२०१७ ला जेव्हा संपूर्ण भारत निरोप देत होत. तेव्हा तिकडे इस्रो च्या इस्रो सॅटेलाईट सेंटर- ISRO Satellite Centre (ISAC)मध्ये वैज्ञानिक, अभियंते, टेक्निकल स्टाफ सकट सगळेच अहोरात्र कामात व्यस्त होते. त्याला कारण ही तसेच आहे. नवे वर्ष नवी दिशा घेऊन येते असं म्हणतात. गेल्या ऑगस्ट मध्ये आलेल्या अपयशाला मागे ठेवत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रो नव्या वर्षात अनेक नव्या आव्हानांना सामोरी जाते आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रातील मागणीला पूर्ण करण्यासाठी इस्रो मध्ये वरच्या लेवल पासून खालच्या लेवल पर्यंत माणसं रात्रंदिवस काम करत आहेत.
नवीन वर्षाचे पहिले ३ महिने इस्रो साठी खूप महत्वाचे असणार आहेत. तब्बल ४ मोठ्या मोहिमा पहिल्या तिमाहीत इस्रो पूर्ण करणार आहे. त्यातील सगळ्यात महत्वाचं मिशन असणार आहे भारताच चांद्रयान मोहीम-२. चंद्रावर पुन्हा एकदा स्वारी करण्यासाठी भारत सज्ज होत असून चंद्रावर रोवर उतरवण्यास सज्ज होत आहे. त्यानंतर जी.एस.एल.व्ही. मार्क ३ आपल्यासोबत कम्युनिकेशन उपग्रह GSAT-20 घेऊन अवकाशात उड्डाण भरणार आहे. ह्या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात GSAT-६ हा भारताचा सैनिक कम्युनिकेशन उपग्रह इस्रो प्रक्षेपित करत आहे. ह्या तीनही मोहिमा अतिशय महत्वाच्या असून त्यासोबत गुगल लुनार स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारतीय स्टार्ट अप टीम Indus Moon Mission पण ह्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत इस्रो बरोबर रॉकेट द्वारे चंद्रावर पाठवत आहे.
हे वर्ष इस्रो आणि भारतीय अवकाश क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचं असणार आहे. भारतातून दोन चंद्र मोहिमा काही दिवसांच्या अंतराने चंद्राकडे झेपावत आहेत. ह्या एतेहासिक क्षणांचे आपण साक्षीदार होतो आहोत हे आपलं परमभाग्य. एक मोहीम ही भारत सरकारची तर त्याच वेळेस एक मोहीम ही एका स्टार्ट अप टीम ची असणार आहे. ह्या दोन्ही मोहिमा भारताच्या अनेक नवीन स्वप्नांच्या विंग्स ना फायर करणार हे नक्की. ह्या शिवाय भारताच्या नागरिक आणि सैनिकी गरजा ही इस्रो ने बाजूला ठेवलेल्या नाहीत. म्हणून ह्या मोहिमांसोबत दोन कम्युनिकेशन उपग्रह सुद्धा इस्रो प्रक्षेपित करत आहे. बरं इतक सगळ करून त्यात आपल्या परदेशी गिऱ्हाईक ना इस्रो ने पहिल्या तिमाहीत जागा दिली आहे.
येत्या १० जानेवारीला इस्रो आपल्या वर्कहॉर्स पी.एस.एल.व्ही. सी ४० द्वारे तब्बल ३१ उपग्रहांच प्रक्षेपण करत आहे. ह्यात भारताचा Cartosat–2 सिरीज मधला उपग्रह सगळ्यात महत्वाचा पे लोड असून त्यात panchromatic and multispectral satelliteआहेत. ते अवकाशातून हाय रिझोल्यूश डेटा देऊ शकतात. ह्याशिवाय इतर एक मायक्रो आणि एक नॅनो असे भारतीय उपग्रह असून इतर २८ उपग्रह हे परदेशी आहेत. ज्यात अमेरिका आणि फिनलंड ह्या देशांच्या उपग्रहाचा समावेश आहे. एकाचवेळी इतके उपग्रह प्रक्षेपित करणे प्रचंड कठीण काम आहे. सोप्या शब्दात सांगायचं झाल तर खरच रॉकेट सायन्स! कारण वेगवेगळ्या कक्षेत त्याचं प्रक्षेपण व त्या सोबत आपल्या उपग्रहांच्या रचने सोबत त्यांना आपल्या रॉकेट मध्ये सामावून घेण हे इस्रोच प्रचंड मोठ रॉकेट डिझाईन मधल यश म्हणावं लागेल. कारण रॉकेट च्या साच्यात वेगवेगळ्या धाटणीचे उपग्रह सामावून त्यांची यंत्रणा रॉकेट च्या यंत्रणेशी जुळवून मग त्याचं प्रक्षेपण शक्य होते.
२०१८ ह्या वर्षात प्रत्येक महिन्यात एक रॉकेटच प्रक्षेपण ह्या वेगाने इस्रो ने आपल्या मोहिमांच उद्दिष्ठ निश्चित केल आहे. भारताच्या कम्युनिकेशन गरजा तसेच इतर सैनिकी आणि नागरी गरजा पूर्ण करण हे इस्रो च मूळ उद्देश पूर्ण करत त्याशिवाय वैज्ञानिक मोहिमा आणि कमर्शियल उड्डाण ह्यांना जागा दयायची असेल तर ह्या पेक्षा अधिक वेगाने इस्रोला काम कराव लागणार आहे. एकाच वेळी ४ महत्वाच्या आणि इतर मोहिमांवर काम चालू आहे. एकाच वेळी २ चंद्र मोहिमांवर काम चालू आहे. आपण लक्षात घेऊ शकतो कि ह्या सर्वात एक चूक झाली तरी इस्रो साठी तो मोठा धक्का आहे. पण तरीही ही जोखीम उचलून भारताची पताका अवकाश क्षेत्रात मानाने फडकत ठेवणाऱ्या इस्रो साठी येणार नवे वर्ष नवी दिशा आणि नवीन स्वप्न सत्यात उतरवणारं असणार आहे हे निश्चित. एक भारतीय म्हणून इस्रो च्या सगळ्या संशोधक, वैज्ञानिक, अभियंते ह्यांना येणाऱ्या वर्षासाठी खूप खूप शुभेछ्या. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.