तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा आहे का? तसे असेल तर आरोग्य सेवेशी निगडित व्यवसाय सुरू करण्याचा नक्की विचार करा. भारतात आता आरोग्य सेवेशी निगडित व्यवसायांना चांगलीच मागणी आहे. त्याशिवाय सरकार देखील आरोग्यविषयक जागरूकता आणि त्यासंबंधीच्या सुविधा यांना प्राधान्य देत आहे. त्यामुळे अशा व्यवसायांना सरकारी पाठिंबा देखील मिळू शकतो.
कोविडच्या उद्रेकानंतर भारतात एकूणच आरोग्याविषयक जनजागृती जोमाने होत आहे. सर्व नागरिक आपापल्या आरोग्याविषयी जागरूक बनत आहेत. अशा वेळी निरनिराळ्या आरोग्यविषयक सुविधांची अर्थातच खूप गरज भासते. त्यामुळे आरोग्य सेवेशी निगडित असणारा व्यवसाय सुरू केल्यास तुमचा खूप फायदा देखील होऊ शकतो आणि समाजाला अशा व्यवसायांचा खूप उपयोग देखील होऊ शकतो.
म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आरोग्य सेवेशी निगडित असणाऱ्या १० बिजनेस स्टार्ट अप आयडिया म्हणजेच व्यवसायाच्या कल्पना सांगणार आहोत.
१. हेल्थ क्लब किंवा योगा मेडिटेशन सेंटर सुरू करणे
सध्या भारतातील लोकांना व्यायामाचे महत्त्व चांगलेच पटू लागले आहे. त्यामुळे तुम्ही जर योगा इंस्ट्रक्टर असाल तर अतिशय कमी खर्चात किंवा घरच्या घरी देखील तुम्ही योगासने शिकवण्याचे क्लासेस सुरू करू शकता. त्याशिवाय शरीराला व्यायाम देणाऱ्या योगासनांच्या बरोबरीने प्राणायाम, ओंकार हे मनाला व्यायाम देणारे आणि मनःशांती टिकवणारे प्रकार देखील शिकवू शकता. तुम्ही जर जिम् इंस्ट्रक्टर असाल तर स्वतःचा हेल्थ क्लब सुरू करू शकता. परंतु त्यासाठी काही प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता भासू शकते. सध्या या दोन्ही प्रकारच्या व्यवसायांना खूप मागणी आहे.
२. मेडिकल आणि सर्जिकल साहित्याचे दुकान सुरु करणे
सध्या ब्लड प्रेशर मॉनिटर, ऑक्सीमीटर , थर्मामीटर , स्टेथोस्कोप, ईसीजी मशीन, एक्स-रे मशीन, डायग्नोस्टिक सेट यासारख्या साहित्याला बाजारात खूप मागणी आहे. त्याच बरोबर N95 मास्क , सर्जिकल मास्क, सर्जिकल ग्लोव्ह , ड्रेसिंगचे साहित्य, निरनिराळे ब्लेडस् , व्हीलचेअर , हॉस्पिटल बेड , हॉस्पिटल मध्ये लागणारे फर्निचर या सर्व वस्तूंना देखील मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यापैकी कोणत्याही वस्तूंचे दुकान तुम्ही सुरू करू शकता. होलसेल मध्ये अशा वस्तू घेऊन त्यांची बाजार भावाने विक्री करणे फायद्याचे ठरू शकते.
३. मेडिकल दुकान सुरु करणे
मेडिकल स्टोअर अथवा फार्मसी स्टोअर हा कायमस्वरूपी मागणी असणारा व्यवसाय आहे. निरनिराळी औषधे लोकांना सतत लागत असतात. त्यामुळे एखाद्या प्राईम लोकेशनवर असे दुकान सुरू केल्यास मोठ्या प्रमाणावर व्यवसाय होऊ शकतो. औषधांच्या व्यवसायात मिळणाऱ्या नफ्याचा दर भरपूर असतो. अर्थात औषधांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या संबंधीचा परवाना मिळणे आवश्यक असते. हा व्यवसाय सुरू करताना योग्य मार्गाने सर्व परवाने घेऊनच सुरू करावा. लोकांच्या आरोग्याशी निगडित असणारा हा व्यवसाय असल्यामुळे काही चुकीचे घडल्यास त्यात धोके आणि होऊ शकणाऱ्या शिक्षाही भरपूर असतात.
४. पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू करणे
हल्ली निरनिराळ्या प्रकारच्या रक्त तपासण्या करून घेण्याचे प्रमाण देखील खूप वाढले आहे. वेगवेगळ्या रक्त तपासण्या, युरीन आणि स्टूल तपासण्या यांची रोगाचे निदान करण्यासाठी खूप मदत होते. त्यामुळे डॉक्टर अशा प्रकारच्या तपासण्या करून घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सुरू करणे हा भरपूर मागणी असणारा व्यवसाय आहे. अर्थात त्यासाठी पॅथॉलॉजी विषयातील पदवी मिळवलेली असणे आवश्यक असते.
५. डायग्नोस्टिक सेंटर उघडणे
पॅथॉलॉजी लॅबच्या बरोबरीने एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, एम आर आय या पद्धतीच्या तपासण्या देखील भरपूर प्रमाणात केल्या जातात. अशा तपासण्यांमुळे रोगाचे अचूक निदान करण्यास मदत होते. या सर्व तपासण्या करणारे डायग्नोस्टिक सेंटर उघडणे हा एक उत्तम व्यवसाय आहे. जर पुरेशी जागा आणि गुंतवणूक करण्यास मोठी रक्कम तुमच्याजवळ असेल तसेच या व्यवसायाला लागणारे सर्व परवाने आणि पदव्या तुमच्याजवळ असतील तर असे डायग्नोस्टिक सेंटर सुरू करणे खूप फायद्याचे आहे. भारतातील लोकसंख्या बघता कितीही डायग्नोस्टिक सेंटर उघडली गेली तरी ती कमीच पडतात. नावाजलेल्या डायग्नोस्टिक सेंटरची फ्रॅंचाईजी सुरू करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.
६. हर्बल आणि ऑर्गेनिक वस्तूंचे दुकान सुरू करणे
रासायनिक कीटकनाशके वापरून पिकवलेल्या भाज्या किंवा घातक प्रिजर्व्हेटीव्ह घालून तयार केलेल्या खाण्याच्या वस्तू वापरण्यातले धोके आता लोकांच्या लक्षात येऊ लागले आहेत. त्यामुळे लोकांचा हर्बल आणि ऑरगॅनिक वस्तू वापरण्याकडे कल आहे. जर तुमच्याकडे दुकान सुरू करण्याची जागा आणि गुंतवणुकीसाठी काही भांडवल असेल तर चांगल्या प्रतीच्या हर्बल आणि ऑरगॅनिक वस्तू विकणे हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. मोठ्या प्रमाणावर अशा वस्तू घाऊक दराने विकत घेणे आणि त्या रिटेल दराने विकणे यामुळे चांगला नफा कमावता येईल. अर्थातच या वस्तूंचा दर्जा अतिशय चांगला असणे खूप आवश्यक आहे.
७. नर्सिंग होम किंवा हॉस्पिटल उघडणे
आरोग्य विषयक सेवांमधला हा सर्वात मोठा व्यवसाय आहे. अशापद्धतीने नर्सिंग होम किंवा हॉस्पिटल सुरू करण्यासाठी अर्थातच भरपूर मोठी जागा आणि आणि गुंतवणूक करण्यासाठी भरपूर भांडवलाची आवश्यकता असते. एखादी स्वतंत्र इमारत , तज्ञ डॉक्टरांची टीम आणि तज्ञ नर्सेस आणि इतर स्टाफ या सर्वांची आवश्यकता असते. त्याचबरोबर हॉस्पिटल अथवा नर्सिंग होम सुरू करण्यासाठी वेगवेगळे सरकारी परवाने आणि रजिस्ट्रेशन यांची आवश्यकता देखील असते. परंतु असे हॉस्पिटल किंवा नर्सिंग होम उघडणे हा केवळ व्यवसाय नसून ते समाजासाठी दिलेले योगदान आहे.
८. डोळ्यांचा दवाखाना उघडणे
जर तुम्ही नेत्र तज्ञ डॉक्टर असाल तर कोणत्याही दवाखान्यात नोकरी करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचा दवाखाना उघडून व्यवसाय सुरू करू शकता. यासाठी अर्थातच जागेची आणि भांडवलाची आवश्यकता असते. डोळ्यांच्या दवाखान्याबरोबरच चष्म्याचे दुकान देखील सुरू करणे फायदेशीर ठरते. निरनिराळे चष्मे आणि लेन्स बनवणे यामध्ये नफ्याचा मोठा मार्जिन आहे.
९. डायटीशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट बनणे
सध्याच्या काळात सर्व लोकांचे जंक फूड आणि फास्ट फूड खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे वजन वाढलेले असणे ही समस्या जवळपास सर्वच लोकांमध्ये दिसून येते. अशा सर्व लोकांना योग्य आणि पौष्टिक आहार कोणता हे जाणून घेण्यासाठी डायटीशियन किंवा न्यूट्रिशनिस्टची गरज भासते. जर तुम्ही डायटीशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट बनण्यासाठी एखादा कोर्स केला असेल तर तुम्ही घरच्या घरी हा व्यवसाय सुरु करू शकता. तसेच एखाद्या हॉस्पिटल किंवा नर्सिंग होमशी संलग्न राहून देखील तुम्हाला हा व्यवसाय करता येईल. लोकांमध्ये स्थुलतेची समस्या अगदी कॉमन असल्यामुळे या व्यवसायाला सध्या खूप मागणी आहे.
१०. घरपोच मेडिकल सुविधा पुरवणे
हा सध्या खूप मागणी असणारा व्यवसाय बनला आहे. आजकाल घरोघरी वेगवेगळ्या कारणांमुळे बरेचसे वृद्ध लोक एकटे असतात. त्यांना गरज भासणाऱ्या वैद्यकीय सुविधा जसे की औषधे, फिजिओथेरपी , मदतनीस पुरवण्यासाठी तुम्ही काम करू शकता. म्हणजे अशा वैद्यकीय सुविधा पुरवणाऱ्या एजन्सी आणि त्या सुविधांची आवश्यकता असणारे कस्टमर यांच्यामधला दुवा बनून तुम्ही हा व्यवसाय करू शकता. सध्याच्या काळात या व्यवसायाला सर्वात जास्त मागणी आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
तर हे आहेत भारतात सध्या मागणी असणारे आरोग्य सेवेशी निगडित वेगवेगळे दहा व्यवसाय. यापैकी काही व्यवसायांना विविक्षित पदवी आणि परवाने असणे आवश्यक आहे तर काही व्यवसाय हे कोणालाही सुरू करणे शक्य आहे. तुम्हाला यापैकी जो व्यवसाय सुरू करणे शक्य असेल तो जरूर सुरू करा. कारण आरोग्यविषयक व्यवसाय सुरू केल्यास स्वतःबरोबरच समाजाचा देखील फायदा होतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.