चेहऱ्यावरच्या काळ्या डागांमुळे आत्मविश्वास कमी झालाय? मग हा लेख वाचा आणि चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करण्यासाठीचे घरगुती उपाय जाणून घ्या.
आपल्या त्वचेच्या सगळ्यात वरच्या थरामध्ये ‘मेलॅनिन’ नावाचं एक द्रव्य असतं ज्यामुळे त्वचेला रंग येतो.
गोऱ्या रंगाच्या लोकांमध्ये हे मेलॅनिन कमी प्रमाणात असतं तर सावळ्या रंगाच्या लोकांमध्ये जरा जास्त प्रमाणात. पण कधीकधी काय होतं, काही कारणामुळे त्वचेतलं हे मेलॅनिन एखाद्या ठिकाणीच जास्त प्रमाणात तयार होतं, उदाहरणार्थ डोळ्यांच्या खाली, गालावर, कपाळावर..
आणि तो भाग आपल्या चेहऱ्यावरच्या इतर त्वचेच्या तुलनेत जास्त काळा दिसतो. याला ‘हायपरपिगमेंटेशन’ असं म्हणतात.
यामुळे चेहऱ्यावर वेगवेगळ्या जागी काळे डाग पडतात आणि त्वचा दिसायला सुद्धा निस्तेज दिसायला लागते.
चेहऱ्यावर असं काही झालं की बऱ्याचदा आत्मविश्वास गेल्यासारखा वाटतो, बाहेर जाणं, लोकांना भेटणं नकोसं व्हायला लागतं आणि यामुळे आपल्या एकूण व्यक्तिमत्वावरच परिणाम होतो.
हे मेलॅनिन प्रॉडक्शन कमी करता येतं का?
आपल्या त्वचेत किती मेलॅनिन तयार होणार आहे आणि त्यानुसार आपला रंग कसा असणार आहे ही माहिती आपल्या जनुकांमध्ये असते त्यामुळे मेलॅनिन कमी करून, किंवा वाढवून गोरं किंवा काळं होता येत नाही पण, जर हायपरपिगमेंटेशन, म्हणजे इतर भागांच्या तुलनेत एकाच भागात जास्त मेलॅनिन तयार होत असेल तर मात्र ते कमी करता येतं.
काळं किंवा गोरं असणं यावर स्वतःची किंमत न ठरवता आपल्यातला ‘आत्मविश्वास’ आपली चमक वाढवेल हे ध्यानात घेतलेलं कधीही चांगलं.
मेलॅनिन असं ठराविक भागातच तयार होण्यामागे बरीच कारणं असतात, जास्त वेळ उन्हात थांबणे, स्ट्रेस, हार्मोनल इम्बॅलन्स, वाढतं वय इत्यादी.
असं होऊन हायपरपिगमेंटेशन होऊ नये यासाठी आपण कोणती काळजी घेऊ शकतो?
१. जास्त वेळ उन्हात जाणं टाळावं, शक्यतो १० ते ३ जेव्हा उन्हाची तीव्रता खूप जास्त असते.
२. बाहेर जाण्याला काहीच पर्याय नसेल तर सनस्क्रीन, लांब बाह्यांचे कपडे, गॉगल घालून बाहेर पडावं जेणेकरून कमीतकमी ऊन लागेल.
मेलॅनिनच प्रॉडक्शन कमी करून, हायपरपिगमेंटेशन म्हणजेच काळ्या डागांपासून सुटका मिळवायचे उपाय म्हणजे लेझर थेरपी किंवा बाजारात मिळणारी (काही) क्रीम्स ही आहेतच पण यासाठी बराच वेळ जातो, खर्च होतो आणि काही प्रमाणात याचे विपरीत परिणाम (साईड इफेक्ट्स) सुद्धा दिसून येतात.
काही ओव्हर द काऊंटर, म्हणजेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकत घेता येणारी क्रीम्स असतात.
कधी त्यांचा उपयोग होतो तर कधी नाही पण यापेक्षा सुद्धा सरळ, साधे आणि मुख्य म्हणजे कोणतेच विपरीत परिणाम नसलेले घरगुती उपाय या डागांवर हमखास लागू पडतात.
असे कोणते घरगुती उपाय आहेत ज्याने आपण चेहऱ्यावरचे काळे डाग कमी करू शकतो याबद्दल पुढे वाचा.
१. पपई
पपईमध्ये असलेल्या पपेन नावाच्या एन्झाईममुळे, डेड स्किन सेल्स त्वचेवरून जाऊन नवीन स्किन सेल्स तयार होतात त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो आणि काळे डाग कमी होतात.
पिकलेल्या पपईचा गर काढून चेहऱ्यावर थोडावेळ लावून ठेऊन मग चेहरा थंड पाण्याने पुसून कोरडा करायचा. असं आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्याने सुद्धा छान फरक पडेल.
२. टरबूज (मस्क मेलन)
टरबूजाच्या गराने टॅन झालेली, म्हणजे उन्हात जाऊन-
जाऊन काळपट पडलेली त्वचा निघून जाते. जर सतत उन्हात जाणं होत असेल तर आठवड्यातून एकदोनदा रात्री टरबूजाचा गर चेहऱ्यावर थोडावेळ लावून ठेवून मग चेहरा धुवून घ्यायचा, असं दोन ते तीन वेळा केल्यावर सुद्धा उन्हामुळे आलेले काळपट डाग जातील आणि लगेच फरक जाणवेल.
३. ताक
ताकामध्ये लॅक्टिक ऍसिड असतं जे त्वचेसाठी लाभदायक असतं. यामुळे त्वचेवरचं अतिरिक्त मेलॅनिन प्रोडक्शन तर कमी होतंच शिवाय त्वचेला छान चकाकी येते.
चेहऱ्यावर ताकाचा हात लावून रोज थोडावेळ मसाज केला तर काहीच दिवसात चेहऱ्यावरचे काळे डाग गायब होतील.
४. दूध आणि गाजर
गाजरातल्या बिटा कॅरोटीनमुळे चेहऱ्यावरचे काळे डाग तर कमी होतातच शिवाय त्वचा घट्ट राहायला सुद्धा मदत होते.
दुधामुळे त्वचेचा पोत सुधारतो. गाजर किसून घेऊन त्यात थोडं दूध घालून त्याची पेस्ट करून रोज रात्री चेहऱ्याला लावून, आपलीच बोटं गोल-गोल फिरवत सगळीकडून मसाज करून घ्यायचा.
असं रोज केलं तर आठवडाभरात फरक जाणवायला सुरुवात होईल.
५. हळद
हळद एरवी सुद्धा औषधी असते. त्वचा उजळण्यासाठी हळदीचा उपयोग आपल्याकडे फार पूर्वीपासून केला जातो.
थोड्याशा चणा डाळीच्या पिठात हळद घालून त्याची पाण्यात किंवा दुधात कालवून पेस्ट करून चेहऱ्यावर दहा मिनिटं लावून, नंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुतला तर त्वचा उजळते, काळे डाग कमी होतात.
६. चंदन
चंदनामुळे त्वचा उजळते हे सर्वश्रुत आहे. चंदन पावडर एक चमचा आणि लिंबू आणि टोमॅटोचा रस एक चमचा अशी पेस्ट करून चेहऱ्याला दहा मिनिटं लावून ठेवायची.
चंदनामुळे काळे डाग तर जातातच पण त्याचबरोबर चेहऱ्यावरचे इतर जुने डाग, पिंपल्स सुद्धा गायब होतात.
लिंबात असलेल्या व्हिटॅमिन ‘सी’ मुळे हायपरपिगमेंटेशन कमी व्हायला मदत होते. असा चंदन, लिंबू व टोमॅटोचा लेप करून नियमितपणे चेहऱ्याला लावला तर त्वचा एकसारखी उजळायला मदत होते.
७. कोरफड
रोज रात्री झोपताना कोरफडीचा गर चेहऱ्याला लावला तर चेहऱ्यावरचे उन्हामुळे आलेले काळे डाग जायला मदत होते आणि सगळ्या त्वचेचा रंग एकसारखा होतो.
बाजारात मिळणारी एलो वेरा जेलचा सुद्धा उपयोग होऊ शकतो. उन्हातून आल्यावर कधीकधी त्वचेची जळजळ होते तेव्हा सुद्धा कोरफडीचा गर लावल्याने आराम मिळतो.
८. लिंबाचा रस
लिंबात असलेल्या व्हिटॅमिन ‘सी’ मुळे चेहऱ्यावरचं हायपरपिगमेंटेशन कमी होऊन चेहऱ्याची त्वचा उजळते.
दिवसातून एकदा चेहऱ्यावर लिंबाचा रस नुसता लावला तरी याचा परिणाम दिसायला लागतो. काहींची त्वचा एकदम नाजूक आणि पातळ असते, अशांसाठी मात्र हा उपाय थोडा त्रासदायक असू शकतो.
लिंबाच्या रसाने चेहऱ्याची आग व्हायची शक्यता असते, त्यामुळे सुरुवातीला लिंबाचा रस थोड्या साध्या पाण्यात घालून घेऊन, अंदाज घेत लावावा.
याचबरोबर, बाहेरून किंवा उन्हातून आल्यावर आपली त्वचा नाजूक झालेली असते त्यामुळे अशा वेळेस लगेच लिंबाचा रस लावणे टाळावे कारण त्याने आग होऊ शकते.
९. ग्रीन टी
ग्रीन टीचे खूप फायदे आहेत, हा त्यातलाच एक.
रोज एक कप ग्रीन टी नियमितपणे घेतला तर डिटॉक्सिफिकेशन होतं. यामुळे हळूहळू सगळ्याच तक्रारी दूर होतात त्यात त्वचेची सुद्धा होते.
हायपरपिगमेंटेशन प्रभावीपणे घालवण्यासाठीचा हा एक हमखास उपाय आहे.
हे घरगुती उपाय करताना एक लक्षात ठेवलं पाहिजे की सगळ्यांनाच सगळ्या उपायांचा एकसारखा फायदा होईल असं नाही.
प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार जसा वेगळा असतो तसंच हायपरपिगमेंटेशन होण्यामागचं कारण सुद्धा वेगळं असतं त्यामुळे या उपायांपेकी आपल्याला कोणता उपाय सूट होतोय याचा आढावा घेऊन तो करावा.
दुसरी गोष्ट अशी की कोणतेही घरगुती उपाय करताना सातत्य सगळ्यात महत्वाचं असतं, आज लेप लावला आणि उद्या काळे डाग गेले असं होणार नाही हे लक्षात ठेऊन, रोज दिवसातून स्वतःसाठी दहा पंधरा मिनिटं काढून हे उपाय करत राहायचे.
याचा फरक जरी हळूहळू दिसत असला, तरी तो दिसणार हे नक्की शिवाय याचे काही दुष्परिणाम सुद्धा नसल्याने आपण खूप दिवस वेगवेगळे उपाय करून बघू शकतो. एखादवेळेस एखाद्या उपायाचा फायदा झाला नाही तर तोटा नक्कीच होणार नाही.
या घरगुती उपायांचा तुम्हाला फायदा झाला कि नाही हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की कळवा आणि हे उपाय तुमच्या जिवालगांबरोबर सुद्धा शेयर करायला विसरू नका.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.