तुमचं आयुष्य असो कितीही व्यस्त, या 20 सहज साध्या सोप्या उपायांनी तुम्ही तुमचं आयुष्य आणि तुमची जीवनशैली आणखी सुधारू शकाल.
आयुष्यात एक काळ असा असतो की आर्थिक गणितं, कुटुंब आणि काम यामध्ये तुम्ही गुरफटून जाता. स्वतःकडे बघायला वेळच नसतो.
“कधी तरी स्वतःसाठी वेळ काढू हां….” असं स्वतःलाच तुम्हीच फसवं वचन देता आणि कामाच्या चक्रात पुन्हा अडकता.
पण तुमचं आयुष्य बदलण्यासाठी, आणखी सुधारणा करण्यासाठी फार मोठा वेळ गरजेचा नाहीच.
काही छोट्या छोट्या गोष्टी रोज करून तुम्ही तुमचं ‘लाइफस्टाइल’ अधिकाधिक चांगलं करू शकता.
त्यामुळे तणाव कमी होईल आणि आयुष्य सुधारायला वाव मिळेल.
कामाच्या प्रचंड ताणावातही तुम्ही संतुलित निरोगी आणि आनंदी असाल.
आजचं जीवन इतकं धावपळीचं, धकाधकीचं झालेलं आहे की तुम्ही खरंच स्वतःसाठी वेळ बाजूला काढू शकतंच नाही.
पण मग आठवड्याला अर्धा तास तर तुम्ही नक्की करू शकता?
अहो रोजचा अर्धा तास नव्हे, आठवड्यातून फक्त अर्धा तास!
या अर्ध्या तासात काय काय करायचं ते समजून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.
१) ध्यानधारणा करा
अगदी चित्रपटातल्या सारखं “नssही sss” असं तुम्ही केलं असेल ना?
कारण प्रत्येकाकडून असं ध्यानधारणा कर, ध्यानधारणा कर, हे ऐकून तुम्ही वैतागला असाल.
विशेषतः नवीन योगा शिकणारे लोक किंवा तुमच्या मातोश्री यांच्याकडून ध्यानधारणेविषयी भाषण ऐकून-ऐकून तुम्ही कंटाळाला असाल.
पण आम्ही तुम्हाला सांगतो ध्यानासाठी योगा मॅटची ची गरज नाही, भरपूर वेळेची गरज नाही.
तर तुमच्या कामाच्या ठिकाणी रोज काही मिनिटं शांत बसा. श्वासावर लक्ष केंद्रित करा.
या नियमित प्रॅक्टिसनं तुम्हांला नक्की फरक जाणवेल.
२) दिवसाची सुरुवात काटेकोर नियोजनानं करा
तुमचा दिवस उत्साही आनंदी आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी सकाळीच कामाच्या रगाड्यात बुडून जाऊ नका.
छोट्या छोट्या भागात सकाळची कामं विभागून ठेवली तर वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचते.
वाचायला विचित्र वाटेल पण थोडासा विचार यावर नक्की करा, तुम्ही एखाद्या विषयावर निर्णय घेण्यासाठी सकाळचा वेळ घालवत असाल तर तुमचा दिवस प्रचंड गडबडीत पार पडेल.
व्यायामला जायचं का नाही? ड्रेस कुठला घालायचा? या छोट्या प्रश्नांची सुद्धा ठाम उत्तरं आदल्या दिवशीच तयार ठेवा.
सकाळची रेंगाळणारी कामं जर वेळेवर पूर्ण केलीत तर तुम्ही वेळेवर तयार व्हाल आणि पटापट आवराल.
वेळेवर घरा बाहेर पडल्यामुळे पूर्ण दिवस तुम्हांला हातामध्ये मिळेल.
भरपूर वेळ काम करण्यासाठी मिळेल.
३) रात्रीच्या कामाच्या ही वेळ ठरवा
एका प्रसन्न सकाळसाठी रात्रीच्याही वेळेचं नियोजन पक्क हवं.
सध्या मोबाईल रुपी राक्षसांनं तुमचा प्रचंड वेळ खाण्याचा चंगच बांधला आहे.
म्हणून रात्रीचं वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळणं गरजेचं आहे.
संध्याकाळच्या वेळेला शॉवर घेउन फ्रेश होणं, दुसऱ्या दिवशीच्या कामाचे नियोजन, मन रिलँक्स करण्यासाठी स्वतःला काहीतरी ऍक्टिव्हिटी देणं अशा गोष्टी तुम्ही संध्याकाळ आणि रात्र या कालावधीमध्ये करू शकता.
४) झोपायची जागा उत्तम, स्वच्छ ठेवा.
बहुतेक वेळा तुम्ही पाहिलं असेल की कपडे, वस्तूं, पुस्तकांचा पसारा हा बेड वरती अस्ताव्यस्त पसरलेला असतो.
तुमची झोपण्याची जागा आरामशीर सुटसुटीत मोकळी स्वच्छ असावी आणि तेही दिवस भर!
उत्तम झोपेनंतरच दुसरा दिवस उत्साहाचा बनतो.
५) दुपारी काहीतरी क्रिएटिव्ह काम करा.
उत्साहाने सुरू झालेली सकाळ, कामाचे डोंगर उपसता उपसता दुपारकडे झुकते आणि किंचित सुस्तावते, थोडासा आळस येतो.
अशा वेळेला थोडसं स्ट्रेचिंग करून पुरेसं पाणी प्या. वेळ ठरवून महत्त्वाची कामं पार पाडा.
10 मिनिटं तुमच्या आवडीचं काम करा आणि सुस्तीला राम राम म्हणा.
६) स्वयंपाक करा.
महिलांना तर रोजच स्वयंपाक करावा लागतो.
पण पुरुषांनीही हे लक्षात घ्या.
एखाद्या पदार्थाच्या निर्मितीचा प्रयत्न तुम्ही रोज करा.
तुमच्या लंच बॉक्स मध्ये किंवा रात्रीच्या जेवणात एखादा साधा पदार्थ तुम्ही करा आणि हा पदार्थ तुम्हाला तुमचा ताण हलका करायला खूप मदत करेल.
७) कामाच्या जागेपासून थोडं अंतर ठेवून जेवायला बसा.
तुमच्यापैकी कितीतरी जण असे असतील, जे आपल्या कामाच्या ठिकाणीच लंच बॉक्स ओपन करत असतील.
पण त्यासाठी एखादी वेगळी जागा निवडा.
रोज तुमच्या डेस्क पासून थोडं अंतर ठेवून जेवायला बसा.
जेवताना पदार्थांचा आस्वाद घेऊन जेवण पूर्ण करा.
तुम्ही उचललेलं हे पाऊल तुम्हांला निरोगी, संतुलित जीवनाकडे घेऊन जाईल.
८) स्फूर्तीदायक व्हिडीओ बघा.
त्यातून जगण्याची प्रेरणा मिळेल. विचारांना दिशा मिळेल .
असे व्हिडिओज पहाणं आता खरंच खूप सोपं आहे.
लंच ब्रेक मध्ये अगदी थोडासा वेळ, किंवा तुम्ही कुठं वाट बघत असाल तर, दुसऱ्यांना डिस्टर्ब होणार नाही अशा प्रकारे हे छोटे प्रेरणादायी व्हिडिओ आवर्जून बघा.
९) ज्ञानवर्धक गोष्टी ऐका.
पॉडकास्ट, रेडिओ यांच्या माध्यमातून जगभरातल्या उत्तम गोष्टी ऐकण्याची संधी आता तुमच्या अगदी हाताच्या अंतरावर आहे .
त्यामुळे नवनवीन विषयांसंबंधी जाणून घ्या.
त्यामुळे तुमच्या जीवनात रस निर्माण होईल.
आणि हो! एखादा विनोदी कार्यक्रम सुद्धा आवर्जून ऐका आणि खळखळून हसा!!
१०) घडामोडी लिहा
“दिसामाजी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडीत वाचीत जावे”
असं प्रत्यक्ष रामदास स्वामींनी लिहिलेलं आहे.
मात्र आज लिखाण हे भूतकाळात जमा झालेलं आहे.
पण तुम्ही कागद-पेन घेऊन लिहायला सुरुवात करा.
काय लिहायचं आणि कसं लिहायचं हे तुम्हांला लिहायला सुरवात केल्यावर कळेलच.
जे यशस्वी लोक आहेत त्यांचा तुम्ही अभ्यास केला तर वाचन आणि लेखन या दोन गोष्टी आजही त्यांच्या आयुष्यात नित्यनेमाने चालू असतात.
११) छोटी-छोटी निर्मितीमूल्य असणारी कामं करा
आता इतक्या गोष्टी सेट झाल्यानंतर बाकीची सगळी कामं बाजूला ठेवा, आणि जे तुम्हांला करावंसं वाटतं ते करा.
त्यापूर्वी आणखीन एक गोष्ट आवर्जून करा एका वेळेला एकच काम नीट पूर्ण करण्याचं ध्येय ठेवा.
एकाच वेळी अनेक गोष्टी कधीच करू नका.
अशा प्रकारे नियोजन करून तुम्हाला एखादी कला शिकायला वेळ मिळू शकतो, व्यायामासाठी वेळ काढता येतो किंवा ध्यानधारणेसाठी पुरेसा, हवा तेवढा वेळ देता येतो.
१२) स्वतःला नीट ओळखा
तुमच्या शिवाय तुम्हाला नीट कोण ओळखू शकतं?
तुम्ही कशात मास्टर आहात, कोणती गोष्ट तुम्हाला नीट जमत नाही? कशाची भीती वाटते? हे वेळोवेळी तपासून बघा आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करा.
१३) स्वतःला वेळ द्या
तुमच्या शरीराचा थकवा दूर करण्यासाठी कधीतरी स्वतःला मसाज करून घ्या.
तनाला मनाची वेळोवेळी विश्रांती ही पुढच्या वाटचालीसाठी गरजेचे असते.
१४) तुमच्या ध्येयाच्या आढावा घ्या.
आयुष्यात प्रत्येकाची स्वप्नं असतात, ध्येय असतात.
त्या दृष्टीने वर्ष सुरू होताना तुम्ही काही संकल्प करता.
त्या संकल्पांवरती योग्य पद्धतीने काम सुरू आहे ना? हे बघा.
कुठेतरी काहीतरी राहून जातं असं वाटलं तर वेळापत्रकामध्ये बदल करा.
१५) शाब्बासकीचे क्षण सांभाळून ठेवा
मोबाईलमुळं मेसेज व्हिडिओ संभाळून ठेवणं खूप सोपं झालं आहे.
मात्र फक्त डाटा गोळा करू नका त्याचा वापर करा.
कामासाठी, कलेसाठी, छंदासाठी तुम्हाला मिळालेली दाद रेकॉर्ड करून ठेवा किंवा मेसेज असतील तर स्क्रीन शॉट काढून ठेवा.
ज्यावेळी तुमचं मन उदास असेल आणि अशी वेळ प्रत्येकावर कधी ना कधीतरी येत असते, तर उदास मनाने काम नीट होत नाहीत, नैराश्य दाटून येतं त्या वेळेला कौतुकाचे हे फोटो सतत नजरेला पडतील असे ठेवा.
आठवा तुम्ही उत्तम काम करू शकता तुम्हांला मिळालेली दाद पुन्हा अनुभवताना तुम्ही निराशेतून बाहेर पडू शकता.
१६) यशाची नोंद ठेवा.
तुम्ही जर स्वतःला कामात फक्त झोकून दिलं असेल तर थोडा वेळ काढा.
दर आठवड्याला त्या त्या यशाची नोंद करा.
सकारात्मक गोष्टींचा छोट्या-छोट्या यशाचा तुमच्या मनावर चांगला परिणाम होतो.
तुम्हाला तगडं प्रोत्साहन मिळतं. जेंव्हा तुम्हाला स्वतः बद्दल सांगायचं असतं तेव्हा तुमच्याकडे क्रमवार माहिती उपलब्ध असते.
१७) पत्र लिहा.
तुमच्या जुन्या मित्र-मैत्रिणींना पत्र लिहा.
त्यात ती व्यक्ती तुमच्यासाठी किती महत्त्वाची आहे ते त्यांना सांगा.
खरं तर आता पत्रांचा जमाना उरलेला नाही, पण मोबाईल वरती दीर्घ मेसेज मधून त्यांना पत्ररुपानं कळवा की तुम्हाला त्यांची काळजी आहे
आपल्या सहकाऱ्यांच्या सुखदुःखाविषयी आवर्जून चौकशी करा.
१८) तुमचा परिसर स्वच्छ ठेवा.
दिवसभर तुम्ही जिथे वावरता ती तुमची जागा व्यवस्थित लावून घ्या.
थोडीशी डेकोरेट करा.
वेळोवळी नको असलेल्या गोष्टी काढून टाका.
तुमचा ताण कमी करण्यासाठी आणि तुमचा वेळ वाचवण्यासाठी स्वच्छता हा सुद्धा एक उत्तम उपाय आहे.
१९) स्क्रीन पासून थोडातरी वेळ दूर राहा
आपलं आयुष्यं मोबाईल, टीव्ही, कम्प्युटरशी जोडलं गेलेलं आहे, जखडलेलं आहे.
त्यामुळे मुद्दामून ठरवून निसर्गाच्या संगतीत वेळ घालवा.
कागदाची ओरिगमी करा किंवा तुम्हाला आवडेल तो छंद जोपासा.
मात्र स्क्रीन पासून ठरावीक वेळ नक्की दूर राहा.
२०) घराबाहेर पडा.
जेंव्हा तुम्हाला कोणी सल्ला देतं जिम जॉईन करा फिरायला जा, तेंव्हा उद्देश हाच असतो की वेगळया मोकळ्या वातावरणात बरं वाटतं.
घरात राहून राहून उदासी बेचैनी वाढते. मन जास्त निराश होतं.
तेच आजूबाजूच्या लोकांमध्ये मिसळल्यानंतर मोकळेपणाने अनुभवता.
तर मित्रांनो वेळच मिळत नाही, खूप गडबड आहे, काहीतरी करायचंय पण वेळच मिळत नाहीये असं जेव्हा तुमच्या ओठांवर असेल तेंव्हा हे २० उपाय ट्राय करा आणि स्वतःसाठी छान वेळ काढा.
तुमच्या बिझी आयुष्यामध्ये तुम्हाला वेळ मिळण्यासाठी तुम्ही काय करता आम्हांला कळवा अर्थातच नेहमीप्रमाणे या लेखाखाली कमेंटमध्ये!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.