त्वचेच्या अनेक समस्यांपैकी एक अतिशय त्रास देणारी समस्या म्हणजे तेलकट त्वचा.
कितीही चेहरा धुवा, पावडर लावा तरीही आपल्यापैकी काहीजणांना त्वचेच्या तेलकटपणाने हैराण केलेले असते.
तेलकट चेहऱ्यामुळे आपला आत्मविश्वास कमी होतो.
लोकांसमोर वावरताना सारखे अवघडून जायला होते, फोटो चांगले येत नाहीत पण याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर पिंपल्स (ऍक्ने) येतात आणि या पिंपल्स मधून काही इन्फेक्शन्स सुद्धा उत्भवू शकतात.
तेलकट त्वचेसाठी अनेक घरगुती उपाय आहेत पण त्याआधी आपण थोडक्यात बघू की त्वचा तेलकट नेमकी कशामुळे होते आणि त्यामध्ये हे ऍक्ने कसे होतात.
आपल्या त्वचेवर ‘सिबम’ नावाचा एक थर असतो.
खरेतर या थरामुळे आपल्या त्वचेला, त्यावर असलेल्या हेयर फॉलिकल्सला पोषण मिळते आणि त्वचेला आणि केसांना चकाकी मिळते.
पण काहीवेळा काहीजणांमध्ये या सिबमचे जास्त प्रमाणात उत्पादन होते.
यामुळे त्वचा तेलकट होते. तेलकट त्वचेवर धुळीचे कण चिकटून बसतात.
आपल्या त्वचेवर बारीक छिद्र असतात.
या जास्तीच्या सिबममुळे ती छिद्र बंद होतात. याचमुळे तिथे ऍक्ने होतात.
हे ऍक्ने एकदा झाले की त्यांच्यावर फार चिकाटी ठेऊन उपचार घ्यावे लागतात.
म्हणूनच, वेळीच सावध होणे गरजेचे आहे.
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि राहणीमानाच्या दृष्टीने सुद्धा आपली त्वचा छान आणि टवटवीत दिसली पाहिजे.
अशा अनेक समस्या असतात ज्यांच्यावरचे उपाय आपल्या घरातच कुठेतरी लपलेले असतात.
चेहऱ्याचा तेलकटपणा घालवायला सुद्धा असे अनेक सोपे उपाय आहेत.
यासाठी हा लेख वाचून झाल्यावर तुम्हाला फक्त तुमच्या स्वयंपाकघरात थोडी शोधाशोध करायची आहे आणि त्यानंतर नियमितपणे आणि मनापासून हे उपाय करून बघायचे आहेत.
१. चेहरा वारंवार धुवा
कोणताही उपाय करण्याआधी चेहरा धुणे महत्वाचे आहे. हे साधे काम आपण बऱ्याचदा करायला विसरतो.
ज्यांचा तेलकट चेहरा असतो त्यांना चेहरा वारंवार धुण्याने सुद्धा फरक जाणवू शकतो.
यासाठी कोणतेही महागडे फेसवॉश किंवा साबण नसले तरी चालतात.
दिवसातून चार वेळा साध्या थंड पाण्याने चेहरा धुवून सुती कापडाने टिपून घेत राहिल्याने चेहऱ्यावरचे तेल निघून जाते आणि त्यावर मग धुळीचे कण, प्रदूषणाचे कण चिकटून बसत नाहीत.
सकाळी आणि संध्याकाळी चेहरा धुतल्यावर चेहऱ्याला कापसाच्या बोळ्याने अलगद गुलाबजल लावल्याने चेहऱ्यावरचे तेल जाते आणि चेहरा उजळायला सुद्धा फायदा होतो.
समजा प्रवासात किंवा कोणत्या इतर ठिकाणी स्वच्छ पाणी मिळणार नसेल तर टिश्यू पेपरने चेहऱ्यावर जमा झालेले तेल टिपून घेतले तरी चालते.
२. मध
हाताच्या बोटांवर थोडा मध घेऊन चेहऱ्यावर सगळीकडे लावून ठेवावा.
दहा मिनिटांनी चेहऱ्यावरचा मधाचा थर कोरडा झाला की स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा.
मधामुळे चेहऱ्याला पोषण मिळते पण त्याचबरोबर तेलकटपणा दूर होतो.
मधाचा अजून एक महत्वाचा उपयोग हा आहे की मधामुळे चेहऱ्यावर बॅक्टरीयाची वाढ होत नाही.
त्याचमुळे तेलकट चेहऱ्याबरोबरच जर ऍक्नेचा सुद्धा त्रास असेल तर मधाचा फायदा होतो.
३. ओट्स स्क्रब
ओट्सचे आपल्या तब्येतीसाठी अनेक फायदे आहेत तसेच आपल्या त्वचेसाठी सुद्धा ओट्स उपयोगी आहेत.
ओट्स आणि पाणी मिक्सरमधून वाटून घेऊन त्याची पेस्ट करून ती चेहऱ्यावर स्क्रब प्रमाणे वापरली तर चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो आणि चेहऱ्यावरचे डेड स्किन सेल्स निघून जातात.
ओट्सची पेस्ट दह्यात किंवा पपईच्या गरात कालवून घरगुती फेसपॅक सुद्धा करता येते.
हे मिश्रण चेहऱ्यावर दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवायचे आणि सुकल्यावर स्वच्छ धुवायचे.
आठवड्यातून एकदा हा उपाय केला तर त्वचेचा तेलकटपणा, चिकचिक लगेच दूर होतो.
४. बदामाचा स्क्रब
बदामामुळे चेहऱ्यावरच्या डेड स्किन सेल्स, धुळीचे कण आणि इतर घाण निघून जाते.
बदाम चेहऱ्यावरचे जास्तीचे तेल सुद्धा शोषून घेते.
हा स्क्रब करण्यासाठी बदामाची थोडी भरड पूड करून घ्यायची आणि चमचाभर मधात कालवून चेहऱ्यावर बोटांनी अलगद चोळायची.
५. कोरफड
कोरफडीचे आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी अनेक फायदे आहेत.
चेहऱ्यावरचा तेलकटपणा घालवण्यासाठी सुद्धा कोरफड अतिशय उपयोगी आहे.
हा उपाय करायला सुद्धा एकदम सोपा आहे. कोरफडीच्या एका पानाचा गर काढून घेऊन रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावायचा.
आणि सकाळी उठल्यावर धुवून टाकायचा. हा उपाय करायला लागल्यापासून काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.
६. टोमॅटोचा स्क्रब
टोमॅटोमध्ये आढळणारे सालीसायक्लिक ऍसिड हे ऍक्ने दूर करायला मदत करते.
टोमॅटो मधले ऍसिड त्वचेवरचे जास्तीचे तेल शोषून घेते.
टोमॅटोचा स्क्रब करण्यासाठी टोमॅटोच्या गरात एक चमचा साखर कालवून घ्यायची.
हे मिश्रण चेहऱ्याला लावून, बोटे गोलाकार फिरवत अलगद मसाज करून घ्यावा आणि पाच ते दहा मिनिटांनंतर स्वच्छ पाण्याने धुवून चेहरा साफ करावा.
हा उपाय नियमितपणे केला तर चेहऱ्यावरचे ऍक्ने जातात आणि त्वचेचा तेलकटपणा सुद्धा कमी होतो.
७. मुलतानी माती
तेलकट चेहऱ्यासाठी फार पूर्वीपासून मुलतानी मातीचा वापर केला जातो.
यामुळे चेहऱ्यावरचे तेल शोषले जाते. मुलतानी मातीचा घरगुती फेस पॅक तयार करण्यासाठी दोन चमचे मुलतानी मातीमध्ये एक चमचा दही आणि दोन किंवा तीन थेंब लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
हा घरगुती फेसपॅक चेहरा स्वच्छ धुवून, कोरडा केल्यानंतर त्यावर लावून ठेवायचा आणि पूर्णपणे सुकला की थंड पाण्याने धुवून घ्यायचा.
८. मसूर डाळ
मसूर डाळीच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचा तेलकटपणा कमी होतो.
अर्धी वाटी मसूर डाळ रात्रभर बिजवून घ्यायची आणि त्यात थोडे दूध घालून सकाळी वाटायची. या मिश्रणाचा दोन प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो.
मसूर डाळ जर जाडसर वाटली तर ते स्क्रब प्रमाणे वापरता येते आणि जर एकदम बारीक वाटून मसूर डाळीची पेस्ट केली तर तिचा उपयोग फेसपॅक सारखा करता येतो.
हा फेसपॅक चेहऱ्यावर सगळीकडे समप्रमाणात पंधरा ते वीस मिनिटांसाठी लावून ठेवायचा आणि मग थंड पाण्याने चेहरा साफ करायचा.
आठवड्यातून एकदा मसूर डाळीचा स्क्रब किंवा फेसपॅक वापरल्याने तेलकटपणा कमी होण्यासाठी फायदा होतो.
९. कडुलिंब
कुडूलिंबाचा पाला चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्याचा तेलकटपणा कमी होतो.
तसेच कडुलिंब हे जंतुनाशक असल्याने चेहऱ्यावर ऍक्ने असतील तर ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते.
कडुलिंबाचा पाला थोडे पाणी घालून वाटून घ्यायचा आणि त्यात साधारण अर्धा चमचा हळद घालून नीट मिक्स करून घ्यायचे.
हा झाला घरच्याघरी तयार होणार फेसपॅक.
आता आठवड्यातून एकदा हा फेसपॅक चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावून ठेवायचा आणि मग चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा.
या कडुलिंबाच्या फेसपॅकच्या वापराने चेहऱ्यामध्ये लगेच फरक जाणवेल.
१०. बेसन
चार चमचे बेसन, दोन चमचे मध आणि दोन चमचे हळद हे गुलाब पाण्यात व्यवस्थित गाठी न होता कालवून घ्यावे.
हा लेप, म्हणजेच फेसपॅक चेहऱ्यावर समप्रमाणात लावून सुकेपर्यंत तसाच ठेवायचा.
फेसपॅक पूर्ण सुकला की चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा.
आठवड्यातून एकदा तरी हा फेसपॅक चेहऱ्याला लावावा. यामुळे चेहऱ्यावरचा तेलकटपणा लगेच कमी होतो.
टीप- फेसपॅक लावताना ब्रशचा वापर केला तर फेसपॅक सगळ्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावता येतो.
चेहरा तेलकट होण्याची अनेक कारणे असतात. उन्हाळयात घाम येऊन चेहरा जास्त तेलकट दिसायला लागतो पण काहींना हा त्रास अनुवांशिकच असतो किंवा हार्मोनल चेंजेसमुळे होतो.
आता हा त्रास जर अनुवांशिक असेल तर त्यावर फार उपचार घेता येत नाहीत पण या घरगुती उपायांच्या नियमित वापराने फरक नक्की जाणवतो.
या उपायांबरोबरच संतुलित आहार घेतला पाहिजे, जेवणात अति गोड आणि तळलेले पदार्थ टाळळे पाहिजेत.
तसेच नियमितपणे व्यायाम केला पाहिजे.
याचबरोबर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जी सौन्दर्य प्रसाधने वापरतो ती चांगल्या ब्रँडची आहेत का, ती ऑइल बेस्ज्ड आहेत का वॉटर बेस्ज्ड याची शहानिशा केली पाहिजे.
तेलकट चेहरा असलेल्यांनी शक्यतो वॉटर बेस्ज्ड सौन्दर्य प्रसाधने वापरली पाहिजेत.
तुमच्या लक्षात आलेच असेल की या घरगुती उपायांमुळे तुमच्या चेहऱ्यावर काही विपरीत परिणाम होणार नाही कारण यात सगळ्या नैसर्गिक गोष्टीच वापरायच्या आहेत.
त्यामुळे हे सोपे उपाय तुम्ही लगेच करून बघू शकता!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.