कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यातून एक सुंदर कलाकृती साकारतो.
त्याचप्रमाणे आईबाबा आणि शिक्षक सुद्धा मुलांना घडवत असतात..
आईबाबा शिकवतील ते मुलं शिकतात, आईबाबा वागतील तसं मुलं वागतात.
जेव्हा आपण एखाद्या मुलाला चांगला मुलगा किंवा लाडावलेला मुलगा अशी लेबलं चिकटवत असतो तेव्हा, ती खरंतर त्याच्या आईवडिलांना लागू होत असतात..
कारण मुलगा चांगला होण्यामागे किंवा बिघडण्यामागे आईबाबांचाच हात असतो.
मुलांना चांगल्या सवयी लागाव्यात, वाईट सवयींपासून मुलं शक्य तितकी लांब राहावीत यासाठी चांगले आईबाबा नेहमी आग्रही असतात.
मोकळ्या हवेत खेळायची सवय लागणे, आपला पसारा आवरून ठेवणे, सर्व भाज्या नाक न मुरडता खाणे..
या आणि अशा किती सवयी असतात ज्या आईबाबांना आपल्या मुलांना अगदी सुरुवातीपासून लावायच्या असतात.
मुलं थोडी मोठी झाली की मात्र एक फार अवघड काम आईबाबांच्या मागे असतं, ते म्हणजे मुलांना अभ्यासाची गोडी लावणे!
बऱ्याचदा मुलांचा गैरसमज असतो की अभ्यास म्हणजे काहीतरी कंटाळवाणा प्रकार असतो.
आणि त्याचमुळे ती अभ्यासाला टाळायला बघत असतात.
आणि अशामुळे मग आईबाबांना सतत त्यांच्या मागे लागून अभ्यास करून घ्यावा लागतो..
मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, की असं का होत असेल?
कारण सोपं आहे.. आपणच अभ्यासाची एक भयंकर व्याख्या तयार करून ठेवली आहे. अभ्यास अमुक पद्धतीनेच करायला हवा,
याच वेळेला करायला हवा असे नियम आपणच आपल्या नकळत घालत असतो.
मुलं अभ्यासाचा कंटाळा करतात त्याला कारण म्हणजे आपल्याकडून घडणारी सगळ्यात मोठी चूक..
ती म्हणजे अभ्यास हा, शिस्तीतच व्हायला हवा हा आग्रह..
असं करायचं नाही तर मग काय? मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची?
सध्या या वर्क अँड लर्न फ्रॉम होमच्या दिवसांत तर हा प्रश्न सगळ्याच पालकांना पडला असेल.
म्हणूनच आजच्या लेखात आम्ही तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावायची याबद्दल काही टिप्स देणार आहोत.
१. मुलांना वाचनाची गोडी लावा
ज्या मुलांना वाचायला आवडतं त्यांना अभ्यासाची सुद्धा आपोआप गोडी लागते.
वाचनाचे पुष्कळ फायदे असतात, वाचनामुळे मुलांचा शब्दसंच वाढतो, भाषा विकसित होते, संवाद कौशल्य वाढतं, एका जागी बसून लक्ष केंद्रित करून घ्यायची सवय आणि याचमुळे त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाला गती मिळते.
वाचनामुळेच मुलांना विचार करायची सवय लागते आणि त्यांच्या विचारांना दिशा सुद्धा मिळते.
अगदी लहानपणापासून मुलांना गोष्टी वाचून, पुस्तकातली चित्र दाखवली तर त्यांना सुरुवातीपासूनच वाचनाची गोडी लागते.
थोड्या मोठ्या मुलांबरोबर आपण स्वतः वाचत बसलो, त्यांना दिवसातला एक ठराविक वेळ वाचनासाठी आखून दिला आणि त्या वेळात आपण ही त्यांच्याबरोबर बसून वाचलं तर त्यांना वाचनाचं महत्व पटतं आणि सवय सुद्धा लागते.
आता या पॅटर्नमध्ये, मुलांची आवड-निवड, स्वभाव यानुसार थोडा फरक होऊ शकतो. तो पालकांनी समजून घेणं गरजेचं.
मुलांना त्यांच्या वयाला साजेशी गोष्टीची पुस्तकं भेट म्हणून देणं हा सुद्धा त्यांच्या मनात वाचनाबद्दल ओढ निर्माण करायचा एक प्रभावी उपाय आहे.
हेतू मात्र हा असला पाहिजे की, ‘अभ्यास म्हणजे काही कंटाळवाणं, शिक्षा दिल्या सारखं ‘टास्क’ नसून त्यात पण इंटरेस्टिंग असं बरंच काही आहे!!’
वाचनाची सवय लागल्यावर तुम्हाला तुमच्या मुलाला अभ्यासाची गोडी लावायला विशेष प्रयत्न करावेच लागणार नाहीत!
२. मुलांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष द्या
सगळ्यांनाच सगळे विषय आवडतील असं नाही.
काहींना गणितात गती असते तर काहींना इतिहासात.
सगळ्या विषयांचा अभ्यास केला पाहिजे, निदान दहावी होईपर्यंत तरी, हे जरी खरं असलं तरी तुमच्या मुलाचा असा कोणता आवडीचा विषय आहे, हे जाणून घेऊन त्याबद्दल त्याच्याशी संवाद साधला, त्याबद्दल त्याला अधिक माहिती दिली, त्याला त्याबद्दल अजून वाचन करायला प्रोत्साहन केलं तर त्याला समजेल की अभ्यास हा काही फक्त शालेय पुस्तकाइतपतच मर्यादित नाही.
अगदी हे असंच, माझ्या मुलाला शाळेत शिकवला जाणारा इतिहास लहान पणा पासून ‘युजलेस’ वाटायचा.
हे असं काहीतरी वाचण्या पेक्षा, वेगवेगळ्या देशांचे इतिहास सिलॅबस मध्ये हवे होते, असंच त्याला वाटायचं.
अशा वेळी त्यांच्या पण विचारांचा मान ठेऊन, त्यांची आवड जपून सिलॅबस मधला अभ्यास पण कसा गरजेचा आहे हे समजावून सांगून, त्यांच्या आवडी जपण्यासाठी तशी पुस्तकं घेऊन देण्याचं काम आपण करून करू शकतो.
किंवा सध्या यु ट्यूबवर प्रत्येक विषयावर व्हिडीओ उपलब्ध होऊ शकतात…
यामुळे नावडीचे किंवा अवघड वाटणाऱ्या विषयांबद्दल सुद्धा त्यांना भीती वाटणार नाही.
मुलांशी त्यांच्या आवडीनिवडीबद्दल चर्चा करून आपण त्यांना महत्व देतोय ही जाणीव त्यांना होते आणि त्यामुळे स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय सुद्धा त्यांना लागते.
३. मुलांचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने घ्या
साधारण सहावी, सातवी पर्यंत मुलांचा अभ्यास घ्यायला लागतो.
अभ्यास घेताना जर पालक मुलांसमोर बसले आणि त्यांना उत्तरं लिहून काढायला लावली किंवा धडे मोठमोठ्याने वाचायला लावले तर, मुलं अभ्यास करायला कंटाळा करू शकतात.
म्हणूनच मुलांसाठी अभ्यास करायच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या पाहिजेत.
उदाहरणार्थ, स्पेलिंग पाठ व्हायला त्यांना रोज दिसतील असे आकर्षक तक्ते त्यांच्याकडूनच करून घेऊन त्यांच्या खोलीत लावता येतील किंवा त्यांच्या आवाजात पाढे रेकॉर्ड करून रोज त्यांना ऐकवता येतील.
कधी त्यांच्या मित्रमैत्रिणींना जमवून एकत्र अभ्यास करायची सवय लावता येईल.
प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याप्रमाणेच त्यांची अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते.
या पद्धतीतली तुमच्या मुलाला सगळ्यात सूट होणारी कोणती पद्धत आहे.
आणि या शिवाय ही तुम्ही इतर कोणत्या पद्धती वापरून मुलांना अभ्यासात गुंतवू शकता याचा विचार करून त्या गोष्टी करून बघता येतील.
४. मुलांना तुमच्या शिक्षणाच्या अनुभवांबद्दल सांगा आणि त्यांचे अनुभव ऐकून घ्या
मुलांना संभाषण आवडतं. त्यांना त्यांचं मत विचारलं तर त्यांना महत्व देतोय असं वाटून जबाबदारीची जाणीव येते.
म्हणूनच तुमचे लहानपणीचे अनुभव त्यांना सांगा, त्यांच्या अनुभवांबद्दल विचारून संवाद साधा.
याशिवाय ही त्यांच्या एखाद्या धड्यात रस दाखवून त्याबद्दल त्यांना प्रश्न विचारून त्यांना बोलतं करा.
किंवा ते सोडवत असलेल्या एखाद्या गणिताबद्दल कुतूहल व्यक्त करून, त्याबद्दल प्रश्न विचारा म्हणजे त्यांना सुद्धा अभ्यास करायला हुरूप येईल.
५. मुलांचं छोट्याशा गोष्टींसाठी सुद्धा कौतुक करा
मुलांना आईबाबांकडून सतत कौतुकाची अपेक्षा असते.
लहान मुलं तर बऱ्याचदा काही गोष्टी केवळ आईबाबांनी ‘शाब्बास’ म्हणावं म्हणून करत असतात.
आईबाबांनी कौतुक केलं की मुलांना नवा हुरूप येतो म्हणूनच मुलांची कितीही लहान गोष्ट असुदे त्याचं कौतुक करा!
तुम्हाला त्यांचं कौतुक वाटतं हे त्यांना कळू द्या म्हणजे ते अजून जास्त कष्ट घ्यायला सज्ज होतील.
अगदी तुमच्या मुलाला एखाद्या विषयात रस नसेल आणि जेमतेम का होईना पण मार्क पाडून तो पास झाला असेल.
तरी त्याचं कौतुक करून बघा, पुढच्या वेळेला या नावडीच्या विषयात जास्त मेहनत तो घेताना तुम्हाला दिसतो की नाही ते.
६. मुलांना व्यवस्थितपणा शिकवा
मुलांना आवरावरीची सवय लावा. पसरलेलं अभ्यासाचं टेबल, न आवरली पुस्तकांची कपाटं बघितली की अभ्यास करायचा सगळा मूड कुठल्या कुठे पळून जातो.
हेच जर पुस्तक छान मांडून ठेवली, कपाटात वस्तू नीट रचून ठेवल्या, त्यांच्या आवडीचं एखाद खेळणं अभ्यासाच्या टेबलवर ठेवलं,
तर अभ्यास करताना फ्रेश वाटेल आणि नेहमी पेक्षा जास्त अभ्यास होईल.
याचप्रकारे मुलांना वहीत व्यवस्थित लिहायची सुद्धा सवय लावली पाहिजे.
छान सुवाच्च अक्षरातलं खाडाखोड नसलेलं किंवा कमी खाडाखोड असलेलं लिखाण बघितलं की बरं वाटतं.
त्यांच्या व्यवस्थितपणाचं वेळोवेळी कौतुक करा, अक्षर नीट काढलं, एकसारखं लिहिलं तर त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या, त्यांच्या आवडीचं पेन, पेन्सिल आणून द्या, घरच्या अभ्यासाला त्यांच्या आवडत्या कार्टूनच्या वह्या ठेवा.
लहान मुलं असतील तर त्यांना फळ्याचं आकर्षण असतं, मग त्यांच्या खोलीत एक फळा लावून घ्या ज्यामुळे त्यांना अभ्यासाला बसायला अधिक उत्साह वाटेल आणि अभ्यासाची गोडी वाढेल.
मुलं मोठी म्हणजे ५ वी, 6 वी च्या वयाची झाली, की महत्त्वाचे पॉईंट्स, फॉर्म्युलाज लक्षात ठेवण्यासाठी भिंतीवर चिटकवण्याचे स्टीकी नोट्स आणून द्या!
भिंतीवर आपल्या अभ्यासाचे पॉईंट्स बघून त्यांना अभ्यासाच्या जवाबदारीची राहील.
७. मुलांच्या टीव्ही बघायच्या किंवा गेम खेळायच्या वेळेवर निर्बंध आणा
सतत टीव्ही बघून किंवा गेम खेळून मुलांना सुस्ती येते.
खूप वेळ गेम खेळले तर त्यांना नंतर लक्ष एकाग्र करायला अवघड जातं आणि या गोष्टींची सवय लागली की सारख्या त्याच कराव्याशा वाटतात.
आणि वाचन, अभ्यास याची गोडी अजिबात लागत नाही आणि टीव्ही, गेम आजिबात नको म्हणलं तरी ते बरोबर नाही.
कारण अशा एखाद्या गोष्टीला विरोध केला तर मुलं ती गोष्ट चोरून करायला बघतात आणि खोटं बोलायला शिकतात.
म्हणून त्यांना दिवसातून जर ठराविक वेळ टीव्ही आणि गेम्स यासाठी दिला तर त्यांचं ही समाधान होतं आणि आईबाबांचा पण हेतू साध्य होतो.
मित्रांनो, पालकत्त्व हा काही विशेष फॉर्म्युला नाही.
प्रत्येक मुलासाठी/ मुलीसाठी यात थोडा थोडा बदल करावा लागेल.
पण या टिप्स लक्षात घेऊन, आपल्या मुलांच्या स्वभावानुसार, आवडीनुसार त्या अमलात आणल्या तर त्यांना अभ्यासाची गोडी लावणे सहज शक्य होऊ शकेल.
याव्यतिरिक्त तुम्ही कोणत्या ट्रिक्स वापरता का? त्या कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका!
https://manachetalks.com/12316/how-to-boost-confidence-in-kids-marathi-mulancha-aatmvishvas-ksa-vadhvava/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.