जसं जसं तुमचं वय वाढतं तशी प्रॉडक्टिव्हिटी कमी होत जात चालली असं काही जाणवतं का बरं तुम्हाला? लहान असताना कुठलंही काम करताना असलेला जोश, उत्साह हळू हळू वय वाढत गेलं तसा व्यस्त प्रमाणात कमी होत गेला कि नाही! म्हणूनच पाच राजमार्ग आणि आणि त्यासाठीच्या एक्झरसाईझ आज या लेखात मी तुम्हाला सांगणार आहे.
बरेचदा सकाळी उठून आपला दिवस सुरू होतो तो घाई गडबडीचं दिवसभराचं टाइमटेबल डोळ्यासमोर ठेऊनच.
आपण जेव्हा लहान होतो तेव्हा सकाळी उठून जसा सहज दिवस सुरू व्हायचा कसलाही विचार, चिंता आणि स्ट्रेस डोक्यात नसायचा तसं जमतंय का आता?
बघा अगदी लहान असताना हे असं सहज व्हायचं, जमायचं पुढे शाळेत जायला लागलो तसं होमवर्क, टीचरने असं सांगितलं, मित्रांसोबत आज असं ठरलेलं आशा काही विचारांनी जागा घेतली.
थोडं वय वाढत गेलं तशी या प्रश्नांची आणि कामाच्या लिस्टची तीव्रता वाढत गेली. आणि हा स्ट्रेस आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला.
आपल्याला आता वाटतं बालपणीचा काळ सुखाचा!! अजूनही ते तसं जगणं का बरं जमत नाही?
खरंतर यातून निघण्यासाठी तुम्ही काहीही जास्त सर्कस न करता स्वतःचीच काळजी घेणाऱ्या काही गोष्टी पाळल्या तरी पूरे.
काही छोट्या छोट्या गोष्टी आपले रोजचे प्रातर्विधी असल्यासारख्या केल्या तरी आनंदी राहून तुम्हाला तुमची प्रॉडक्टिव्हिटी वाढवता येईल.
सकाळी रोजच्या शेड्युल पेक्षा २५-३० मिनिटं लवकर उठून काही गोष्टी जाणीव पूर्वक आपल्या सवयीचा भाग बनवल्या तर मूड चांगला ठेऊन स्ट्रेसफ्रि दिवस सुरू करणं आणि हलकं फुलकं बागडणं यात तुम्हाला काहीही अवघड वाटणार नाही.
आज या लेखात असेच पाच राजमार्ग मी तुम्हाला सांगणार आहे.
हे नियम दररोज पाळाले तर काही दिवसांनी तुम्हालाच तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी चमत्कारिक रित्त्या वाढल्याचं जाणवेल.
लहान असताना इतकं सहज बागडणाऱ्या तुमच्यावर मोठं होता होता हि नकारात्मकतेची पुटं का बरं चढत जातात?
तुमच्याबरोबर जे काही चुकीचं झालं, जी अवघड परिस्थिती निर्माण झाली त्याने तुमचं मन व्यापून जातं.
यामुळे तुमचा सगळा फोकस जातो तो निगेटिव्हिटीवर.
तुमच्यात खूपशा स्ट्रेंथ असल्या तरी तुम्ही स्वतःलाच ओळखत नसल्यासारखं कोशात जाऊन बसतात.
अशा वेळी तुम्हाला प्रश्न असतो कि हे सगळं कळतं पण त्यासाठी करायचं काय? कारण होतं असं कि मोठ्या गोष्टी करता करता तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीच विसरून जात.
म्हणूनच आनंदी राहून प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याचे हे पाच राजमार्ग समजून घ्या. आहेत अगदी साधे बरंका. पण तिकडे आपलं लक्षच जात नाही.
ती न्यूटनची गोष्ट माहित आहे ना, कि त्याने मोठ्या आणि छोट्या मांजरीसाठी एकाच दरवाजाला शेजारी शेजारी दोन होल पडले. तसं होतं काहीसं आपलं. मोट्ठ्या विचारांच्या मागे पळता पळता या छोट्या छोट्या पण खूप प्रभाव पडणाऱ्या गोष्टी आपण विसरूनच जातो.
आणि म्हणूनच मनाचेTalks वर आम्ही याचीच जाणीव तुम्हाला करून देतो. तुम्ही आमच्या लेखांना प्रतिसाद देता आणि आमच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सामील होतात याबद्दल मनस्वी धन्यवाद.
तर आता प्रॉडक्टिव्हिटी वाढवणारे पाच राजमार्ग काय आणि त्यासाठी काय करायचं हे विस्ताराने समजून घ्या.
स्वाध्याय पहिला- सकारात्मक मानसिकता जागरूक करा
तुमची मानसिकता नकारात्मक केव्हा होते माहित आहे? जेव्हा तुमच्यातला आशावाद आणि कृतज्ञतेची भावना कुठेतरी दडी मारून बसते.
आता सकारात्मक मानसिकता डेव्हलप करण्यासाठी एक साधारण १० मिनिटांची एक्झरसाईझ करा.
त्यासाठी काय करायचं?
तुम्ही कधी तुम्हाला स्वतःला थोपटल्याचं आठवतये का? मग आता ते करा, सहजच…. तुम्ही आतापर्यंत केलेल्या चांगल्या गोष्टींची उजळणी करा, आठवा तुमच्याला चांगुलपणा, तुमच्यातली तुम्हाला वाटत असलेली स्ट्रेंथ.
हे तीन प्रश्न स्वतःला विचारा!!
१) मागच्या एका आठवड्यात मी केलेल्या १० चांगल्या गोष्टी कोणत्या होत्या?
२) कोणत्या १० गोष्टींसाठी मला कृतज्ञ वाटतं?
३) माझ्या आयुष्यात कोणत्या १० गोष्टी मला आनंदी करतात?
स्वाध्याय दुसरा- मनाचे निरीक्षण करा
यात तुम्हाला स्वतःच्या मनाचे निरीक्षण करायचे आहे. जेव्हा तुमचं मन भूतकाळाची चिंता करतं, भविष्याची धास्ती ठेवतं तेव्हा नकारात्मक मानसिकता उफाळून येते.
वाचून ‘मनाचे निरीक्षण करणे’ हे खूप किचकट काम असेल असं काही समजू नका. यासाठी तुम्हाला फक्त प्रेझेन्टवर फोकस करून जागरूकपणे चिंता करणं सोडून द्यायचं आहे.
त्यासाठी काय करायचं?
एक काहीतरी तुमच्या आवडीची वस्तू किंवा शक्यतोवर फुल घ्या. ते एका टेबलवर ठेवा.
आता एक अगदी ५ मिनिटाची एक्झरसाईझ करायची. त्याच्याकडे असं बघा जसं त्या फुलाला तुम्ही पहिल्यांदाच बघताय. त्या फुलाचा रंग, वास नुसतं अनुभवा. त्यावर कोणतंही जजमेंट न करता नुसतं कुतूहलाने अनुभवा.
स्वाध्याय तिसरा- वाचन करा
आपल्यावर आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा खूप प्रभाव पडतो. आणि दुर्दैवाने यातल्या जास्तीत जास्त घटना या निगेटिव्ह असण्याची शक्यता असते.
किंवा अगदी पूर्ण निगेटिव्ह नसल्या तरी त्यातलं चांगलं वेचून घेणं आपल्याला जमतंच असं नाही.
रोज किमान ३० मिनिटं कुठल्याही सकारत्मक गोष्टींचं वाचन करा.
आणि शक्यतोवर सकाळी उठल्यावर सर्वात पहिल्यांदा करा. ध्येय पूर्ण करण्याबद्दल, चांगल्या सवयी लावण्याबद्दल, यशस्वी होण्याबद्दल… म्हणजे निगेटिव्हिटीला दूर ठेवेल असे वाचन रोज सकाळी निदान ३० मिनिटं करा.
बघा तुम्हाला ताजे तवाने झाल्याचे फिलिंग येईल. आणि म्हणूनच मनाचेTalks च्या असंख्य सब्स्क्रायबर्स साठी आम्ही रोज सकाळी काहीतरी मॉर्निंग मोटिव्हेशन पाठवतो.
एखादा वाचनाचा विषय रिपीट झाला तरी तो जसा पुन्हा तुम्ही वाचाल तसं त्यातून नवीन काहीतरी विचार तुम्हाला सुचेल. आणि वाचनातून बदल घडतात याची कत्येक उदाहरणं तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
स्वाध्याय चौथा – व्हिज्युअलायझेशन
बरेचदा तुमची ध्येय तुम्हाला अशक्य वाटतात. आणि तुम्ही निराश होता. अशा वेळी व्हज्युअलायझेशन कामाला येतं कारण डोळ्यांनी बघितलं तरच विश्वास बसतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला तुमची ध्येय शक्य वाटायला लागतात. यासाठी एक १० मिनिटांची एक्झरसाईझ पुरे होईल.
त्यासाठी काय करायचं?
एका शांत ठिकाणी बसा. काही डिस्टरर्ब्न्स होणार नाही असं बघा. शांत डोळे मिटा. एक खोल श्वास घेऊन जी काही तुमची स्वप्नं असतील ती सत्यात उतरली आहेत आणि तसे तुम्ही जगत आहात असंच इमॅजिन करा. तुम्ही बघताय, फील करताय इतकं इमॅजिन करा. ते कसं होईल असा विचारच नको एवढा थोडा वेळ. (कारण ते कसं करायचं याची ऊर्जा मिळण्यासाठीच हे करायचंय. नुसते ‘मुंगेरीलाल के हसीं सपने’ असं नाही)
स्वाध्याय पाचवा- लेट गो करायला शिका
बरेचदा आपण आपले भूतकाळातले अनुभव मनाच्या एका कोपऱ्यात दडपून ठेवलेले असतात. मग हे भावनिक बॅगेज जोपर्यंत आपण उतरवून ठेवणार नाही तोपर्यंत पुढचा विचार स्वच्छ कसा होईल?
त्यासाठी काय करायचं?
यासाठी एक अगदी २० मिनिटांची एक्झरसाईझ करा. याने तुम्हाला अगदी शांत आणि हलकं वाटेल. आरामात बसा.
१० खोल आणि स्थिर असे श्वास घ्या. मग त्या गोष्टींचा विचार मनात आणा ज्या तुम्हाला लेट गो करायच्या आहेत.
विचार अगदी सहज येऊ द्या. त्यावर कसलेही जजमेंट करू नका. मग पुन्हा १० शांत श्वास घेऊन ते श्वास सोडताना ते ‘लेट गो’ वाले इमोशन तुम्ही तुमच्या शरीरातून बाहेर टाकताय असं फील करा.
बघा कसं हलकं वाटेल. हि एक्झरसाईझ रोज करा. विचार स्वच्छ होईपर्यंत करा.
अभिनंदन आणि शुभेच्छा, आताच तुम्हाला आनंदी राहून तुमच्यातली प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याचे पाच राजमार्ग समजले आहेत. आता असं समजा कि ‘स्काय इज द लिमिट फॉर यु’ आणि आणि मग पुढच्या कामाला लागा.
कोविड-19 सुद्धा एक दिवशी जगाचा निरोप घेईल. फक्त तोपर्यंत सर्वांना नियम पाळून सुरक्षित राहायचं आहे… काय पटतंय ना!!!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.