बऱ्याचदा झोपेतून उठल्यावर आपले समाधान होत नाही, दिवसभर सारखी झोप येत राहते, आळसावलेले वाटते अशावेळेला आपण म्हणतो की झोप लागली पण गाढ झोप लागत नाही.
तर काही वेळेला झोपेतून उठल्यावर आपल्याला एकदमच फ्रेश वाटते.
अशावेळेला आपण म्हणतो की, वाह! रात्रभर छान गाढ झोप झाली.
ही गाढ झोप म्हणजे शांत झोप हे तर आहेच.
पण असे झोपेचे किती प्रकार असतात?
गाढ झोप म्हणजे काय? ती कधी लागते आणि ती लागावी यासाठी काय उपाय करायचे हे सगळे आज आपण या लेखात बघणार आहोत.
झोपेचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात, (१) Rapid Eye Movement (REM) Sleep आणि (२) Non Rapid Eye Movement Sleep ज्यामध्ये अजून उपप्रकार असतात, N1, N2 आणि N3.
चांगली झोप लागणे म्हणजे काय?
आपली चांगली झोप झाली असे जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा आपल्या झोपेत आपण या दोन्ही स्टेज आणि या दोन्ही स्टेजच्या अंतर्गत येणाऱ्या स्टेजेस सुद्धा पार केलेल्या असतात.
या दोन्ही झोपेचे प्रकार कसे असतात आणि या झोपेच्या प्रकारात आपल्या मेंदूत नक्की काय होते हे आता आपण थोडक्यात बघूया.
हे सगळं किचकट का वाचायचं म्हणून सोडून देऊ नका.
हे वाचून हळूहळू चांगली झोप घेण्याचं तंत्र तुम्हाला नक्की जमायला लागेल.
१. Non Rapid Eye Movement Sleep
यामध्ये आपल्या डोळ्यांच्या हालचाली होत नाहीत.
N1 – आपल्याला नुकतीच झोप लागत असतानाची ही स्टेज. ही झोपेची स्टेज फार कमी वेळ, म्हणजे अगदी १० ते १५ मिनिटांपुरतीच असते.
या झोपेत असताना अगदी बारीक आवाज ऐकून सुद्धा आपल्याला जाग यायची शक्यता असते.
खरेतर, अशी जाग आल्यास आपल्याला झोप लागली होती हे सुद्धा काहीवेळा लक्षात येत नाही.
या सुरुवातीच्या झोपेत आपले शरीर झोपेसाठी स्वतःला तयार करत असते.
आपण हळूहळू शांत होत जातो, आपल्या शरीराचे स्नायू सगळे रिलॅक्स होतात, डोळ्यांच्या हालचाली मंदावतात, बीपी कमी होते आणि शरीराचे तापमान सुद्धा कमी होते.
N2 – ही आपल्या झोपेची नंतरची स्टेज किमान २० ते २५ मिनिटांची असते. यामध्ये सहजासहजी जाग यायची शक्यता कमी झालेली असते आणि आपले शरीर सुद्धा आधीपेक्षा जास्त रिलॅक्स होत असते. यामध्ये आपल्या डोळ्यांच्या हालचाली पूर्णपणे थांबलेल्या असतात.
N3 – ही आपल्या झोपेची सगळ्यात महत्वाची स्टेज. या स्टेजमधे आपल्याला गाढ झोप लागते. २० ते ४० मिनिटांच्या या झोपेच्या स्टेजमध्ये कोणी आपल्याला उठवायचा प्रयत्न केला तरी सहजासहजी जाग येत नाही.
या झोपेत आपल्याला आजूबाजूचे आवाज अजिबात ऐकू येत नाहीत.
आपण जरी आठ तास झोपलो पण आपल्या झोपेत ही N3 स्टेज आलीच नाही तर आपली झोप पूर्ण होत नाही.
यामुळे भरपूर तास झोपून सुद्धा आपण थकलेलोच असतो.
या झोपेतून आपल्याला कोणी जागे केलेच तर आजूबाजूला काय चालू आहे हे समजायला जरा वेळ लागतो.
या झोपेत आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते.
आपण या झोपेत असतो तेव्हा आपले बीपी अजून कमी होत जाते आणि आपण एकदम शांत होतो.
ज्या लोकांना झोपेत बोलण्याची किंवा चालण्याची सवय असते ते याच झोपेत असताना तसे करतात.
२. Rapid Eye Movement (REM) Sleep
ही झोपेची स्टेज यायला आधीच्या तिन्ही स्टेज पार कराव्या लागतात.
त्यामुळे ही झोप जेव्हा सुरु होते तेव्हा आपल्याला झोप लागून तास ते दीड तास होऊन गेलेले असतात.
या झोपेच्या प्रकारच्या नावावरूनच लक्षात येते की, ही झोप लागलेली असताना आपल्या डोळ्यांच्या हालचाली डोळे बंद असतानाच होत असतात.
या झोपेत आपल्या शरीराचे तापमान कमीच राहते पण बीपी मात्र वाढते.
आपल्याला स्वप्न पडतात ती आपण या झोपेत असताना.
झोपेचे हे चार प्रकार आपण बघितले.
आपली पूर्ण झोप व्हायला आपल्याला या चारही प्रकारच्या झोपेच्या प्रकारातून जावे लागते.
पण आपल्यापैकी अनेकांना काही कारणामुळे झोप लागत नाही किंवा झोप सुरुवातीला जरी लागली तरी मधेमधे जाग येत राहते.
झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर थकल्यासारखे वाटत राहते.
आणि कामात उत्साह वाटत नाही.
पूर्ण झोप होणे हे आपल्या एकूण आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार महत्वाचे आहे.
म्हणूनच आपण शांत झोप लागावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
हे प्रयत्न करायचे म्हणजे नक्की काय करायचे?
आपल्या या लेखाच्या पुढच्या भागात आपण हेच बघणार आहोत.
शांत झोप लागावी आणि मुख्य म्हणजे झोप पूर्ण व्हावी यासाठी या काही गोष्टी करता येतील.
१. नियमितपणे व्यायाम करा
व्यायामाने मनातले विचार शांत होतात.
बऱ्याचदा डोक्यात अनेक प्रकारचे विचार चालू असतात.
त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही.
त्यामुळे व्यायामाचा हा एक फायदा होतो.
व्यायामाचा दुसरा फायदा म्हणजे व्यायाम केल्याने आपल्याला दमायला होते.
या दमण्याने सुद्धा शांत झोप लागायला मदत होते.
त्यामुळे आपल्या दिनचर्येत व्यायामाचे महत्व ओळखून वेळेतच व्यायामाला सुरुवात केली पाहिजे.
२. गरम पाण्याची अंघोळ
झोपण्याच्या आधी शरीरातील उब वाढवली तर शांत झोप लागायला मदत होते.
आणि जास्त वेळासाठी शांत झोप लागते.
म्हणूनच झोपायच्या आधी गरम पाण्याने अंघोळ करणे हा उत्तम उपाय आहे.
तुम्ही थंड भागात राहत असाल तर एखाद्या जाडसर दुलईचा किंवा रजईचा सुद्धा फायदा होतो.
३. झोपेची वेळ ठरलेली असू द्या
आपल्या शरीराचे आपले एक स्वतःचे घड्याळ असते ज्याला बॉडी क्लॉक असे म्हणतात.
जर झोपायची, उठायची, जेवायची एक ठराविक वेळ नसेल तर गाढ आणि शांत झोप लागणे अवघड होऊन बसते.
त्यामुळे झोपायची एक निश्चित वेळ ठरवून घ्यायला हवी आणि त्याच वेळेला रोज रात्री खोलीतले लाईट बंद करून, मोबाईल बाजूला ठेऊन झोपायचा प्रयत्न केला पाहिजे.
समजा काही कारणाने एखाद्या दिवशी आपण उशिरा झोपलो, वेळेत झोपायला जमले नाही तरी उठायची वेळ ही बदलता कामा नये.
तसे केले तर झोपायची आणि उठायची साखळी तुटेल आणि ती परत बसे पर्यंत वेळ जाईल.
४. झोपताना मोबाईल, टीव्ही बघू नका
स्क्रीन टाईम वाढला की झोप कमी होते. म्हणूनच झोपायच्या आधी किमान अर्धा तास तरी मोबाईल न बघणे हा उत्तम पर्याय आहे.
बेडवर पडून सुद्धा झोप येत नसेल तर काय करायचे हे उपाय मागच्या एका लेखात सांगितले आहेतच पण झोप येत नाही म्हणून मोबाईल बघण्याचा पर्याय चुकून सुद्धा निवडू नये.
यामुळे झोप लागायला अजिबात मदत होत नाही उलट येत असलेली झोप जाते.
५. झोपण्यापूर्वी तासभर काही पिऊ नका
झोप लागत असताना जर वारंवार बाथरूमला जायची वेळ आली तर झोपेत विनाकारण व्यत्यय येतो.
एकदा मोडलेली झोप कित्येकदा परत लागत नाही. म्हणूनच झोपण्यापूर्वी तासभर जर काही प्यायले नाही, तर ही शक्यता कमी होऊन शांत झोप लागण्यासाठी मदत होऊ शकते.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.