शिक्षण, उच्चशिक्षण, नोकरी हे क्रमाक्रमाने प्रत्येकाच्या आयुष्यात चालूच असते.
चांगले शिक्षण घ्यायचे कारण त्यामुळे चांगली नोकरी मिळणार असते.
नोकरी मिळाली की, त्यात सुद्धा प्रगती करून बढती घ्यायची स्पर्धा असते.
मित्रांनो, हे असेच असते नाही का?
केवळ आपलेच नाही तर या जगातल्या प्रत्येक माणसाचे आयुष्य हे असेच असते.
पण याच ठरलेल्या साच्यातून आपले आयुष्य जगत असताना आपण काही गोष्टींचा विचार करत नाही, जसे की आपण करत असलेल्या कामातून आपल्याला खरेच समाधान मिळते का?
की आपण आपले करायचे म्हणून काम करत असतो?
खरेतर हा विचार आपण अत्यंत गांभीर्याने करायला हवा.
आता काहींना असे वाटू शकते की कामातून आनंद नाही मिळाला तरी पैसे मिळतात ना?
मग सगळ्यातूनच सगळे कसे आपल्या मनासारखे मिळेल? अगदी बरोबर आहे.
आयुष्यात काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतातच.
जर सगळे १०० टक्के आपल्या मनासारखे व्हावे अशी अपेक्षा असेल तर ती चूकच आहे.
पण मित्रांनो, जेव्हा आपण मनाविरुद्ध पाच गोष्टी करतो तेव्हा मनासारखी एकतरी गोष्ट घडली पाहिजे बरोबर ना?
आपल्या आवडीचे काम असेल तर साहजिकच आपली प्रगती जास्त झपाट्याने होत राहील आणि त्याचा आपल्या मनावर आणि एकूणच आयुष्यावर सकारात्मक परिणाम होईल.
आपल्या आयुष्यात जेवढा पैसा महत्वाचा असतो तेवढीच आपली तब्येत सुद्धा.
तब्येत जपण्यासाठी सतत स्ट्रेस घेऊन उपयोग नसतो म्हणूनच शेवटी आनंदी राहण्यासाठी, आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपल्याला आपल्या कामातून आनंद, समाधान मिळते का?
या गोष्टीचा आढावा घेणे गरजेचे आहे.
तुम्हाला तुमच्या कामातून आनंद, समाधान मिळत नसेल तर ते तुमच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने चांगले नाही.
तुम्ही तुमच्या नोकरीला किंवा कामाला काय देता आणि त्याबदल्यात (पैशांव्यतिरिक्त) तुमचे काम तुम्हाला काय देते, तुमच्यात कोणती सुधारणा घडवून आणते हे महत्वाचे आहे.
आता हे जाणून घ्यायला काय करायचे?
तीन सोपे प्रश्न आहेत, जे आपण स्वतःला विचारले तर आपल्याला सहज कळू शकते की आपल्या कामातून आपल्याला समाधान मिळते का नाही?
तयार आहात ना स्वतःला हे तीन प्रश्न विचारायला?
१. तुमच्या कामाला तुमचा फायदा होतो का?
तुम्हाला तुमच्या कामातून काय मिळते यापेक्षा सुद्धा महत्वाचे आहे की तुमच्या कामाला तुमच्याकडून काय मिळते?
तुमच्या कंपनीला तुमच्याकडून फायदा होतो का?
किंवा अगदी तुमच्या टीममध्ये तुम्ही आल्यापासून काही सुधारणा आहे का?
तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर खुश आहेत का?
मित्रांनो, जर तुम्ही मनापसून काम करत असाल तर या सगळ्या प्रश्नांचे उत्तर हो असेच असेल.
आणि तुम्ही मनापसून काम तेव्हाच कराल जर तुम्हाला त्यातून आनंद मिळत असेल.
या प्रश्नाचे उत्तर जर नाही असेल तर मात्र विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
हा फायदा काही टार्गेट्स सारखा मोजता येणारा नसतो आणि तसा कोणी मागत सुद्धा नाही.
पण ही स्वतःशी प्रामाणिक राहण्यासाठी करायची महत्वाची गोष्ट आहे.
२. तुम्हाला रोज काहीतरी नवे शिकायला मिळते का?
आपल्याला काल जे काम येत नव्हते ते आज येते का?
किंवा काल आपल्याला ज्या कामाबद्दल आत्मविश्वास वाटत नव्हता त्याच कामाबद्दल आज आपल्याला आत्मविश्वास वाटतो का?
आपल्या आयुष्यात या सेल्फ इम्प्रूव्हमेंटला फार महत्व आहे.
आपल्याला आपल्या कामाचा पैशांच्या रूपाने मोबदला मिळणे हे एवढेच उपयोगी नाही.
आपल्या कामातून रोज आपल्याला काहीतरी नवीन शिकता यायला हवे किंवा आपल्या मध्ये काहिना काहीतरी सुधारणा व्हायला हवी.
एकतर ही सुधारणा आपल्या कामाच्या पद्धतीत असेल, विचार करण्याच्या पद्धतीत असेल किंवा लोकांशी संवाद साधण्याची कला असेल..
अगदी लहानातली लहान गोष्ट सुद्धा असू शकते पण ती असली पाहिजे.
आपल्या कामात तोचतोपणा असेल, नवीन शिकण्यासाठी काहीच नसेल आणि आपल्यामध्ये कोणत्याच प्रकारची सुधारणा होत नसेल तर केवळ पैसे मिळतात म्हणून नोकरी करत राहायची का हा महत्वाचा प्रश्न आहे.
पैशांइतकाच आपला मानसिक विकास सुद्धा महत्वाचा असतो.
तो होत असेल तरंच आपल्याला आपल्या कामातून समाधान मिळेल अन्यथा काम म्हणजे फक्त पैसे मिळवण्यासाठीचा पर्याय होईल.
३. तुमच्या कामातून तुम्हाला आनंद मिळतो का?
कामातून दर वेळेस आनंद मिळेल असे नाही.
आणि तसे असणे अपेक्षित सुद्धा नाही कारण काम आणि मज्जा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
जर कामात सतत मजा शोधत राहिलो तर आपण त्याबद्दल गंभीर राहू शकतो का हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे.
पण कामातून आनंद मिळणे हे वेगळ्या अर्थाने सुद्धा आपण घेऊ शकतो. कसे ते बघूया.
आपण कामात असताना आपल्याला असे वाटते का की आयुष्यात हेच तर करायचे होते?
किंवा आपल्यावर सोपवलेली एखादी महत्वाची जवाबदारी आपण यशस्वीपणे पार पाडली तर त्याबद्दल आपल्याला विशेष आनंद होतो का?
म्हणजे केवळ दिलेले काम संपवले यापुरता आनंद मर्यादित न राहता आपल्याला त्यातून एकप्रकारचे सात्विक समाधान मिळते का?
हे दोन्ही प्रश्न या मुद्याबाबत अतिशय महत्वाचे आहेत.
रोज सकाळी उठल्यावर आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना कामाबद्दल प्रेम वाटते की?
तिथे जाताना आनंद होतो का? हे सुद्धा महत्वाचे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजेत.
कामातून आनंद घ्यायचा याचा अर्थ असा नाही की कामात काहीच टेन्शन असता काम नये.
कामात कोणतेच टेन्शन नसेल, प्रेशर नसेल तर आपली प्रगती होणार नाही.
त्यामुळे वरील दोन मुद्यांप्रमाणे कामातून शिकायला मिळायला हवे, तसे प्रयत्न आपण केले पाहिजेत आणि आपल्यामुळे आपल्या कंपनीची सुद्धा प्रगती व्हायला हवी.
यासाठी आपण कष्ट घेतले पाहिजेतच. पण हेच सगळे करताना आपल्याला एकप्रकारचे समाधान मिळाले पाहिजे.
मित्रांनो, तुम्ही करत असलेल्या कामात जर तुम्ही खुश असाल तर तुमची प्रगती अटळ आहे. याचबरोबर तुमच्या कामातून तुम्हाला आनंद मिळत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या एकंदरीत आयुष्यावर सुद्धा होत असतो.
तुम्ही आनंदी असाल तर तुमचे नातेसंबंध सुधारतात, तुमचे आरोग्य चांगले राहते आणि मनाने सुद्धा तुम्हाला नेहमी फ्रेश वाटते.
आपल्या आयुष्यात पैशांइतकेच आरोग्याला महत्व आहे हे वर म्हटलेच आहे. आपल्या नोकरीच्या ठिकाणी आपण दिवसातला सगळ्यात जास्त वेळ घालवत असतो म्हणूनच तिथून आपल्याला आनंद मिळतो का?
तिथे आपण खुश आहोत का? थोडक्यात आपण करत असलेली नोकरी आपल्यामध्ये चांगले बदल घडवून आणते का हे प्रश्न स्वतःला सतत विचारले पाहिजेत.
जर यापैकी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर नाही असे असेल तर मात्र आपल्याला विचार करायला हवा. आपल्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आपण असे काम शोधायचा प्रयत्न केला पाहिजे ज्यामुळे आपल्याला आनंद मिळतो.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
आपण आपले चरितार्थ चालवण्यासाठी जे
काही काम, उद्योगधंदा, नोकरी करतो त्यातुन खरोखर समाधान मिळते का, आनंद मिळतो का, आपल्या कामाचा परिणाम आपल्या बुद्धीवर, मनावर त्याचा कोणता परिणाम होतो सकारत्मक की नकारत्मक हे सर्वात महत्वच आहे आणि हे सर्व जाणून घेण्यासाठी आपण मनाचे talks मध्ये स्वतःला हे तीन प्रश्न विचारा आणि जाणून घ्या विषयी खूप छान कौशल्य सांगितलं आहे. खरोकर प्रामाणिकपणे स्वतःला हे प्रश्न विचारले तर नक्कीच आणि निश्चितच फायदा होईल.
मनाचे talks टीम चे मनापासून आभार.