पैसा किंवा श्रीमंतीविषयी एक मोठा गैरसमज पसरलेला असतो.
श्रीमंती म्हणजे काय हो? अफाट खर्च मोठमोठ्या गाड्या, मोठा बंगला हे सगळे असले की श्रीमंती अशी भावना तुमच्या मनात असते.
खरंच श्रीमंती अशी असते का? आपली आर्थिक परिस्थिती आपणच आपल्या विचारांमधून घडवत असतो, हे बरोबर आहे का?
आणि बरोबर असेल, तर ते कसे? हे जाणून घेण्यासाठी हा लेख बारकाईने वाचा.
१) श्रीमंती म्हणजे खर्च न केलेला पैसा. .
तज्ञं असं म्हणतात श्रीमंती म्हणजे खर्च न केलेला पैसा.
तुमच्या मनात अशी कल्पना असते की महागड्या वस्तु खरेदी करणं म्हणजे श्रीमंती,
तज्ञ बरोबर याच्या उलट सांगतात, ते म्हणतात, पैसे कमावणं, त्याची बचत करणं आणि इंन्व्हेंस्ट करणं ही खरी श्रीमंती.
श्रीमंतीच्या बाबतीत दिसतं तसं नसतं, हेच खरं! जी माणसं सुट्टीसाठी प्रचंड पैसा खर्च करतात, खूप कपडे विकत घेतात, ब-याच महाग वस्तूंची खरेदी करतात ते खऱ्या अर्थाने श्रीमंत नसतात.
त्यांच्या कडे साठवलेला पैसा नसतो.
काही लोक मात्र दिसायला अगदी साधेसुधे असतान पण त्यांचा बॅक बॅलन्स मात्र मजबूत असतो.
त्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल तर खर्च न होणारा पैसा ज्याच्याकडे तोच खरा श्रीमंत आहे हे लक्षात घ्या.
आता याचा अर्थ हा नाही की, अवास्तव काटकसर किंवा कंजूशी करणे म्हणजे श्रीमंती, खर्च आणि काटकसर याचा समतोल साधता आला तर आर्थिक गणित जमवणे सोपे होते.
२) सगळे पैसे खर्च करू नका
एक खूप गरीब माणूस होता. तो एका श्रीमंत माणसाकडे कामाला लागला.
त्या श्रीमंत माणसाच्या सवयी बघून, तो ही हळूहळू पैशाची उत्तम गुंतवणूक करायला शिकला आणि लवकरच तोही त्या शहरातला श्रीमंत माणूस झाला.
आता या श्रीमंत माणसाचं सूत्र काय असेल सांगा?
त्या माणसाचं साधं सोपं सूत्र हेच होतं, की कमाई केलेले सगळेच्या सगळे पैसे खर्च करायचे नाहीत.
यावर जेंव्हा सर्व्हे केला गेला तेव्हा हेही लक्षात आलं की बऱ्याच लोकांकडे गुंतवणुकी विषय पुरेशी गंभीर जाणीव नसते.
पैशाची बचत कशी करायची? पैसे कसे गुंतवायचे? हे त्यांना माहितीच नसतं.
वीज बिल, कपडे, धान्य यावर महिन्याची कमाई संपून जाते.
तर मित्रांनो, एकूण कमाईच्या ८०%टक्केच कमाई झालेली आहे असं समजून घेऊन खर्च करायला हवा.
२०% बचत करायला हवीच, तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता.
समजा तुम्हांला १०००० रूपये मिळाले तर ८०००/- रुपयेच खर्च करायचे.
२००० रुपये बचतीसाठी ठेवायचेच.
आलेले सगळे पैसे खर्च करून टाकणं ही सवय मोडून टाका.
3 ) किती पैसे कमवायचे याचा आकडा ठरवा.
तुम्हाला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे? त्यासाठी जास्तीत जास्त किती कमवायला हवं? हे तुम्हाला निश्चित माहिती पाहिजे.
खूप जास्तही पैसा ही पुरेसा ठरत नाही किंवा खूप कमी पैसा सुद्धा पुरेसा नसतो.
फक्त तुम्हीच ठरवू शकता की तुम्हाला किती पैसा हवा?
एका संशोधनात लोकांना त्यांचा आनंद १ ते ५ आकड्यात मोजायला सांगितला.
वेगवेगळ्या आर्थिक स्तरातले लोक सारखेच आनंदी होते.
म्हणजे खूप पैसा खूप आनंद घेऊन येतो असं नाही, हे या निरीक्षणातून लक्षात आलं.
पण याच लोकांना विचारलं तुम्हाला आणखीन किती कमाई हवी? तेव्हा ती अजून ५०% तरी वाढलेली आवडेल असं लक्षात आलं.
पैशाच्या कमाईचं समाधान कुठपर्यंत मिळतं?
तुमच्या सुरुवातीच्या काळात तुमच्या कमाईचा आनंद हा आभाळाएवढा असतो.
पण जसजसे दिवस जातात, जसे पैसे यायला लागतात तसतसं या आनंदाचं प्रमाण कमी होत जातं.
कारण कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवलेलच नसतं.
त्यामुळे स्पर्धेत फक्त धावत राहणं हेच तुमचं आयुष्य होऊन जातं.
ध्येय न ठरवता केवळ पैसे मिळवण्यासाठी झगडत राहीलात तर फक्त हताशा तुमच्या पदरी पडेल.
४) एकाच आर्थिक कमाईवर अवलंबून राहू नका.
एकदा एका वर्गात एका शिक्षकाने विचारलं की “आयुष्यात धोका कुठं असतो?”
प्रत्येकानं वेग-वेगळं उत्तर दिलं.
त्यातल्या काही जणांनी असं सांगितलं, की व्यापार किंवा उद्योग करणं हा आयुष्यातला सगळ्यात मोठा धोका आहे.
शिक्षकांनी हसून त्यांना सांगितलं की व्यापार किंवा उद्योग हा धोकादायक नसतो, तर आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा धोका हा असतो की तुम्ही एकाच आर्थिक कमाई वरती अवलंबून असता.
एकाच कमाई वरती अवलंबून असणारे लोक कमाईचा तो एकमेव स्त्रोत चालू ठेवण्यासाठी मनाविरुद्ध तडजोडी करत राहतात, आणि दिवसेंदिवस निराश होत जातात.
काही कारणामुळे या कमाईचा मार्ग अचानक बंद झाला तर? हा विचार करायलाच हवा.
मित्रांनो, घरबसल्या, इंटरनेटच्या मदतीने तुम्ही आता नवीन कौशल्य शिकू शकता आणि तुमच्या कमाईचा. दुसरा स्त्रोत निर्माण करू शकता.
इंटरनेट चा वापर करून पैसा कमावणे कसे शक्य आहे? ते वाचा या लेखात
कमाईच्या एकाच मार्गावर अवलंबून असणारी व्यक्ती जबाबदारीच्या ओझ्याखाली दबून जाते.
एकाच कमाईवर अवलंबून राहण्याची चुकीची धोकादायक सवय बदला.
५) आयुष्याभोवती संरक्षित भिंत बांधा.
तुमच्या आयुष्याभोवती पैशांची एक सुरक्षित भिंत तयार करा.
आयुष्याला वा-यावर सोडण्याच्या घातक सवयीला आयुष्यातून लवकरात लवकर हद्दपार करा.
मित्रांनो, आयुष्यात अनेक घटना अशा असतात ज्या आपल्या हातात नसतात.
नुकत्याच कोरोना काळात याचा आपण अनुभव घेतला आहे.
कितीही उत्तम आर्थीक नियोजन असलं तरी ते कोलमडू शकते.
चांगली नोकरी हातातून जाऊ शकते, उद्योग व्यवसायात तोटा होऊ शकतो.
त्यासाठी पुढच्या किमान ६ महिन्याच्या खर्चाची बचत तुम्ही बाजूला काढून ठेवली पाहीजे.
हा रिझर्व्ह फंड कसा जमवावा हे समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
नोकरी बदलायची असेल, उद्योगात नवं काही करून पहायचं असेल तेंव्हा ही ६ महिन्याची बचत तुमच्या गाठीशी असेल तर तुम्ही निवांतपणे, मनासारखी नवी नोकरी शोधू, प्रयोग करु शकता.
भाविष्यासाठी एक पै ची ही बचत न करणं ही चुकीची सवय तुम्ही वेळीच सोडून द्यायला हवी.
६) वेळेची किंमत ओळखा
जास्तीत जास्त जमिनीसाठी दिवसभर धावणाऱ्या माणसाची गोष्ट तुम्हांला माहितीच आहे.
त्याच्या हातात शेवटी काहीच येत नाही. नाहक जीव मात्र जातो. बरोबर ना?
तर मग आता एक गोष्ट सांगा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात किंमती गोष्ट कोणती?
हरलात? ही गोष्ट आहे वेळ.
तुमच्या नातेसंबंधांसाठी, तुमच्या आनंदासाठी वेळ फार महत्वाचा आहे.
तुमच्या कडे वेळ असेल तरच तुम्ही पैशांचा उपभोग घेऊ शकता.
जेंव्हा तुम्ही एकाच वेळी जास्त गोष्टी खरेदी करता, जास्त गोष्टींकडे लक्ष देता तेंव्हा या सगळ्या गोष्टी मेंटेन करणं अवघड होतं.
याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो, तुमच्या आनंदावर होतो.
कोणतं काम महत्वाचं? कोणतं काम करण्याची फारशी गरज नाही हे वेळीच ओळखा.
त्यासाठी वॉरेन बफेटचा मंत्र वापरा.
तुमच्या आयुष्यातली, तुम्हांला महत्वाची वाटतात अशी २५ कामं लिहून काढा.
त्यातली टॉपची जी ५ कामं आहेत त्यावर लक्ष केंद्रीत करा. बाकीच्या २० कामांना विसरून जा. वेळेचं महत्त्व ओळखा.
एक ना धड भाराभर चिंध्या असं आयुष्य न जगता, ज्या गोष्टींची खरोखरच गरज नाही त्यामध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टींवरती लक्ष केंद्रित करायला शिका.
या सवयी तुम्हाला श्रीमंत करतील.
७) ऋण काढून सण साजरे करू नका
मित्रांनो बऱ्याच गोष्टी तुम्ही EMI वर घेता त्याचे हप्ते फेडून व्याज ही भरत बसता.
कर्ज घेणं ही आज एक सहज सोपी गोष्ट बनली आहे.
कर्ज घेणं याला सामाजिक प्रतिष्ठा ही प्राप्त झाली आहे.
पण मित्रांनो, कर्ज काढून वस्तू विकत घेण्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागू दे, पण बचत करूनच वस्तू विकत घ्या.
कर्ज प्रकरण संपवण्यासाठी तुम्हांला मूळ रकमेपेक्षा दुप्पट तिप्पट रक्कम जास्त भरावी लागते.
जोपर्यंत कर्ज तुमच्या आयुष्यात आहे तोपर्यंत तुम्ही श्रीमंत होऊ शकत नाही.
तुम्ही चांगली गुंतवणूक करू शकत नाही.
तुमची प्रगती थांबते. कर्ज काढणारी व्यक्ती कर्ज संपवण्याच्या काळजीनं थकून जाते.
त्यामुळे कर्ज घेण्याची सवय त्वरीत बदला.
८) श्रीमंत होण्यासाठी गुंतवणूक करा.
कोणतंही कारण न देता, टाळाटाळ न करता योग्य गुंतवणूक केली पाहिजे, तरच पैशानं पैसा वाढेल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल.
तुमच्याकडे अभ्यासाला वेळ असेल तर स्टॉक मार्केटचा अभ्यास करून त्यात पैसे गुंतवा. पण हो स्टॉक मार्केट मध्ये काम करण्यात यश मिळवण्यासाठी त्यात अभ्यास महत्त्वाचा.
स्टॉक मार्केट मध्ये पैसा टाकून श्रीमंत होऊ, हा विचार करणारे लोक बरेचदा अमुक-तमुक माझ्या ओळखीच्या व्यक्तीने मला शिकवले तर ‘हे’ काम मला करता येईल, असा विचार करतात, पण स्टॉक मार्केट मध्ये पारंगत होणे हे, पोहोणे शिकण्या सारखे आहे.
ज्यामध्ये शिकवणाऱ्या पेक्षा शिकणाऱ्याचे ‘ऍक्टिव्ह पार्टीसिपेशन’ महत्त्वाचे.
तुमच्याकडे वेळच नसेल तर म्युच्युअल फंडांचा पर्याय निवडा.
योग्य गुंतवणूक तुमच्या पैशांना लवकरात लवकर दुप्पट-तिप्पट व्हायला मदत करते.
पण या गोष्टी पटकन घडून येत नाही त्यासाठी संयम बाळगायला हवा आणि दीर्घ मुदतीच्या पैशांची गुंतवणूक ही करायला हवी.
गुंतवणूक करण्याची टाळाटाळ करण्याची सवय सोडा.
वयाच्या अठराव्या वर्षीपासून तरुणांनी ही सुरुवात केली पाहिजे.
वयाच्या अठराव्या वर्षी मुलांकडून कोणत्या गोष्टी सुरू करून घेतल्या पाहिजेत, याबद्दल चा लेख मनाचेTalks वर आपण लवकरच घेऊन येऊ.
९) संधीचा योग्य फायदा उठवा.
एक युवक दोन-तीन तासाचा प्रवास करून नोकरीला जात होता.
लॉकडाऊनमध्ये त्याला Work from home चा पर्याय मिळाला.
प्रवासाचा त्याचा वेळ वाचला. याच वेळेत त्याने गुंतवणूक केली.
त्याने नेहमीच्या नोकरीबरोबर आणखी काम या उरलेल्या वेळेत करून पैसा मिळवत संधीचा फायदा उठवला.
पैसा असो की वेळ योग्य पद्धतीने आणि योग्य जागी गुंतवला तरच चांगले रिटर्न्स मिळतात.
वेळेप्रमाणे पैशाची ही गुंतवणूक विचारपूर्वक करा.
जिथे एकाच जागी १०,००० रुपये तुम्ही गुंतवणार आहात तिथे ते एकाच जागी न गुंतवता १० जागी तुम्ही गुंतवू शकता.
यासाठी संधी ओळखणं आणि समोर आलेल्या संधीचा फायदा उठवणं गरजेचं असतं.
श्रीमंत होण्यासाठी आम्ही तुम्हांला कोणत्या ९ सवयी सोडल्या पाहिजेत हे सांगितलं
आता तुम्ही आम्हाला सांगा की तुम्ही तुमची कोणती सवय दूर केलीत ज्यामुळे तुमची प्रगती झाली?
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.