म्हणूनच विजयाच्या दिशेने घोडदौड करण्यासाठी, संघर्षावर मात कशी करायची ते वाचा या लेखात.
आयुष्यात काही चांगले मिळवायचे असेल तर संघर्ष तर करावाच लागणार. पण या संघर्षावर मात करत, आपली मानसिकता सकारात्मक ठेवण्यासाठीचे काय आहेत तीन मार्ग, वाचा या लेखात.
‘जिंदगी हर कदम एक नई जंग है’ हे गाणं तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. जीवन म्हटलं की त्यात संघर्ष आलाच, सुख-दुःखाचे प्रसंग, फायदा-तोट्याचे खाचखळगे आलेच.
होरपळणार्या उन्हाळ्यानंतर मनाला आणि शरीराला थंडावा देणारा पाऊस येतोच. तसाच संघर्ष हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि तो कधीतरी संपणारच.
संघर्ष जीवनाचा अविभाज्य घटक
काही चांगले काम करायचे असेल, कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर संघर्ष तर करावाच लागणार. पण या संघर्षाच्या काळातही काही वेळा आपले मानसिक संतुलन ढळू लागते.
निराशा येते, कधीकधी तर असा प्रश्नही पडतो की एवढे कष्ट, संघर्ष करूनही आपल्याया यश का मिळत नाही?
आणि मग आपण आपला संघर्ष थांबवायचा विचार करतो. पण लक्षात ठेवा टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही.
सध्या आपण अनिश्चित 2020 या काळात जीवन जगत आहोत.
आपल्या सर्वांनाच हा मानसिक, आर्थिक संघर्ष करावा लागत आहे. पण याचा शोक करत रडत बसायचं, की यावर मात करत पुढची वाटचाल करायची, हे आपणच ठरवायचे आहे.
संघर्षातूनच माणूस चांगल्या गोष्टी शिकतो. जसे की सोन्याला तापवून त्याच्यापासून सोनार सुंदर दागिना तयार करतो. तसेच जीवनातील संघर्ष, संकटे हे आपल्याला मजबूत बनवतात.
जीवन संघर्षावर विजय मिळवा
कवि मंगेश पाडगावकरांची एक कविता आहे, ‘सांगा कसं जगायचं रडत रडत की गाणं म्हणत’.
आयुष्यात संघर्ष आला की आपण हतबल होतो. पण अश्या परिस्थितीवरही विजय मिळवत यशस्वी होता येतं.
हिन्दी चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांनाही चित्रपट सृष्टीमध्ये आपली ओळख निर्माण करण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. त्यांच्या उंचीमुळे, तर कधी त्यांच्या आवाजामुळे त्यांना भूमिका मिळत नव्हत्या. पण त्यावर मात करत त्यांनी मिळतील त्या भूमिका केल्या.
प्रारंभी नकारात्मक भूमिकेतून त्यांनी प्रेक्षकांवर छाप पडली ज्यामुळे ‘एंग्री यंग मॅन’ ही उपाधी चाहत्यांकडून त्यांना मिळाली.
तुम्ही-आम्ही चांगल्या गोष्टी जशा स्वीकारतो तसा संघर्षही आनंदाने स्वीकारला पाहिजे.
त्यावर विजय मिळवला पाहिजे. जीवनातील संघर्षाला स्वीकारत यशोशिखर गाठलेल्या कित्येक व्यक्तींची उदाहरणे आपण वाचतो, पाहतो.
संकटे आल्यावर निर्माण होणार्या मानसिक संघर्षावर विजय कसा मिळवायचा याचे तीन मार्ग जाणून घेवूयात.
१. कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नाही, हे ध्यानात घ्या
जीवनात कोणतीही घटना, प्रसंग, संघर्ष हे कायमस्वरूपी नसतात, याची खूणगाठ मनाशी बांधा. जे आज आहे ते उद्या नसणार आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.
आज जी परिस्थिति आहे ती उद्या बदलणार आहे. अंधार्या रात्रीनंतर तेजस्वी प्रकाश असणारा दिवस उगवतोच. त्यामुळे चांगली-वाईट स्थिति स्वीकारून पुढची वाटचाल करा.
२. नकारात्मक विचारांना बळी पडू नका
कोणतीही वाईट घटना घडली की आपण त्याचा दोष इतरांना देतो.
स्वतःल मनस्ताप करून घेतो आणि त्यामुळे नकारात्मक विचारांची साखळी तयार होते आणि मग त्यातून चुकीची कृती घडते.
त्यामुळे लोक द्वेष करू लागतात. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मनात नकारात्मक विचारांना थारा देवू नका, त्याच्या आहारी जाऊ नका आणि विचाराना तुमच्या मनाचा ताबा घेवू देवू नका.
नकारात्मक विचारांची साखळी तोडण्याचा प्रयत्न करा.
३. आजच्या संघर्षात उद्याची प्रगति पहा
तुम्ही एक जीवंत माणूस आहात, तुम्ही नवीन गोष्टी शिकू शकता, त्या आत्मसात करून प्रगति करू शकता. ‘परिवर्तन’ ही मनुष्याला मिळालेली देणगी आहे. त्याकडे स्वतःचे जीवन बदलण्याची, आणखी चांगले करण्याची संधी म्हणून पहा.
उजाड माळरानावर काही काळानंतर पावसाच्या शिडकाव्याने हिरवळ तयार होवून त्यावर रंगीबेरंगी फुलांची सुंदर बाग तयार होते, तसेच आयुष्यात येणार्या संघर्षामुळे व्यक्ति त्यातून मार्ग काढत यशस्वी होते. मानसिक आणि शरीरिकरीत्या कणखर बनते.
सारांश
अडचणी आणि संकटे सतत आपल्या आयुष्यात येतच असतात. आपण त्यातून काय निवडायचे ही आपली जबाबदारी.
त्या संकटांना घाबरायचं, की त्यांना झुगारून त्यातून मार्ग काढत यशस्वी जीवन जगायचे हे आपल्यावर अवलंबून आहे.
सगळं काही चांगलं आहे आणि आणखी चांगलं होणार आहे, हा दृढनिश्चय बाळगा.
पळताना थोडी ठेच तर लागणारच पण शर्यत जिंकल्यानंतरच्या विजयाचा महोत्सव त्याच्यापेक्षा कित्येक पटींनी जास्त मोलाचा आहे.
त्यामुळे ही आयुष्याची शर्यत जिंकायची असेल तर नकारात्मक विचारांच्या घोड्यावर स्वार होऊ नका.
धन्यवाद आणि संघर्षावर मात करून विजेता होण्यासाठी टीम मनाचेTalks कडून मनःपूर्वक शुभेच्छा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.