हल्लीची तरुण पिढी शहरात राहणे, नोकरी किंवा व्यवसाय करणे जास्त पसंत करते. सर्वांनाच शहरात राहायचं असतं. शहरातील आधुनिक राहणीमान सर्व तरुण मुलांना हवेसे वाटते.
पण ह्याला काही अपवाद देखील आहेत. अशी काही तरुण मुले आहेत जी स्वतःहून शेती करण्याकडे वळत आहेत.
शेती करून, त्यात नवेनवे प्रयोग करून स्वतःबरोबरच इतरांचा फायदा करून देण्याकडे त्यांचा कल असतो.
शेती करण्याला कमी लेखणाऱ्या, नावे ठेवणाऱ्या पिढीपुढे स्वतःचे उदाहरण घालून देऊन ते नवा आदर्श निर्माण करत आहेत.
अशीच गोष्ट आहे महाराष्ट्रातील पुण्याच्या रोहित चव्हाण ह्या तरुणाची. रोहित चव्हाणने आधुनिक पद्धतीने शेती करून नफा कसा कमवता येतो ह्याचे उदाहरणच घालून दिले आहे.
रोहित खरे तर एका गरीब शेतकऱ्याचा मुलगा. तो लहानपणापासूनच शेतात सतत कष्ट करून देखील पुरेसे पैसे न मिळवू शकणाऱ्या वडिलांना पहात होता.
त्यामुळे शेती करण्याकडे त्याचा कल नसता तरी वावगे वाटले नसते. पण असे झाले नाही.
उलट आपल्या वडिलांना आलेल्या अडचणींचा नीट अभ्यास करून त्या अडचणी येऊ न देता उत्तम प्रकारे शेती करण्याचा रोहितने ध्यास घेतला.
रोहितच्या असे लक्षात आले होते की शेतकरी स्वतः मालाची विक्री न करता ती आडत्यामार्फत (एजंट) करतात त्यामुळे नफ्याचा बराचसा हिस्सा कमिशन म्हणून जातो.
हे लक्षात आल्यावर रोहितने निश्चय केला की शेती करण्यातील सर्व खाचाखोचा लक्षात घेऊन आपल्या वडीलोपार्जित जमिनीवर उत्तम प्रकारे शेती करायची.
त्यासाठी त्याने अहमदनगरच्या कृषि महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. लहानपणापासून गरिबीत दिवस काढल्यामुळे उत्तम शेती करून भरपूर पैसे कमवण्याचे स्वप्न त्याने पाहिले.
रोहितच्या घरची वडीलोपार्जित जमीन ही द्राक्षे आणि डाळिंबाच्या शेतीसाठी अतिशय चांगली आहे.
परंतु आधुनिक तंत्रज्ञान माहीत नसल्यामुळे तसेच कमिशनपोटी बराच पैसा जात असल्यामुळे त्याच्या वडिलांनी ती कधी केली नाही.
परंतु ह्या दोन्ही गोष्टींवर मात करण्याचे रोहितने ठरवले. कॉलेजमध्ये शिकलेल्या ज्ञानाच्या जोरावर रोहितने द्राक्षे आणि डाळिंबाच्या शेतीबाबतचे आधुनिक तंत्रज्ञान माहीत करून घेतले.
तसेच योग्य प्रमाणात जमिनीची मशागत आणि पाणी पुरवठा ह्यावरही लक्ष दिले.
तसेच मध्यस्थ किंवा आडत्याची गरज लागून कमिशन द्यावे लागू नये म्हणून रोहित स्थानिक फळांची निर्यात कशी करतात हे शिकला.
त्यासाठी त्याने एका निर्यात करणाऱ्या फर्ममध्ये विनावेतन काम केले आणि सर्व बारकावे समजून घेतले. आता रोहित स्वतः त्याच्या जमिनीतील स्थानिक फळांची निर्यात करतो. तसेच इतर शेतकऱ्यांनाही त्याबाबत मदत करतो.
उत्तम प्रतीची स्थानिक फळे जर शेतकऱ्याने स्वतः निर्यात केली तर काहीही कमिशन न लागता उत्तम नफा होऊ शकतो.
रोहित असे म्हणतो की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढते आहे कारण दुर्दैवाने त्यांना ह्या अशा प्रकारच्या शेतीची काहीही कल्पना नसते.
त्यामुळे कर्जे, नुकसान होऊन ते आत्महत्या करतात. परंतु रोहित स्वतः आता हे रोखण्यासाठी पाऊल उचलतो आहे.
परिसरातील शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे, निर्यातीबद्दल योग्य माहिती देणे हे तर तो करतोच पण ह्याशिवाय सध्या लॉकडाऊनमुळे विकली न गेलेली द्राक्षे कशी साठवायची, त्यापासून मनुका, बेदाणे कसे तयार करायचे ह्याचेही प्रशिक्षण तो त्याच्या परिसरातील शेतकऱ्यांना देत आहे.
कोणत्याही शेतकऱ्याने खचून जाऊन चुकीचा निर्णय घेऊ नये ह्यासाठी रोहित प्रयत्न करतो.
त्यासाठी तो स्वतःचेच उदाहरण लोकांपुढे ठेवत आहे. त्याच्या वडिलांच्या १५ एकर वडिलोपार्जित जमिनीत शेतीची सुरुवात करून रोहित आता ८० एकर जमिनीचा मालक बनला आहे.
‘लक्ष्मी फार्म’ ह्या नावाने असणाऱ्या त्याच्या व्यवसायाने मोठी मजल मारली आहे. त्याच्या शेतात द्राक्षे आणि डाळिंबाची १ लाख झाडे आहेत.
फळांची गुणवत्ता टिकून राहावी ह्यासाठी रोहित खूप कष्ट घेतो. फळांचा आकार, रंग एकसारखा आणि उत्तम प्रतीचा असावा ह्याची तो विशेष काळजी घेतो.
म्हणूनच त्याच्या शेतातील फळे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन अशा देशांमध्ये निर्यात केली जातात.
तसं पाहिलं तर भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकरी हा आपला अन्नदाता. परंतु दुर्दैवाने अनेक शेतकऱ्यांना हलाखीत दिवस काढावे लागतात. अशा वेळी सर्व तरुण शेतकऱ्यांनी रोहित चव्हाणचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे.
शेतीत नवनवीन प्रयोग करून उत्तम पीक कसे घेता येईल व स्वतःचा तसेच इतरांचाही फायदा कसा करून देता येईल हे पाहिले पाहिजे.
तर अशी ही रोहित चव्हाणची प्रेरणादायक कहाणी. कशी वाटली ते नक्की सांगा….
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.