‘इम्प्रेसिव्ह’ म्हणजेच ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या’ या ९ सवयी तुमच्यात आहेत का?

लोकांना ‘इम्प्रेस’ करायचं आहे? लोकांच्या मनात स्थान निर्माण करायचं आहे? मग हे गुण तुमच्यात आहेत का? ‘इम्प्रेसिव्ह’ असण्याच्या या कसोटीत ९ पैकी तुमचा स्कोअर काय?

कधी तुमच्या बाबतीत असं झालं आहे का, की कोणालातरी तुम्ही अगदी थोड्या वेळासाठी भेटला आहात पण ती व्यक्ती तुमच्या एकदमच लक्षात राहिली आहे..

म्हणजे बघा एखाद्या मैत्रिणीच्या मैत्रिणीला किंवा मित्राच्या भावाला, म्हणजे ज्यांच्याशी तुमचा थेट संबंध यायचं तसं काही कारण नाही, अशांना कधी काही निमित्ताने भेटला आहात आणि थोड्या वेळातच त्या व्यक्तीच्या वागणुकीमुळे म्हणा किंवा स्वभावामुळे किंवा बोलण्यामुळे तुमच्या ती एकदम लक्षात राहिली आहे?

हे वाचल्यानंतर नक्कीच अशी बरीचशी माणसं तुमच्या डोळ्यांसमोर आली असतील, हो ना?

कदाचित त्यांच्या पैकी काहींशी आता तुमची मैत्री असेल, घरगुती संबंध सुद्धा असतील तर काहींशी नंतर कधी संपर्क आला देखील नसेल.

पण तरीही ती व्यक्ती मात्र तुमच्या मनातून गेली नसणार. एखादं स्थळ, एखादी घटना किंवा तशीच एखादी दुसरी व्यक्ती तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण करून देत असणार.

असं नेमकं का होतं?

काही लोकांमध्ये असे काही गुणच असतात, की ज्यामुळे ते अगदी पटकन समोरच्याला आवडून जातात आणि फक्त आवडतंच नाहीत, तर कायम आठवणीत राहतात.

अशा लोकांबद्दल सगळे सतत चांगलंच बोलत असतात आणि त्यांच्या सहवासात राहण्यासाठी सुद्धा प्रयत्नशील असतात.

मग कधी तुम्हाला असा प्रश्न पडतो का की आपल्याबाबतीत असं होत असेल का? आपण कोणाच्या लक्षात राहत असू का?

या जगाच्या पाठीवर अमुक एक जागा किंवा गोष्ट बघितली की कोणालातरी माझी आठवण येत असेल का?

आणि असं खरंच होत असेल तर ती आपल्यासाठी आनंदाचीच गोष्ट असेल ना?

आणि कदाचित जर असं होत नसेल तर तसं झालेलं आपल्याला आवडेलच ना?

मग स्वभावातल्या अशा नेमक्या कोणत्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपण पटकन समोरच्याला आवडून जातो आणि त्यांच्या मनात उतरतो?

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, म्हटलं तर या गोष्टी अगदी सोप्या आहेत, तुम्ही आम्ही सहज आत्मसात करू शकू अशा. फक्त त्यासाठी नवीन गोष्टी शिकून, त्या आचरणात आणून स्वतःमध्ये थोडेसे बदल करून घ्यायची तयारी हवी.

आपण आपलं व्यक्तिमत्व सुधरवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतच असतो, हा देखील त्याचाच एक भाग आहे कारण आपलं व्यक्तिमत्व भारदस्त असेल तरंच आपण समोरच्याच्या लक्षात राहू, नाही का?

आजच्या या लेखाचा हेतू हाच आहे की तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणं की ज्या वाचून, त्यानुसार स्वतःमध्ये बदल करून, काही जुन्या सवयी सोडून, काही नवीन सवयी लावून घेऊन तुमचं व्यक्तिमत्व सुधारू शकता.

जेणेकरून लोकांना तुमचा सहवास हवाहवासा वाटेल, तुम्ही नेहमी त्यांच्या आठवणीत राहाल आणि तुमच्याबद्दल त्यांच्याकडून चांगलंच बोललं जाईल..

१. लोकांना मदत करा पण लोकांकडून अपेक्षा करू नका : 

खरं सांगा, जेव्हा आपण एखाद्याला मदत करतो तेव्हा मनाच्या आत कुठेतरी आपल्याला त्या मदतीची जाणीव ठेवायची असते.

वरवर आपण तसं दाखवलं नाही तरी आपण ती मदत केली होती, हे आपण आपल्यापुरतं का होईना पण आठवणीत ठेवतो आणि जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपण त्या व्यक्तीकडून मदतीची मनातल्या मनात तरी अपेक्षा ठेवतोच.

आणि ही आपल्याला अपेक्षित असलेली मदत समोरून आली नाही की खट्टू होतो आणि पुढच्या वेळेला कोणाला मदत करताना दहा वेळा विचार करतो.

पण जर आपण नुसतं म्हणण्यापुरतं नाही तर खरंचच परतफेडीची अपेक्षा न ठेवता एखाद्याची मदत केली तर लोकांच्या आपण नक्कीच लक्षात राहू.

नेहमी मदत करणारी/करणारा म्हणून आपण जर कोणाच्या लक्षात राहत असू तर आपल्यासाठी ही नक्कीच एक आनंदाची गोष्ट असेल.. म्हणून लोकांना मदत करत राहा.

आणि यामुळे तुमच्यामध्ये सुद्धा स्वतः बद्दल आत्मविश्वास, प्राबल्याची भावना म्हणजेच ‘Superiority Complex’ तयार होईल. आणि मत्रांनो, विश्वास ठेवा हि भावना अगदी ‘भारी’ 👌 असते.

२. स्वतःच्या चुकांना मान्य करा आणि त्या हसण्यावारी न्यायची तयारी ठेवा :

आपल्याला असं वाटलं, की आपण जर परफेक्ट असू तर लोकांच्या लक्षात राहू कारण परिपूर्ण असणं या गोष्टीला आपल्यात अवास्तव महत्व दिलं आहे.

याचप्रमाणे एखादी गोष्ट आपल्याला जमत नसली किंवा करता येत नसली तरी आपल्याला तो आपला कमीपणा वाटतो आणि आपण ते लपवायला जातो.

यामुळे होतं काय की आपण एकतर आपल्या चुका मान्य करत नाही, दुसऱ्याने त्या दाखवल्या तरी नाकारतो आणि जर कधी मान्य केलीच तर आपल्याला तो अपराध असल्यासारखं वाटतं.

आणि आपण स्वतःला त्याबद्दल दोष देत बसतो. यामुळे काय होतं? तर आपण इतरांसाठी चेष्टेचा विषय ठरतो. याऊलट जर आपण स्वतःहून आपल्या चुका कबूल केल्या, आपल्याला एखादी गोष्ट येत नसली तर ती मान्य केली, तर त्यात आपल्याच मनाचा मोठेपणा दिसतो.

याहून सुद्धा पुढे जाऊन आपल्या किरकोळ चुकांवर आपणच एखादा विनोद करून हसलो.. तर ज्याचं नाव ते.. ‘हसरी, मजेशीर, मोकळ्या मनाची व्यक्ती’ म्हणून आपण समोरच्याच्या लक्षात नाही राहिलो तरच नवल!!

३. दुसऱ्यांना बोलू द्या

लोकांना ‘इम्प्रेस’ करायच्या नादात आपण त्यांच्याशी बोलताना बऱ्याचदा आपलीच टेप लावतो.

आपण काय काय केलं, कसं केलं, आपल्याला आत्तापर्यन्त आयुष्यात काय मिळालं काय नाही, आयुष्यात इथवर पोहोचायला आपण किती खाचखळगे पार केले.

हे सांगत बसण्याच्या नादात आपण समोरच्याला बोलायला वावच देत नाही.

या पेक्षा जर आपल्याबद्दल थोडक्यात माहिती देऊन आपण समोरच्याला बोलतं करण्याचा प्रयत्न केला, त्यांना त्यांच्या आयुष्याबद्दल, त्यांच्या परिवाराबद्दल विचारलं तर त्यांना ते आवडेल.

काहीजणांना या निमित्ताने बोलायला मिळालं म्हणून बरं वाटेल तर काहींना तुमचा हा गपिष्ट स्वभाव भावेल..

त्यामुळे लोकांना खरंच ‘इम्प्रेस’ करायचं असेल, आपण त्यांच्या लक्षात राहू यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर त्यांना फक्त आपल्याबद्दलच न सांगता मोकळ्यामनाने त्यांच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायची तयारी दाखवा आणि बघा तुमचा हा गुण कसा सगळ्यांना भावतो ते!

४. स्वतःच्या मतांवर, निर्णयांवर ठाम राहा

असं किती वेळा झालं आहे की समोरचा म्हणतो म्हणून आपण आपले निर्णय बदलतो?

आपला एखादा निर्णय समोरच्याला पटण्यासारखा नसेल तर आपण त्याला आवडेल म्हणून आपल्या मनाविरुद्ध तो बदलतो.

यावेळी आपल्याला यातून काय अपेक्षित असतं, ‘की आपण समोरच्यासाठी आपल्या मनात नसतानाही अमुक केलं, त्यामुळे त्याला आपल्याबद्दल आदर वाटला पाहिजे किंवा त्याने ते लक्षात ठेवलं पाहिजे.’

बघा, इथेच तर आपण चुकतो! आपली एखादी गोष्ट समोरच्याला पटली नाही किंवा आवडली नाही म्हणून सोडून का द्यायची?

यापेक्षा आपण त्यांच्याशी नीट बोलून, आपली बाजू शांतपणे मांडून, त्यांना ती गोष्ट पटायलाच हवी असा आग्रह न धरता समजावून सांगायला हवी, न भांडता आपली भुमिका स्पष्ट करायला हवी.

तुम्ही जसे आहात तसेच राहणार आहात हे समोरच्याला कळलं तर त्याच्या मनातला तुमच्याबद्दलचा आदर नक्की वाढेल.

५. स्वतःच्या भावनांवर ताबा ठेवा

‘राग किंवा चिडचिड’ या अशा गोष्टी आहेत ज्याने आपण सगळ्यात जास्त स्वतःचंच नुकसान करून घेतो.

समोरचा कितीही चुकला, आपल्याला कितीही कमी-जास्त बोलला तरी त्यावर आपली जी प्रतिक्रिया असते तीच आपल्या स्वभावाची ओळख असते.

एकदा तोंडातून गेलेला शब्द परत घेता येत नाही. म्हणूनच कितीही राग आला तरी शांत राहणंच हिताचं असतं.

राग आल्यावर स्वतःला वेळ देणं सगळ्यात महत्वाचं आहे. एखाद्याचा राग आला तर त्या क्षणी त्याला नडायला न जाता स्वतःला वेळ देऊन, राग निवळू देऊन, काही तासांनी किंवा एका दिवसांनी त्या व्यक्तीशी बोलायला गेलं तर शांतपणे प्रश्न सुटू शकतो.

भावनांवर ताबा ठेवण्याची परिपक्वता तुमच्यात असेल तर समोरच्याला तुमच्याबद्दल आदर का वाटणार नाही? तुमच्या या गुणामुळे तुम्ही समोरच्याच्या मनात तुमचं स्थान पक्कं तर करालच शिवाय त्यांना सुद्धा तुमचा हा गुण आत्मसात करावासा वाटेल.

६. तुमच्या आवडीनिवडी, छंद जपा.. त्याबद्दल बोला

तुम्ही जर मनापासून एखादी गोष्ट करत असाल तर समोरच्याला तुमचं कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही.

तुमच्या आवडीनिवडीबद्दल समोरच्याला सांगून, त्याची त्याबद्दलची मतं जाणून घेऊन तुम्ही संवादाची नाळ जितकी भक्कम कराल तितके समोरच्याच्या जास्त लक्षात राहाल.

समजा तुम्हाला वेगवेगळ्या देशांची नाणी जमा करण्याचा छंद असेल आणि तुमच्या या छंदाबद्दल तुम्ही अगदी भरभरून बोलत असाल तर समोरच्याला ती गोष्ट नक्की लक्षात राहील आणि एखाद्या वेगळ्या देशाचं नाणं त्याला मिळालं तर तुमची आठवण हमखास येईल.

७. सगळ्यांशी आदराने वागा

दुसऱ्यांना कमी लेखणारे, तुसड्यासारखं वागवणारे काही लोक असतात.

त्यांना स्वतःबद्दल जितकं प्रेम असतं तितकीच दुसऱ्यांना पाण्यात बघायची सवय असते.

आपल्यापेक्षा कमी हुद्यावरच्या लोकांना किंवा हॉटेलमधल्या वेटरना सतत कमीपणाने वागवण्यात त्यांना धन्यता मिळते पण अशी लोक आपल्याला आवडतात का? कदाचित ही लोकं आपल्या लक्षात राहतील सुद्धा..  पण ते त्यांच्यातल्या या वाईट गुणांमुळे.

हेच जर तुम्ही सगळ्यांशी प्रेमाने, आपुलकीने वागलात, समोरच्याचा आदर केलात तर तुमचा हा गुण सगळ्यांना आवडेल आणि त्यांच्या मनातला तुमच्याबद्दलचा आदर वाढेल आणि एक चांगली, सुस्वभावी व्यक्ती म्हणून तुम्ही त्यांच्या नक्की लक्षात राहाल.

८. आत्मविश्वास जपा

ताठ मान, खांदे, स्थिर नजर, हसरा चेहरा असं असेल तर तुम्ही समोरच्याच्या नजरेत पटकन याल, नाही का?

तुमच्या या क्वालिटीजमुळे तुमच्याबद्दल त्यांना आदर वाटेल. वागण्याबोलण्यातल्या या आत्मविश्वासाने तुम्ही समोरच्याचं मन सहज जिंकून घेऊ शकता.

याबद्दल एक साधं उदाहरण द्यायचं ते आपण अनोळखी व्यक्तीशी बोलताना शेकहॅण्ड कसा करतो यावरून आपण त्याच्या लक्षात राहतो.

जर आपण अवघडून, कसाबसा अर्धामुर्धा हात त्याच्या हातात दिला तर त्याला आपल्यात आत्मविश्वास नाही हे लगेच समजतं याऊलट जर नजरेला नजर भिडवून, घट्ट हात मिळवला तर त्याला आपल्या आत्मविश्वासाची खात्री पटते आणि एक ‘कॉन्फिडन्ट’ व्यक्ती म्हणून आपण त्याच्या लक्षात राहतो.

किंवा काही लोकांना असा भारदस्त ‘शेकहँड’ करणं जमत नाही. अशा वेळी आत्मविश्वासाने केलेला नमस्कार सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

९. स्वतःच्या दिसण्याची काळजी घ्या

आपण कसे कपडे घालतो, केसांची रचना कशी ठेवतो यावरून समोरच्याच्या आपण नक्कीच लक्षात राहतो.

चांगलं दिसणं न दिसणं हे काही आपल्या हातात नसतं पण टापटीप राहणं मात्र असतं.

व्यवस्थित इस्त्रीचे कपडे, नीट विंचरलेले केस, बायकांना हलका मेकअप, पुरुषांची व्यवस्थित केलेली दाढी या बाह्य गोष्टी असल्या तरी महत्वाच्या असतात.

स्वतःच्या दिसण्याबद्दल जागरूक असलेली तरी त्याबद्दल अहंकार नसलेली लोकं इतरांना जास्त भावतात.

मित्रांनो आणि मैत्रिणींनो, या गोष्टी किती सोप्या आहेत ना?

आपल्या स्वतःवर थोडं काम करायची आपली तयारी असेल तर आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल नक्कीच घडवून आणू शकतो.

तुम्ही सुद्धा यातल्या मुद्यांकडे लक्ष देऊन, त्यानुसार तुमच्या वागण्या-बोलण्यात, राहणीमानात बदल करून तुमचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षित बनवून समोरच्याच्या मनात स्थान पटकावू शकता.

तुम्ही पाहिलेल्या अशा ‘लक्षात राहिलेल्या’ लोकांच्या आठवणी कमेंट्स मध्ये सांगा आणि लेख आपल्या मित्र मैत्रिणींना शेअर करा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

3 thoughts on “‘इम्प्रेसिव्ह’ म्हणजेच ‘प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या’ या ९ सवयी तुमच्यात आहेत का?”

  1. प्रभावी व्यक्तिमत्त्वाच्या’ सवयी बद्धल या लेखात माहिती दिली आहे ती फार महत्वाची व उपयुक्त आहे.
    व रोज सकाळी असं छान छान सकारत्मक खाद्य मेंदूला पुरवता त्या बद्दल मनाचे Talks टीम चे मनापासून धन्यवाद आणि या उपक्रमाला खुप साऱ्या शुभेच्छा

    Reply

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।