व्यायामाचे महत्व सगळीकडेच अधोरेखित केलेले आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा आहेच.
दिवसभरातून किमान अर्धा तास तरी वेळ काढून व्यायाम केला पाहिजे.
संतुलित आहार आणि योग्य व्यायाम म्हणजे आपल्या आरोग्याची गुरुकिल्लीच!
एकदा आपल्याला व्यायामाचे महत्व पटले आणि व्यायामाची गोडी लागली, की एक दिवस सुद्धा आपल्याकडून व्यायाम चुकवला जात नाही.
काहींना जिममध्ये जाऊन व्यायाम करायला आवडतो, काहींना एखादा खेळ खेळायला आवडतो, काहीजण पोहतात, काही योगासने घालतात…
कितीतरी व्यायाम प्रकार आहेत. पण तरीही अनेकांची तक्रार असते की आम्हाला जिमसाठी किंवा इतर कशासाठी वेळच मिळत नाही.
खरेतर दिवसभरातून स्वतःसाठी वेळ काढणे अत्यंत गरजेचे असते पण कधीकधी घर, काम, ऑफिस, प्रवास यामध्ये खरेच वेळ काढणे अवघड जाते.
पण म्हणून व्यायाम न करून चालेल का? नाही ना?
मग काय करायचे? तर सोपा चालण्याचा व्यायाम!
फक्त वेळ कमी असणाऱ्यांसाठीच नाही तर सगळ्यांच्याच आरोग्यासाठी या चालण्याच्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हा व्यायाम करायला आपण कोणालाच बांधील नसतो.
आपल्याला वेळ मिळेल तेव्हा, आपल्या सोयीनुसार आपल्याला तो दिवसभरात कधीही करता येतो.
आज आम्ही तुम्हाला चालण्याचे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे काही महत्वाचे फायदे सांगणार आहोत.
चला तर मग जाणून घेऊया निरोगी आयुष्यासाठी चालण्याचे फायदे.
१. रक्तपुरवठा सुधारते
चालण्यामुळे आपला हार्ट रेट वाढतो आणि त्यामुळे सगळ्या अवयवांना व्यवस्थित रक्तपुरवठा होतो.
म्हणजेच चालणे हा आपल्या सर्वांगाला होणारा व्यायाम आहे.
यामुळे आपल्या ह्रदयाची कार्यक्षमता सुद्धा वाढते.
ज्यांना हाय बीपी म्हणजेच हायपरटेन्शन किंवा उच्चरक्तदाबाचा त्रास आहे त्यांच्यासाठी चालणे हा एक उत्तम व्यायाम आहे.
दिवसातून केवळ अर्धा तास चालण्याने बीपी कमी होते.
२. ओस्टिओपोरोसिसचा त्रास कमी होतो
जसेजसे वय वाढत जाते तशी तशी कॅल्शियम या खनिजाच्या कमतरतेमुळे आपल्या शरीरातील हाडे कमकुवत होत जातात.
काहींमध्ये ही हाडे इतकी नाजूक होतात की किरकोळ पडण्याने सुद्धा फ्रॅक्चर होऊ शकते.
या आजाराला ऑस्टिओपोरोसिस म्हणतात. या आजारावर जरी काही औषध नसले तरी आपल्या जीवनशैलीत आणि आहारात बदल करून तो आटोक्यात ठेवता येतो.
चालणे हा असाच एक उत्तम मार्ग आहे, ऑस्टिओपोरोसिस आटोक्यात ठेऊन त्याचा त्रास कमी करण्यासाठी.
चालण्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते, यामुळे हाडांमधून कॅल्शिअमचे प्रमाण वेगाने कमी होत नाही.
मेनोपॉजनंतर स्त्रियांना ऑस्टिओपोरोसिसचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा स्त्रियांसाठी चालणे हा एक उत्तम व्यायामप्रकार आहे.
३. मूड चांगला होतो
चालण्याने आपल्या शरीरात एंडोर्फिन्स नावाचे हार्मोन्स प्रमाणात तयार होतात.
या हार्मोन्समुळे आपला मूड चांगला होतो.
म्हणूनच खूप राग आल्यावर किंवा वाईट वाटल्यास, मन दुखावले गेल्यास चालण्याचा व्यायाम केला तर ते आपल्या मानसिक आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर असते.
याचा अर्थ असा नाही की फक्त राग आल्यावर किंवा वाईट वाटल्यावरच चालण्याचा व्यायाम करायचा.
रोज, नियमितपणे चालण्याने शरीरात एंडोर्फिन्स जास्त प्रमाणात तयार होणे हे एरवी सुद्धा आपल्यासाठी फायदेशीरच असते.
४. वजन कमी होते
वजन कमी करायला खूप मोठे व्यायामप्रकार, महागडे जिम याची दरवेळेला गरज असतेच असे नाही.
रोज, न चुकता तीस मिनिटे वेगाने चालण्याने आपण २०० कॅलरी घटवू शकतो.
म्हणजेच चालणे हा वजन कमी करण्याच्या दृष्टीने सुद्धा एक महत्वाचा व्यायाम आहे.
याचा अजून एक फायदा म्हणजे यासाठी दिवसातून फक्त तीस ते पंचेचाळीस मिनिटे लागतात.
आणि आपल्या आरोग्याच्या हितासाठी आपण ती नक्कीच देऊ शकतो, हो ना?
५. मसल्ससाठी लाभदायक
हाडांच्या आरोग्यासाठी चालण्याचे फायदे आहेतच पण त्याचबरोबर चालण्याने आपल्या शरीरातील मसल्स टोन होण्यासाठी मदत होते.
चालण्याने विशेषतः पोटऱ्यांमधील मसल्स टोन होतात.
आणि आपल्या शरीरातले फॅटचे प्रमाण कमी होऊन मसल्सचे प्रमाण वाढते.
चालण्याचा व्यायाम करताना जर हात सुद्धा वर खाली केले तर दंडाचे मसल्स सुद्धा टोन होतात.
६. झोप चांगली लागते
नियमित व्यायामाने झोप चांगली लागण्यासाठी मदत होते.
चालणे सुद्धा असाच एक महत्वाचा व्यायामप्रकार आहे ज्याने शांत झोप लागते.
ज्यांना रात्री शांत झोप लागत नाही किंवा ज्यांची सलग झोप होत नाही अशांनी जर नियमितपणे चालण्याचा व्यायाम केला तर झोपेचे प्रमाण वाढते.
७. श्वासोच्छवास
वेगाने चालण्याने दम लागतो. निरोगी आयुष्यासाठी दम लागणारे व्यायामप्रकार करावेत.
यामुळे आपला श्वासोच्छवास सुधारतो, फुफुसांची कार्यक्षमता वाढते आणि यामुळे शरीरातल्या सगळ्या पेशींना व्यवस्थित प्राणवायूचा पुरवठा होतो.
८. अल्झायमर्सचा धोका कमी होतो
वयाच्या साधारण पासष्टव्य वर्षांपासून अल्झायमर्सचा धोका जास्त असतो.
नियमितपणे चालण्याचा व्यायाम केला तर आपले शारीरिक आरोग्य तर सुधारतेच पण त्याचबरोबर चालण्याचा व्यायाम मानसिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला निरोगी ठेवतो.
यामुळे अल्झायमर्स किंवा डिमेन्शिया अशा वाढत्या वयाबरोबर होणाऱ्या आजारांचा धोका कमी होतो.
आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हिताचे म्हणून तरुणपणापासून चालले पाहिजेच पण वयाच्या साठीनंतर आपल्या दिनचर्येत चालण्याचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.
९. सांधेदुखीपासून बचाव
आपल्या शरीरातील सांध्यांना रक्तपुरवठ्यातून पोषण मिळत नाही तर सांध्यात तयार होणाऱ्या वंगणामुळे मिळते.
जेव्हा या वंगणाचे प्रमाण कमी होते तेव्हा सांधेदुखी उतभवते.
पण नियमितपणे चालल्याने सांध्यांना या वंगणाचा व्यवस्थित पुरवठा होतो ज्यामुळे सांध्यांचे आरोग्य सुधारते आणि सांधेदुखी सारखे त्रास मागे लागत नाहीत.
१०. आयुष्य वाढते
चालण्याचे इतके फायदे आपण बघितलेच. चालण्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
म्हणूनच नियमितपणे चालण्याने आपले आयुष्य सुद्धा वाढते असे निदर्शनास आले आहे.
किती सोपा व्यायाम आहे ना हा चालण्याचा? रोज फक्त अर्धा तास चालण्याने आपल्या आरोग्यावर त्याचा इतका चांगला परिणाम होणार असेल तर दिवसातल्या चोवीस तासांमधील फक्त अर्धा ते पाऊण तास आपण आपल्या आरोग्यासाठी नक्कीच देऊ शकतो, नाही का?
मात्र हे चालणे आपण व्यायामाच्या दृष्टीने करतोय हे आपण लक्षात ठेऊन या अर्ध्या तासात वेगाने चालले पाहिजे.
दिवसभरात जर कामाच्या निमित्ताने सतत चालणे होत असेल तर त्यालाच व्यायाम समजणे हे योग्य नाही.
ह्या चालण्याच्या व्यायामाचा अजून एक महत्वाचा फायदा असा की त्यासाठी कोणती ठराविक वेळ लागते ना कोणते उपकरणे.
त्यामुळे आपल्या कामाच्या निमित्ताने बाहेर असताना, फिरतीवर असताना सुद्धा हा व्यायाम अगदी सहज करता येऊ शकतो.
कोणत्याही वयाच्या लोकांना चालणे वर्ज नाही हा चालण्याचा अजून एक मुख्य फायदा! म्हणूनच चांगले आरोग्य जपण्यासाठी लहानपणापासून चालण्याची सवय लावली पाहिजे.
हा लेख वाचून तुम्हाला चालण्याचे महत्व पटले म्हणूनच आता तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा लेख शेयर करा जेणेकरून त्यांचे सुद्धा आरोग्य सुधारेल!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Very nice & useful information given by manache talk