जगणे म्हटले की काळजी करणे आलेच. घरातून निघालेली आपली प्रिय व्यक्ती त्याच्या नियोजित ठिकाणी सुखरूप पोहोचेपर्यंत असलेली शॉर्ट टर्म काळजी असुदे किंवा आपल्या मुलाच्या भविष्याची लॉन्ग टर्म काळजी असुदे..
कोणत्याही व्यक्तीला ही काळजी, त्याबरोबर आलेला स्ट्रेस हा चुकला नाहीये.
याव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्यातल्या बऱ्या वाईट घडामोडींमुळे मनावर येणारा ताण, कामाचा किंवा अभ्यासाचा ताण असतोच.
आयुष्य पूर्णपणे स्ट्रेस फ्री करता येईल का?
या प्रश्नाचे उत्तर नाही असेच असेल. पण मग याचा अर्थ असा आहे का, की या स्ट्रेसच्या ओझ्याखाली, सतत काळजी करत आपले जगत राहायचे आणि आपल्याबरोबर इतरांनाही दुखी करायचे?
तर अजिबात नाही.
मित्रांनो, स्ट्रेस जरी पूर्णपणे घालवणे शक्य नसले तरी तो काही प्रमाणात कमी नक्कीच केला जाऊ शकतो.
स्ट्रेसमुळे आपल्याला मानसिक थकवा तर येतोच पण त्याचबरोबर स्ट्रेस हा अनेक शारीरिक समस्यांना सुद्धा कारणीभूत असतो.
आरोग्यपूर्ण आयुष्य जगायचे असेल तर आपल्याला शारीरिक आरोग्याइतकीच मानसिक आरोग्याची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे.
मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी स्ट्रेस कमी करणे हे पहिले पाऊल आहे.
आपल्या रोजच्या जगण्यात, घरी किंवा ऑफिसमध्ये, आपण अशा अनेक घटनांना सामोरे जात असतो, ज्यामुळे आपल्याला स्ट्रेस येतो, किंवा असलेला स्ट्रेस वाढतो.
स्ट्रेसशी सामना करायचा असेल तर तो रोजच्यारोज करावा लागतो.
म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी या टिप्स घेऊन आलोय. तुमच्या आयुष्यात असलेल्या काळज्या, चिंता आणि त्यामुळे तुमच्या मनावर येणारा ताण, अर्थात स्ट्रेस कसा कमी करता येईल यासाठी या काही टिप्स आहेत.
१. स्ट्रेसचा स्वीकार करा
स्ट्रेस हा आपल्या आयुष्याचा अपरिहार्य भाग आहे हे स्वतःला सांगा.
असे केल्याने जेव्हा एखाद्या घटनेमुळे तुमच्या मनावर ताण येईल तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या मूडवर होणार नाही.
कधी अचानक मनावर ताण आला तर तो तात्पुरता असणार आहे हे स्वतःला बजावून शांत रहायचा जास्तीत जास्त प्रयत्न करता येईल.
मुख्य म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीचा ताण येतो हे आपल्याला वेळेवर लक्षात आले तरच त्याच्यावर उपाय करता येईल, हो ना?
२. स्वतःकडे लक्ष द्या
जेव्हा एखाद्या गोष्टीचा तुम्हाला जास्त ताण येतोय असे जाणवेल तेव्हा सगळ्यात जास्त गरज असते ती स्वतःकडे लक्ष देण्याची.
पण आपण नेमके हेच करायला विसरतो. आधीच आपल्या मनावर ताण असतो त्यात स्वतःकडे दुर्लक्ष होते.
यापेक्षा जर ताणतणावाच्या काळात आपण स्वतःकडे लक्ष दिले, स्वतःचे लाड केले तर आपले मन ताजेतवाने होते.
असे झाल्याने समोरच्या स्ट्रेसफुल घटनेकडे बघायला वेगळा दृष्टिकोन मिळतो.
आता स्वतःचे लाड करायचे म्हणजे काय?
एक दिवस आपल्याला हवे ते करायचे मग ते सुट्टी घेऊन खरेदी करणे असुदे, आपल्या आवडीचे पुस्तक वाचणे असुदे, पार्लर-सलून मध्ये जाऊन स्वतःला पॅम्पर करवून घेणे असो
किंवा एखाद्या मित्रमैत्रिणीबरोबर मारलेल्या गप्पा असुदे..
बाकी कसलाच विचार न करता अपल्याला हवे तसे काही काळासाठी वागायचे.
३. तुमच्यातील कमततेचा स्वीकार करा
काही गोष्टीत आपण एक्स्पर्ट असतो, तर काही गोष्टी आपल्याला नाहीच जमत, कितीही प्रयत्न करा..
आता ज्या गोष्टी शिकायला हव्यात, त्या शिकायच्याच तो व्यक्तिमत्व विकासाचा भाग आहे.
पण एखादी गोष्ट आपल्याला नसेल जमत तर त्यामुळे मनावर ताण कशाला घ्यायचा?
ते खुल्या मनाने मान्य करावे आणि शिकायची तयारी दाखवावी..
लागलीच तर त्यासाठी मदत मागण्याची तयारी सुद्धा ठेवावी.
असे केल्याने स्ट्रेस कुठल्या कुठे पळून जाईल आणि यामुळे तुम्हाला ही काहीतरी नवीन शिकायची संधी मिळेल.
४. स्वतःवर विश्वास ठेवा
समजा तुमच्यावर अचानक एखादी अवघड जबाबदारी आली तर काय होते?
साहजिकच मनावर एक ताण येतो, ‘आपल्याला जमेल का?’
‘आपल्याकडून सगळे नीट पार पडेल का?’ असे प्रश्न मनात येतात.
ते साहजिकच आहेत. पण या प्रश्नांमध्ये अडकून बसता कामा नये.
अशाने आपल्यातला आत्मविश्वास कमी होतो आणि आपली ते काम उत्तमपणे निभावून नेण्याची पात्रता असून सुद्धा केवळ स्ट्रेस घेतल्याने आपण गोंधळून जाण्याची शक्यता असते.
म्हणूनच स्वतःवर विश्वास असण्याची गरज आहे. आपल्याला हे काम जमणार आहे, असे स्वतःला सांगत राहायचे म्हणजे आलेला ताण हलका होतो.
५. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
एखाद्या घटनेबद्दलच नाही एक एकंदरीत आयुष्याबद्दलच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर त्याचा फायदा होतो.
आपली विचार करण्याची पद्धतच जर नकारात्मक असेल तर आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस येणारच.
कारण प्रत्येक गोष्टीत आपण नकारात्मक विचार करून वाईटातली वाईट शक्यतेचा विचार करून विनाकारण स्ट्रेस घेत राहणार..
म्हणूनच आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर त्याचा स्ट्रेस कमी करायला फायदा होतो.
६. नियमितपणे व्यायाम करा
व्यायामाचे शरीराला ज्याप्रमाणे फायदे होतात त्याप्रमाणेच मनाला सुद्धा फायदा होतो.
व्यायाम केल्याने शरीरात ‘हॅपी हार्मोन्स’ तयार होतात ज्यामुळे आपल्या मनावरचा ताण हलका होतो.
जर एखाद्या गोष्टीचा मनावर ताण जाणवत असेल तर अर्धा तास वेगाने चालल्यावर किंवा ज्यांना जिममध्ये व्यायाम करायला आवडतो त्यांना जिममध्ये व्यायाम करून बरे वाटते आणि मनावरचे ओझे कमी होते.
यामुळे स्ट्रेस कमी होतोच पण मन सुद्धा ताजेतवाने झाल्याने जी काही ताण निर्माण करणारी परिस्थिती आहे त्यावर तोडगा काढायला सोपे जाते.
७. आरोग्यपूर्ण आहार
खरेतर आरोग्यपूर्ण आहाराचा आणि स्ट्रेसचा काय संबंध असे वाटू शकेल.
पण आपण जर आपल्या आहारात बदल केले आणि तेलकट, तुपकट, मसालेदार पदार्थ कमी केले तर आपले मन जास्त फ्रेश राहते.
आणि मन फ्रेश असले की समोर कितीही ताणतणाव निर्माण करणारी परिस्थिती येऊदे, आपण त्याचा विचार शांतपणे करू शकतो आणि स्ट्रेस यायच्या आधीच त्यावर मात करू शकतो.
८. व्यसनांपासून दूर राहा
एक गैरसमज असतो की दारूमुळे किंवा सिगारेटमुळे स्ट्रेस हलका होतो.
यामुळे अनेक लोक या व्यसनांच्या आहारी जातात.
पण खरेतर या व्यसनांमुळे माणूस आपली सारासार विचार करायची क्षमता हरवून बसतो आणि चुकीचे निर्णय घेतो.
ताण असेल तर सगळ्यात आधी मन शांत होणे गरजेचे असते ज्यामुळे आपण विचारपूर्वक निर्णय घेऊन आलेल्या परिस्थितीवर मात करू शकू.
९. ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये असलेल्या थियानिन या द्रव्यामुळे आपले मन शांत होण्यासाठी मदत होते.
म्हणूनच ग्रीन टीच्या नियमित सेवनाने स्ट्रेस दूर होतो.
दिवसातून एकदा ग्रीन टी प्यायल्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही चांगले फायदे आहेत.
मित्रांनो, आहेत ना हे सोपे उपाय?
आपली गाडी ट्राफिक मध्ये तासन्तास अडकून राहिली तर काय केले पाहिजे?…
एकतर, शांत बसून राहिले पाहिजे नाहीतर वेळ घालवण्यासाठी दुसरा काहीतरी चांगला मार्ग शोधला पाहिजे…
वेळ जातोय, इथला त्रास नेहमीचाच वगैरे वगैरे म्हणून चिडचिड, त्रास आणखी वाढवण्यात काही अर्थ आहे का?
जी गोष्ट आपल्या हातातच नाही अशा गोष्टीची चिंता कशाला करायची?
त्यापेक्षा हे वरील उपाय करा.. म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या हातात आहेत त्यावर काम करता येईल!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very use ful tips thank you…
आजच्या धावपळीच्या जीवन शैलीत ताणतणावाचे प्रमाण भरपुर वाढलेले आहे त्यासाठी आजच्या या लेखात आपण ज्या टीप दिलेल्या आहेत ते म्हणजे एक जालीम औषध आहे नक्कीच त्याचा फायदा होईल असे मला वाटते.
मनाचे talks टीम चे मनपूर्वक धन्यवाद.