आपण जेव्हा एखाद्या बँकेत आपले बचत खाते उघडतो तेव्हा बँकेचा प्रतिनिधी आपल्याला आपल्या खात्यात दर महिन्याला सरासरी शिल्लक रक्कम कमीतकमी किती असली पाहिजे ते सांगतो.
पण कमीतकमी सरासरी शिल्लक रक्कम किंवा मिनीमम मंथली एव्हरेज बॅलन्स म्हणजे नक्की काय? बँक ते कसे कॅल्क्युलेट करते हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेऊया.
त्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा बँकेने असं सांगितलं की तुमच्या बचत खात्यात दर महिन्याला सरासरी शिल्लक रक्कम रु. १०,०००/- इतकी असली पाहिजे.
तर बऱ्याच खातेदारांचा असा समज होतो की त्यांच्या खात्यात दररोज किमान रु.१०,०००/- असलेच पाहिजेत. अन्यथा त्यांना बॅलन्स कमी झाल्याबद्दल दंड भरावा लागेल.
आणि म्हणून ते आपली बचत खात्यातील शिल्लक रक्कम कधीही १०,०००/- पेक्षा खाली जाऊ देत नाहीत.
काही वेळा आवश्यकता असूनही लोक ही रक्कम काढत नाहीत कारण त्यांना दंड बसण्याची भीती वाटते. परंतु सरासरी शिल्लक अशी ठरवली जात नाही.
एखाद्या खात्याची महिन्याची सरासरी शिल्लक रक्कम ठरवण्याची बँकेची पद्धत वेगळी असते. आणि खरंतर खूप सोपी सुद्धा.
कशी ठरवतात सरासरी शिल्लक रक्कम ?
सरासरी हा शब्दच ह्या प्रश्नाचे उत्तर आहे. संपूर्ण महिन्यात दररोज बँकेचे कामकाज संपताना बचत खात्यात जी शिल्लक रक्कम असेल तिची महिन्याच्या शेवटी बेरीज केली जाते आणि त्या बेरजेला त्या महिन्यात जितके दिवस असतील त्या आकड्याने भाग दिल्यावर जी रक्कम येते ती त्या खात्याची सरासरी शिल्लक रक्कम असते.
आणि ही रक्कम वरील उदाहरणा प्रमाणे रु. १०,०००/- असणे आवश्यक आहे. म्हणजेच दर दिवशी रु.१०,००० /- बँकेत शिल्लक असणे आवश्यक नाही तर महिन्याच्या शेवटी काढलेली सरासरी रु. १०,०००/- असणे आवश्यक आहे.
जर आपण ३० दिवसांच्या महिन्याचे उदाहरण घेतले तर त्यातील केवळ १५ दिवस जरी आपल्या खात्यात रु. २०,०००/- असतील तरीही आपली सरासरी महिन्याची शिल्लक रु. १०,०००/- होते. इतर १५ दिवस रक्कम १०,०००/- पेक्षा कमी असेल तरीही काही फरक पडत नाही, दंड भरावा लागत नाही.
त्यामुळे खरंतर सेव्हिंग्स अकाउंट उघडण्यासाठी बँक निवडताना ‘मंथली ऍव्हरेज बॅलन्स’ची धास्ती बाळगण्याचे काहीही कारण नाही. बँकेच्या इतर सुविधा, बँकेची सर्व्हिस, जे ‘टेक्नॉलॉजी सॅव्ही’ असतील त्यांच्यासाठी इंटरनेट बँकिंग या सर्व गोष्टी जिथे चांगल्या असतील ती बँक निर्धास्तपणे निवडावी.
खाजगी बँकांमध्ये ही बचत खात्याची सरासरी शिल्लक रक्कम जास्त असते. परंतु अनेक राष्ट्रीय बँकांमध्ये जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र ही सरासरी शिल्लक रक्कम अगदी कमी असते.
ज्यामुळे जास्तीतजास्त लोक बचत खाते काढून बचत करू शकतात. तसेच राष्ट्रीय बँकांमध्ये काही कारणाने भरावी लागणारी दंडाची रक्कम देखील अतिशय कमी असते.
तर आज आपण जाणून घेतलं की बँकेत सरासरी शिल्लक रक्कम कशी ठरवतात. तुमच्या बचत खात्याची सरासरी शिल्लक रक्कम किती आहे हे जाणून घ्या आणि त्याप्रमाणे नियोजन करून बचत करा, तसेच खात्यातील रकमेचा योग्य विनियोग करा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.