित्येक नवी पाखरे त्याने अंगाखाली घेतली होती पण हिच्यात काही वेगळे होते नक्की.
“बसायचं ना ..???” तिने सलवारची नाडी पकडत विचारले. तोंडातून मराठी शब्द येताच तो चमकला. “कुठून आलीस ….??” त्याने प्रश्न केला.
“मसणातून आले …तुला काय करायचंय…??”
“इथे कशी ….??” परत त्याने विचारले.
“आई बापानेच पाठवली… दर महिना 25 हजाराच्या बोलीवर.”
“म्हणजे आईबापानेच विकलं तुला..?? आणि हे तू इतक्या शांतपणे सांगत्येस…??.” तो हादरला….
” काय करू तमाशा करून..?? लहान भाऊ खूप हुषार आहे. खूप शिकायचे आहे त्याला. घरात पैसे नाहीत आणि तशीही मुलगी म्हणून त्यांना मी नकोच होते पहिल्यापासून. लग्नासाठी ते खर्च करायला तयार नाहीत. म्हणून इकडे पाठवली भावाचे तरी भले करेल म्हणून….” बोलताना तिच्याही नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तोही क्षणभर सुन्न झाला.
“तुला काय वाटते …??? हे आवडते तुला… त्याने मूर्खांसारखा प्रश्न केला…..”…… “इथे असलेल्या कोणत्या मुलीला आवडते ..??” तिचे तिखट उत्तर.
“आता भाऊ कुठे आहे तुझा ….?? त्याला माहित आहे तू कुठे आहेस….?” त्याची उत्सुकता संपेना…..
“माहीत नाही…… कुठेतरी जाणार होता शिकायला. त्याला नाही आवडणार मी जे काही करतेय ते …?? कोणत्या भावाला आवडेल …?? तुम्हाला आवडेल ……??? ह्या प्रश्नाने तर त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मनात म्हणाला, “खरेच असा विचार कधीच का शिवला नाही आपल्या मनाला.”
तिने त्याच्याकडे पाठ केली आणि सलवार उतरवू लागली. अचानक त्यातून काहीतरी खाली पडले. त्याने ते उचलले. एक बंद पाकीट होते ते…. त्यावर पत्ता लिहिला होता आणि स्टॅम्प लावला होता.
“हे काय आहे…..?” कशीतरी शब्दांची जुळवाजुळव करून त्याने प्रश्न केला. क्षणभर तिने त्याकडे पाहून ते पाकीट हिसकावून घेतले.
“राखी आहे त्यात….. गेले पाच दिवस माझ्यापाशी आहे. पोस्टात टाकायचा धीर होत नाही.” बोलता बोलता तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो काही न बोलता खाली मान घालून बाहेर पडला.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.