आपल्या आयुष्यात स्पर्धेला हल्ली प्रचंड महत्व प्राप्त झालं आहे. आधी चांगले मार्क पाडून चांगलं कॉलेज मिळवायला स्पर्धा, मग अजून चांगले मार्क पाडून चांगली नोकरी मिळवायला स्पर्धा, नोकरी टिकवून ठेवायला स्पर्धा, नोकरीत प्रमोशनसाठी स्पर्धा..
सगळीकडे नुसती रॅटरेस! परिणाम काय?
अतिरिक्त स्ट्रेस, हायपरटेन्शन, डायबेटीस आणि या सगळ्या आजारांमुळे हार्ट अटॅकचा धोका.
पूर्वी हार्ट ऍटॅक यायचं सरासरी वय साधारण साठ वर्षांच्या पुढचं होतं पण हल्ली तिशीतल्या व्यक्तींना सुद्धा हायपरटेन्शन किंवा स्ट्रेसमुळे हार्ट अटॅक आल्याचं आपण ऐकतो.
हे सगळं ऐकूनच आपल्याला घाबरायला होतं मग जर आपल्या समोर कोणाला हार्ट अटॅक आला तर आपण किती पॅनिक होऊ याचा विचार केला आहे का?
समोरच्या व्यक्तीची हालत बघून त्याला मदत करण्याऐवजी आपलाच जीव भीतीने अर्धा होईल.
पण तुम्हाला माहीत आहे का, की हार्ट ऍटॅक येणाऱ्या व्यक्तीला लक्षणं दिसायला लागल्यापासून पंधरा मिनिटात वैद्यकीय मदत मिळाली, तर त्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात?
आपण जर एखाद्याला अशा गंभीर प्रसंगी मदत करून त्याचे प्राण वाचवू शकलो तर ते आपल्याला आवडेलच ना?
म्हणूनच आज आम्ही हा लेख घेऊन आलोय.
या मध्ये हार्ट अटॅकची लक्षणे, ती दिसू लागल्यावर सामान्य (वैद्यकीय पार्श्वभूमी नसलेल्या) माणसाला करता येतील असे प्रथमोपचार याची अगदी सोप्या भाषेत माहिती आहे जेणेकरून कधी तुमच्या देखत एखाद्याला हार्ट अटॅक आलाच तर तुम्ही पॅनिक न होता त्या व्यक्तीला मदत करून तिचे प्राण वाचवू शकता.
हार्ट ऍटॅक येतो म्हणजे नक्की काय होतं?
जेव्हा काही कारणामुळे आपल्या हृदयाला रक्त पुरवठा बंद होतो तेव्हा हृदयाच्या स्नायूंना प्राणवायूची (ऑक्सिजन) कमतरता भासू लागते आणि ते निकामी होतं- म्हणजेच अटॅक येतो.
हार्ट ऍटॅक येत असलेल्या व्यक्तीला बऱ्याचदा आपल्याला काय होतंय हे समजत नाही किंवा काहीवेळेला समजत असून सुद्धा त्यांना ते सांगता येत नाही आणि यामुळे वैद्यकीय मदत मिळायला उगाच विलंब होतो.
हे अत्यंत धोकादायक आहे कारण वेळेतच लक्षणं ओळखून त्यावर प्रथमोपचार सुरु केले तर एखाद्याचा जीव वाचू शकतो.
हे प्रथमोपचार म्हणजे नक्की काय, ते कसे करायचे हे जाणून घेण्याआधी ते केव्हा करायचे हे जाणून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे.
यासाठी हार्ट अटॅकची लक्षणं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणूनच प्रथमोचाराबद्दल लिहिण्याआधी आपण हार्ट अटॅकची लक्षणं काय असतात, ती कशी ओळखायची हे जाणून घेऊ.
हार्ट अटॅक येत असलेली व्यक्ती सैरभैर होते, या व्यक्तींमध्ये प्रचंड अस्वथता आढळते.
पण कुठलीही अस्वस्थ व्यक्ती दिसली की तिला हार्ट अटॅक येत असेल असं आजिबात नाही.
कारण अस्वथ वाटायची अजूनही बरीच कारणं आहेत त्यामुळे एखादा व्यक्ती काही कारणाने बैचेन असेल तर त्याला हार्ट अटॅकच येत असेल असं सरसकट गृहीत धरणं गैर आहे.
म्हणूनच याच बरोबर इतर काय अशी लक्षणं आहेत जी फक्त हार्ट अटॅक येत असलेल्या व्यक्तींमध्ये आढळतात?
१. हार्ट अटॅक येत असेल तर पेशन्टला छातीत (डाव्या बाजूला, जिथे हृदय असतं तिथे) प्रचंड दुखतं आणि त्यामुळे बैचैन व्हायला होतं.
२. हेच दुखणं डाव्या खांद्यात, जबड्यात, पाठीत आणि क्वचित दातांमध्ये पसरतं.
३. दुखण्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो आणि पेशन्ट जोरजोरात श्वास घ्यायचा प्रयत्न करू लागतो.
४. डोकं हलकं वाटतं त्यामुळे चक्कर येते.
५. प्रचंड प्रमाणात घाम येतो
६. वेदनेमुळे मळमळ जाणवते आणि उलटी होईलसं वाटत राहतं, क्वचित उलटी होते देखील.
आपल्यादेखत एखाद्या व्यक्तीला असा त्रास होऊ लागल्यावर सगळ्यात आधी काय करायचं तर आपण शांत राहायचं, कारण आपण पॅनिक झालो तर सारासार विचार करू शकणार नाही.
त्यामुळे आपण जर शांत असू तरंच समोरच्याला मदत करू शकतो हा विचार मनात पक्का ठेवायचा आणि घाबरून जायचं नाही.
अर्थातच एखाद्याला आपल्या देखत जर ही लक्षणं दिसली तर सर्वात आधी डोकं शांत ठेऊन वैद्यकीय उपचार मिळेपर्यंत आपण जे करतो किंवा करू शकतो त्याला प्रथमोपचार म्हणतात.
हार्ट अटॅकची लक्षणं ओळखल्या नंतर, ऍम्ब्युलन्सला बोलावून ती येईपर्यंतच्या वेळात नेमकं काय करायचं हे आपण बघू.
(आपल्याला स्वतःला हा त्रास होत असेल तरीही या गोष्टी आपण परिस्थितीचं भान ठेऊन करू शकतो)
१. हार्ट अटॅक येणारी व्यक्ती किंवा तिथे उपस्थित असलेली कोणीही व्यक्ती जर “काही नाही होत.. जरा त्रास होतोय, होईल बरा..” या मताची असतील तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करून ऍम्ब्युलन्सला बोलावण्यात बोलावण्यात हलगर्जीपणा करू नये.
जर का काही नसेल तर ती चांगलीच गोष्ट आहे पण जर त्रास खरंच हार्ट अटॅकचाच असेल तर असा हलगर्जीपणा अजिबात परवडण्यासारखा नसतो.
२. पेशन्टला आडवं झोपावावं, तो/ती शांत राहील यासाठी आपण शांत राहून त्यांना धीर देणं महत्वाचं आहे. घट्ट कपडे असतील तर ते थोडे सैल करावे.
३. तोंडात फक्त एक ऍस्पिरिनची गोळी टाका. याने रक्त पातळ होतं व धोका कमी होतो. (हे करताना मात्र ऍस्पिरिनची ऍलर्जी नाही ना याची नीट खात्री करून घ्यावी)
४. जर आधीपासूनच ह्रदयविकाराचा त्रास असेल तर डॉक्टरांनी नायट्रोग्लिसरीन ही गोळी दिलेली असते.
त्याबद्दल विचार करून ती पेशन्टला लवकरात लवकर दिली पाहिजे. मात्र अशी गोळी डॉक्टरने दिलेली नसेल तर ती आपल्या मनाने कधीच देऊ नये.
५. Cardiopulmonary Resuscitation (CPR) चं जर ट्रेनिंग घेतलं असेल तर ते करू शकता.
यात पेशन्टचं नाक बंद करून त्याच्या तोंडात आपल्या तोंडाने श्वास भरायचा असतो.
हार्ट अटॅक येत असताना काय करावं हे आपण बघितलं.
पण नुसतंच ते जाणून घेऊन काही उपयोग नाही कारण हे करताना अगदी अनावधानाने आपण एखादी चुकीची गोष्ट केली तर पेशंटचा जीव धोक्यात जाऊ शकतो. त्यामुळे काय करावं इतकंच काय करू नये हे ही महत्वाचं आहे.
१. पेशंटला एकट्याला सोडून कधीही जाऊ नये.
२. पेशन्टनी मदत कितीही नाकारली तरी त्यांचं न ऐकता, त्यांना जमेल तितकं शांत राहून मदत करत राहावं.
३. खरंच हार्ट अटॅक आहे का दुसरं काही याची चिकित्सा करत विनाकारण वाट बघत बसू नये, लगेचच मदतीसाठी डॉक्टर/ऍम्ब्युलन्सला फोन करावा.
वर म्हटल्याप्रमाणे काही नसेल तर चांगलंच आहे.
४. पेशंटला पाणीच पाजलं, तोंडात गोड काहीतरी खायला दिलं असं काहीही करायचं नाही.
फक्त ऍस्पिरिन किंवा डॉक्टरांनी अशा इमरजेंसीसाठी जर काही गोळी लिहून दिली असेल तर त्याची चौकशी करून ती द्यावी.
मित्र मैत्रिणींनो, आपल्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर त्यासारखी आनंदाची दुसरी गोष्ट नाही हो ना?
हा लेख वाचून तुमच्या बऱ्याच शंका दूर झाल्या असतील आणि अशा वेळेस हिंमत न ढासळू देता समोरच्याला शक्य तितकी मदत करण्याइतपत माहिती तुम्ही मिळवली आहे.
हीच महत्वाची माहिती तुमच्या नातेवाईकांबरोबर आणि मित्र-मैत्रिणींबरोबर ‘शेअर’ करा..
एक लक्षात ठेवा.. हार्ट अटॅकची लक्षणं दिसल्यावर पंधरा मिनिटात मदत केली, तर एक जीव आपण वाचवू शकतो.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Useful information nice….
Very usefull information ….primary step…..
But give more information for never happens like this……so what precaution should be taken……for healthy health…………. 🙏🙏🙏💐💐💐.