मिसाईल डिफेन्स सिस्टीम हि भारताची येत्या काळातली गरज बनणार आहे. कारगिल युद्धात पाकिस्तान ने अण्वस्त्र टाकण्याची भाषा केल्यावर भारताच्या नागरिकांना तसेच प्रदेशांना सुरक्षित ठेवण्यासाठी मिसाईल डिफेन्स सिस्टीम ची गरज भारताला जाणवली.

एन्टी मिसाईल डिफेन्स सिस्टीम हि सरफेस टू एअर मिसाईल डिफेन्स सिस्टीम असून आपल्यावर हल्ला करणाऱ्या एखाद्या मिसाईल ला निष्प्रभ करण्यासाठी वापरली जाते. बलास्टिक मिसाईल हि न्युक्लिअर, केमिकल, बायोलोजीकल वेपन वाहून नेऊ शकतात आणि दूर अंतरावरून शत्रूवर डागण्यात येतात. अश्या मिसाईल नी आपल्या देशात, प्रदेशात हल्ला करून नुकसान करण्याआधीच त्यांना हवेतल्या हवेत निष्प्रभ करण्यासाठी एन्टी मिसाईल डिफेन्स सिस्टीम वापरली जाते. ह्यात समोरून येणाऱ्या मिसाईल ला आधी ओळखून मग त्याचा रस्ता कसा असेल ह्याचा अंदाज बांधून मग त्याला निष्प्रभ करणार त्याच तोडीचं मिसाईल डागण्यात येतं. वाचताना हे सोप्प वाटलं तरी अश्या मिसाईलचा वेग आणि ते डागण्याचं स्थान तसेच कोणत्या प्रदेशावर ते हल्ला करणार हे माहित नसताना अचानक येणाऱ्या मिसाईलला आधी ओळखून मग त्याला अस निष्प्रभ करण खूप कठीण आहे.
भारताचा बलास्टीक मिसाईल डिफेन्स प्रोग्राम दोन लेयरचा आहे. १९९९ मध्ये भारताने ह्याची सुरवात केली. ह्यात पहिल्या लेयर मध्ये पॅड किंवा पृथ्वी मिसाईल डिफेन्स सिस्टीम असून ही अति उंचावरून (५०-८० किमी) येणाऱ्या मिसाईल पासून रक्षण करते. तर एडव्हांस मिसाईल डिफेन्स सिस्टीम हि कमी उंचीवरून (३० किमी) येणाऱ्या मिसाईल पासून संरक्षण करते. ह्या दोन्ही सिस्टीम मिळून ५००० किमी. वरून डागलेल्या कोणत्याही मिसाईल ला निष्प्रभ करू शकतात. ह्या सिस्टीम मध्ये मिसाईल शिवाय धोक्याची सूचना देणारं, माहितीच आदान प्रदान करणारं नेटवर्क तसेच ह्या सगळ्यांचा कमांड आणि कंट्रोल करणारी सिस्टीम पण भाग आहे.
ह्या डिफेन्स सिस्टीम ला वेगवेगळ्या सोअर्सेस पासून भारताच्या हवाई क्षेत्राची माहिती सतत मिळत असते. ज्यात रडार, उपग्रह ह्यांच्याकडून मिळणारी माहिती असते. एकाच वेळी १० कम्प्युटर सतत ह्या माहितीचं आकलन करत असतात. ही सिस्टीम भारताच्या गुप्त नेटवर्कशी सुद्धा कनेक्टेड असते. माहितीचं आदान प्रदान होताना ते लिक होऊ नये म्हणून सिक्युअर नेटवर्क चा ह्यात वापर केला जातो. ही डिफेन्स सिस्टीम मिळालेल्या माहितीच्या आधारे लक्ष्याच वर्गीकरण, लक्ष ठरवण तसेच त्याला निष्प्रभ करण्यासाठी किती व कोणत्या मिसाईल ची गरज लागेल हे सगळी ही प्रणाली बघत असते. ही सिस्टीम हा सगळा डेटा ह्याचं कमांड करणाऱ्या सोअर्सेस कडे हे सगळं अतिशय नियोजनबद्ध रीतीने मांडत असते.
एकदा लक्ष्य निर्धारित झाल कि मग मिसाईल लॉन्चिंग साठी लागणारा डेटा मिळवला जातो. येणारं मिसाईल त्याची दिशा, वेग, अंतर आणि त्याचं टार्गेट ह्या सगळ्याचं गणित केल जातं. मग मिळालेल्या माहितीच्या आधारे एन्टी डिफेन्स मिसाईल लॉन्च करण्यासाठी लागणारा वेळ मोजला जातो. सगळ्या गणिती नंतर मिसाईल लॉन्च केल जाते. येणारं मिसाईल पूर्णपणे नष्ट होई पर्यंत सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो. वाचताना जितका वेळ लागला त्या पेक्षा कमी वेळात वरील सगळ्या गोष्टी घडणं गरजेचे असते. त्यामुळे अशी प्रणाली विकसित करून ती पूर्णपणे कार्यान्वित करण हेच एक मोठ शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे.
२८ डिसेंबर २०१७ ला भारताच्या पृथ्वी मिसाईल ने चांदीपूर ओडीसा येथून उड्डाण भरलं. उड्डाण भरताच त्याला लक्ष्याचा दर्जा दिला गेला. मिसाईल डिफेन्स सिस्टीम ला कमांड कडून गो अहेड मिळताच मिसाईल डिफेन्स सिस्टीम ने लक्षचं स्थान तसेच त्याची दिशा, टार्गेट, आणि उडण्याचा रस्ता निश्चित केला. एकदा हे सगळ निश्चित झाल्यावर मिसाईल डिफेन्स सिस्टीम ने आपल्या अब्दुल कलाम बेटावरील (आधी व्हीलर बेट म्हणून ओळखल जायचं) एड्व्हांस एअर डिफेन्स मिसाईल डागलं ह्या एअर डिफेन्स मिसाईल ने आपल्याला मिळणाऱ्या अपडेट वरून स्वतःचा रस्ता मिसाईल प्रमाणे बदलत हवेत १५ किलोमीटर वर लक्ष्याचा माख ४ (४ माख म्हणजे ध्वनीच्या ४ पट) वेगाने वेध घेतला. ह्या क्षेपणास्त्रात एड्वांस सेन्सर असून ते हवेतल्या हवेत होणाऱ्या क्षेपणास्त्रच्या मार्गात होणाऱ्या कोणत्याही बदलाचा वेध घेऊ शकतात. हे एड्वांस मिसाईल ७.५ मी. उंच असून १.२ टन वजनाच असते. ह्यात सिंगल स्टेज सॉलिड फ्युएल चा वापर केला आहे. मिसाईल डिफेन्स सिस्टीम स्वोर्डफिश रडार वापरत असून हे रडार ८०० कमी च्या पट्ट्यातील हवेत जाणारा क्रिकेटचा चेंडू पण ओळखू शकते इतक शक्तिशाली आहे. येत्या काळात ह्याची क्षमता १५०० किमी पर्यंत नेण्यात येणार आहे.
मिसाईल डिफेन्स सिस्टीम हि भारताची येत्या काळातली गरज बनणार आहे. कारगिल युद्धात पाकिस्तान ने अण्वस्त्र टाकण्याची भाषा केल्यावर भारताच्या नागरिकांना तसेच प्रदेशांना सुरक्षित ठेवण्यासाठी मिसाईल डिफेन्स सिस्टीम ची गरज भारताला जाणवली. भारताने रशिया कडून एस ४०० हि मिसाईल डिफेन्स सिस्टीम तब्बल ६ बिलियन अमेरिकन डॉलर मोजून २०१५ ला खरेदी केली आहे. येत्या काळात भारताला सुरक्षित ठेवण्यात सिंहाचा वाटा मिसाईल डिफेन्स सिस्टीम उचलणार आहे. भारताच्या भोवती अस संरक्षक जाळं उभारण्यात ज्या संशोधक, वैज्ञानिक, अभियंते ह्यांनी मोलाच योगदान दिल त्या सर्वाना माझा सलाम.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.