आपले स्वतःचे घर असावे हे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते.
हल्ली घरांच्या किमती गगनाला भिडल्या असल्या तरी वेगवेगळ्या बँका देत असलेल्या गृहकर्जामुळे घर घेणे सर्वसामान्य लोकांच्या आटोक्यात आले आहे.
अर्थात, बँक जेव्हा गृहकर्ज देते तेव्हा त्यावर विशिष्ट दराने व्याजही आकारते. कर्ज फिटेपर्यंत मुद्दल आणि त्यावरील व्याज भरत राहणे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीसाठी बंधनकारक असते.
व्याजाची रक्कम कमीत कमी भरावी लागावी ह्यासाठी सर्वांचा गृहकर्ज लवकरात लवकर म्हणजेच मुदत पूर्ण होण्याआधी फेडण्याकडे कल असतो. आपल्याजवळ पुरेसे पैसे जमा झाले की डोक्यावरचा कर्जाचा भार हलका करणे ही चांगलीच गोष्ट आहे.
कारण बहुतेक वेळा व्याजाचा दर असा असतो की मुदत संपेपर्यंत मुद्दल आणि व्याज समान होऊन घेतलेल्या कर्जाच्या दुप्पट रक्कम फेडण्याची वेळ येते. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी आपले गृहकर्ज मुदतीआधी जरूर फेडावे. तसेच ह्याबाबतीत चांगली गोष्ट अशी की रिझर्व्ह बँकेने अशा मुदतीच्या आधी फेडले जाणाऱ्या कर्जावर कोणतीही पेनल्टी लावलेली नाही. त्यामुळे केवळ कर्जाची सम्पूर्ण रक्कम भरून कर्जमुक्त होता येणे शक्य आहे.
मात्र मुदती आधी असे कर्ज फेडताना काही गोष्टींची कटाक्षाने काळजी घेणे आवश्यक असते. कोणत्या ते आपण पाहूया
१. आपली सर्व ओरिजिनल कागदपत्रे ताब्यात घ्या
जेव्हा बँक एखाद्या घरासाठी गृहकर्ज देते तेव्हा घराच्या कराराची सर्व ओरिजिनल कागदपत्रे बँकेकडे तारण म्हणून ठेवलेली असतात. कर्जाची रक्कम फेडल्यावर ती ओरिजिनल कागदपत्रे मूळ मालकाच्या (म्हणजेच कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या) ताब्यात परत मिळणे अतिशय आवश्यक असते. ह्या कागदपत्रांमध्ये घराचे खरेदीखत, पैसे भरल्याच्या ओरिजिनल पावत्या, इंडेक्स 2 इत्यादीचा समावेश असतो. ही सर्व ओरिजिनल कागदपत्रे बँकेकडून लक्षपूर्वक परत मिळवा.
२. बँकेकडून NOC घ्या
बँकेकडून सदर प्रॉपर्टीवर असणारे सम्पूर्ण कर्ज तुम्ही फेडले असून त्या प्रॉपर्टीवर आता बँकेचा कोणताही हक्क नाही असे सांगणारे ना हरकत प्रमाणपत्र म्हणजेच NOC घ्या. हे NOC घरावरील तुमची मालकी सिद्ध करण्यासाठी अतिशय उपयोगी असते.
तसेच कर्जाची काहीही रक्कम शिल्लक नाही हे देखील त्यामुळे सिद्ध होते. कर्ज फेडून झाल्यावर असे NOC तुमच्याकडे असणे अतिशय महत्त्वाचे असते.
३. तुमचा CIBIL score अपडेट करून घ्या
Credit Information Bureau India Limited म्हणजेच CIBIL तर्फे दिला जाणारा score हा प्रत्येक व्यक्ती आपले कर्ज योग्य हफ्ते भरून फेडत आहे ना ह्याचे प्रमाणपत्र असते. त्यामुळे संपूर्ण कर्ज मुदतीआधी फेडल्यास बँक कर्मचाऱ्यांना सांगून तुमचा CIBIL Score अपडेट करून घ्या. अन्यथा तुमच्या नावावर कोणतेही कर्ज नसूनही तुम्ही CIBIL score मध्ये मागे पडू शकता.
४. रजिस्ट्रार ऑफिसकडून बँकेचे प्रॉपर्टी वरील अधिकार काढून टाकणारे सर्टिफिकेट मिळवा
बरेच वेळा कर्ज फिटेपर्यंत कर्जदाराने मालमत्ता परस्पर विकू नये म्हणून बँक रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंद करून ती प्रॉपर्टी स्वतःच्या ताब्यात ठेवणारे अधिकारपत्र तयार करते. कर्ज फेडून झाल्यावर असे अधिकारपत्र रद्द ठरवणारे सर्टिफिकेट तुम्हाला रजिस्ट्रार ऑफिसकडून मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी बँकेचा एक कर्मचारी बरोबर घेऊन रजिस्ट्रार ऑफिसमधून तसे सर्टिफिकेट मिळवा. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे.
५. वकीलाकडून कायदेशीर रित्या घरावर तुमची मालकी दाखवणारी कागदपत्रे बनवून घ्या
गृहकर्ज संपूर्णपणे फेडून झाल्यावर घरावर कायदेशीर रित्या तुमची मालकी प्रस्थापित करणारी कागदपत्रे एखाद्या वकीलाकडून बनवून घ्या. असे करणे ऐच्छिक असले तरी भविष्यात जर घर विकायचे असेल तर हे कागद उपयोगी पडू शकतात.
६. एनकमब्रन्स सर्टिफिकेट मिळवा
एकदा का तुमचे संपूर्ण गृहकर्ज फिटले आणि घराची संपूर्ण कागदपत्रे तुमच्या ताब्यात मिळाली आणि रजिस्ट्रार ऑफिसकडून घरावरील बँकेचा अधिकार काढून टाकणारे सर्टिफिकेट मिळाले की त्याआधारे तुम्ही रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घराच्या एनकमब्रन्स सर्टिफिकेट साठी अर्ज करू शकता. असे सर्टिफिकेट मिळाले की घर तुमच्या मालकीचे आहे हे सिद्ध करण्यात कोणताही अडथळा येऊ शकत नाही. ह्या सर्टिफिकेटमध्ये सदर प्रॉपर्टीशी संबंधित सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद असते. त्यात तुम्ही मुदतीपूर्वी गृहकर्ज फेडले असल्याची देखील नोंद असते.
त्यामुळे एनकमब्रन्स सर्टिफिकेट आवश्यक ठरते.
७. कर्जाची रक्कम कशा पद्धतीने फेडली त्याची सविस्तर नोंद ठेवा
मुदतीआधी गृहकर्जाची रक्कम फेडताना ती कशा प्रकारे फेडली आहे त्याची नोंद तुमच्याकडे असणे अतिशय आवश्यक आहे. ज्या अकाउंट मधून सदर रक्कम भरली गेली आहे त्या अकाउंटचे स्टेटमेंट, तुम्ही दिलेल्या चेकची फोटोकॉपी तुमच्याकडे संग्रही असणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात कधी बँक किंवा इतर कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये विचारणा झाल्यास तुमच्याकडे कर्ज फेडल्याचा पुरावा म्हणून असे बँक स्टेटमेंट असेल.
८. आधी दिलेले पोस्ट डेटेड चेक आठवणीने परत घ्या
बँकेकडून गृहकर्ज घेतल्यावर भराव्या लागणाऱ्या EMI च्या रकमेचे पुढच्या तारखांचे चेक बँक आपल्याकडून घेते. मुदतीआधी कर्ज फेडल्यावर असे चेक दिलेले असल्यास ते लक्षात ठेवून परत घ्या. त्यामुळे त्या चेकचा भविष्यात गैरवापर होणार नाही.
तर मित्रांनो, ह्या आहेत अशा ८ गोष्टी ज्या आपण मुदतीआधी गृहकर्ज फेडताना कटाक्षाने लक्षात घेतल्या पाहिजेत. तसे तर बहुतेक सर्व सरकारी आणि निमसरकारी बँका कर्ज समाप्तीच्या वेळी ही सर्व प्रोसिजर पूर्ण करतात. परंतु आपल्या बाबतीत घडणाऱ्या ह्या संपुर्ण आर्थिक व्यवहाराची आपल्याला नीट माहिती असणे अतिशय आवशक असते.
त्यामुळे गृहकर्ज फेडताना वरील सर्व बाबींची पूर्तता होत आहे ना ह्याकडे लक्ष द्या. तसेच तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना देखील ही उपयुक्त माहिती मिळावी ह्यासाठी हा लेख जास्तीतजास्त शेअर करा.
कर्ज घेण्याआधी या दहा गोष्टींकडे लक्ष द्या!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.