अशी दादागिरी करणाऱ्यापैकी एक दादा म्हणजे मन्ना दा\ मन्ना डे. कधीकाळी पतंगबाजी व कुस्तीचे शौकिन असलेले मन्नादा संगीतातील दादा कसे काय झाले असतील बुवा? आपला एक एडचोट प्रश्न. असाच एक प्रश्न मदनमोहन व बासरी वादक पं. हरीप्रसाद चौरसिया यांच्या बाबतीही पडतो. मदन मोहन संगीत विश्वात येण्यापूर्वी लष्करात मशिनगन हाताळत असत म्हणे! इकडे येऊन त्यांनी सुरांच्या बंदुकी हाताळल्या तर पंडित हरीप्रसाद यांना त्यांच्या वडिलांना पहिलवान करायचे होते तर त्यांनी बासूरीतुन मनमोहक सूर काढले. पतंगाचे एक वैशिष्ठय म्हणजे तो आकाशात वर वर हवेत डोलत असतो पण त्याची डोर मात्र कसलेल्या हातात असल्यामुळे तो कसा नाचवायचा ते त्या जादूई बोटानां माहित असतं. मन्नादाच्या स्वरांचेही काहीसं असंच होतं. ते कधी आसमंत व्यापत तर कधी क्षणात जमिनीवरच्या मातीच्या कुशीत रमत. ‘दो बिघा जमीन’ मधील त्यांचे ते गाणे आठवा ‘धरती कहे पूकारके’ त्यातील ‘भाई रे’ म्हणतांना सूर थेट गगनात जातात तर ‘सावन बिता जाए’ म्हणताना थेट मातीच्या गर्भात उतरतात.
लहानपणी बाराखडी तर तुम्ही आम्ही सगळेच शिकलो. ‘अ’ अननसाचा (पुस्तकातील अननस प्रत्यक्ष बघायला २०-२२ वर्षे जावी लागली हे अल्हिदा), ‘क’ कमळाचा, ‘ज्ञ’ यज्ञाचा, ‘ब’ बाणाचा वगैरे वगैरे. अगदी रटाळ अन् निरस बाराखडी. मग मन्नादाची बाराखडी आली- “अ.. आ.. आई.. म म.. मका… मी तुझा मामा अन् दे मला मुका.’’ मी हा सिनेमा आजपर्यंत पाहिला नाही हा आवाज मन्नादाचा आहे यावरही सुरूवातीस माझा विश्वास नव्हता. बाराखडी इतकी नादमधूर असते व हे खट्याळ आणि मिश्किल स्वर कुस्तीगिर मन्नादा चे आहेत हे ही मला सहजासहजी पचत नाही. मात्र मन्नादानी असे अनेक चमत्कार आमच्या पचनी पाडले.
अनेकानां शास्त्रीय संगीताची भलतीच अलर्जी असते तर काहीनां जबरदस्त खाज. मला आजही लख्खं आठवतं, दोन तीन वर्षांपूर्वी टिव्ही वरील संगीताच्या रिअॅलिटी शोमध्ये एका १४ वर्षांच्या मुलाचे ‘लागा चुनरीमे दाग’ सुरू होतं, छानच गात होता पोरगा. गाण्याच्या शेवटचा तराणा सुरू झाला अन् त्या पोराने चक्क ही कुस्ती जिंकली. मला एकदम क्लिक् झाले, मन्नादानी कुस्तीचा अनुभव या गाण्यातुन दिला आणि शास्त्रीय संगीताची अॅलर्जी असणाऱ्यानांही मनोसोक्त टाळ्या वाजविल्या. त्या दिवशी पहिल्यांदा मी मन्नादा चा जन्म कोणत्या वर्षी झाला हे शोधुन काढले. हे गाणे वयाच्या चाळीशी नतंर मन्नादानी गायले होते आणि समोरचा पोरगा १४ वर्षांचा होता. म्हणजे तेव्हा त्या पोराच्या बापाचाही जन्म कदाचित झाला नसेल. तर अभिजात संगीत असं काळाच्या मर्यादा ओलांडून पूढे निघून जातं.
मन्ना डे नेहमी शास्त्रीय रागदारीवर आधारात गाण्यावर नेहमीच खुलत. कारण रियाज नावाचा खुराक त्यांनी लहानपणा पासूनच भरपूर पचवला होता. ही गाणी ती लिलया गात खरे पण पडद्यावरील कलावंताना तोंड हलवताना जाम पंचाईत होत असे. ‘लागा चुनरी…’ हे गीत पडद्यावर राजकपूर या संगीताचाच पाईक असलेल्या कलावंताने गायले पण शेवटचा तराणा गाताना त्याचें ओठ कमी आणि पायांचा पदन्यास अधिक दाखवावा लागला, मग बाकीच्यांची काय कथा. ‘झनक झनक तोरी बाजे पायलीया….’ हे गाणे थिएटरात फक्त ‘ऐकायला’ जाणारे महाभाग काही कमी नव्हते. राजकुमारला या गाण्यातील आलापी म्हणताना कोण कसरत करावी लागली होती. सरगम गातानां तर ओठ सोडून बाकी सगळे अँगल त्यात होते. दिलिपकुमार मात्र अशा गाण्यासाठी खूप मेहनत घेत असत.
५० ते ७० चे दशक हे भारतीय चित्रपट कारकिर्दीतील सूवर्णयुग विशेषत: संगीताचे. गाणी लिहणारी बाप माणसे, चाली लावणारे जबरदस्त किंवा जबरदस्त माणसानी लावेल्या चाली. तेव्हा खरे तर हा गीत संगीताचा आखाडाच होता. या आखाड्यातले पहिलवानही एकापेक्षा एक कसलेले होते. वयाच्या १६ -१७ व्या वर्षी मी मुकेशचा फॅन होतो म्हणून काही मित्रांनी मला वाळीत टाकण्याचा प्रयत्नही केला होता. ते वयच मुळी ‘दर्द’ भरे असते त्याला मी काय करणार. आपलं प्रेम व्यक्त न करता येणाऱ्यासाठी मुकेश त्यांचा मनातील सगळे व्यक्त करीत असे. पण जसजसे संगीताचे अवाढव्य विश्व विस्तारू लागले तसतसे त्यातल्या ताऱ्यांची महत्ती उमगू लागली. ‘दिल ही तो है….’ हा १९६३ चा सिनेमा पण आमच्या गावी पोहचायला त्याला तीन वर्षे लागली (तेव्हा असेच होत असे. त्या सिनेमाची रिळं असणाऱ्या लोंखडी पेट्या ट्रेनने येत. आगोदरच्या ठिकाणी सिनेमाचा मुक्काम वाढला की पुन्हा पेटी यायला उशीर होत असे) यातील ‘लागा चुनरीमे दाग….’ रेडिओ वरून प्रचंड लोकप्रिय झालेले…. हे गाणे पडद्यावर सुरू झाले की शिट्या टाळ्यांचा कडकडाट होई. या गाण्याची चाल संगीतकार रोशन यांनी राग भैरवीत बांधली आहे. खरे तर शास्त्रीय संगीतातल्या मैफिलीचा शेवटचा ‘टाटा बायबाय’ करणारा हा राग. भैरवीने आजही प्रत्येक मैफीलीची सांगता होते. अन् इथे तर चित्रपटाच्या मध्यातच मन्नादा अवघे थिएटर घुसळुन काढत असत. अर्थात यात चमत्कारी ‘रोशना’ई पण होतीच म्हणा. तर ‘मन्नादाचा आवाज असा होता मन्नादाचा आवाज तसा होता’ हे काटेकोरपणे शास्त्रीय भाषेत सांगणे मला तर अवघडच वाटते. कारण शास्त्रीय संगीतातील माझा बकूब लिंबूटिंबूच आहे. एकताना मात्र मनाला भावते पण त्याचं शास्त्र भारी किचकट. मन्ना दा यांनी हे खूपच सोपे करून आमच्या कानातुन मना पर्यंत पोहचविले. माझे म्हणने असे की स्वरांचे धबधबे अंगावर घेताना त्यात चिंब भिजून जा की सरळ सरळ. !!
मन्ना डे यांचा असाच कोसळणारा एक धबधबा म्हणजे ‘ना तो कारवाँ की तलाश है’ ही साहिरच्या लखलखत्या लेखणीतुन उतरलेली ‘बरसात की रात’ या सिनेमातील कव्वाली. हिंदी चित्रपटसृष्टीतले ७ मिनीटे आणि २२ सेंकदाचे हे सर्वात दीर्घ गाणे आणि तेही ऐकावेसे वाटणारे. या कव्वालीच्या आगोदरचे संगीताचे तुकडे म्हणजे हिरे, माणिक, मोती यांची बरसातच आहे. यात वाजवलेले काचेचे तुकडेही जींवत होऊन वाजले आहेत. महंमद रफी, आशा भोसले, एस.डी. बातीश, सुधा मल्होत्रा यांच्या सोबत मन्नादानी ही कव्वाली अप्रतिम गायली. दमदार दमदार म्हणतात तो हाच आवाज हे तेव्हा कळले. मन्ना दाची उडत्या चालीतील असंख्य गाणी आजही पायाला ताल धरायला लावतात. ‘वक्त’ चा लाला केदारनाथ आपल्या चार तरूण मुलांच्या आईला जेव्हा ‘ए मेरी जोहराजबी तुझे मालूम नही’असे दणक्यात सांगतो तेव्हा थेटरात शिट्या ऐकताना आपल्याला शिट्टी वाजवता येत नाही याची खंत वाटली होती. असाच जोरदार बार ‘बहारोंके सपने’ या चित्रपटात ‘चुनरी संभाल गोरी’ म्हणत मन्नादानी उडवला. या चित्रपटाचा नायक राजेश खन्ना असुनही गाणे मात्र अन्वर हुसेन(संजय दत्तचा मामा) यांच्यावर चित्रीत झाले होते.
मन्ना डे यांनी असाच धूमाकूळ ‘पडोसन’ या चित्रपटात घातला. . किशोरकुमार व मेहमूद सोबतचे ‘एक चतूर नार’ हे एक धम्माल गाणे. या गाण्याचीही एक कथाच आहे या गाण्यात शास्त्रीय संगीताचे काहीसे विडंबन होते. मन्ना दा सरगमचे मास्टर तर किशोर दा ला सरगम अजिबात जमत नसे. यावरून मग वाद झाला. यावर निर्माता म्हणाला- की गीतकार राजेंद्र कृष्ण यांनी जसे लिहले तसेच गायचे आहे. किशोर कुमार तयार झाले मात्र मन्ना दा तयार होईनात. ते म्हणाले- “मैं ऐसा हरगिज नहीं करूँगा। मैं संगीत के साथ मजाक नहीं कर सकता।” कसे तरी करून मग त्यांचे मन वळविण्यात आले. गाण्याचे मुद्रण सुरू झाले. पण मन्ना दानी सर्व गाणे शास्त्रीय ढंगातच गायले. पण जेव्हा किशोर दा नी आपले कडवे अशास्त्रीय पद्धतीने गायले तेव्हा मन्ना दा खूपच नाराज झाले व म्हणाले- “हे कसले गाणे? हा राग कोणता आहे?” यावर अभिनेते मेहमूद त्यानां समजावत म्हणाले- “सर, किशोर यांनी जे गायले ते या प्रसंगात गरजच आहे.” मात्र मन्ना दा यानां ते मान्यच नव्हते. त्यांनी त्यांच्या वाट्यात आलेले गायले खरे पण ते सर्व नाही गायले जे त्यानां अमान्य होते. कारण संगीताचे विडंबन त्यानां मान्यच नव्हते. तरही हे गाणे तुफान गाजले. ही तर आर.डी.बर्मन, मन्नादा, किशोर, मेहमूद यांनी केलेली महामस्तीच होती. आठवा तो मन्नादाचा ‘नाच ना जाने आगंन तेडा—तेडा—तेडा. माणसं गडबडा लोळत असत व आजही लोळतात, म्हणजे हा कुस्तीतला धोबीपछाड नाही का? आत्ता कळले ना की मन्नादा कसे कुस्तीगिर होते ते!!!
याच पठडीतलं आणखी एक गाणं आहे राजकपूरच्या ‘बुटपॉलीश’ मधलं. ‘लपक झपककर आ रे बदरवा’ डेव्हीड या कसलेल्या अभिनेत्यानं ते पडद्यावर साकारलं होतं. प्रत्यक्ष गाणे विनोदी जरी वाटत असले तरी यात कमालीची आर्तता व आर्जव होतं. चॅप्लीनच्या विनोदात जशी करूणा दडलेली असते तसं काहीसं हे गाणं होतं. मन्नादानी याचं सोनं केलं. त्याकाळी चित्रपटसृष्टीत काही आडाखे होते म्हणजे असे रफीसाहेब दिलीपकुमारसाठी गाणार, किशोरदा देवानंदसाठी गाणार तर मुकेश राजकपूरसाठी गाणार. मात्र मन्नादा या चौकटीतले नव्हते. त्यांचा आपला संचार कुठेही. त्यांचे एक गाणे ‘जिए तो क्या जिए’ कोणत्या चित्रपटातले असावे याचा मी शोध घेतला. ‘बादल’ नावाचा तो सिनेमा होता. बघायला गेलो तर नायक प्रेमनाथ. हे गाणे संपल्यानंतर अनेकजण सिनेमा हॉलच्या बाहेर निघून जात. “गाणे ऐकले आणि पावलो आता चित्रपट काय बघायचा” असं काहीसं त्या काळी प्रेक्षकाना होत असे.
मन्ना डे यांची काही गाणी जशी दमदार, झोकदार, डौलदार, जोमदार आहेत तशी काही हळूवार व गोडही आहेत. ‘रात और दिन’ हा नर्गिसला अभिनयाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट. या चित्रपटात लतादीदी बरोबर त्यांनी गायलेले ‘दिल की गिरह खोल दो’ ऐकून बघा. मात्र या साठी एक अट आहे… दारे खिडक्या बंद अन् डोळे बंद करा अनु मनाचा झरोका उघडा. स्वरांच्या लयदार हिंदोळ्या बरोबर मन्नादा तुम्हाला वेगळ्याच विश्वाचे दर्शन घडवुन आणतील. बहूतेक हेच ते स्वरांचे विश्व असावे. या विश्वात गाणारा आणि ऐकणारा दोघेही तल्लीन झाले की आनंदाच्या गुहेत आपण खोल खोल जाणार यात शंकाच नाही. असेच एक मधाळ गाणे म्हणजे ‘चोरीचोरी’ मधील ‘ये रात भिगी भिगी…..’ या गाण्याच्या सुरूवातीस वाजवलेले ट्रम्पेटचे तुकडे आगोदर घायाळ करतात तर उरलेली कसर मन्ना दा व लता बाई भरून काढतात. यातील ‘जीवन मे न जाने क्या है कमी’ या ओळीतली कातरता शब्दात कशी सांगायची? खरं तर राज कपूरचा आवाज म्हणजे मुकेश. मात्र अनेक चित्रपटात ते त्यांच्यासाठी मन्नादाचा आवाज वापरत. ‘श्री 420’ मधला निरागस राजू जेव्हा‘ दिल का हाल सुने दिलवाला’ म्हणत कैफियत मांडतो तेव्हा मन्नादाच्या चेहऱ्यावरही तसचं निरागस हसू उमटलं असेल की !! ‘कस्मेवादे प्यार वफा सब’ यातला पोकळपणा मन्नादाने जितक्या ताकदीने प्रकट केला तर तितकाच ‘जिंदगी कहती है पहेली’–ची विषन्नताही आपल्या संवेदनशिल स्वरांनी प्रकट केली.
कुस्तीगिर होते म्हणून काय मनाचे हळवंपण लोप पावतं? आपल्या मायभूमिला पारखं होऊन जे भूतकाळातील आठवणीनां लोंबकळत असतात त्यानांच ‘ए मेरे प्यारे वतन–’ची वेदना समजू शकते. मन्नादाचा स्वर या गीतात टोकाचा हळवा झालाय, अगदी हृदयात खोल भाला खूपसावा पण रक्ताचा एक थेंबही न निघावा असेच आहेत हे स्वर. वर्ष १९५६ म्हणजे मी जेमतेम एक वर्षाचा होतो तेव्हा एक चित्रपट आला होता ‘बसंत बहार’. भारतीय संगीताचा आत्मा म्हणून ज्याला ओळखले जाते त्या शास्त्रीय संगीताला केंद्रस्थानी ठेवून याची कथा लिहली होती. सपाट चेहरा ठेवून तोंडावर एकही सुरकती उठू द्यायची नाही अशी स्पर्धा ठेवली तर भारत भूषण या नटाला पहिला क्रमांक मिळाला असता तर तो या चित्रपटाचा नायक तर निम्मी ही नायिका. तिने आयुष्यभर नावा प्रमाणे निम्माच केला. शंकर-जयकिशन ही संगीतकार होते खरे पण खऱ्या अर्थाने तेच या चित्रपटाचे नायक होते. म्हणजे यातील संगीत वजा केले तर सिनेमाची टीम वगळता कुणीही हा सिनेमा पाहवयाचे धाडस केले नसते. तर यात एक गाणे आहे ‘सूर ना सजे क्या गाऊ मै’. शैलेंद्रने गाण्यातच लिहून ठेवलं की सूरच लागत नाहीत तर काय कप्पाळ गाणार? म्हणजे हा एक विरोधाभासच म्हणायला हवा की…. मन्नादाने अत्यंत मर्मभेदी, तरल व हळव्या स्वरात न लागणाऱ्या सर्वच स्वरांना सजवले. आता हे काम एरागबाळ्याचे कसे असेल? याच चित्रपटात पंडित भिमसेन जोशी सारख्या दिग्गज गायका बरोबर ‘केतकी गुलाब जुही—’ म्हणत तानांचा पाऊस पाडण्याची किमयाही त्यांनी केली.
आई महामाया व वडील पूर्णचंद्र डे यांच्या घरी जन्मलेल्या या मुलाला लहानपणा पासूनच आपले काका कृष्णचंद्र डे यांच्या संगीताने भूल् घातली. वडीलानां वाटे आपला मुलगा वकील व्हावा त्यामुळे मन्ना दा अनेक वर्षे गोंधळलेल्या अवस्थेत होते. “वकील की गाणे” शेवटी गाण्याने वकीलावर मात केली. ते लहान असताना एकदा उस्ताद बादल खान आणि त्याचे काका कृष्णचंद्र रियाज करत होते. त्यावेळी बादल खान यांच्या कानावर लहानग्या मन्ना चे सूर कानावर पडले. त्यावर त्यांनी कृष्णचंद्र यानां विचारले- “हा कोण मुलगा गातोय?” यावर काकानी मन्नाला बोलावले व ओळख करून दिली. त्यांनी छोट्या मन्नाची प्रतिभा ओळखली. काका कृष्णचंद्र हे संगीत क्षेत्रात सर्वांना परिचीत होते. मन्ना त्यांच्या सोबतच मुंबईला आला व इथलाच झाला. सन १९४३ मध्ये सर्वप्रथम त्यानां गायीका सुरैय्या सोबत “तमन्ना” या चित्रपटासाठी गाण्याची संधी मिळाली. तत्पूर्वी त्यांनी “रामराज्य” (म.गांधी यांनी आपल्या आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट) या चित्रपटात कोरस मध्ये उभे राहून आपला आवाज दिला होता. १९६१ मधील “काबुलीवाला” या चित्रपटातील संगीतकार सलील चौधरी यांच्या “ऐ मेरे प्यारे वतन…”या गाण्याने त्यांना रसिक श्रोत्यांच्या हृदयात स्थान मिळवून दिले.
मन्ना डे सर्वांचेच आवाज होते. नायक, खलनायक, विनोदवीर, सहकलाकार अगदी कुणीही. त्यांचे गाणे नायकाच्याच गळ्यातुन उतरत असे असे नाही. ‘सफर’ मधले ‘नदीया चले चले रे धारा–’ नावाड्याने गायले पण राजेश खन्नाची संपूर्ण अस्वस्थता गाण्याने अलगद टिपली. १९७३ मधील ‘बॉबी’तला कोळीवाड्यतला जॅक ब्रिगान्झा (प्रेमनाथ) जेव्हा ‘ना माँगू सोना चाँदी’ गाऊ लागतो तेव्हा प्रेमनाथ मन्नादाच्या गळ्याने गातोय की मन्नादा त्याच्या गळ्याने गातात हेच समजत नाही इतका हा आवाज एकमेकात मिसळून गेला आहे. असेच एक अप्रतिम गाणे म्हणजे “मेरी सुरत तेरी आंखे” या चित्रपटातील “पुछो ना कैसे मैने रैन बिताई…….” सचिन देव बर्मन यांनी आहिर भैरव रागात बांधलेले हे गाणे आजही हृदयात वेदनेची कंपने निर्माण करते. खरं तर त्यांची अशी शेकडो गाणी आहेत ज्यावर स्वतंत्रपणे एक एक लेख लिहीता येईल.
मन्ना डे यांची आणखी एक गंमतीची बाब म्हणजे सुरूवातीच्या काळात त्यांना धार्मिक व पौराणिक चित्रपटाची गाणी बर्यापैकी मिळाली. रामराज्य, महाकवी कालिदास, विक्रमादित्य, प्रभूका घर, गीतगोविंद, रामायण, जय महादेव,अंगूलीमाल वगेरे वगैरे. अशा चित्रपटात मुख्यत्वे भक्ती रसाचा कस लागतो आणि नकळतपणे गायक भजन गायक होऊ शकतो. मात्र मन्ना दा फक्त भजन गायक नाही झाले. अनेक गाणी जी भजने नसतात पण भक्ती रसाने ओंथबंलेली असतात त्या गाण्यानांही त्यानी न्याय दिला. “तू प्यार का सागर है’’, “ ए मालिक तेरे बंदे हम” ,”भयभजंना सून वंदना हमारी”, “कहाँसे आयो घनश्याम”, “यशोमती मय्यासे” सारखी भक्ती रसाचा मळा फुलवणारे मन्नादा जेव्हा ‘प्यार हुवा इकरार हुवा—’ आणि ‘झुमता मौसम मस्त महिना….’ म्हणू लागतात तेव्हा चकित व्हायला होते. त्यांची प्रकृती वा वृत्ती पाहता हा माणूस गाण्यातुन इतका अवखळपणा कसा काय व्यक्त करू शकला? ( पण असं घडू शकतं. ओमप्रकाश, कन्हैयालाल, डेव्हिड हे कसलेले कलावंत अविवाहीत होते पण चित्रपटातील त्यांचा कौटुंबिक अभिनय कसा विसरता येईल.)
मन्नादाचे गाणे कोणता नायकाने गायले याला रसिकांनी फारसे महत्व दिलेच नाही. त्यांचे अमुक तमुक गाणे चित्रपटात आहे एवढेच रसिकांसाठी पूरेसे होते. विनोदाचा बादशाह मेहमूदसाठी त्यांनी गायलेली गाणी ही खास मन्नादा पठडीतील आहेत. जितेंद्र-बबीताच्या औलादमधील ‘जोडी हमारी जमेगा कैसे जॉनी’, ‘गंगा मेरी माँ का नाम, आजा मेरी जान ये है जून का महिना’, ‘खाली बोतल खाली डिब्बा’, ‘वाँगो– वाँगो-’ , शम्मीकपूरचा गोंधळ असलेले मेरे ‘भैंस डंडा क्यूँ मारा’ ही गाणी केवळ आणि केवळ मन्नादासाठीच ऐकली व पाहिली जातात. कठीण गाणे गावे ते मन्ना दा यांनीच…ते नेहमीच अशा कठीण गाण्यानां आव्हान देत व ते ऐकायला मात्र सोपे करून टाकत. कवी हरीवंशराय बच्चन यांनाही जेव्हा “मधूशाला” स्वरबद्ध करायची होती तेव्हा सर्वप्रथम आठवण झाली ती मन्नादा यांचीच. इतक्या वर्षा नंतर आजही ही मधूशाला अत्यंत मधाळ वाटते ती मन्नादाच्या सूरांमुळेच.
१८ डिसेंबर १९५३ मध्ये केरळच्या सुलोचना कुमारन बरोबर त्यांचा विवाह झाला.शुरोमा आणि सुमिता अशा दोन मुली त्यांना आहेत. २०१२ मध्ये त्यांच्या पत्नीचे बंगलोर येथे कर्क रोगाने निधन झाले. पत्नीच्या निधना नंतर ५० वर्षे मुंबईत राहिलेले मन्ना दा बंगलोरला स्थायिक झाले ते कायमचेच. चित्रपट हे माध्यमच मुळी आभासी आहे. एका पांढऱ्या शुभ्र पडद्यावर तांत्रिक करामती करून छायाचित्राद्वारे केलेला खेळ. मात्र चित्रपटगृहातील अंधारात आपण त्यात बुडून जातोच की!! वीज जाताच या आभासी जगातुन बाहेर येतो अन् परत त्यात गुंतून जातो. त्यातील अवघं जग जरी खोटंखोटं असलं तरी. या चित्रपटातील संगीत मात्र अस्सल असतं. कारण सिनेमा संपल्यावरही आपण आपल्या सोबत आणतो ते गाणं. निसर्गाने सर्वच प्राण्यांना ध्वनी दिला आहे व तो काढण्यासाठी घशा सारखा अवयवही दिला आहे. पण फक्त मानवानेच या ध्वनीचे रूपातंर गाण्यात केले. असं म्हणतात की गाताना किंवा कोणत्याही कलेच्या अविष्कारात तादात्म्यता फार महत्वाची असते. पण जेव्हा वैयक्तिक पातळीवर आपल्याला अविष्कार करायचा असेल तर आपला ‘स्व’त्त्वामध्ये आपण बुडून जाऊ शकतो.
मन्नादा जेव्हा रंगमंचावर प्रेक्षकासमोर थेट गाणे सादर करीत तेव्हा ते डोळे मिटून गात असत. त्यांना जेव्हा असे डोळे बंद करण्याचे कारण विचारले तर म्हणत-‘गाणे ही माझी पूजाअर्चना, साधना, प्रार्थना आहे, ती डोळे मिटूनच करतात.’ पार्श्व गायनात असे तादात्म्य पावणे सोपे नाही. कारण ते गाणे चित्रपटात ‘कुणीतरी’ गाणार आहे, म्हणजे त्यातील व्यक्तीरेखा आपल्या भावना गाण्यातुन व्यक्त करणार आहे. पण त्याच वेळी ती व्यक्तीरेखा जीवंत करणारा आणखी कुणीतरी कलावंत आहे. जो एकाचवेळी पडद्यावर वेगळा आहे आणि प्रत्यक्षात वेगळा आहे. आणि अशा व्यक्तीरेखेसाठी पार्श्वगायकाला गायकाला गायचं आहे व तेही वेळेचं भान ठेवून. मुळात ही एक फार मोठी कसरतच असते आणि चित्रपटाच्या सुवर्णकाळातील दिग्गजाना ती छान पार पाडता आली. मन्नादा हे त्या काळातील दिग्गजापैकी हयात असलेले शिलेदार होते. ‘मेरा नाम जोकर’ मधील राजू जीवनावर भाष्य करताना म्हणतो- ‘पहिला घंटा बचपन है– दुसरा जवानी— तिसरा बुढापा’ यातील प्रत्येक शब्दातील अर्थ मन्नादानी केवळ आणि केवळ आपल्या सुरांनी जीवंत केला आहे. शेवटी तर त्यांनी कहरच केला आहे. त्यांचा गळ्यातुन जीवनाचा आशय आर्ततेने पाझरू लागतो- ‘‘उसके बाद खाली खाली तंबू है, खाली खाली कुर्सियाँ है, बिना चिडियाका बसेरा है, ना तेरा है ना मेरा है’’ आजही जेव्हा जेव्हा हे स्वर कानी पडतात तेव्हा तेव्हा सभोवती एकटेपणाचे अव्यक्त धुके पसरल्याचा भास होतो.
मन्ना दा नी गायलेल्या गाण्याची संख्या किती आहे यापेक्षा त्यांनी गायलेली गाणी आमच्या हृदयात घर करून बसतात हेच महत्वाचे. अनेकदा त्यांचे स्वर ऐकतानां जन्माबरोबरच आलेला मृत्यू नावाचा संवगडी प्रथमच जवळपास असल्याचा भास होऊ लागतो. गाणे असे जन्म आणि मृत्यूला जोडते. हा जोडणारा सेतू म्हणजे गायक, संगीतकार, गीतकार…मनस्वी कलावंत असतो. मन्नादा आपल्यात नाहीत हे माझ्या सारख्याला पचनी पडत नाही कारण त्यांना कधी जवळुन प्रत्यक्ष पाहता नाही, त्यांच्या जादूई गळ्याला स्पर्श करता आला नाही, त्यांच्या कुठल्याच कार्यक्रमाला कधी जाता आले नाही, त्यांच्या सोबत गर्दीतही फोटो काढण्याचा योग कधी आला नाही आणि बोलणे तर फार फार लांबची बात. मात्र तरीही ते माझ्या सारख्या शेकडो लाखो जणांच्या कुठेतरी आत तेव्हाही नक्कीच होते आणि आताही आहेत. कारण गाणं कधीच संपत नसतं, नव्हे ते कधी संपूच नये. अन्न पाणी हवा या सोबतच मन्नादाच्या गाण्यावर पोसलेली एक पिढी आजही हयात आहे, त्यांच्यासाठी मन्नादा कायम त्यांच्या सोबतच आहेत आणि हेच सत्य आहे !!!
रफी साहब, मुकेश, किशोर, तलत मेहमूद, महेंद्र कपूर या सर्वात मन्ना दा जेष्ठ्य होते. स्वत: रफी साहब त्यांचे दिलोजानसे चाहते होते. ८ जून २०१३ रोजी छातीत इन्फेक्शन झाले आणि मन्ना दा यानां आय.सी.यू. मध्ये दाखल व्हावे लागले. यात सुरवातीला ते बरे झाले पण नंतर मात्र कार्डीक अटकने त्यानां कायमचे हिरावून घेतले. लहानपणा पासून केलेली पहिलवानी व सुरांच्या तालमीमुळे सुदैवाने त्याना उत्तम आरोग्य लाभले. ९४ वर्षांचे प्रदीर्घ आयुष्य त्यानां लाभले.
आज मन्ना दाचा स्मरण दिवस….मृत्यू नंतरही ज्यांचे वय सतत वाढतच असते अशा कलावंता पैकी ते एक …त्यांच्या सुरानां विनम्र अभिवादन.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.