जगात चॉकलेट नावाचा असा खाऊ आहे, जो कोणालाही आपल्या प्रेमात पाडू शकतो.
लहान मूल रडायला लागलं तर दे चॉकलेट, कुठल्या कारणासाठी कोणाला पटकन गिफ्ट द्यायचं असेल तर दे चॉकलेट, प्रेम व्यक्त करायचं असेल तर दे चॉकलेट.
चॉकलेट द्यायला-घ्यायला अगदी काहीही कारण पुरतं.
प्रिया मध्यंतरी आजारी होती त्यामुळे तिला खूप अशक्तपणा आला होता. तर अनुजा तिच्यासाठी चक्क डबाभर चॉकलेट्स घेऊन आली.
म्हणाली, “आता रोज यातलं एक डार्क चॉकलेट खा. लवकरच तुला फ्रेश वाटायला लागेल.” गंमत वाटली ना तिच्या बोलण्याची.
पण हे खरच आहे. तुम्हाला माहीत आहे का ठराविक प्रमाणात डार्क चॉकलेट खाण्याचे आरोग्याला फायदे आहेत. तेच आपण या लेखात पाहणार आहोत…
डार्क चॉकलेट मध्ये काही न्युट्रिअंट्स असतात ज्याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. तसंच हा एक अँटिऑक्सिडण्ट्सचा उत्तम स्रोत आहे.
कोकोच्या झाडाच्या बियांपासून डार्क चॉकलेट बनवलं जातं. एका अभ्यासातून असं लक्षात आलं आहे की साखरविरहीत डार्क चॉकलेट आरोग्य सुधारायला मदत करतं आणि हृदय विकाराची शक्यताही कमी करतं.
तसेच तब्येतीच्या दृष्टीने डार्क चॉकलेट खाण्याचे काही फायदेही अभ्यासातून स्पष्ट झाले आहेत.
१. पौष्टिकता :
अत्यल्प साखर आणि कोकोचं प्रमाण जास्त असलेलं डार्क चॉकलेट जर तुम्ही खात असाल तर ते तुमच्यासाठी नक्कीच पौष्टिक आहे.
कारण यात भरपूर न्युट्रिअंट्स, फायबर आणि मिनरल्स असतात.
साधारण १०० ग्रॅम डार्क चॉकलेटमध्ये ७०-८५% कोकोचं प्रमाण असेल तर भरपूर प्रमाणात मँगनीज, कॉपर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह, फायबर, झिंक, फॉस्फरस शरीराला मिळतं.
पण रोज एवढं १०० ग्रॅम चॉकलेट खाणही योग्य नाही. कारण त्याबरोबर तेवढी साखरही खाल्ली जाते.
म्हणून मोजक्या प्रमाणातच डार्क चॉकलेट खाणं चांगलं. तसंच सॅच्युरेटेड, मोनोसॅच्युरेटेड किंवा अल्प प्रमाणात पॉलिसॅच्युरेटेड फॅट्स असलेलं चॉकलेट खाणं योग्य ठरेल.
डार्क चॉकलेट मध्ये अल्प प्रमाणात कॅफिन आणि थिओब्रोमाईनही असतं. त्यामुळे स्वतःला फ्रेश वाटावं यासाठी थोडसं डार्क चॉकलेट खाऊ शकता.
२. मुबलक अँटिऑक्सिडण्ट्स :
डार्क चॉकलेट मध्ये भरपूर प्रमाणात आर्गेनिक कंपाऊंड्स असतात. जे शरीरात चांगल्या अँटिऑक्सिडण्ट्स प्रमाणे काम करतात. यामध्ये पॉलिफेनॉल्स, फ्लेवेनॉल्स, कॅटेशिन्स ही द्रव्य असतात.
इतर फळांच्या तुलनेत ही अँटिऑक्सिडण्ट्स जास्त चांगली असतात हे एका अभ्यासातून स्पष्ट झालं आहे.
३. रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त :
शरीरात नायट्रिक ऑक्साईड तयार करण्यासाठी डार्क चॉकलेट मधील फ्लेवेनॉल घटक काम करतो. शरीरातील रक्तदाब सुरळीत ठेवण्यासाठी नायट्रिक ऑक्साईड महत्वाची भूमिका बजावतो.
म्हणून मूड फ्रेश करून शांत राहण्यासाठी, परिणामी रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट खाणं उपयुक्त आहे. डार्क चॉकलेट खाऊन रक्तदाब नियंत्रित व्हायला बराच वेळ जातो पण परिणाम नक्कीच दिसतो.
४. कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त :
डार्क चॉकलेट मध्ये अँटिऑक्सिडण्ट्स असल्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी ते उपयुक्त आहे. शरीरातील LDL म्हणजे bad cholesterol कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
तसंच शरीरातील इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी डार्क चॉकलेट उपयुक्त आहे.
थोडक्यात हृदयाचे विकार टाळायचे असतील तर रोज मोजक्या प्रमाणातच डार्क चॉकलेट खाणं चांगलं आहे.
५. हृदयरोगावर नियंत्रण :
डार्क चॉकलेट खाण्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचण्याचं प्रमाण कमी होतं. या प्रक्रियेसाठी थोडासा वेळ लागतो.
एका अभ्यासातून असं दिसून आलं की, आठवड्यातून चार पाच वेळा ठराविक प्रमाणात डार्क चॉकलेट खाल्ल्याने काही लोकांचा हृदयरोगाचा धोका ५७% नी कमी झाला आहे.
६. त्वचेचं संरक्षण :
डार्क चॉकलेट मध्ये असणारे बायोएक्टिव्ह कंपंउंड्स त्वचेच्या दृष्टीने चांगले असतात. उन्हापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी डार्क चॉकलेट मधील फ्लेवेनॉल घटक त्वचेमध्ये रक्तप्रवाह पुरेसा ठेवण्यासाठी आणि त्वचेमध्ये आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
त्यामुळे त्वचेचा पोतही चांगला राहतो. त्यामुळे तुम्हाला कामासाठी सतत उन्हात जावं लागत असेल तर काही प्रमाणात डार्क चॉकलेट खाणं उपयुक्त आहे.
७. मेंदूचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी उपयुक्त :
डार्क चॉकलेट मध्ये असलेल्या फ्लेवेनॉलमुळे रक्त प्रवाह सुरळीत राहतो हे तर आपल्याला लक्षात आलं. हा रक्त प्रवाह असाच सुरळीत राहून मेंदू ताजातवाना होतो.
त्यामुळेच चॉकलेट खाणाऱ्या व्यक्तीला फ्रेश मूड असल्यासारखं वाटतं. त्यामुळे ताणतणाव असणाऱ्या व्यक्तीने जर डार्क चॉकलेट खाल्लं तर त्याचा नक्कीच उपयोग होतो.
कॅफिन आणि थिओब्रोमाईन या घटकांमुळेही मेंदुला उत्तेजना मिळते.
डार्क चॉकलेट खाण्याने असे महत्वाचे फायदे शरीराला मिळतात. पण याचा अतिरेक झाला तर शरीरात कॅलरीज आणि साखर अतिरिक्त वाढू शकते.
त्यामुळे जेवणानंतर चॉकलेटचा छोटासा तुकडा खाणं चांगलं. आवडत असेल तर क्रिम आणि साखर न वापरता हॉट चॉकलेटही पिऊ शकता.
बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट मिळतात. तरीही कोकोचं प्रमाण ७०% पेक्षा जास्त असलेले चॉकलेट खाणं योग्य आहे. यामध्ये साखरेचं प्रमाणही अल्प असतं.
इंग्रजांनी आपल्याला ओळख करून दिलेला आणि तितकाच हेल्दी असा हा पदार्थ. ‘चॉकलेट आवडत नाही’ असं म्हणणारे लोक जगात अगदी कमीच असतील, नाही का. तुम्हाला जर चॉकलेट आवडत असेल तर वरच्या टीप्स नक्की विचारात घ्या.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.