सगळे आई-बाबा आपल्या लेकरांचे पुष्कळ लाड करत असतात. जे स्वतःला लहानपणी मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे ह्याचा अट्टाहास करतात. अगदी सगळ्या मागण्या पुरवल्या जातात.
बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू घरात आलेली असते. मुलांना ह्यातून काय समजते ह्याचा विचार आपण करतो का..?…
आणि म्हणून मुलांना पैशांचं महत्त्व पटवून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ते महत्त्व सहज सहज कसं पटवून द्यायचं हे सांगणारा हा लेख आहे.
‘आई माझी सायकल जुनी झाली, त्या मॉन्टीला बघ कशी नवीन मिळाली सायकल.. मला पण हवी..’
‘अरे पण तीन महिन्यांपूर्वी घेतलेली सायकल इतक्यात कशी जुनी झाली..?? आम्ही एकदा सायकल घेतली की कित्येक वर्षे वापरायचो. नंतर तीच भावंडांना द्यायचो.. अगदी १५ – २० वर्षांनी ती भंगारात काढायचो.. तो पर्यंत तीच पादडायचो..’
‘आई मला ते काही सांगू नकोस. मला नवीन सायकल हवी’
हे असे संवाद तुमच्या खूप परिचयाचे असतील नाही का..? सायकल असो, कपडे असो, खेळ असो, वह्या पुस्तक आणि दप्तर असो एक ना अनेक वस्तू सध्याच्या युगात घेतल्या घेतल्या जुन्या होतात आणि मग नवीन वस्तूंची डिमांड सुरू होते..
ह्याचं कारणही आपल्याला माहीतच असेल..
सगळे आई-बाबा आपल्या लेकरांचे पुष्कळ लाड करत असतात. जे स्वतःला लहानपणी मिळालं नाही ते आपल्या लेकरांना मिळालं पाहिजे ह्याचा अट्टाहास करतात.
अगदी सगळ्या मागण्या पुरवल्या जातात. बाजारात मिळणारी प्रत्येक वस्तू घरात आलेली असते. मुलांना ह्यातून काय समजते ह्याचा विचार आपण करतो का..?
सतत हवे ते सगळे पुढ्यात ठेवले की मुलांना इतकेच समजते की त्यांना काय हवे नको ते देणे हेच आई वडिलांचे कर्तव्य..
त्यात त्यांची चूक अशी काहीच नाही.. कारण डोळे उघडल्यापासून कशाचीच कमतरता आयुष्यात नसणे हे हल्लीच्या मुलांचे भाग्यच म्हणता येईल.
पण त्या साठी आई-वडिलांनी घेतलेले कष्ट ह्या मुलांना माहीत नसतात.
त्यांना लहान घर, कमी पैसे, कमी वस्तू, कमी खेळणी, भावंडांशी शेअरिंग, मित्रांना जमवून मैदानी खेळ खेळणे ह्यातले फारसे काही माहीतच नसते..
एक तर मूल एकटे असते किंवा एखादे भावंड असले तरी दोघांना सगळं कसं अगदी एक सारखं मिळतं..
त्यामुळे शेअर करणे, जे अवेलेबल आहे त्यात बघून वाटे करणे आणि मुख्य म्हणजे पैसे वाचवणे हे असले फंडे त्यांना अगदीच अनोळखी..
खरे तर कित्येक लोक जे हालाखीतून खूप वर आले त्यांना कायमच परिस्थितीची जाणीव आणि पैशांची किंमत असते.
त्यांच्या हातून वावगे खर्च होत नाहीत. कष्टाने कमावलेला पैसा सन्मार्गी लागतो.
पण त्यांच्या पुढच्या पिढ्या सगळं आयतं मिळाल्याने वाडवडिलांचे कष्ट मातीत मिळवतानाही आपण पाहतो..
तेव्हा नेहमी एक गोष्ट राहून राहून वाटते की ह्या मुलांना वेळीच पैशांचे महत्व समजून दिले असते तर त्यांनी स्वतःचे आणि वाडवडिलांचे भविष्य किती उज्वल केले असते..??
तर मित्रांनो, आजचा आमचा मुद्दा हाच आहे की पाश्चातापाच्या आधी पावले उचलली तर आपल्या आपण मुलांना, भावी पिढीला एक सुंदर भविष्य घडवण्यासाठी तयार करू शकतो.
मुलांना वेळीच पैशांचे महत्त्व पटवून दिले तर तेही त्याचा योग्य विनिमय करू शकतील.
नव्हे नव्हे ते इतके स्मार्ट युगात आहेत की भविष्यात त्या पैशांचा उपयोगही अगदी स्मार्टली करतील..
पैसे कसे कमवायचे किंवा कमावलेले कसे वाचवायचे आणि वाढवायचे हे लहानग्यांना वेळीच शिकवणे हा देखील पालकत्वातील एक संस्कार मानला गेला पाहिजे इतका महत्वाचा हा मुद्दा आहे.
ह्याची सुरुवात देखील अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता..
१. घरातले रोजचे खर्च काय काय असतात ह्याबद्दल मुलांना माहिती द्या: आई आणि बाबा पैसे कमवतात. ते पैसे घरात कशा कशा साठी खर्च करावे लागतात ह्या बद्दल मुलांशी चर्चा करा.
रोजचा कुटुंबाचा खर्च काय असतो, रोजचा खर्च महिन्याच्या खर्चांमध्ये पकडून महिन्याचे बजेट कसे काढले जाते ह्या प्रोसेस मध्ये मुलांना सहभागी करून घ्या.
किराणा सामान आणताना यादी कशी बनवतात आणि कसे सामान आणले जाते ही इंटेरेस्टिंग ऍक्टिव्हिटी म्हणून मुलांना करण्यास सांगा.
पैसे किती खर्च झाले आणि किती वाचले ह्याचा हिशोब ठेवायला शिकवल्यास उत्तम.. म्हणजे ‘आटे दाल का भाव’ त्यांना व्यवस्थित कळेल..
त्यांचे स्वतःचे महिन्याचे खर्च भागवायला त्यांना काही पॉकेटमनी जरूर द्या.
आणि त्यातच महिन्याचा खर्च कसा करायचा हे, घरखर्चाची माहिती मिळाल्यामुळे, ते आपसूक शिकतील..
२. घरातील मोठया वस्तूंच्या खरेदीच्या कामात मुलांना सहभागी करा: घरासाठी एखादी मोठी वस्तू जसे की टीव्ही, फ्रीज किंवा एसी आशा वस्तू खरेदी करताना कराव्या लागणाऱ्या गोळाबेरजे मध्ये मुलांनाही धडे द्या..
बजेट कसे ठरवले, किती हप्त्यात वस्तू घेणे परवडेल हे सगळे मुद्दे त्यांना समजावून सांगा.
लोन घेतले असेल तर आपण याचे हप्ते कसे काही महिने किंवा वर्ष फेडणार आहोत हे त्यांना अगदी सहज सहज समूज द्या.
बजेट कमी असल्यास त्याचे विभाजन कसे करायचे हे शिकवा.
करण बजेटच्या बाहेर, पैसा नसताना पैशांची उधळपट्टी करता कामा नये हा धडा ते ह्यातून नक्कीच शिकू शकतात.
ते स्वतः काहीही डिमांड करताना देखील आई वडिलांनी कमावलेल्या पैशाच्या मध्ये त्यांचे स्वतःचे बजेट बसतेय किंवा नाही हे समजून घेऊन शकतील.
३. बजेट आणि खर्च ह्या फापटपसाऱ्यातून पैसे कसे वाचवायचे हे शिकवणे महत्वाचे: गरज नसताना महागडी वस्तू घेऊन पैसा संपवायचा की गरजेपुरता वापरून उरलेला पैसा साठवायचा ह्यातला फरक मुलांना समजावून द्या.
हे साठवलेले पैसा कालांतराने काही आपत्तीमध्ये किंवा शिक्षणासाठी किंवा अतिमहत्वाच्या खरेदीसाठी कसा उपयोगी पडतो हे उदाहरणासाहित मुलांसमोर मांडा.
छोट्या छोट्या तडजोडी करायला शिकवा. जवळच्या अंतरावर रिक्षाने जाण्यापेक्षा सायकलने किंवा चालत जाऊन कसे पैसे वाचतील अशी प्रॅक्टिकल्स करवून घ्या.
स्वतःच्या पॉकेटमनीमधून काही पैसे वाचवण्यासाठी प्रोत्साहन द्या.
वर्षभरातून जास्तीत जास्त पैसे साठवले गेल्यास त्यांना एखादे सरप्राईस द्या. ह्यातून आहे त्या परिस्थितीत पैशांचा योग्य विनिमय ते नक्कीच शिकतील.
४. लहान लहान इन्व्हेस्टमेंट शिकवा: शेअर बाजार, गोल्ड खरेदी, इन्श्युरन्स, एफ. डी. अशी मोठ्यांची इन्वेसमेंट असते.
आणि ती वेळोवेळी काशी कामी येते ह्याची तोंडओळख त्यांना असू द्या.. मात्र त्यांना त्यांच्या वयाप्रमाणे योग्य अशी इन्व्हेस्टमेंट शिकवा.
म्हणजे घरात ५० खेळणी पडलेली असताना नवीन खेळणेच घेणे हे योग्य नसून त्या ऐवजी पैसे साठवून गरजेची उपयुक्त वस्तू घेणे, चाईल्ड इन्श्युरन्स मध्ये पैसे घालणे किंवा अगदी पैसे साठवून बँक अकाउंट उघडून त्यात छोट्या निधी ची आरडी चालू करणे असे स्मॉल इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स त्यांना शिकवा.
ह्यातून पैसे गाठीला साठवणे हे ते उत्तम शिकतील.
५. अगदी सोप्प्या उदाहरणातून त्यांना फालतू खर्च टाळणे शिकवा: पेनातली शाई संपली तर पेन टाकून नवीन आणण्यापेक्षा फक्त कमी पैशात येणारी रिफिल बदलली तर तिथे कसे ४-५ रुपये वाचतात हे शिकवा.
भाजी आणायला गेल्यावर भाव चढे असताना भरमसाठ भाजी आणण्यापेक्षा, गरजेपुरती भाजी घेणे आणि पैसे वाचवणे हे ही एक उत्तम उदाहरण असू शकते.
मागच्या वर्षीच्या अर्ध्या वापरलेल्या वह्या नवीन वर्षी वापरल्यास त्यातून वाचणारे पैसे स्वतःच्या पिग्गी बँक मध्ये साठतील ह्याची जाणीव करून घ्या.
घरात भरपूर कपडे असताना उगीच आहेत पैसे म्हणून शॉपिंग करा, एकावर एक फ्री मिळतंय म्हणून चढ्या भावात वस्तू खरेदी करा अशी निरुपयोगी कामे न करता त्यावेळी वाचलेला पैसा नंतर स्वतःच्याच कमी कसा येतो ते पटवून द्या.
म्हणजे मुलांना अवास्तव गरजा ठेवणे आणि वाढवणे किती अयोग्य आहे हे कळेल.
६. जे शिकवता ते स्वतः त्यांच्या समोर आचरणात आणा: तुम्ही स्वतः कमावता म्हणून बेलागाम पैसा उडवत असाल तर तुम्हाला मुलांना पैसे वाचवण्यास शिकवण्याचा काय अधिकार..??
त्यामुळे जरी तुम्ही रग्गड पैसे कमवत असला तरी मुलांना तुमच्या पैशांच्या कुबड्या देऊ नका.
त्यांना सक्षम करण्यासाठी तुम्ही जे शिकवत आहात ते तुम्ही देखील करा.
नाहीतर दुसऱ्यास सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण अशी स्वतःची अवस्था करून घ्याल.
मुले कृती बघून शिकत असतात हे लक्षात ठेवा. तुम्ही जे कराल तोच आदर्श मुले घेतात. त्यामुळे सावधान..!! तुमचा कष्टाने कमावलेला पैसा वाया जाऊ देऊ नका. तुम्ही आदर ठेवाल तर मुले नक्कीच शिकतील..
७. मुलांना स्वतः पैसे कमवायची संधी द्या: बाल कामगार पद्धतीवर संपूर्ण भारतात बंदी आहे. पण म्हणून मुलांना स्वतःचा पैसा स्वतः कमावणे ह्यावर आपण बंदी घालू शकता नाही.
इथे आपला उद्देश त्यांनी पोटापाण्यासाठी काम करावे असा नाही. तर घरकामात मदत करून, समाजकामात मदत करून स्वकष्टाचा पैसा जमवण्यासाठी प्रयत्न करणे असा आहे..
म्हणजे जर लेकरांनी तुम्हाला घरात कामी मदत केली तर त्यांना ५ – १० रुपये त्याबदल्यात द्या आणि पिग्गी बँक मध्ये ठेवण्यास सांगा.
पैसा हा सहजासहजी मिळत नसतो तर, अभ्यास करून मोठे झाल्यावर खूप कष्ट करून तो कमवाव लागतो हे मुलांना समजायला लागेल.
अशा तऱ्हेने कष्टाने पैसा कमावला की तो खर्च करताना विचार करण्याची सवय सुद्धा मुलांना लागेल.
पैसा फक्त उडवायचा असतो ही मानसिकता मुलांची होऊ द्यायची नसेल तर मुलांना थोडेफार कळत्या वयापासूनच पैशांशी दोस्ती करून द्या.
कोणतीही वस्तू घ्यायला पैसा नसेल तर आपल्याला ती घेता येत नसते हे मुलांना कळू द्या.
हट्टी मुले भर रस्त्यात फतकल मारून धिंगाणा घालतात हे फारच विचित्र दृश्य असते.
अशी मुले मोठी होऊन कितपत पैशाला आदर देतील ह्याचा विचार करणेच अवघड.
त्यामुळे शॉपिंगला जाताना त्यांना त्यांच्या पॉकेटमनीतील काही पैशांचे बजेट ठरवून द्या. त्याच पैशात जे येऊ शकते तेवढेच खरेदी करण्याची मुभा द्या.
म्हणजे स्वतःचे पैसे आपल्या आपण ते वाचवायला शिकतील. अशी मुले मोठी झाल्यावर नक्कीच उत्तम तऱ्हेने आर्थिक बाजू सांभाळतील. हे वेगळे सांगायला नको..!!
चला तर मग ह्या भावी पिढीच्या शिलेदारांना पैशांचा आदर करायला शिकवूया आजपासूनच…!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.