मित्रांनो, तुम्ही आयुष्यात आनंद आणि सुख, समाधान मिळण्यासाठी काय काय करता?
चांगलं शिक्षण घेता, चांगले मार्क्स मिळवून चांगली नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय ह्याची सुरुवात करता. भरपूर पैसे मिळायला लागतात, आणि सगळी सुखं तुमच्या पायाशी लोळण घ्यायला लागतात.
तुम्हाला काय हवं, कधी हवं, कसं हवं, ते सगळं तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही मिळवायला लागता. हळू हळू तुम्ही सगळ्या सुखांना अनुभवायला सक्षम होता.
मग घरचे लोक तुमचे दोनाचे चार हात करून देतात. हल्ली तर काहीजण स्वतःच आपल्या जोडीदाराची निवड करून दोनाचे चार हात करून घरच्या लोकांना धक्का देतात.
लग्ना आधी तुमचे कितीही गुण जुळले असतील तरी दोन वर्षांनंतर एकमेकांचे खरे गुण कळायला लागतात.
आजकाल तर दोघेही उत्तम गुण मिळवून आपलं शैक्षणिक वर्चस्व दाखवून मोठया पगाराच्या नोकऱ्या करत संसाराचा आनंद घेण्यासाठी विवाहबध्द होतात.
मग चालू होते गुणांची स्पर्धा, तुला जास्त कळतं का मला!!
तुला काहीच कळत नाही!! जे काही कळतं ते फक्त मलाच…
मला काही कळत नाही असं वाटलं का तुला? कळतंय तुलापण फक्त वळत नाही…. असं सगळं कळत न कळत घडायला लागतं.
अर्थात हे सगळ्यांच्या बाबतीत नाही बरं का. काही धक्के इगो ला बसतात त्यावेळी दुखावलेला इगो भांडण उकरून काढतो.
कोणाला अपमान वाटतो तर कोणाला हेवा. कधी राग येतो तर कधी चिंता वाटायला लागते. आधी कुरबुर असते, ती नंतर खडाजंगी होते. आधी वाद असतो, नंतर भडका उडतो. आणि मनं होतात कलुषित….
एकमेकांचं तोंड बघू नये अशी स्थिती निर्माण होते. पण लग्न केलंय म्हणून एकत्र राहायचं, कारण लोक काय म्हणतील?
म्हणून एकत्र पण एकमेकांकडे न बघता धुस फूस करत राहायचं. अशी परिस्थिती काही लोकांमध्ये निर्माण होते.
काही तर हमरी तुमरी वर येऊन जोडलेलं नातं तोडायच्या तयारीत येतात. ह्याची कारणं काय असतील ती त्या दोघांनाच माहिती असतात.
कोणी कोणावर संशय घेऊन ही परिस्थिती निर्माण करतं तर कोणी कोणाचं वागणं सहन होत नाही म्हणून एकमेकांपासून मनाने दुरावतात.
मग ह्या परिस्थितीत काहीतरी संभाषण झालं तरच कळू शकेल की नक्की प्रॉब्लेम कशात आहे. पण बोलायला जावं तर उलटाच अर्थ जोडीदाराने काढला तर सगळंच मुसळ केरात जायचं म्हणून संभाषण पण होत नाही.
पण अशा अवघड परिस्थितीत जर योग्य वेळी योग्य संभाषण जर दोघांमध्ये झालं तर कदाचित तपमान कमी होऊन चांगली थंड हवा घरात वहायला लागेल. याउलट काही चूक झाली तर भडका सुद्धा उडेल, नाही का?
मग हे “अवघड संभाषण” नात्यात गोडवा आणायला कधी, कुठे आणि कसं करायला पाहिजे ह्याच्या काही टिप्स ह्या लेखात आपण बघू.
खात्रीने काही फरक पडू शकेल. अर्थात ते भांडण किती पराकोटीला गेलंय त्याच्यावर अवलंबून आहे बरं का. बघा ह्या टिप्स आणि सफल संभाषणातून पुन्हा मजबूत करा बिघडलेलं नवरा बायको मधलं नातं.
(१) दोघांच्या नात्यात बिघाडी झाली तर बोलणंच बंद करून टाकू नका….
“तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्याकडे लक्ष द्या”.
जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या दोघांमध्ये संभाषण होणं खूप गरजेचं आहे. ते योग्यच आहे.
पण दुसरीकडे तुम्हाला असं ही वाटत असेल की जर आता ह्या विषयावर काही बोलणं झालं तर ते बोलणं जास्तच घातक ठरेल. म्हणजे परिस्थिती स्फोटक आहे.
मग अशी द्विधा मनस्थिती ज्या वेळी झाली असेल त्यावेळी ‘तुम्हाला’ नक्की कशाची अपेक्षा आहे ते पक्कं ठरवा.
तुम्हाला दोघात चांगलं सकारात्मक संभाषण व्हावं असं अपेक्षित असेल तर तुम्ही आधी सगळा सकारात्मक विचार करा. आणि बोलण्याची तयारी करून ठेवा.
पण तुम्हाला जे काही बोलायचं ते पॉझिटिव्ह बोलायचंय. एक सुद्धा निगेटिव्ह वाक्य तुम्ही बोलायचं नाही.
“तुम्हाला आधी हे माहिती पाहिजे की हे तुमच्या दोघातलं संभाषण का व्हायला पाहिजे!!”
म्हणजे. (१) हे दोघातलं संभाषण हे तुमच्या जोडीदाराच्या दृष्टिकोनातून मतभेदाचा विषय नीट समजून घेण्यासाठी व्हायला पाहिजे, का (२) जोडीदाराच्या मनात काही संशय निर्माण झालाय तो काढून टाकण्यासाठी हे संभाषण झालं पाहिजे किंवा (३) जे काही खोटं किंवा संशयाचं वातावरण निर्माण झालंय ते स्वच्छ करायचंय का (४) काही हानिकारक किंवा निष्ठुर वागणूक दिली गेली त्याबद्दल कबुली द्यायची किंवा घ्यायची आहे आणि नंतर त्यातून तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी जवळीक साधायची आहे, हे आधी निश्चित करून तशी तयारी करा.
“जे काही संभाषण तुमच्या दोघांमध्ये होईल ते खूप तणाव निर्माण करणार आहे ह्याची तयारी ठेवा”
रबर इतकं ताणलं की ते आता अगदी तुटायच्या बेतात आहे, अशावेळी हीच अवघड परिस्थिती निर्माण झालेली असते. काहीही बोलाल त्याचा उलटा अर्थ आपोआप काढला जातो. आणि वातावरण परत तापतं.
मग तापलेलं वातावरण लवकर शांत होणं कठीण असतं. पुन्हा त्याच सगळ्या विषयांवर गदारोळ होतो. पुन्हा बोलायला गेलो तर हे होणारच, आणि दोघांचाही पारा वरती चढणार.
ह्याची सुद्धा तयारी ठेवायला पाहिजे. कारण अर्थाचा अनर्थ झाला तर????? रणकंदन होणारच. तयारी ठेवा,
पण जर तुम्हाला ह्या संभाषणातून तुमच्या दोघांपैकी एकाला सुद्धा ह्या बोलण्याचा त्रास होऊ नये, किंवा दुखावला/ली जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्ही तुमच्यासमोर असं चित्र उभं करा की तुम्ही काही ही झालं तरी बचाव करत करत बोलणार आहात. त्यामुळे ताण तणाव जास्त वाढणार नाही.
(२) हे अवघड संभाषण नेमकं कसं कराल?
“आपल्याला बोलायला पाहिजे, किंवा आपण बोलायचं का जरा?” अशी सुरुवात करू नका.
तर अशा वाक्याने सुरुवात करा की जाणवलं पाहिजे की हा विषय खूप संवेदनशील आहे, अवघड आहे, डोकं तापवणारा आहे, त्रासदायक आहे.
आणि नंतर हे क्लिअर करा की तुमचा दृष्टिकोन वेगळा आणि जोडीदाराचा दृष्टिकोन वेगळा त्यामुळे दोघांनी एक विचार करून हे नीट समजून घेऊ आणि समजूतदारपणे ह्यातून काहीतरी पॉझिटिव्ह निर्णय घेऊ. अशी सुरुवात झाली की तुमचं तणावाचं वातावरण एकदम बदलून जाईल.
(३) “गुळमुळीत बोलू नका, आणि विषय सोडून भरकटू नका”
ठाम बोला. म्हणजे मी आता तुझ्या दृष्टिकोनातून विचार केला आणि मला चूक समजली. आता ही चूक परत होऊ देणार नाही. मी जे बोललो त्याबद्दल तुझा विचार काय आहे? आता मला कळलं, आता हे समजून घेऊ आणि अर्थाचा अनर्थ होऊ द्यायचा नाही ह्याची काळजी घेऊ.
असं अगदी सहज एकमेकांशी बोलून एकमेकाला समजून घ्या.
(४) हे अवघड संभाषण तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही करणार आहात, तर ते कुठे कराल? आणि कसं कराल?
आयुष्यभर तुमच्या बरोबर राहण्याचं मान्य करून कायदेशीर बाजूने सुरक्षित असा विवाह करून तुम्ही तुमचा जोडीदार निवडलेला असतो.
माणूस म्हटलं की चुका होतील, मतभेद होतील. पण घटस्फोट होण्याइतकी परिस्थिती निर्माण होणं म्हणजे बऱ्याच काही गोष्टी न जुळणे, म्हणजे परस्पर विरोधी व्यक्ती एकत्र आल्यावर असं घडू शकतं.
घटस्फोट हा जसा कधीही विनाकारण घेतला जात नाही तसेच जर समाजाला घाबरून घटस्फोट घेण्याची जर तुमची हिम्मत नसेल तर आपला इगो बाजूला ठेऊन आपल्या जोडीदाराशी जुळवून घेणे यातच समजदारी असते.
आणि असे सामंजस्याने घेऊन एकांमध्ये पॅच अप करणे वेळीच नाही जमले तर जगणं ओझं करून घेणारी सुद्धा उदाहरणं आहेत म्हणून वेळीच सावरणं महत्त्वाचं.
केवळ गैर समज, संशय, असल्या हलक्या गोष्टीतून जीवन उध्वस्त न होऊ देता समजून घेऊन जर विचारांवर संयम ठेवला तर दुरावलेली नाती परत सुरळीत होऊ शकतात. म्हणून योग्य संभाषण होणं जरुरीचं आहे.
आता हे संभाषण कुठे व्हायला पाहिजे? भर चौकात? का एखाद्या हॉटेल मध्ये का सार्वजनिक ठिकाणी? तर ते संभाषण तुमच्या राहत्या घरात केलं गेलं पाहिजे.
फक्त जर तुम्हाला मुलं असतील तर ती शाळेत किंवा खेळायला गेल्यावर हे संभाषण करा, त्यामुळे त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही.
हे संभाषण कधी ही जोडीदाराला सिनेमा बघायला घेऊन गेलात तर तिथल्या रेस्टोरन्ट मध्ये करू नका. कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असं संभाषण होऊ देऊ नका.
हे संभाषण तुमच्या आयुष्याशी निगडित आहे असे समजून प्रेमाचे धागे मजबूत करण्याच्या हेतूने करा. त्यासाठी जोडीदाराला सन्मानाची वागणूक द्या, भांडण झालं म्हणून तुच्छ वागू नका.
जर तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळवायचे असतील तर जोडीदारशी समंजसपणे वागा. जोडीदाराला कुठेही ट्रॅप करायचा म्हणजे कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करू नका.
हे लक्षण चांगले म्हणून ओळखले जात नाही. कमीपणाची वागणूक देऊ नका. कारण आयुष्यभर साथ देणाऱ्या जोडीदाराला तुम्हीच जर कमीपणाची वागणूक दिलीत तर बाकी तुमचे जवळचे लोक सुद्धा तशीच वागणूक देतील.
आपल्या माणसाचा मान आपण ठेवायचा. म्हणजे इतर लोक सुद्धा मान देतात.
काही गोष्टी अशा असतात की जरा नमतं घेतलं तर तुम्हाला कोणी नावं ठेवायला तिथे येणार नाही. फक्त जोडीदार असणार आहे.
चूक असेल आपली तर जोडीदारापुढे सॉरी म्हणायला लाज कसली? अहंकार नाती जोडत नाही, उलट बिघडवतो. अशा संभाषणात तर अहंकार बाजूला ठेवलेला चांगलं.
आता एवढं सगळं जर तुम्ही केलं, तरी जर तुमचा जोडीदार समजून घ्यायला तयार नसेल तर तिथं एखाद्या मध्यस्थाची जरुरी आहे असं समजा.
नातेवाईक, वयस्कर अनुभवी व्यक्ती, मानाने मोठी व्यक्ती अशा वेळी मध्यस्थ म्हणून तुम्हाला मदत करू शकेल. किंवा एखादा कौंसेलर ह्या वर काही तडजोड करून गाडी पुन्हा रुळावर आणू शकेल. पण ते ऍग्रिमेंट सारखं होईल.
म्हणून मनाने जुळलेली नाती जास्त काळ टिकतात. हे जाणून मनं जुळवून आणायचा प्रयत्न यशस्वी ठरतो. म्हणून मनं जुळवून आणा नाती मजबूत करा आणि आयुष्य आनंदी ठेवा. ‘म्हणूनच मनाचेTalks नेहमी वाचत चला’.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.