मित्रांनो, आपण खूप उत्साहाने आपली आवडती बाईक खरेदी करतो. वाहतुकीचे आणि सुरक्षेचे सर्व नियम पाळून ती चालवायला पण लागतो.
आपण बाईक चालवण्याचा मनमुराद आनंद घेत असतो. आणि अचानक आपल्या लक्षात येते की आपली गाडी मायलेज/ ऍव्हरेज अगदी कमी देते.
एक लिटर पेट्रोल मध्ये बाईक किती किलोमीटर अंतर पार करते त्यास बाईकचे मायलेज असे म्हणतात. सध्याचा पेट्रोलचा गगनाला भिडलेला भाव पाहता जास्तीत जास्त मायलेज देणारी बाईकच सर्वसामान्य लोकांच्या खिशाला परवडेल.
खरंतर कोणती बाईक घ्यावी हे ठरवताना बाईकचे मायलेज हा एक निर्णायक घटक असतो.
कितीही आकर्षक बाईक असेल तरी जर तिचे मायलेज कमी असेल तर ग्राहकांचा ती बाईक घेण्याकडे कल नसतो.
जास्तीत जास्त मायलेज देणारी बाईकच सर्वांच्या पसंतीस उतरते. तुमच्याकडे आधीच एक बाईक आहे का? ती घेताना तुम्ही मायलेजचा विचार केला नव्हता का? काळजी करू नका.
आपण असे काही उपाय पाहणार आहोत ज्यामुळे आपण आपल्या बाईकचे मायलेज वाढवू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशा कोणत्या ट्रिक्स आहेत…
१. बाईक चालवताना वेग स्थिर ठेवा
बाईक चालवताना वारंवार वेग वाढवणे आणि ब्रेक दाबून तो कमी करणे हे बाईकच्या मायलेज साठी चांगले नाही.
एका स्थिर वेगाने बाईक चालवली आणि रॅश ड्रायविंग करणे टाळले तर आपण बाईकचे मायलेज वाढवू शकतो. ३० ते ५० किमी प्रति तास एवढा वेग स्थिर ठेवून बाईक चालवणे उत्तम मायलेज मिळवण्यासाठी योग्य आहे.
२. बाईक उन्हात पार्क करू नका
तुमची बाईक प्रखर उन्हात पार्क करू नका. उन्हामुळे पेट्रोल उडून जाण्याची शक्यता असते. ज्यामुळे मायलेज कमी होते. बाईक नेहेमी सावलीत पार्क करा.
३. बाईक उभी असताना इंजिन बंद करा
तुम्ही एखाद्या ठिकाणी जात असताना वाटेत लाल सिग्नल लागला म्हणून उभे राहता किंवा एखादा मित्र येईपर्यंत त्याची वाट बघत उभे राहता.
अशा वेळी गाडीचे इंजिन आठवणीने बंद करा. बाईक नुसती उभी असताना देखील इंजिन चालू असेल तर काही प्रमाणात पेट्रोल जळते. ते आपण अशा प्रकारे वाचवू शकतो.
४. चांगल्या प्रतीचे इंधन वापरा
तुमच्या बाईकसाठी नेहेमी चांगल्या प्रतीच्या पेट्रोल /डिझेलची निवड करा. त्यामुळे बाईक चे इंजिन नेहेमी चांगल्या स्थितीत राहते आणि बाईकचा परफॉर्मन्स सुधारतो.
५. चाकातील हवा नियमितपणे तपासा
बाईकच्या चाकातील हवेचे प्रमाण नियमितपणे तपासा आणि कमी असेल तर योग्य प्रमाणात हवा भरून घ्या.
आता असे वाटू शकेल की चाकातील हवेचा आणि मायलेजचा काय संबंध?
परंतु तसे नाही, चाकात हवा कमी असेल तर बाईकच्या इंजिनवर अतिरिक्त ताण येतो आणि त्यामुळे मायलेज कमी होते.
म्हणून चाकातील हवेचा दाब नियमित तपासणे चांगले.
६. बाईक योग्य गियर मध्ये चालवा
बाईकला जे गियर असतात ते विशिष्ट स्पीड साठी डिजाईन केलेले असतात.
योग्य स्पीड साठी योग्य तो गियरच वापरा. लोअर गियर मध्ये असताना जास्त वेगात बाईक चालवू नका.
त्यामुळे इंधनाचे ज्वलन भरभर होईल आणि अर्थातच बाईकचे मायलेज कमी होईल.
७. बाईकचे सर्विसींग नियमितपणे करा
तुमच्या बाईक चे सर्विसींग नियमीतपणे करा.
त्यामुळे बाईक चांगल्या स्थितीत तर राहिलंच पण काही बिघडले असेल तर ते वेळीच लक्षात येऊन दुरुस्त करता येईल.
बाईकच्या इंजिन वर अधिक ताण येणार नाही आणि बाईकचे मायलेज सुधारेल.
८. बाईक मधील इंजिन ऑइल प्रमाणात आहे ना, हे तपासा
चांगल्या प्रतीचे आणि योग्य प्रमाणात असणारे इंजिन ऑइल हे बाईकच्या उत्तम मायलेजसाठी महत्वाचे असते.
चांगल्या मान्यताप्राप्त गॅरेज मधील मेकॅनिक कडून तुमच्या बाईक मधील इंजिन ऑइल नियमितपणे तपासून घ्या.
९. बाईकच्या चेनला पुरेसे वंगण द्या
दररोजच्या प्रवासात धूळ, माती आणि वाळूमुळे बाईकची चेन खराब होते.
ती व्यवस्थित फिरण्यासाठी त्या चेनला पुरेसे वंगण घाला.
अन्यथा त्याचा बाईकच्या मायलेजवर परिणाम होतो.
१०. क्लचचा वापर नीट करा
बाईक चालवताना क्लचचा वापर करावा लागतो. तो क्लच दाबताना काळजीपूर्वक दाबा.
खूप जोरात क्लच दाबण्याची सवय असेल तर क्लच खराब होऊन मायलेज कमी होते.
११. बाईकचे एअर फिल्टर नियमितपणे स्वच्छ करा
जर बाईकचे एअर फिल्टर स्वच्छ नसतील तर त्यातून पुरेशी शुद्ध हवा इंजिन पर्यन्त पोचणार नाही आणि त्यामुळे ज्वलनासाठी जास्त प्रमाणात इंधनाचा वापर होईल आणि बाईकचे मायलेज कमी होईल. म्हणून बाईकचे एअर फिल्टर नेहेमी स्वच्छ ठेवा.
१२. फ्युएल पाइप, फ्युएल फिल्टर आणि पेट्रोलची टाकी नेहेमी तपासा
फ्युएल पाइप, फ्युएल फिल्टर किंवा पेट्रोलची टाकी हयापैकी कशालाही बारीकसे जरी छिद्र असेल तर त्यातून सतत पेट्रोलची गळती होत राहते आणि त्यामुळे बाईकचे मायलेज कमी होते.
म्हणून ह्या तिन्ही पार्ट्सची नियमित तपासणी करा. आणि आवश्यकता असेल तर तो पार्ट बदला.
१३. एक्सलरेटर दिला असताना क्लच दाबू नका
नवख्या बाईक स्वारांकडून हमखास ही चूक होते.
बाईक चालवताना स्पीड वाढवण्यासाठी एक्सलरेटर दिला असताना कधीही क्लच दाबू नये.
त्यामुळे जास्त इंधनाचे ज्वलन होते आणि मायलेज कमी होते.
तर ह्या आहेत तुमच्या बाईकचे मायलेज वाढवण्याच्या काही ट्रिक्स.
ह्यांचा वापर करून तुमच्या बाईकचे मायलेज वाढवा आणि बाईक चालवण्याचा मनमुराद आनंद घ्या, अर्थात सुरक्षेचे सर्व नियम पाळून.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.