एखादा मोठा वक्ता काय किंवा एकेका ग्राहकाला आपल्या पॉलिसीज बद्दल योग्य माहिती देऊन त्याला खुश करून आपला ग्राहक बनवणारा इन्शुरन्स एजंट काय, एखादा विक्रेता काय ह्या सर्वांना संभाषणचतुर असावंच लागतं. मग बघुयात संभाषण चतुर कसं व्हायचं? चांगलं आणि चुकीचं संभाषण ह्यातला फरक काय आहे ते…
संभाषण चतुर कसं व्हायचं ? आणि आपल्या संभाषणातून लोकांना कसं खुश करायचं?
संभाषण करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला हसायला लावले की तुमचं संभाषण चांगलं झालं असं म्हणता येईल का?
एखादा तोतरा बोलणारा माणूस सुद्धा आपल्या बोलण्याने लोकांना हसवू शकतो. तो काय बोलतोय हे समजून घ्यायलाच लोकांचा जास्त वेळ खर्च होतो, पण लोक त्याच्या बोलण्याला सुद्धा दाद देतात.
एकदा परराज्यातून आलेल्या एका माणसाने राजालाच प्रश्न विचारला की महाराज तुम्हाला विनोद सांगता येतो का??
तेंव्हा राजाने अsssss अहंमssssअ…. असं अडखळून त्या माणसाला उत्तर दिलं …..
म… माझं आणि वेळेचं (टायमिंगचं) कधीच जमत नाही.
असं म्हणून तो राजाच मोठ्याने हसायला लागला. विनोद झाला की लोक हसतात. विनोद करणारा स्वतःच हसला तर विनोदातली सगळी जान निघून जाते.
संभाषण कलेला एक वेगळा दर्जा आहे. ही कला शिकायला मेहेनत घ्यावीच लागते बरंका.
हजारो लोकांच्या समोर एकटे उभे राहून त्यांची मनं जिंकायची, अनोळखी लोकांना भेटून त्यांना आपल्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिस बद्दल कन्व्हिन्स करायचं म्हणजे सहज सोपी गोष्ट नाही.
त्यासाठी खूप माहिती गोळा करायला लागते. कोणत्याही विषयावर बोलायला, सगळ्याच विषयाचं ज्ञान असायला लागतं.
आणि महत्वाचं म्हणजे कोणत्या प्रकारचे लोक आपल्या समोर बसलेले आहेत हे जाणून तसं बोलायला लागतं खरं की नाही?
एखादा मोठा वक्ता काय किंवा एकेका ग्राहकाला आपल्या पॉलिसीज बद्दल योग्य माहिती देऊन त्याला खुश करून आपला ग्राहक बनवणारा इन्शुरन्स एजंट काय, एखादा विक्रेता काय ह्या सर्वांना संभाषणचतुर असावंच लागतं.
मग बघुयात संभाषण चतुर कसं व्हायचं? आणि चांगलं आणि चुकीचं संभाषण ह्यातला फरक काय आहे ते…
अगदी प्रामाणिकपणे, लोकांच्या आवडीप्रमाणे केलेलं संभाषण हीच चांगल्या संभाषणाची ‘गुरुकिल्ली’ आहे. हे पहिलं लक्षात असूद्या.
तुमच्या संभाषणात समोरच्या व्यक्तीची नको तितकी प्रशंसा आणि त्याच्या कामाची नको तितकी स्तुती असेल तर ते संभाषण चांगलं संभाषण ठरत नाही.
कोणतीही गोष्ट गळ्यात मारायची असेल तर काही लोक असं संभाषण करतात. पण ते वाईट संभाषण ठरेल.
काही लोकांना सवय असते की समोरच्या व्यक्तीचा चेहेरा बघून पहिल्याच एका मिनिटात ठरवून टाकतात की ह्याच्याशी बोलून काहीच उपयोग होणार नाही.
आपला वेळ वाया जाणार, पण हे चांगलं नाही.
तुम्हाला जर चांगलं संभाषण चतुर व्हायचं असेल तर असा विचार करून चालणार नाही. कुठल्याही विक्रेत्याने आपल्या ग्राहकाला अंडरएस्टिमेट न करता त्याला हवी ती माहिती देणं हे खूप महत्त्वाचं आहे.
मी रियल इस्टेट मध्ये काम करत असताना हि गोष्ट तेव्हा शिकलो जेव्हा एक साधा दिसणारा माणूस, ज्याला मी ३५ लाखाचा फ्लॅट, हा काही कामाचा क्लायन्ट नाही म्हणून अगदी अनिच्छेने दाखवला पण त्याने मात्र ७५ लाखाचा फुल्ली फर्निश्ड फ्लॅट माझ्याच नाकावर टिच्चून घेतला.
समोरच्या व्यक्तीकडे दुर्लक्ष न करता त्याला तुमच्याकडे असलेली सगळी माहिती अगदी प्रामाणिकपणे दिली पाहिजे.
त्याला काही अडचण असेल तर ती आधी दूर केली पाहिजे. त्याने काही प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर दिलं गेलं पाहिजे.
त्याच्या बोलण्याला मान देऊन त्याला सगळी माहिती द्यायला पाहिजे. त्याला न समजलेली गोष्ट परत समजेपर्यंत सांगायला पाहिजे.
त्याला कदाचित तुमचा प्रामाणिक सल्ला नंतर योग्य वाटेल, तो खुश होईल आणि तुमचं मनाचं कनेक्शन जुळूनही जाईल. म्हणून चेहेरा बघून भविष्य ठरवू नका.
काही लोक अतिशय संवेदनशील असतात. त्यांच्याशी बोलताना कोणतंही असभ्य वाक्य वापरू नका. किंवा कधीही अशा लोकांना उल्लू बनवायचा प्रयत्न करू नका.
अशा लोकांशी बोलताना तुम्ही अतिशय नम्रपणे बोला. शांतपणे चर्चा करा. प्रत्येक मुद्दा अगदी हसत खेळत समजावून द्या. त्यांना ते आवडेल आणि तुमचं संभाषण यशस्वी होईल.
संभाषण चतुर व्हायचंय ना? मग ही गोष्ट अगदी लक्षातच ठेवा. आपण कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी संभाषण करत असू त्यावेळी आपले, स्वतःचे प्रॉब्लेम सोडवण्यात वेळ घालवू नका.
म्हणजे त्याच वेळी एखादा तुमच्या घरून फोन आला आणि घरचा काही प्रॉब्लेम सोडवण्यात तुम्ही वेळ घालवलात तर ते चुकीचं आहे.
समोरच्या व्यक्तीचा वेळ हा बहुमूल्य आहे हे समजून अशा गोष्टी टाळा. आणि समोरच्या व्यक्तीकडे आपला चेहेरा ठेऊन त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून पूर्ण लक्ष केंद्रित करून अतिशय आवडीने बोलणी करा.
तुमचा त्या चर्चेतला इंटरेस्ट समोरच्या व्यक्तीला दिसायला हवा, की मग तुमचं संभाषण यशस्वी झालंच म्हणून समजा.
आपल्यापेक्षा वयाने मोठ्या व्यक्ती किंवा ज्ञानी व्यक्ती किंवा श्रीमंत व्यक्ती अशा व्यक्तींशी बोलताना मनात चिंता असते किंवा भीती असते.
अशावेळी तुमच्यातला प्रचंड आत्मविश्वास जागृत करा आणि चिंता आणि भीतीला पळवून लावा
एक गोष्ट लक्षात घ्या की आत्मविश्वास हा प्रत्येकाकडे असतोच असे नाही. कोणाचा अगदी कमी असतो किंवा नसल्या सारखाच असतो.
त्याची कारणं वेगवेगळी आहेत, पण आपला आत्मविश्वास हा आपण स्वतःचा स्वतः विकसित करायचा असतो. जन्मतःच कोणी आपल्याबरोबर आत्मविश्वास घेऊन येत नाही. त्याला वाढवायचं काम आपण करायचं.
आत्मविश्वास कसा वाढवायचा याबद्दल आपण मागे एका लेखात माहिती घेतली होती. त्या लेखाची लिंक शेवटी दिलेली आहे.
सतत प्रॅक्टिस, करून आपण आपल्या संभाषणाची तयारी करायची. त्यातल्या चुका शोधून काढायच्या आणि सुधारणा करायची.
असंच स्वतःला सिद्ध करत जायचं, त्यामुळे आपोआप आपला कॉन्फिडन्स वाढत जातो. हा प्रचंड प्रमाणात वाढवायचा.
म्हणजे आपण जे काही बोलू ते अगदी बरोबर, बिनचूक असेल इतका सराव करायचा. म्हणजे आपल्या संभाषणाविषयीच्या सगळ्या चिंता किंवा मोठ्या लोकांसमोर बोलायची भीती पूर्ण नाहीशी होते.
हे करून बघा. आणि सिद्ध करा स्वतःला.
ज्यावेळी तुम्हाला कोणासमोर बोलायची भीती वाटते त्यावेळी समजा तुमचा आत्मविश्वास कमी पडतोय. त्याला जागृत करायचं काम करा.
आपण वक्ता म्हणून कुठे भाषण देणार असतो किंवा एखाद्या सेल्स कॉल वर जातो त्यावेळी आपण काही हाताची घडी घालून बोलत नाही. तर त्या त्या प्रसंगा प्रमाणे आपले हातवारे होणं जरुरीचं असतं. त्यामुळे आपली कॉन्फिडन्स लेव्हल आणखी वाढते.
थोडक्यात आपण भाषण देताना, बोलताना अभिनय करतो. तसा केला पाहिजे. आपल्या चेहऱ्याच्या हलचाली लोकांना दिसायला पाहिजेत.
आपलं संपूर्ण शरीर हे त्याप्रमाणे आपल्या बोलण्यातला सहजपणा दाखवतं. तुमचे डोळे सुद्धा तुमच्या बोलण्याचा अर्थ लोकांना सांगत असतात. राग व्यक्त करताना डोळे मोठे करणं, कपाळाला आठ्या दिसणं हा अभिनय आपोआप दिसायला पाहिजे.
हे हावभाव तुमच्यातला आत्मविश्वास लोकांना दाखवतात. आणि त्यामुळेच तुमचं बोलणं म्हणजे एकूणच तुमची पर्सनॅलिटी लोकांना आवडायला लागते.
तुम्ही केलेल्या विनोदाला समोरून खळखळून दाद मिळते. किंवा भाषण सहज समजावून सांगितलेल्या एखाद्या वाक्याला टाळ्या पडतात. त्यापेक्षा एखाद्या सेल्स पर्सनसाठी महत्त्वाचं म्हणजे त्याच प्रॉडक्ट विकलं जातं. त्यावेळी तुमची भीती, चिंता शिल्लकच राहिलेली नसते. म्हणजेच आत्मविश्वास वाढलेला असतो.
एका व्यक्तीशी जेंव्हा आपण संभाषण करत असतो त्यावेळी त्या व्यक्तीकडे बघून प्रत्येक वाक्य बोला. ह्यातून तुमचा आत्मविश्वास दिसतो.
थोडी प्रॅक्टिस केली की हे जमायला लागेल. जर तुम्ही समोर बसलेल्या व्यक्तीशी बोलताय आणि तुमची नजर दुसरीकडेच असेल, किंवा खाली असेल तर तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे असा अर्थ होतो.
समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात बघा.
आपल्याकडे शब्दांचा भरपूर साठा असायला पाहिजे म्हणून वेगवेगळ्या विषयांवरची जास्तीत जास्त पुस्तकं वाचा. शब्द संपदा वाढवत रहा.
जेवढं काही शिकायला मिळेल ते शिका. मोठ्या, आणि उत्तम वक्त्यांची भाषणं ऐकायला जा. त्यांची बॉडी लँग्वेज आत्मसात करा.
एक उत्तम वक्ता होण्यासाठी, संभाषण कुशल होण्यासाठी तुमचा जास्तीत जास्त वेळ द्या. भरपूर माहिती मिळवा.
सतत बोलण्याचा सराव करा. आणि व्हा उभे हजार लोकांच्या समोर एक उत्तम वक्ता म्हणून, एक संभाषण चतुर म्हणून, आणि जिंका सगळ्यांची मनं. सिद्ध करा स्वतःला की मी संभाषण चतुर म्हणून सज्ज आहे आणि मी लोकांना खुश करू शकतो.
Picture Credit : https://www.filmcompanion.in/
आत्मविश्वास वाढवण्यासाठी या सहा सूत्रांचं पालन करा (मराठी प्रेरणादायी)
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.