आपण बायका घरात आणि बाहेर अनेक भूमिका पार पाडत असतो.
या भूमिका पार पाडताना आपण कधी आपल्यासाठी वेळ काढतो का हो? नाही ना?
मग, चला तर मैत्रीणिंनो आज शिकूया शरीर आणि मन ताजेतवाने ठेवण्यासाठीच्या काही सोप्या पण महत्वाच्या टिप्स.
गेल्या काही महिन्यांपासून आपण सगळेच एका तणावाखाली आहोत. लॉकडाउन सुरू आहे आणि शाळा नसल्याने मुलेही घरातच आहेत.
वयस्कर लोकांच्या फिरण्यावर बंधने असल्याने तेही घरातच आहेत. त्यामुळे घरातल्या सगळ्यांची मर्जी सांभाळताना त्या गृहिणीची मात्र तारांबळ होत आहे.
घरातील सगळ्यांच्या आवडी-निवडी सांभाळणे, त्यांची काळजी घेणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे, नवर्याचा डबा बनवणे, घरातील ज्येष्ठ लोकांच्या औषधपाण्याची-जेवणाची तयारी करणे याशिवाय घरातील स्वच्छता करणे आणि या सगळ्या रहाटगाडग्यात बायका स्वतःकडे कधी लक्षच देत नाहीत.
थोडसं जरी दुखलं-खुपलं तरी त्याकडे दुर्लक्ष करतात. मग करणे सांगू लागतात की व्यायामासाठी वेळ मिळत नाही, खूप काम असतं हो! सगळं मलाच करावं लागतं.
बरोबरच आहे, पण घरातल्या लोकांच्या पोषणाची जबाबदारी तुमच्याकडे आहे ना, मग तुम्ही त्यासाठी तुम्ही शारीरिक आणि मांनासिकरीत्त्या निरोगी आणि संतुलित असणं खूप गरजेचं आहे.
घरातील लोकांच्या जेवणाची जबाबदारी ज्या अन्नपूर्णेकडेकडे आहे तिला संतुलित आहार मिळतो का?
याचा विचार घरातील लोक नाही तर तुम्ही महिलांनी स्वतः केला पाहिजे. आपण बायका जेव्हा व्याधी खूप वाढतात तेव्हाच त्याच्याकडे गांभीर्याने पाहतो.
पण त्या होऊ नयेत यासाठी काही प्रयत्न करतो का?
याचे उत्तर ‘नाही’ असेच येईल. एका संशोधनात असे आढळून आले आहे की भारतीय स्त्रियांच्या शरीरात लोहाचे प्रमाण खूप कमी आहे.
त्यामुळे महिलांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
सध्या लॉकडाऊनमुळे पुरेसा वेळ महिलांना मिळाला आहे. त्याचा सदुपयोग करून घेतला पाहिजे.
पण त्यासाठी नेमकं काय करायचं? चला, जाणून घेऊयात मानसिक आणि शारीरिक संतुलांनासाठीचे हे सात राजमार्ग.
1) वैद्यकीय तपासणी करा आणि शारीरिक शारीरिक क्षमता वाढवा
आपण महिला कधीच आपल्या शरीरात असणार्या रक्ताची, त्यातील साखरेच्या प्रमाणाची, लोहाची वैद्यकीय चाचणी करत नाही.
कधीकधी खूप जबाबदार्या सांभाळताना थकवा येतो आणि त्याचा दुष्परिणाम शरीरावर दिसू लागतो.
घरच्या कामासोबतच नोकरीही करताना मानसिकरीत्त्या ताण येतो.
पण सध्या लॉकडाऊन ही नामी संधि महिलांना स्वतःकडे लक्ष देण्यासाठी मिळाली आहे. यावेळेत तुम्ही रुटीन वैद्यकीय तपासणी करून घ्या.
शरीरातील कॉलेस्ट्रॉल, किडनीचे, रक्तातील लोहाचे प्रमाण, थाईरोईड, हार्मोन्सचे प्रमाण तपासून घ्या. जर तुमचे वय 40च्या वर असेल आणि जर तुम्ही मोंनोपोजच्या जवळ आला असाल तर हार्मोन्सची चाचणी करून घ्या.
त्यामुळे डॉक्टर तुम्हाला हार्मोन संतुलित ठेवणारी योग्य ती औषधे सुचवतील.
अनेक स्त्रियांना मासिक पाळीच्या खूप तक्रारी असतात. ओटी पोटात दुखणे, पायाला गोळे येणे, खूप रक्तस्राव होणे या आणि अश्या खूप तक्रारी असतात की ज्यांचा सामना महिलांना करावं लागतो.
पण याकडे दुर्लक्ष न करता स्त्रीरोगतज्ञांना भेटून याविषयीची माहिती घेतली पाहिजे आणि त्यावर उपचारही.
2) सकाळी फिरायला जा
सकाळच्या ताज्या हवेत फिरून येणे खूप छान असते.
उगवता सूर्य, किलबिलणारे पक्षी, त्यांचे मंजूळ आवाज, ताजी हवा यामुळे मन आपसूकच उल्हसित होते.
त्यामुळे सकाळी चालायला जाणे खूप आरोग्यदायी आणि मनस्वी आनंद देणारे असते.
सकाळी मोकळ्या हवेत फिरण्याने मुबलक ऑक्सीजन आपल्याला मिळतो. दिवसभर आपण ताजेतवाने राहतो. कामाचा कंटाळा येत नाही.
‘चालणे’ हा कोणत्याही वयातील लोकांसाठी उत्तम आणि सहज होणारा व्यायाम आहे. सकाळी आणि संध्याकाळी तासभर चालण्याने शरीरातील हालचाली व्यवस्थित होतात. अनेक तक्रारी कमी होतात.
यामुळे तुम्हाला इतर कामांपसून थोडी विश्रांति मिळते आणि वेळही. त्यामुळे चालणे हा व्यायाम मनाला आणि शरीराला ऊर्जा देणारा आहे.
चालण्यासाठी महिलांनी सकाळचा तासभर वेळ राखून ठेवायलाच हवा. तुम्हाला एकट्याने फिरायचा कंटाळा येत असेल तर तुम्ही तुमच्या कॉलनी, गल्लीतील महिलांचा ग्रुप करून फिरायला जाऊ शकता.
आणि हो सध्या, सोशल डिस्टनसिंग आणि मास्क यांना विसरून तर चालणारच नाही…
3) संतुलित आहार घ्या
अनेक महिला सकाळच्या कामाच्या गडबडीत सकाळचा नाश्ता घेणे टाळतात. कामे तर संपत नाहीत आणि मग घरातील कामाचा पसरा आवरता आवरता दुपार कधी होते ते काळात नाही आणि जेवणाची वेळ टळून जाते.
मग भुकही निघून जाते आणि मग काहीतरी जंक फूड किंवा भात-आमटी पोटात ढकलली जाते.
मैत्रीणिंनो, हे योग्य नाही. आपल्या शरीराची काळजी आपणच घेतली पाहिजे.
यासाठी वेळेत आणि सकस अन्न खाणे आवश्यक आहे. त्यासाठी सकाळचा नाश्ता 9 वाजेपर्यंत घेणे, दुपारचे जेवण 1 ते 2 या वेळेत खाणे, संध्याकाळी 8 च्या आत जेवण घेणे अश्या सवयी स्वतःला लावून घ्या.
वेळेवर न जेवल्याने शरीरात आम्लपित्त, डोकेदुखी, अपचन, पोटाच्या इतर तक्रारी उद्भवतात.
जेवतानाही सकस आहार घेणे आवश्यक आहे. आपण काय खातोय? जे खातोय ते आपल्या शरीराला उपयुक्त आहे की नाही?
त्यातून आपल्याला आवश्यक ती प्रथिने, विटामिन्स मिळतात का?
याचीही माहिती घ्यायला हवी. कुटुंबासहित नोकरी आणि करियरचा राजमार्ग यशस्वी करायचा असेल तर शारीरिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी संतुलित आहार महत्वाचा आहे.
यासाठी जेवणात कडधान्ये, डाळी, उसळी, हिरव्या पालेभाज्या, फळे यांचा समावेश असला पाहिजे. दररोजच्या आहारात वरण-भात, भाजी-पोळी, दही, ताक याचा समावेश असावा. आनंदाने अन्नाचा आस्वाद घ्या.
4) यांत्रिक जगाशी संपर्क कमी करा
सध्याच्या युगात मोबाइल, टॅब, इंटरनेट, टेलीविजन, लॅपटॉप, संगणक अश्या यांत्रिक साधंनांचा अमाप वापर आपल्या आयुष्यात वाढला आहे.
सध्याच्या कोरोंना लॉकडाऊन मध्ये तर याला अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. सतत येणारे ईमेल, व्हाट्स अप वरचे मेसेजेस, इंटरनेट सर्फिंग या गोष्टी पाहताना बराच वेळ आपले डोळे आणि शरीर गुंतले जाते.
सतत स्क्रीनवर पाहत राहिल्याने डोळ्यांचा रेटिना कमी होऊ लागतो, मानसिक थकवा यायला लागतो.
या गोष्टी गरजेच्या आहेत, त्या आपल्या कामाचा भाग आहेत.
पण त्या किती वेळ हाताळायच्या याचे प्रमाण मात्र आपल्या हाती आहे. मी कित्येक महिला अश्या पहाते की सतत मोबाईलवर बोलत असतात, तासन्तास चॅटिंग करतात, इंटरनेटवर काहीतरी विडिओ पाहत बसतात.
या वस्तूंचा सुसाट वापर करताना आपण आपल्या मेंदूला, मनाला, शरीराला विश्रांतीची गरज आहे हे विसरूनच जातो.
पण हे टाळायला हवे. त्यासाठी एक उदाहरण देते. माझ्या मानसशास्त्रज्ञ असणार्या एका मैत्रिणीने भन्नाट कल्पना अमलात आणली आहे.
ती म्हणजे ‘इंटरनेट उपास’.आपण नेहमी आठवड्यातील एखादा वार कोणत्या न कोणत्या देवाचा उपास म्हणून करतो.
त्यावेळी आपण दिवसभर काहीही अरबट-चरबट खात नाही, लंघन करतो.
तसाच ‘इंटरनेट उपास’ करायचा. त्या दिवशी इंटरनेट, मोबाइल जास्त वापरायचा नाही. उपवासाला फक्त काही विशिष्ट पदार्थच आपण खातो… केळी, खजूर वगैरे!!
तसंच या ‘इंटरनेट उपवासाला’ आम्हाला म्हणजेच मनाचेTalks ला मात्र भेट द्यायची, सकारात्मकतेचे डोस घेण्यासाठी🙋♀️
ही कल्पना गमतीशीर आहे पण ती राबवल्यामुळे अनेकांना खूप फायदा झाला. तो दिवस घरकाम, बागकाम, मुलांशी खेळणे, कुटुंबियांसोबत फिरायला जाणे, आवडता सिनेमा पाहणे, छंद जोपासणे, निसर्गात रमणे यात घालवायचा.
अनेक लोकांनी याप्रमाणे उपास केला आणि त्यांना मानसिक ऊर्जा मिळाली.
जी त्यांना त्यांच्या कामासाठी उपयोगी पडली. अश्या रीतीने गृहिणी आणि नोकरदार महिलांनीही काहीकाळ यांत्रिक वस्तूंच्या वापरापासून सुट्टी घ्यायला हवी.
5) ध्यानधारणा करा, छंद जोपासा
नोकरीमुळे नेहमी बाह्य जगाशी आपला संबंध येतो. पण आपण आपल्याशी ‘संवाद’ साधत नाही.
त्यासाठी ध्यानधारणा करणे खूप आवश्यक आहे. ध्यान केल्याने मन एकाग्र होते, स्वतःतील गुणदोष जाणवू लागतात. त्यासाठी विपश्यना करा.
महिलांना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागते यासाठी ध्यान खूप महत्वाची भूमिका बाजवते.
कोणत्याही स्त्रीला कोणता न कोणता छंद असतोच. कोणाला मेहंदी छान काढता येते, तर कोणाला रांगोळी सुंदर काढता येते.
अभिनय, गीतगायन, कलाकासूरीच्या वस्तु बनवण्याचा छंद मनाला ऊर्जा देतो.
अनेक महिलांनी तर स्वतःच्या छंदाला व्यवसायचे स्वरूप दिले आहे. मासिके, पुस्तकांचे वाचन, छान गाणी ऐकणे यासाठी दररोजच्या कामातून, व्यापातून थोडा का होईना पण वेळ जरूर काढा.
त्यामुळे नक्कीच तुम्ही प्रत्येक दिवसाची मजा लुटू शकाल.
6) नाही म्हणायला शिका
बायकांनी एखाद्या कामला नाही म्हंटलं की लगेच लोकांना त्यांच्यातील अकार्यक्षमता दिसते. पण काही वेळा हे गरजेचं असतं.
बर्याच महिला नाही कसं म्हणायचं? म्हणून हरेक कामाला होकार देतता आणि नंतर पश्चाताप करत बसतात.
स्वतःची तब्येत बरी नसताना केवळ नवर्याची मर्जी राखावी म्हणून घरात पार्टीचे आयोजन असताना घरातील महिला जेवण बनवतात, तर कधी नोकरी टिकवण्यासाठी उशिरापर्यंत बॉसने सांगितल्यावर ऑफिसमध्ये थांबून राहतात. हे चुकीचे आहे.
काहीवेळा स्वतःच्या शरीरसाठी योग्य त्या प्रकारे नाही म्हणणे योग्यच असते.
मनात नसताना उगाच काम कराल तर त्याचा त्रास अधिकच होईल. त्यामुळे अशावेळी तुम्हाला काय वाटते? हे महत्वाचे असते.
लोकांचा विचार नंतर करा आधी स्वतःचा विचार करा आणि अनावश्यक कामाला नकार द्या.
7) साधे आणि सुटसुटीत आयुष्य जगायला शिका
माझ्या एका मैत्रिणीला कायम दुसर्याविषयी ईर्षा करायची सवय.
एखाद्या मैत्रिणीने पैठणी साडी घेतली की हिने ती आणलीच.
कोणी घरात एखादी नवीन वस्तु घेतली तर आपल्याही घरात एखादी नवीन वस्तु आणण्यासाठी तिची नाहक धडपड सुरू झालीच म्हणून समजा. पण यामुळे तिचाच तोटा झाला.
अनावश्यक पैसा खर्च झाला. कोणीतरी काहीतरी करताय म्हणून मीही ती गोष्ट करावी असा अट्टहास करू नका.
बर्याच स्त्रियांना अशी सवय असतेच, नाही का? त्यामुळे ही सवय बदला आणि साधी राहणी अवलंबवा. अनावश्यक खर्च टाळा, खरेदी टाळा.
ज्याचा उपयोग नाही अश्या वस्तु घेवू नका. याउलट तुम्हाला नको असणार्या, वापरत नसणार्या वस्तु दान करा, कमी किमतीत विका आणि घरातील अडगळ दूर करा.
आपला बराच वेळ स्वच्छतेत जातो त्यामुळे घरातील अनावश्यक भांडी, इतर वस्तु कमी करा. घर सुटसुटीत ठेवा.
8) प्रसंगानुरूप व्यक्त व्हायला शिका
आपण बायका जरा काही नोकरीत, घरात वाद झाला तर त्याचा राग मुलांवर, नवर्यावर, सहकार्यांवर, शेजर्यांवर काढतो.
राग येणे, चीडचीड होणे साहजिक आहे पण उगाच कोणत्याही लहान सहान कारणास्तव चिडचिड करणे योग्य नाही. बर्याचदा एखादा मुद्दा पटला नाही तर लगेच काहीतरी बोलून मोकळ्या होतो.
पण त्यामुळे मने दुखावली जातात आणि नंतर वाईट वाटते. त्यामुळे आपल्याला कधीकधी पटत नसणार्या गोष्टीविषयी लगेच प्रतिसाद द्यायची किंवा व्यक्त व्हायची घाई करू नका. विचार करून मगच बोला.
बर्याचदा घर आणि नोकरीमध्ये तणाव असतो पण त्याचा परिणाम नात्यांवर होत नाही ना? याची काळजी घ्या.
सध्या मुले घरात आहेत त्यामुळे अनेक गृहिणी मुलांवर रागावताना दिसतात पण त्यात त्यांची चूक नाही हे लक्षात घ्या. त्यासाठी परिस्थिति समजून घ्या, त्यानुसार वागा, आणि प्रतिक्रिया द्या. नाहक वितंडवाद घालू नका.
मैत्रीणिंनो, आपण खूप सहनशील आहोत महणून आपल्याला देवीचा दर्जा दिलाय. घराघरातील गृहलक्ष्मी आपणच आहोत. मग आपणच आपल्या मुलाबाळासाठी, घरासाठी मानसिक आणि शरीरिकरीत्या सक्षम असायला हवे ना?
मग हक्काने थोडं स्वतःकडेही लक्ष द्या, स्वतःला जपा, आनंदी रहा आणि तुमच्या सोबतीच्या लोकांनाही आनंदी बनवा.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
hello