उद्या म्हणजेच १२ जानेवारी २०१८ रोजी सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी Indian Space Research Organisation (ISRO) आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करत आहे. १९ एप्रिल १९७५ रोजी इस्रो ने आपला पहिला उपग्रह “आर्यभट” अवकाशात प्रक्षेपित केला तो रशियाच्या सहाय्याने. त्या नंतर १८ जुलै १९८० ला भारताने स्वबळावर रोहिणी उपग्रहाचं प्रक्षेपण करत स्वबळावर उपग्रह निर्माण करून अवकाशात प्रक्षेपित करण्याचं तंत्रज्ञान असणाऱ्या मोजक्या देशात आपलं नाव लिहीलं.
१९८० ला सोडलेला “रोहिणी” उपग्रह हा एस.एल.व्ही. ३ ह्या रॉकेट मधून सोडण्यात आला. त्यानंतर इस्रो ने दोन वेगळ्या रॉकेट प्रणाली वर काम करण्यास सुरवात केली. Polar Orbit साठी पी.एस.एल.व्ही. तर Geostationary Orbit साठी जी.एस.एल.व्ही. रॉकेट ची निर्मिती सुरु झाली. “पोलार ऑरबीट” म्हणजे उपग्रह पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवीय कक्षेतून प्रवास करतो आणि “जिओस्टेशनरी ऑरबीट” म्हणजे पृथ्वीपासून साधारण ३५.७८६ किलोमीटर वरून पृथ्वीच्या परीवलनाच्या दिशेने पृथ्वीच्या वेगात उपग्रह प्रवास करतो. ह्यामुळे पृथ्वीवरून बघताना हा उपग्रह अढळ वाटतो. कम्युनिकेशन उपग्रह अशा कक्षेत स्थापन केले जातात. त्यामुळे एखाद्या प्रदेशावर ते सतत लक्ष ठेऊ शकतात किंवा काम्युनिकेट करू शकतात.
पी.एस.एल.व्ही आणि जी.एस.एल.व्ही. ही दोन्ही रॉकेट तयार करताना इस्रो ने भारताच्या गरजांना पाहिल स्थान दिलं. म्हणून आधीच्या काही काळात भारतीय उपग्रह प्रक्षेपित करण्याच काम इस्रो ने केल. पी.एस.एल.व्ही. च्या अचूक प्रक्षेपण आणि यशाच्या आकडेवारीमुळे जगाच लक्ष भारताकडे वळल. एकामागोमाग एक यशस्वी प्रक्षेपण करताना पी.एस.एल.व्ही. ने अनेक विक्रम केले. परदेशातून त्यांचे उपग्रह प्रक्षेपण करण्यासाठी भारताकडे रांग लागू लागली. एकाच वेळी १०४ उपग्रह प्रक्षेपित करताना पी.एस.एल.व्ही. ने एकाच रॉकेट मधून सगळ्यात जास्त उपग्रह प्रक्षेपित करण्याचा जागतिक विक्रम केला. मंगळयान असो वा कमर्शियल प्रक्षेपण, पी.एस.एल.व्ही. ला इस्रो चा वर्क हॉर्स म्हंटल जाऊ लागल. जी.एस.एल.व्ही. च्या बाबतीत मात्र इस्रो ला यशाने खूप हुलकावणी दिली. Cryogenic Engine Technology चे हस्तांतरण करण्यात आलेले निर्बंध आणि रॉकेट च्या चाचणीत आलेले अपयश कुठेतरी इस्रोला एक पाउल मागे नेत होत. पण ५ जून २०१७ रोजी इस्रो ने आपल्या सर्वात शक्तिशाली अश्या जी.एस.एल.व्ही. मार्क ३ च उड्डाण यशस्वी करत अपयशाची मालिका खंडित केली. हे रॉकेट उड्डाण भरताना ६४० टन इतक्या प्रचंड वजनाच असून ह्यात स्वदेशी Cryogenic Engine वापरण्यात आल आहे. Geostationary Orbit मध्ये ४००० किलोग्राम वजनाचे उपग्रह प्रक्षेपित करण्याची ह्याची क्षमता असून ती येत्या काळात ८००० किलोग्राम पर्यंत नेली जाणार आहे.
आपला १०० वा उपग्रह म्हणून इस्रो “Cartosat–2 ” सिरीज मधील ७१० किलोग्राम वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करत आहे. ह्या उपग्रहाचा मूळ उद्देश “High–resolution specific spot images ” असून ह्यावरील कॅमेरे अतिशय उच्च दर्जाचे “Panocromatic” आणि “Multy Spectral” आहेत. ह्या सोबत इस्रो ३० इतर उपग्रह ज्याचं एकत्रित वजन ६१३ किलोग्राम आहे. ते प्रक्षेपित करत आहे. ह्यात १ नॅनो आणि १ मायक्रो उपग्रह भारताचा असून इतर सर्व उपग्रह हे परदेशी आहेत. ज्यात Canada, Finland, France, Koriya, United Kingdom, U.S.A. ह्या देशांच्या उपग्रहाचा समावेश आहे. ह्या सर्व उपग्रहांच एकत्रित वजन सुमारे १३२३ किलोग्राम आहे.
एकेकाळी चाचपडणारी अवकाश एजन्सी ते जगातील अद्यावत स्पेस एजन्सी मधील एक हा इस्रो चा प्रवास थक्क करणारा असाच आहे. आपला पहिला उपग्रह बैलगाडीतून आणि रॉकेट सायकल वरून नेणाऱ्या इस्रो अर्थात “इंडिअन स्पेस एजन्सी” आज सूर्यावर, चंद्रावर, मंगळावर, शुक्रावर जाण्यासाठी मोहिमा आखत असून त्याच सोबत भारताच्या गरजा भागवण्यासाठी २०२१ पर्यंत ६५ उपग्रह अवकाशात पाठवत असून त्याच्यासाठी प्रत्येक वर्षाला १५-१८ रॉकेट उड्डाणाची तयारी करत आहे. १९ एप्रिल १९७५ ते १२ जानेवारी २०१८ हा प्रवास अदभूत असा आहे. एक भारतीय म्हणून आपण उद्या १२ जानेवारी २०१८ ला सकाळी ९ वाजून २८ मिनिटांनी ह्या १०० व्या उड्डाणाचे साक्षीदार होऊन इस्रो च्या सगळ्या अभियंते, वैज्ञानिक, संशोधक ह्यांना त्यांच्या परिश्रमासाठी कुर्निसात करूयात.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.