आज शंकर खूष दिसत होता. त्याचे कारण आम्हा सर्वाना माहीत होते. होळी जवळ आली की शंकर गावी जायच्या कल्पनेनेच खुश असायचा. नेहमीप्रमाणे त्याने आधीच रजा मंजूर करून घेतली होती. अर्थात नाही केली असती तरीही तो बिनपगारी रजा घेऊन गेला असता याची खात्री होतीच.
सवयीप्रमाणे तो दुसऱ्या पाळीला कामावर आला. रात्रीची गाडी होती त्यामुळे दोन तास आधी निघणार होता. मीही सर्व कामे आटपून घरी आलो. अचानक रात्री साडेनऊला फोन वाजला. पाहिले तर कंपनीतुन होता. रात्री वेळीअवेळी कंपनीतून फोन येतात याची सौ.ला सवय होतीच. पण नेहमीप्रमाणे तिच्या कपाळावर आठी पडली. मी फोन उचलला. माझा दुसऱ्या पाळीचा सुपरवाझर फोनवर होता.
“साहेब इथे मोठे ब्रेकडाऊन झालेय. पूर्ण प्लांट बंद पडलाय. काही सुचत नाहीय. सगळीकडून फोन येतायत” त्याचा स्वर काळजीचा होता.
” काळजी करू नकोस. मी करतो काहीतरी”. असे म्हणून दुसऱ्या कोणाला तरी कंपनीत पाठवायचा विचार करू लागलो. इतक्यात परत फोन आला. पाहिले तर तो शंकरचा होता. त्याने स्पष्टपणे मला सांगितले “साहेब… काळजी करू नका मी आलोय. आता बघतो काय करायचे ते”.
” अरे… पण तू घरी गेलेलास ना..??? मग परत कसा आलास??” मी आश्चर्यचकित होऊन विचारले. कारण शंकर निघून गेला असणार याची खात्री होती मला आणि आता त्याला बोलावून आणणे काही उपयोगाचे नव्हते.
“ते सर्व नंतर… आधी काम आटपतो मग बोलू. मी सुटकेचा निःश्वास सोडत फोन ठेवला. आता कसलीच काळजी नव्हती.
शंकर एक अनुभवी मेकॅनिक होता आणि खात्रीलायक माणूस. तो काम पूर्ण करेल याची खात्री होती. पण हा अचानक कसा आला याचेही कोडे होतेच. जाऊदे ….विचारू नंतर असे मनात म्हणत जेवायला बसलो.
रात्री साडेबाराला शंकरचा फोन आला.
“साहेब काम झाले. प्लांट चालू झालाय. मी निघतो.
“अरे आता रात्रीचा कुठे निघतोस ..??झोपून जा आरामात. तुझा पूर्ण ओव्हरटाईम लिहितो मी” मी समजावले त्याला.
“नको…. मी आता मिळेल ती गाडी पकडून गावाला जातो.
“अरे हो ….आता सांग तू परत कसा आलास ?? लवकर निघाला होतास ना ?? मला वाटले नव्हते तू येशील.” मी उत्सुकतेनेच विचारले.
” साहेब मी निघालोच होतो पण स्टेशनवर आलो आणि सुपरवायझरचा फोन आला. प्लांट बंद आहे ऐकून मला राहवत नव्हते. पण गावाच्या पालखीचे टेन्शन. इतक्या वर्षांची परंपरा कशी मोडायची. खूप द्विधा मनस्थितीत होतो. शेवटी घरी फोन करून बायकोला सर्व परिस्थिती सांगितली. ती बिचारी काय बोलणार. निघायची सर्व तयारी झालेली. शेवटी मोठ्या मुलाने फोन घेतला आणि म्हणाला बाबा ..तुम्ही काळजी करू नका. मी घेऊन जातो सर्वाना पुढे. तुम्ही या मागवून. पण आधी कंपनीतील काम पूर्ण करा. नाही यायला जमले तर यावर्षी पालखी मी घेईन खांद्यावर. तुम्ही बिनधास्त राहा.
खरे सांगू त्याक्षणी जाणवले मी खूप काही कमावले आहे. आज माझ्या मुलाला जबाबदारीची जाणीव झाली. ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. एक मोठ्या जबाबदारीतून मोकळे झाल्याची जाणीव झाली. त्याच जोशात मी परत फॅक्टरीत आलो आणि तुम्हाला फोन केला. साहेब गावावरून मुंबईत आलो ते रोजीरोटीसाठीच ना..?? मग आज आपली रोजीरोटी संकटात आहे हे कोणता कोकणी माणूस सहन करेल .मी नसतो तर तुम्हीही घरातून बाहेर पडला असतात हे नक्की. आता काय मी एकटाच कसाही गावी जाईन. पोरांनाही दाखवून देईन कितीही झाले तरी काम पाहिले आणि मग रीतिरिवाज आणि परंपरा. चला आता मिळेल ती गाडी पकडतो आणि गावी पोचून पोरांना चकित करतो”. शंकरच्या आवाजातील आनंद मला जाणवत होता.
“खरेच शंकर ….आज तू नवीन पिढीसमोर एक आदर्श ठेवलास की मनात असेल तर सगळ्या गोष्टी शक्य असतात. धन्य आहेस तू. आमच्यातर्फे देवीची ओटी भर आणि आशीर्वाद माग सर्वांसाठी” असे बोलून फोन ठेवला.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.