मासिक पाळीमुळे देखील होऊ शकतो ॲनिमिया – जाणून घ्या काय आहे तथ्य.
स्त्रियांच्या आरोग्यविषयक तक्रारी मधील सर्वात महत्त्वाची तक्रार असते ती म्हणजे ॲनिमिया. भारतातील बहुतांश स्त्रिया ॲनिमिया ग्रस्त असतात असे अनेक संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहे.
ऍनिमिया हा असा आजार आहे ज्यामुळे रक्तातील तांबड्या पेशी आणि हिमोग्लोबिन यांचे प्रमाण कमी होते.
आपण एरवी बोलताना सहजपणे असे म्हणतो की तिच्या/त्याच्या शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे. परंतु याचा नक्की अर्थ काय ते आज आपण समजून घेऊया.
हिमोग्लोबीन हे रक्तातील एक प्रकारचे प्रोटीन आहे जे फुफ्फुसांपासून संपूर्ण शरीरभर ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी काम करते. शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत आणि सर्व बारीक नसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम हिमोग्लोबिन द्वारा केले जाते.
याचाच अर्थ जर शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर शरीराला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा होऊ शकणार नाही. या हिमोग्लोबिनची निर्मिती करण्यासाठी शरीराला लोह म्हणजेच आयर्नची गरज भासते आणि जर शरीरात आयर्नची कमतरता निर्माण झाली तर पर्यायाने हिमोग्लोबिनचे प्रमाणही घटते ज्याला आपण ॲनिमिया झाला असे म्हणतो.
ॲनिमियाला सहसा एक साधा आजार समजलं जातं आणि बहुतांश वेळा त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. ॲनिमियाचे थेट दुष्परिणाम लवकर दिसून येत नसल्यामुळे हा आजार झाला आहे हे समजण्यास वेळ लागतो आणि स्त्रियांच्या स्वतःकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रवृत्तीमुळे या आजाराकडे आणखीच दुर्लक्ष केले जाते.
भारतात दरवर्षी जवळजवळ एक कोटी महिला ॲनिमिया ग्रस्त होतात परंतु तरीही अज्ञानामुळे या आजाराकडे फारसे लक्ष दिले जात नाही.
ॲनिमिया होण्याची अनेक कारणे आहेत. शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी असणे, रक्तातील तांबड्या पेशी दोषपूर्ण असणे, बोन मॅरो संबंधी काही समस्या असणे तसेच हॉर्मोन्सचे असंतुलन या कारणांमुळे ॲनिमिया होऊ शकतो.
परंतु त्याच बरोबरीने मासिक पाळी दरम्यान होणारा जास्त रक्तस्त्राव हेदेखील स्त्रियांमध्ये ॲनिमिया असण्याचे प्रमुख कारण आहे.
मासिक पाळी आणि ॲनिमिया यांचा नेमका संबंध काय? त्यावर कोणते उपाय करणे शक्य आहे?
मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होणे या समस्येचा दर पाच पैकी एका महिलेला सामना करावा लागतो.
जर मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर शरीराच्या तांबड्या रक्तपेशी निर्माण करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात तांबड्या रक्तपेशी शरीरातून मासिक पाळीच्या स्त्रावाद्वारे बाहेर टाकल्या जातात.
त्यामुळे शरीराला योग्य प्रमाणात हिमोग्लोबिन तयार करणे शक्य होत नाही आणि शरीरातील सर्व अवयवांना ऑक्सिजन मिळण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. याचा अर्थ अशा स्त्रियांना ऍनिमिया होतो.
मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे ॲनिमिया होण्यासाठी काही इतर घटक देखील कारणीभूत असतात. त्यामध्ये सदर महिलेचे एकूण आरोग्य, जीवनशैली आणि आहार यांचा समावेश होतो.
जर स्त्रियांच्या शरीरात लोह आणि हिमोग्लोबिन यांची कमतरता असेल तर खालील लक्षणे दिसून येतात.
१. थकवा
२. अशक्तपणा
३. श्वास घेण्यास अडथळा
४. त्वचेचा रंग पिवळा पडणे
५. चक्कर येणे, डोके गरगरणे
६. डोकेदुखी
मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होण्याची कारणे
स्त्रियांच्या शरीरातील प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेन या हॉर्मोन्सचे असंतुलन हे मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होण्याचे प्रमुख कारण आहे. याशिवाय आणखीही काही कारणे आहेत ती खालील प्रमाणे –
१. गर्भाशयामध्ये फायब्रोईडच्या गाठी असणे.
२. पॉल्पिस
३. ओव्युलेशन म्हणजे स्त्रीबीज बाहेर पडण्याच्या प्रक्रियेमध्ये काही अडचण असणे.
४. गर्भाशयाच्या पेशी कमकुवत झालेल्या असणे
५. गर्भाशयाच्या आत बसवलेली गर्भनिरोधके वापरणे
६. ऍस्पिरिन किंवा रक्त पातळ होण्याची औषधे घेणे..
७. रक्तासंबंधीचे आजार.
या व अशा अनेक कारणांमुळे मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होऊ शकतो.
मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या जास्त रक्तस्त्रावावरचा उपाय
१. सर्वप्रथम मासिक पाळी दरम्यान जास्त रक्तस्त्राव होत असेल तर अशा स्त्रियांनी आपली दिनचर्या आहार आणि आरोग्य याकडे विशेष लक्ष पुरवले पाहिजे. पोषक आहार घेणे, आवश्यकता असेल तर आयर्न सप्लीमेंट घेणे आणि माफक प्रमाणात व्यायाम करणे या गोष्टी फायदेशीर ठरू शकतात.
२. वर दिलेल्या वैद्यकीय कारणांपैकी कोणत्या कारणामुळे मासिक पाळी दरम्यान जास्त प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे हे डॉक्टरांकडून तपासणी करून समजावून घेतले पाहिजे.
३. ज्या कारणामुळे असा रक्तस्त्राव होत असेल त्यावर योग्य वैद्यकीय उपचार घेऊन तो त्रास कमी केला पाहिजे.
४. अशा त्रासावर सहसा हार्मोन्सच्या गोळ्या, गर्भनिरोधके असणाऱ्या गोळ्या आणि आयर्न सप्लीमेंट दिले जातात. परंतु अशी कोणतीही औषधे स्वतःच्या मनाने घेऊ नयेत. वैद्यकीय सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत.
५. एखादी जास्त गंभीर समस्या असेल तर तज्ञ डॉक्टर त्यावर सर्जरी सारखे उपाय करू शकतात.
तर महिलांनो, ॲनिमिया होण्यामागे मासिक पाळी दरम्यान होणारा जास्त रक्तस्त्राव हे एक कारण असू शकते. त्यामुळे अशा होणाऱ्या जास्त रक्तस्त्रावाकडे दुर्लक्ष न करता त्यावर वेळीच योग्य औषधोपचार करून घ्या.
तसे करण्यामुळे विनाकारण येणारा अशक्तपणा, थकवा टाळता येऊ शकेल.
स्त्रियांनी आपल्या आरोग्यासंबंधी जागरुक राहणे अतिशय आवश्यक असते कारण स्त्रीचे आरोग्य चांगले असेल तर संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते.
मनाचेTalks च्या पेजवर आम्ही वारंवार महिलांच्या आरोग्याचे प्रश्न आणि त्यावरील उपाय सांगणारे लेख प्रकाशित करत असतो. असे लेख आवर्जून वाचा तसेच अशा लेखांमधील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते शेअर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.