परवाच एक गोष्ट वाचली आणि जाणवलं, नकळतपणे केल्या गेलेल्या घाईमुळे बरेचदा भविष्यातल्या खूप चांगल्या संधी आपल्या हातून हुकू शकतात.
वॉरेन बफेट आणि चार्ली मुंगर ही गुंतवणुक क्षेत्रातील अद्वितीय जोडी आपल्यापैकी सर्वांनाच ठावुक असावी..
पण ४५ वर्षांपुर्वी या दोघंबरोबरच आणखी एक, तिसरा भागीदारही होता, रिक गुरैन (Rick Guerin) नावाचा..
हे तिघे मिळुन एकत्र गुंतवणुक करीत असत…
मात्र १९७४ साली आलेल्या एका मोठ्या मंदीच्या तडाख्यांत रिक यांनी आपल्याकडील बर्कशायर हॅथवेचे शेअर्स वॉरेन आणि चार्ली यांना उण्यापुऱ्या ४० डॉलर्स/शेअर भावाने विकुन टाकले.
या बर्कशायर हॅथवेचा आजचा भाव आहे 3,14,477.00 USD !!!
होय, ते स्वल्पविरामच (Commas) आहेत, दशांशस्थळे (decimals) नव्हेत.
या आठवणीबद्दल छेडले असता श्री वॉरेन बफेट म्हणाले..
Charlie and I always knew that we would become incredibly wealthy, We were not in a hurry to get wealthy; we knew it would happen, Rick was just as smart as us, but he was in a hurry.
श्री वॉरेन बफेट
अशीच सेम टु सेम ‘ष्टोरी’ Apple Computer बद्दल पण आहे..
आज कोणा पोराटोरालाही माहित असलेली ही कंपनी ०१ एप्रिल १९७६ या ‘fools Day’ च्या मुहुर्तावर जेंव्हा स्थापन झाली तेंव्हा तीचे तीन प्रमुख भागीदार होते. सर्वश्री स्टीव्ह जॉब्ज, स्टीव्ह व्होझनियॅक आणि रोनाल्ड वॲने…
यातील दोन्ही स्टीव्ह्ज हे संगणक तज्ञ होते आणि कंपनीत १०% भागिदारी असलेले रोनाल्ड यांनी कंपनीकरिता लोगो बनविणे, भागिदारीचा मसुदा व कायदेशीर दस्तऐवज बनविणे अशी कामे केली.
कंपनी स्थापन होवुन जेमतेम दोन आठवडेच होत नाहीत तो या श्रीमान रोनाल्ड यांना संगणकीय कामांचे ज्ञान नसल्याने कंटाळा आला…
व त्यांनी कंपनीतील आपला सगळाच्या सगळा, १०% हिस्सा, ८०० डॉलर्सना विकुन टाकला.
आज ह्या १०% हिश्श्याचे मोल 100,000,000,000 डॉलर्स पेक्षा जास्त आहे
यातुन आपण काय अन्वयार्थ घ्यायचा??
मंदीच्या वावटळींत आपल्याकडील असलेले चांगले शेअर्स, मग ते थेट विकत घेतलेले असोत किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातुन अप्रत्यक्ष रित्या आपल्याकडे असलेले…. विकायचा आततायीपणा करु नये, SIPs बंद करु नयेत.
बफेट सर सुचवितात तसे….. Don’t be in a hurry
मला माहिती आहे…
प्रत्येकाच्या नशीबांत बफेट किंवा स्टीव्ह जॉब्ज होणे अर्थातच नाही…
पण निदान रिक अथवा रोनाल्ड यांच्यासारखी ‘दैव देते…’ प्रकारची पश्चातापाची वेळ तरी यायला नको.
आपल्या संगीतात एक ‘तिहाई’ नावाचा प्रकार असतो, तबला वादनात तोच प्रकार थोडासा विस्तृत करुन ‘चक्करदार’ वाजवतात…
म्हणजे काय??
एकच स्वराकृती वा अक्षरसमुह सलग तीनदा तंतोतंत तशीच, लयबद्धपणे वाजवायची…
आणि शेवटचे, तीसरे आवर्तन बरोब्बर समेवर संपवायचे…
अचुक सम गाठण्याचा आनंद हा केवळ स्वर्गीय असतो, अवर्णनीय असतो…
आता हा तत्वचिंतकाचा आव आणुन पाजलेला उपदेशाचा डोस वाटेल कदाचित…
पण माझी मनापासुनची भावना सांगितल्याशिवाय रहावत नाही… गुंतवणुक ही जीवन संगीतातील एक प्रदीर्घ ‘चक्करदार’ आहे…
शांत सुरवातीनंतर काही मात्रा (Beats) लक्षाच्या (Goals) मागेपुढे असतात….
मधे कधीतरी वाट हरवल्यासारखे, भरकटल्यासारखे वाटुन विचलीत व्ह्यायलाही होते…
पण काही आवर्तनांतर उत्तम वादक असा काही समेवर येतो.. की बस्स रे बस्स…
जसे प्रत्येक मात्रेनंतर समेवर यायचा अट्टाहास गायक वादकांनी धरल्यास सगळी उत्कंठाच संपून ते संगीत अगदी नीरस बेचव ठरेल…
अगदी तसेच, आपणही प्रत्येक दिवशी, दर आठवड्यात अल्पकाळांत आपल्याला मिळालेल्या परताव्याची (Returns) उजळणी करत बसणे, हे निरर्थक आहे
आधी नीट गृहपाठ करुन मग लयबद्धपणे गुतंवणुकीची आवर्तने केल्यास…
उद्दिष्टपूर्तीची ‘सम गाठण्याचा’ सुवर्णक्षण नक्कीच अनुभवायला मिळतो..
सौजन्य : www.arthasakshar.com
लेखक – प्रसाद भागवत
लेखकाविषयी – श्री. प्रसाद भागवत हे गेली २२ वर्षे शेअर बाजारात कार्यरत असून मराठी वाचकांना शेअर मार्केटची माहिती व्हावी म्हणून विपूल लेखन करत आले आहेत.
वाचण्यासारखे आणखी काही…
शेअरबाजार: कधीही धोका न पत्करणे हेच खरे धोकादायक
शेअर-बाजार : वेळ साधणे (timing) नव्हे, वेळ देणे (time) महत्वाचे
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.