“अजूनही लग्नासाठी माझ्या मनाची तयारी झाली नाही असे मला वाटते ….?? मावशीच्या प्रश्नाला वैदेहीचे हे उत्तर ऐकून आम्ही चमकलोच.
“अरे..!! पण लग्न ठरले आहे ना तुझे …?? आणि गेले दोन महिने त्याच्या बरोबर फिरतेस ही तू ..? तरीही अजून तयारी झाली नाही म्हणजे काय ..?? सौ.ने आवाज चढविला.
वैदेही तिची भाची. बऱ्याच प्रयत्नांनी तिचे लग्न ठरले होते. ती स्वतः एक चांगल्या कॉर्पोरेट कंपनीत मोठ्या पोस्टवर कामाला होती. तर होणारा नवरा छोटा उद्योग करीत होता. अर्थात घरची श्रीमंती होती. अनेक स्थळे नाकारणाऱ्या वैदेहीने या स्थळाला होकार का दिला हे आम्हाला पडलेले कोडेच होते . पण वैदेहीही त्याचे उत्तर देऊ शकत नव्हती. वैदेहीची घरची परिस्थिती बेताची होती. खाऊन पिऊन सुखी परिवार म्हणतात ना ….तेच. लग्नाची बोलणी करून आम्ही तिच्या घरी आलो होतो. नेहमीप्रमाणे मी शांतपणे बसून ऐकण्याचे धोरण स्वीकारले होते. तर सौ. भाचीचे लग्न म्हणून फारच उत्साहात होती. पण बोलणी काही तिच्या मनासारखी झाली नाहीत. नवऱ्याकडील मंडळींनी आपल्या श्रीमंतपणाचा दबाव टाकून बऱ्याच गोष्टी कबुल करून घेतल्या असे तिचे म्हणणे. म्हणून शेवटी तिने हा प्रश्न विचारला.
गेले दोन महिने तुम्ही गावभर फिरतायत तरीही त्यांच्याबाबतीत तुला काहीच माहिती नाही ..?? तिने चिडून वैदेहीला प्रश्न विचारला. “मग काय करता काय तुम्ही…. ?? काय बोलणी होतात तुमच्यात ??
“तसे आम्ही जनरल बोलतो. हॉटेलात जाऊन खातो. त्याच्या बाईक वरून फिरतो. अजून सिरीयस असे काही विचारले नाही. तुम्ही जे काही ठरविणार त्याला आमची मान्यता असणार आहे” वैदेहीने शांतपणे उत्तर दिले.
“हो …तरीही शेवटी लग्न तुला करायचे आहे. संसार तुला करायचा आहे. त्या कुटुंबात तुला राहायचे आहे. मग ती माणसे कशी आहेत?? त्यांचा स्वभाव कसा आहे ?? नवऱ्याला काय आवडते ?? तो आपल्याबरोबर संसार करण्यास सक्षम आहे ना ?? या गोष्टी पाहायला नकोत का ??” सौ. चा सूर आता समजावणीचा झाला.
“मान्य आहे मावशी ह्या गोष्टी बोलायला हव्यात. पण आम्ही अजूनही तिथपर्यंत आलो नाही. सध्या असेच जनरल बोलून एकमेकांना समजून घेतोय. होतील इतरही बोलणी हळू हळू. सध्या तरी आमच्या आवडी निवडी जुळतायत बाकी पुढे” वैदेही आता बरीच सावरली होती.
” हे बघ मुलाकडून सांगितलेल्या काही गोष्टी आपल्याला पटत नाहीत. त्या गोष्टीवर अडून बसलो तर लग्न मोडायचा संभव आहे. म्हणून तुला विचारतेय मी” सौ.ने निर्वाणीचे शस्त्रं बाहेर काढले.
“हरकत नाही ..ज्या गोष्टीवर कोणीही ऍडजस्टमेंट करणार नाही तेव्हा ते सोडून द्यावे लागेल. मी बोलेन त्यावेळी त्याच्याशी, मार्ग निघाला तर ठीक नाहीतर सोडून देऊ दुसरा पाहू” वैदेही शांतपणे म्हणाली तसे सौ. ने हताश होऊन माझ्याकडे पाहिले.
ते पाहून मी समजून गेलो आता माझी पाळी आलीय. मी वैदेहीला म्हणालो “सगळे काही इतके सोपे नसते. आपण जेव्हा एकमेकांना पसंद करतो तेव्हा पूर्ण भावना त्यामध्ये गुंतलेल्या असतात. मनाने एकमेकांना वरलेले असते. सासरची माणसेही आपली वाटू लागतात. अश्यावेळी सगळ्या गोष्टीत मुलाचा आणि मुलीचा सहभागही तितकाच महत्वाचा आहे. मोठी मंडळी मुलांच्या पुढच्या आयुष्याचा विचार फार कमी करतात आणि लग्नाच्या प्रथेचा रितिरिवाजाचा विचार जास्त करतात. अश्यावेळी त्या दोघांनी खंबीर होऊन काही निर्णय घेतले पाहिजे. म्हणूनच तुम्हीही या गोष्टीत लक्ष घाला आणि काही निर्णय ठामपणे घ्या. लग्न म्हटले की खर्च आला, मानपान आले, रुसवे फुगवे आलेच. ते योग्यवेळी सोडविले नाहीत तर आयुष्यभर मागे लागतील तुमच्या”.
” हो काका …तुम्ही म्हणता ते खरे आहे. यापुढे मीही गंभीरपणे या विषयात लक्ष देईन आणि त्याच्याशी ही बोलेन. खरेच काही गोष्टी गंभीर बानू शकतात हे लक्षातच आले नव्हते माझ्या” असे म्हणून वैदेहीने सौ. ला मिठी मारली.
वाचण्यासारखे आणखी काही…..
आमचा हरी
Low Cost Housing – बांधकामाची किंमत कमी कशी कराल?
वांग्याचं भरीत……… सांगा हं कसं झालं???
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.