केळीच्या झाडाच्या कचऱ्यापासून सुरु केला मोठा बिजनेस. गावातील ४५० महिलांना दिला रोजगार. कसे ते जाणून घ्या
केळीच्या झाडाच्या बाबतीतली एक गोष्ट आपणा सर्वाना माहीत आहेच. ती अशी की एकदा का केळीला लागलेला घड उतरवला की ते झाड निरुपयोगी होते. त्या झाडाचा बुंधा काढून टाकावा लागतो, त्यातून नवे केळीचे झाड येते ते पुढे वाढते आणि अशी वाढ होत राहते. पण आधीचे झाड तर उपयोगाचे नसते. ते कचरा म्हणून फेकून दिले जाते.
परंतु ह्या केळीच्या झाडाच्या बुंध्यात खूप मोठ्या प्रमाणात फायबर असते. त्याला बनाना फायबर असे म्हणतात.
उत्तर प्रदेशच्या हरीहरपूर ह्या गावातल्या ३५ वर्षांच्या रवी प्रसादने ह्या केळीच्या फायबरपासून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती केली आहे. एरवी कचरा म्हणून टाकून दिल्या जाणाऱ्या केळीच्या बुंध्याचा वापर करून त्याने आपल्या गावातील ४५० महिलांना काम मिळवून दिले आहे.
रवी प्रसाद ह्याचे हरीहरपूर हे गाव उत्तर प्रदेशातील कुशीनगर जिल्ह्यात आहे. कुशीनगरमध्ये तब्बल २७ हजार हेक्टर जमिनीवर केळीची शेती केली जाते.
आधी हे शेतकरी केळीचे घड उतरवल्यावर उरलेली झाडे कचरा म्हणून फेकून देत होते.
परंतु आता रवी प्रसादच्या प्रयत्नांमुळे ह्या झाडांचे फायबर वापरले जाऊन त्यापासून गालिचे, चपला, टोप्या, बॅगा आणि पायपुसणी अशा वस्तु बनवल्या जातात.
केळीच्या शेतकऱ्यांचा आता हा एक पूरक व्यवसायच बनला आहे. मोठ्या प्रमाणावर अशा वस्तु बनवल्या जात आहेत आणि त्यामुळे गावातील सुमारे ४५० महिलांना ह्या वस्तु बनवण्याचे काम मिळून त्या स्वयंपूर्ण बनत आहेत.
रवीने खरंतर गोरखपूरच्या दिग्विजय नाथ कॉलेजमधून इकनॉमिक्स घेऊन बी ए केलं आहे. नोकरीच्या शोधात रवी दिल्लीला गेला असताना योगायोगाने तो तिथे एक प्रदर्शन पाहायला गेला.
तिथे तामिळनाडू येथून आलेल्या एका व्यक्तीच्या स्टॉलवर केळीच्या फायबरपासून बनवलेल्या वस्तु त्याला दिसल्या. ह्यातून त्याच्या मनात ह्या व्यवसायाची कल्पना आली.
मग त्या व्यक्तीच्या मदतीने त्याने केळ्याच्या फायबरपासून वस्तु बनवण्याचे प्रशिक्षण सुमारे एक महिनाभर घेतले. त्यादरम्यान भाषेमुळे आलेल्या अडचणींवर मात करत रवी ह्या वस्तु कशा बनवायच्या हे शिकला.
प्रशिक्षण संपल्यावर रवीने थेट आपले गाव गाठले. आता त्याच्याकडे व्यवसाय सुरु करण्यासाठी कल्पना तर होती पण प्रश्न होता भांडवलाचा.
त्यावर देखील रवीने मात केली. त्याला ‘पंतप्रधान रोजगार’ योजनेतून ५ लाख रुपयांचे कर्ज मिळाले. २०१८ मध्ये त्याने ह्या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली.
नक्की कसा होतो केळीच्या बुंध्याचा वापर?
रवीने सांगितले की केळीचे घड उतरवल्यावर राहणारा केळीचा बुंधा मशीनच्या सहाय्याने चिरला जातो. त्यानंतर त्यातील सगळा रस काढून टाकून तो वाळवला जातो.
मग त्यातून फायबर म्हणजेच धागे मिळतात. हे धागे देखील एका विशिष्ट प्रकारच्या मशीनच्या सहाय्याने केले जातात. ह्या धाग्यांपासूनच मग गालिचे, चपला, टोप्या, बॅगा आणि पायपुसणी तसेच सजावटीच्या इतर वस्तु बनवल्या जातात.
केळीच्या बुंध्यातून निघालेला रस वापरून त्यात निरनिराळे रंग मिसळून ह्या वस्तु रंगवल्या जातात. अतिशय आकर्षक दिसणाऱ्या ह्या वस्तूंना बाजारात खूप मागणी आहे.
ह्या व्यवसायात जम बसू लागल्यावर रवी स्वस्थ बसला नाही. त्याने त्याच्या गावातल्या सुमारे ४५० महिलांना ह्या वस्तु बनवण्याचे ट्रेनिंग दिले.
त्यामुळे त्या महिला स्वयंपूर्ण तर बनल्याच शिवाय मोठ्या प्रमाणावर ह्या वस्तु बनू लागल्यामुळे त्याच्या गावाला देखील एक ओळख मिळाली. मोठा व्यवसाय मिळाला.
रवीने ह्या महिलांच्या सहाय्याने आत्तापर्यंत ५० पेक्षा जास्त राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनात भाग घेतला आहे. त्याने सांगितले की आता ह्या वस्तूंना देशभरातून मागणी आहे. शिवाय त्याच्या जिल्ह्यात केळीचे उत्पादन वाढून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे.
ह्या वस्तु आता अमेझोनवर देखील उपलब्ध करून देण्यासाठी त्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे ह्या वस्तु आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील उपलब्ध होतील.
तर अशा प्रकारे रवी प्रसादने अक्षरशः फेकून दिल्या जाणाऱ्या केळीच्या झाडाच्या कचऱ्याचा पुरेपूर वापर करून मोठ्या प्रमाणावर व्यवसायनिर्मिती केली.
झाडाच्या टाकून दिल्या जाणाऱ्या भागाचा पुरेपूर वापर करून त्याला अतिशय आकर्षक रूप दिले आणि मुख्य म्हणजे स्वतःबरोबरच इतराना देखील रोजगार उपलब्ध करून दिला. अशा होतकरू तरुणांची आज देशाला गरज आहे.
आपणही ह्या बनाना फायबरपासून बनवलेल्या वस्तु मागवु शकतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.