साबुदाण्याची खिचडी खाल्ल्याने होणाऱ्या ‘या’ फायद्यांची तुम्हाला कल्पना सुद्धा नसेल?

उपवासाला खाल्ला जाणारा साबूदाणा वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे का?

श्रावण महिना म्हणजे उपवासांचा महिना!! उपास म्हटला की साबुदाण्याची खिचडी अगदी ‘मस्ट’ असतेच.

लहानमोठे सगळ्यांनाच आवडणारा हा साबूदाणा, ह्याचे नेमके गुणधर्म काय आहेत?

वजन कमी करत असताना साबूदाणा खाणे उपयुक्त ठरते का? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे आम्ही आज ह्या लेखात द्यायचा प्रयत्न करणार आहोत.

बारीक पांढऱ्या मण्यांसारखा दिसणारा साबुदाणा टॅपिओका नावाच्या झाडाच्या मुळांपासून तयार केला जातो.

साबुदाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेट्स असतात. त्यामुळे साबुदाणा खाल्ला की शरीराची एनर्जी म्हणजेच ऊर्जेची गरज भागवली जाते.

साबुदाण्याची मूळची उग्र चव नसते त्यामुळे अनेक पदार्थांच्या कृतीमध्ये साबुदाण्याचा मूळ पदार्थाच्या चवीला धक्का न लावता उपयोग केला जातो.

साबुदाणा हा पोटभरीचा पदार्थ असल्यामुळे भारताच्या अनेक प्रांतांमध्ये साबुदाण्याची खिचडी उपासाला पोटभरीचा पदार्थ म्हणून खाल्ली जाते.

साबुदाण्यामध्ये भरपूर कार्बोहायड्रेट आणि स्टार्च असल्यामुळे त्यापासून बनवलेला पदार्थ खाल्ला की पोट भरल्याची भावना होते. यामुळेच उपासाच्या दिवशी एवढा एकच पदार्थ खाल्ला तरी पुरेसे असते.

परंतु जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर मात्र पोटभरीचा आणि समाधान देणारा असला तरी साबुदाणा खाणे उपयुक्त ठरणार नाही.

साबुदाण्यात असणाऱ्या स्टार्च आणि कार्बोहायड्रेटमुळे वजन कमी करण्यात अडथळा येऊ शकतो.  उलट काहीवेळा साबुदाणा खाण्यामुळे वजनात वाढ होण्याची शक्यता असते.

वजन कमी करताना साबुदाणा खाणे का योग्य नाही हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला साबुदाण्यामध्ये नेमके कोणते घटक असतात हे जाणून घेतले पाहिजे.

साबुदाणा हाय कार्बोहायड्रेट आणि हाय कॅलरी असणाऱ्या पदार्थांच्या गटात मोडतो.

एक कप साबुदाण्यामध्ये खालील घटक असतात

  • ५४४  कॅलरी
  • १३५  ग्रॅम कार्बोहायड्रेट्स
  • १.३७  ग्राम फायबर
  • ०.२९  ग्राम प्रोटीन
  • ०.०३  ग्रॅम फॅट्स
  • ३०.४  मिलिग्रॅम कॅल्शिअम
  • २.४   मिलिग्रॅम आयर्न
  • १.५२  मिलिग्रॅम मॅग्नेशियम
  • १६.७  मिलिग्रॅम पोटॅशियम

या तक्त्यावरून आपल्या लक्षात येते की साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट असतात आणि इतर पोषक घटक अतिशय कमी प्रमाणात असतात. याचा अर्थ साबुदाणा हा परिपूर्ण आहार होऊ शकत नाही.

यावरून आपल्या असे लक्षात येते की वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या लोकांसाठी साबुदाणा खाणे योग्य ठरणार नाही.

परंतु साबुदाण्यात काहीच गुणधर्म नसतात असे मात्र नाही. साबुदाणा खाण्यामुळे शरीराला काही फायदे सुद्धा होतात. त्यामुळे ज्या व्यक्तींचे वजन आटोक्यात आहे असे लोक काही वेळा साबुदाणा नक्कीच खाऊ शकतात. साबुदाण्यापासून आरोग्याला कोणता फायदा होतो हे आपण पाहूया.

१.  ऊर्जेचा स्त्रोत

शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा पुरवण्याचे काम साबुदाणा करतो. कार्बोहायड्रेट आणि कॅलरीजचे प्रमाण भरपूर असल्यामुळे थोडासा साबुदाणा खाल्ला तरी शरीराला पुष्कळ ऊर्जा मिळते.  नियमित  व्यायाम करणारे,  सायकल चालवणारे,  पोहायला जाणारे लोक ऊर्जेचा स्त्रोत म्हणून आहारात साबुदाण्याचा समावेश करतात.

२.  ग्लुटेन फ्री

आजकाल बऱ्याच लोकांना ग्लूटेन या पदार्थाची ऍलर्जी असते. अशा लोकांना ग्लूटेन युक्त पदार्थ खाल्ल्यास पोट दुखी,  पोट फुगणे,  जुलाब आणि थकवा येणे अशा समस्यांचा सामना करावा लागतो.  अशावेळी ग्लूटेन मुक्त असणारा साबुदाणा उपयोगी पडतो. ग्लूटेन एलर्जी असणाऱ्या लोकांसाठी साबुदाण्याचे पदार्थ हा चांगला पर्याय आहे.

३.  पचनशक्ती सुधारते. 

साबुदाण्यामध्ये काही प्रमाणात फायबर असल्यामुळे साबुदाणा खाल्ल्यास शरीराची पचनशक्ती सुधारते असे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे पोट फुगणे, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या विकारांवर साबुदाणा खाण्याचा उपयोग होताना दिसून येतो.

४.  वजन वाढण्यासाठी उपयोगी 

काही अतिशय बारीक असणाऱ्या लोकांना वजन वाढवण्याची आवश्यकता भासते. अशावेळी भरपूर कार्बोहायड्रेट असणारा साबुदाणा त्यांना उपयुक्त ठरू शकतो. वजन कमी करण्यासाठी उपयोगी नसला तरी वजन वाढण्यासाठी मात्र साबुदाणा खाणे निश्चित उपयोगी ठरते.

५.   रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयुक्त

साबुदाण्यामध्ये पोटॅशियम असल्यामुळे साबुदाण्याचा रक्तदाब नियंत्रित करण्यास उपयोग होतो.

६.  हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त

साबुदाण्यामध्ये योग्य प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांच्या बळकटीसाठी साबुदाणा खाणे उपयोगी ठरते.

तर हे आहेत साबुदाण्याचे गुणधर्म आणि साबुदाणा खाण्यामुळे शरीराला होणारे फायदे.

परंतु अर्थातच उपयुक्त आहे म्हणून खूप जास्त प्रमाणात साबुदाणा खाणे योग्य नाही.

मग आहारात साबुदाण्याचा समावेश नेमका कशा प्रकारे असावा आणि किती प्रमाणात असावा?

आहारात साधारणपणे एक ते दीड वाटी साबुदाण्याचा समावेश केल्यास त्याचा काही त्रास होत नाही. परंतु वारंवार साबुदाणा खायचा असल्यास योग्य प्रकारचा व्यायाम नियमित करणे अतिशय आवश्यक असते.

चालणे,  पळणे,  पोहणे,  सायकलिंग किंवा कोणताही खेळ खेळणे यासारखा व्यायाम आठवड्यातून तीन ते पाच दिवस किमान 45 मिनिटे करणे आवश्यक आहे.

तर मित्र मैत्रिणींनो, आज आषाढी एकादशीनिमित्त चविष्ट असणारी साबुदाण्याची खिचडी नक्की खा. परंतु बरोबरीने आवश्यक प्रमाणात व्यायाम करायला विसरू नका.

ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।