आजारपणामुळे किंवा दुसऱ्या काही कारणाने तोंडाला चव नाहीये? मग हा लेख वाचा आणि जाणून घ्या तोंडाला चव आणण्यासाठी काय घरगुती उपाय करायचे.
बऱ्याचदा आजारपणात किंवा आजारपणातून उठताना अशी तक्रार असते की जेवण जात नाही.
असे होण्यामागे मुख्य कारण असते की आजारपणात औषधांमुळे आणि शारीरिक बदलांमुळे आपल्या तोंडाची चव जाते आणि सगळेच कडसर लागायला सुरु होते.
आजारातून उठताना व्यवस्थित जेवण करणे अतिशय गरजेचे असते.
कारण समतोल आहारामुळेच आपली गेलेली ताकद परत येणार असते.
पण तोंडाला चव नसल्याने जेवणे अवघड होऊन बसते.
कधी कधी आजारपणात जेवणच नकोसे होते त्यामुळे सुद्धा तोंडाला चव नसल्यासारखे वाटू शकते.
कधीकधी केवळ आजारपणातच नाही तर इतर काही गोष्टींमुळे सुद्धा तोंडाची चव जाऊन जेवण नकोसे होऊ शकते.
वजन वाढण्याची भीती, एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस, टेन्शन किंवा पित्त, अपचन या सारख्या गोष्टींमुळे पण खाण्यावरची इच्छा उडू शकते.
अशावेळेस माणूस त्याच्या गरजेपेक्षा खूपच कमी प्रमाणात जेवायला लागतो आणि मग त्यातून इतर समस्या उत्भवण्याची भीती असते.
पण हे काही कायमसाठी नसते. काही सोप्या घरगुती उपायांनी लगेच फरक पडू शकतो.
तुम्हाला सुद्धा अशी तोंडाची चव जाऊन जेवण जात नाही असे जाणवत असेल, तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा.
१. आले
एक छोटा आल्याचा तुकडा ठेचून त्यात थोडे लिंबू आणि सैंधव मीठ घातले तर आपल्या जिभेवरच्या टेस्ट बड्स उत्तेजित होतात आणि तोंडाची गेलेली चव हळूहळू परत येते.
जेवणानंतर हा उपाय केल्याने पचनासाठी फायदा होतो. अन्न व्यवस्थित पचले तर भूक लागायला मदत होते.
२. चूर्ण
पिंपळी, आले आणि काळी मिरी याची पावडर करून ती समप्रमाणात मिक्स करून रोज मधाबरोबर घेतल्याने तोंडाची गेलेली चव परत येऊन भूक लागायला मदत होऊ शकते.
हेच चूर्ण एक ग्लास गरम पाण्यात घालून सुद्धा घेता येते.
३. मीठ लावलेली चिंच
बऱ्याचदा आजारपणात तोंडाची चव जाणे हे मानसिक असू शकते.
अशावेळेला आपल्या जिभेवरच्या टेस्ट बड्सना उत्तेजित केल्याने भुकेची जाणीव होतो आणि मग व्यवस्थित जेवण जाते.
आंबट आणि खारट चवीमुळे ह्या टेस्ट बड्स उत्तेजित व्हायला मदत होते.
म्हणूनच एखादे मीठ लावलेले चिंचेचे बुटुक तोंडात धरल्याने तोंडाला चव येते.
४. वेलची
वेलचीला एकप्रकारचा वास असतो. या वासामुळे आपल्याला भुकेची जाणीव होते.
वेलची अगदी कमी प्रमाणात जरी काही पदार्थांमध्ये वापरली तरी तिचा स्वाद त्या पदार्थात उतरतो.
या वासामुळे आणि स्वादामुळे तोंडाला चव येते आणि तो पदार्थ खावासा वाटतो.
म्हणूनच जर तोंडाला चव नसेल तर एखाद्या पदार्थात वेलचीचा वापर केल्याने पेशंटला खायला दिले तर तरतरी येते.
५. गरम पाणी
गरम पाण्याचे आपल्या पचनासाठी आणि एकूण आरोग्यासाठीच पुष्कळ फायदे आहेत.
सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्याने फायदा होतो.
६. काळी मिरी आणि लवंग
तोंडाला चव नसल्यास दोन काळ्या मिरी आणि दोन लवंगा चावून खाव्यात.
यामुळे तोंडातल्या स्वादग्रंथी सक्रीय होतात ज्यामुळे तोंडाला चव येते आणि भुकेची जाणीव होते. भुकेची जाणीव झाली की जेवण जाते.
७. हिंग
हिंगाच्या वासामुळे सुद्धा तोंडाला पटकन चव येते.
हिंग हे पचनासाठी सुद्धा चांगले असते. वाटीभर ताकात एक चिमुट हिंग आणि सैंधव मीठ घालून खाल्ल्याने तोंडाला चव येते.
८. लोणचे
खरेतर आजारपणात तेलकट पदार्थ टाळावेत पण तोंडाला अजिबातच चव नसेल तर जेवण जात नाही.
म्हणून जेवताना अगदी एखादी कैरीच्या किंवा लिंबाच्या लोणच्याची फोड घ्यावी.
यामुळे तोंडाला चव येऊन जेवण जाते.
९. दारू, सिगारेट टाळावी
दारूच्या अति जास्त सेवनाने तसेच प्रमाणाबाहेर धुम्रपान केल्याने तोंडाची चव जाऊन जेवण नकोसे वाटू शकते.
त्यामुळे या व्यसनांपासून दूर रहायचा प्रयत्न करावा. तसेच चहा आणि कॉफीचे सुद्धा प्रमाणाबाहेर सेवन टाळावे, कारण त्याचा सुद्धा आपल्या आहारावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
१०. जिभेची स्वच्छता
आपल्याला चवी या जीभेमुळे समजतात त्यामुळे जिभेची स्वच्छता झाली पाहिजे. दात घासताना ब्रशच्या मागच्या अजुने जीभ देखील साफ करणे गरजेचे आहे.
जेवणाआधी एकदोन मिनिटे गरम पाण्याच्या गुळण्या केल्याने सुद्धा तोंडाची चव परत येते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.