“तुझी मजल काय इथपर्यंतच..” असा टोमणा तुम्हाला कधी कोणी ऐकवला आहे का?
मग हा लेख नक्की वाचा आणि जाणून घ्या असा टोमणा वारंवार ऐकून यशस्वी झालेल्या चेतन भगतची गोष्ट.
मित्रांनो, चेतन भगत माहीत नसलेले आजकालच्या पिढीत कोणी सापडणे विरळाच.
त्यांची पुस्तके, त्यावरचे बॉलिवूडमधले सिनेमे आणि त्यांची मोटिव्हेशनल स्पीचेस यामुळे खासकरून तरुण वर्गात ते प्रचंड लोकप्रिय आहेत.
पण त्यांना आयुष्यात यश हे काही सहजासहजी मिळाले नाही बरं..
त्यांना त्यांच्या नातेवाईकांकडून काय काय टोमणे ऐकावे लागले होते आणि त्यातून बाहेर पडून ते आयुष्यात यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर कसे पोहोचले त्याची ही गोष्ट.
आपल्याकडे मार्कांना अवाजवी महत्व द्यायचे, कमी मार्क मिळणाऱ्यांना सतत घालून पाडून बोलायचे असे अगदी सर्रास चालते.
आपल्यापैकी सुद्धा किती जणांना मार्कांवरून किंवा एखाद्या विषयात कच्चे असण्यावरून असे टोमणे ऐकून घ्यावे लागले आहेत.
“तुमची योग्यताच नाही..” ते “निदान पास तरी हो…” पर्यंत… अनेक टोमण्यांचा आपण सामना केला असेल.
तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की IIT दिल्लीमधून इंजिनीअरिंग आणि IIM अहमदाबादमधून MBA केलेल्या चेतन भगत यांना पण एकेकाळी त्यांचे मनोधैर्य गळून पाडणाऱ्या या शेऱ्यांचा सामना करावा लागला होता…
चेतन भगत त्यांचा दहावीचा निकाल लागल्यावर जेव्हा घरी आले तेव्हा त्यांना दिसले की त्यांचे आईबाबा आणि काही नातेवाईक सुतकी चेहरा करून बसले होते कारण त्यांना मिळालेल्या 76 टक्क्यांवर ते खुश नव्हते.
त्यांना आता चेतन भगतना चांगले कॉलेज मिळणार नाही, चांगले शिक्षण घेता येणार नाही आणि त्यामुळे चांगली नोकरी मिळणार नाही आणि एकंदरीत आयुष्यात अपयश मिळेल अशी भीती वाटत होती.
यावर त्यांना वयाच्या फक्त पंधराव्या वर्षी त्यांच्या मामाकडून पहिला टोमणा ऐकून घ्यावा लागला होता की जाऊदे, “तू आयुष्यात काहीनाकाही तरी करू शकशीलच..”
कोवळ्या वयातले चेतन भगत या वाक्याने दुखावले तर गेलेच पण त्याचबरोबर त्यांना वाटले की आयुष्यात काहीतरी मोठे केले पाहिजे.
या विचारासह चेतन त्यांच्या खोलीत गेले आणि डायरी उघडून त्यात त्यांचे भविष्याबद्दलचे नियोजन लिहू लागले.
मित्रांनो, त्यांनी काय लिहिले हे वाचून आता तुम्हाला हसू येईल.
त्या काळात टेलिफोन बूथ्सना खूप महत्व होतं. चेतनना वाटले की काही नाही तर, आपण निदान एक असे बूथ उघडू शकू आणि कालांतराने पैसे साठवून, मेहनत करून अशी तीन अजून बूथ्स सुरु करून आरामात पैसे कमावू शकू!
हा त्यांचा प्लॅन जेव्हा त्यांनी घरातल्यांना सांगितला तेव्हा त्यांच्या मामाने त्यांना परत टोमणा मारत म्हटले, “बेटा चेतन, इतके तर तू करू शकशीलच.”
हा टोमणा चेतनना खूप खटकला. ‘त्यांना तू इतकेच करू शकतोस, यापेक्षा जास्त नाही.. तुझी योग्यताच तेवढी आहे’ हा त्या टोमण्यातल्या मतितार्थ समजला
आणि त्यांच्या लक्षात आले की नाही, आपल्याला यापेक्षा सुद्धा मोठे काही करावे लागणार आहे..
आपली योग्यता आपणच ठरवायची आहे..
लोकांना जी आपली योग्यता वाटते ती ओलांडून आपण काहीतरी मोठे करायचे आहे.
हे त्यांनी पक्के ठरवले. यानंतरच त्यांनी IIT साठी तयारी करायची असे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी दिवस रात्र एक करून अभ्यास सुरु केला.
यथावकाश त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी भारतातल्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दाखवला.
यानंतर सुद्धा त्यांना चांगला अभ्यास करून चांगले मार्क मिळवून, उत्तम नोकरी मिळवण्याचे सल्ले दिले गेले.
तशी मेहनत करून, पुढे IIM मधून MBA करून उच्च पदाची नोकरी हाँगकाँगमध्ये एका बँकेत मिळवली सुद्धा.
याच वेळेला त्यांच्या लक्षात आले की आपल्या योग्यतेच्या बाहेर असे आयुष्यात काहीच नसते..
म्हणूनच ते त्यांच्या वेगवेगळ्या लेखांमधून आणि भाषणांमधून एक वाक्य आवर्जून सांगतात,
“आयुष्यात जोपर्यंत तुम्ही तुमच्या योग्यतेच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत तुम्ही. यशस्वी होत नाही.”
मित्रांनो, आपली योग्यता काय आहे हे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर आपणच ठरवायचे असते आणि सतत ती पार करण्यासाठी प्रयत्न करायचे असतात.
आपल्या योग्यतेच्या पलीकडची स्वप्ने आपण बघायची असतात..
कारण स्वप्न बघायला तर कोणत्या मर्यादा नसतात, हो ना?
असाच विचार करत चेतन यांनी हाँगकाँगमध्ये नोकरी करत असताना आपले पहिले पुस्तक ‘5 point someone’ लिहायला घेतले जे २००४ मध्ये प्रकाशित झाले आणि लगेच ‘बेस्ट सेलर’ सुद्धा झाले.
२०१० मध्ये यावर 3 इडियट्स हा सिनेमा सुद्धा प्रकाशित झाला.
यानंतर मग ‘One night at the call centre’ (हॅलो), ‘3 mistakes of my life’ (काय पो चे), ‘2 states- The story of my Marriage’, ( 2 states), Half Girlfriend (Half Girlfriend) या कादंबऱ्या आणि त्यावर निघालेले सिनेमे सुपर-डूपर हिट सुद्धा झाले.
हे सिनेमे, What young India wants? हे त्यांचे २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक, त्यांनी केलेले स्तंभ लेखन आणि भाषणे यामुळे त्यांनी अल्प वेळात प्रचंड लोकप्रियता मिळवली.
इतकी की त्यांचे नाव २०१० मध्ये ‘जगातल्या १०० प्रभावशाली’ व्यक्तीनंमध्ये शामिल केले गेले होते!
मित्रांनो, जगाने घालून दिलेली आपली योग्यता पार करण्यासाठी चेतन भगत, यांनी त्यांच्या भाषणात।सांगितलेले तीन नियम काय आहेत ते बघा…
१. बेसिक प्लॅन असणे गरजेचे आहे
आयुष्यात आपल्याला काय हवे आहे, काय करायचे आहे यासाठी एक प्लॅन असणे आवश्यक आहे.
ते पूढे सांगतात की हा प्लॅन फक्त मनात असून उपयोग नाही तर तो कुठेतरी लिहून काढला पाहिजे.
लिहून काढल्याने आपल्याला नक्की काय हवे आहे याची आपल्याला स्वतःला कल्पना येते आणि त्याप्रमाणे आपण मेहनत करू शकतो.
२. प्लॅन अमलात आणण्यासाठी प्रयत्न
एकदा आपल्याला काय हवे हे समजले की तो प्लॅन अमलात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची एक पहिली पायरी सगळ्यात महत्वाची असते, ती म्हणजे ‘सुरुवात’.
आपल्याला काय हवे हे ठरवले की ते मिळवण्यासाठी मेहनत घ्यायची सुरुवात करून आपले प्रयत्न यश मिळेपर्यंत सुरु ठेवणे महत्वाचे आहे.
३. सातत्य हवे
एकदा आपण मेहनत घ्यायला सुरुवात केली की ती अविरत सुरूच ठेवायला हवी.
काही गोष्टी लगेच मिळत नाहीत, त्यासाठी खूप वर्षांची मेहनत असते. हीच गोष्ट लक्षात ठेऊन आपण आपले काम सुरु ठेवले पाहिजे.
याच तीन गोष्टी लक्षात ठेऊन आपण आपल्या योग्यतेच्या पलीकडे जाऊन यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करूया..
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
स्वतःला सिद्ध करण्यासाठी, स्वतःच भवितव्य घडवण्यासाठी चेतन भगत सर यांचे अनुभव (खुप सुरेख माहिती) मनाचे Talks टीम ने या लेखाच्या माध्यमातून सादर केली आहे ह्या बद्धल मनाचे Talks टीम चे मनापासून धन्यवाद आणि या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा.