काही जणांना प्रवास करताना पोटात कसेतरी होऊन, मळमळते आणि कधीकधी उलट्या सुद्धा होतात.
या त्रासाला गाडी लागणे असे म्हणतात. अर्थात ही काही सांगण्याची गोष्ट नाही, कारण हे सर्वांनाच माहीत असते..
पण, गाडी लागते म्हणजे नक्की काय होते?
या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायच्या आधी आपल्याला आपले शरीर बॅलन्स कसा राखते हे समजून घ्यायला हवे.
निसर्गाने आपल्या शरीराचे मेकॅनिझम कसे अजब बनवले आहे बघा…
आपल्या कानाचा आतला भाग हा आपल्या शरीराचा समतोल (बॅलन्स) राखण्याचे काम करत असतो.
म्हणजेच यामुळे आपण खाली, एखाद्या ठिकाणी न पडता, तोल न जाता उभे राहू शकतो किंवा चालू शकतो.
पण प्रवासादरम्यान असे होत नाही.
प्रवासात असताना आपण एका ठिकाणी बसून असतो पण तरी चालत्या गाडीबरोबर पुढे जात असतो.
यामुळे होते असे की आपल्या डोळ्यांना हलणारी चित्रे दिसत असतात पण शरीर मात्र एका ठिकाणीच असते.
असे झाल्याने आपल्या मेंदूला आपले डोळे आणि आपले कान हे वेगवेगळे संदेश पोहोचवत असतात.
याचा परिणाम म्हणजेच आपल्याला कसेतरी होऊन, उलटी सारखे वाटते किंवा उलटी होते देखील.
गाडी लागण्यालाच मोशन सिकनेस म्हणतात.
हा त्रास फक्त गाडीतच होतो असे नाही, कार, जहाज, ट्रेन आणि विमानात सुद्धा मोशन सिकनेसचा त्रास होऊ शकतो.
गाडी लागण्याचा त्रास होतो म्हणजे दरवेळेला उलट्याच होतात असे नाही.
कधीकधी गाडी लागायचा त्रास म्हणजे रेस्टलेस होणे, पेंग येणे, खूप प्रमाणात घाम येणे असेही होऊ शकतात.
कधीकधी थोडेसे मळमळत असतानाच अचानक त्रास वाढून उलट्या व्हायला सुरुवात होते.
खूप चढ उतार असणाऱ्या रस्त्यांवर किंवा खूप वळणदार रस्त्यांवर हा त्रास जास्त होतो.
सहसा पुरुषांपेक्षा बायकांना गाडी लागण्याचा त्रास जास्त प्रमाणात होतो.
लहान मुलांना देखील गाडी लागण्याचा त्रास होतो पण जसेजसे ते मोठे होतात तसा काही प्रमाणात तो त्रास कमी व्हायची शक्यता असते.
आम्ही वेगवेगळ्या समस्यांवर नेहमीच घरगुती उपाय सांगत असतो, जे करायला अगदी सहज आणि सोपे असतात.
या लेखात सुद्धा आज आपण या गाडी लागण्याच्या त्रासासाठी काही सोपे, पण परिणामकारक घरगुती उपाय बघणार आहोत.
१. आले
आल्यामुळे मळमळ कमी होऊन तोंडाला चव येते त्यामुळे प्रवासादरम्यान मळमळत असल्यास आल्याचा तुकडा चघळला तर उपयोग होतो.
नुसता आल्याचा तुकडा चघळायला नको वाटत असेल किंवा हा उपाय लहान मुलांसाठी करायचा असेल तर आल्याची वडी करून प्रवासात जवळ ठेवण्याचा एक चांगला पर्याय आहे.
२. लिंबू
लिंबाच्या वासाने उलटी, मळमळ लगेच थांबते त्यामुळे प्रवासात जर त्रास व्हायला लागला तर एक लिंबू अर्धे कापून त्याचा वास घेतल्याने लगेच आराम मिळतो.
प्रवासाला जाताना एका बाटलीत लिंबू पाणी किंवा लिंबू सरबत बरोबर घेऊन जाणे आणि घोट घोट पीत राहणे हा देखील एक चांगला पर्याय आहे
३. लवंग किंवा वेलदोडा
लिंबाप्रमाणेच लवंग किंवा वेलदोडयाच्या वासाने सुद्धा मळमळ कमी होते.
लवंग किंवा वेलदोडा चघळत राहिल्याने उलटी होत नाही.
त्यामुळे आपल्या पर्समध्ये किंवा खिशात नेहमी एका छोट्या डबीत दोन तीन लवंगा आणि एखाद दुसरा वेलदोडा ठेवला तर अडीअडचणीच्या वेळेस त्याचा फायदा होतो.
४. आवळा सुपारी
आवळ्याच्या आंबटपणामुळे तोंडाला चव येते म्हणून प्रवासात मळमळीचा त्रास होऊ नये म्हणून आधीच थोडी थोडी आवळा सुपारी खात राहावी.
५. सोडा
घोट घोट पाण्याबरोबरच जर थोडा सोडा प्रवासादरम्यान प्यायला तर उलटीचा त्रास होत नाही.
गाडी लागत असेल तर प्रवास करताना शक्यतो चहा कॉफी टाळावी.
६. पाणी
उलटी झाली तर डीहायड्रेशनचा त्रास होतो.
म्हणून प्रवासात आपली पाण्याची बाटली नेहमी सोबत ठेवावी.
प्रवासात पाणी पिताना एकदम सगळे पाणी न पिता हळूहळू एकेक घोट पाणी थोड्या थोड्या वेळाने पीत राहावे.
७. जेष्ठमध
जेष्ठमधाने तोंडाला चव येते पण त्याचबरोबर जर प्रवासात उलट सुलट खाण्याने अपचन किंवा पित्त झाले असेल तर आराम मिळतो.
गाडी लागल्यावर काय उपाय करायचे हे आपण बघितले.
हे उपाय तुम्ही प्रवासादरम्यान सहज करून बघू शकता.
गाडी लागू नये म्हणून काही गोळ्या सुद्धा फार्मसीमध्ये सहज उपलब्ध असतात पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या घेतल्या पाहिजेत.
या लेखाच्या पुढच्या भागात आपण गाडी लागू नये यासाठी काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या हे थोडक्यात बघणार आहोत.
१. गाडी लागणाऱ्यांनी शक्यतो खिडकी जवळची जागा निवडावी आणि खिडकी बाहेर शक्य तितक्या लांब, नजर पोहोचते तिथपर्यंत बघत राहावे.
२. ट्रेनमध्ये बसताना नेहमी गाडी ज्या दिशेला जात असेल त्या दिशेलाच तोंड करून बसावे. विरुध्द दिशेला तोंड करणे टाळावे.
३. गाडीत बसताना शक्यतो पुढच्या सीटवर बसावे. मागच्या सीटवर गाडी लागण्याचा त्रास जास्त होऊ शकतो.
४. चालत्या गाडीत वाचन केल्याने किंवा मोबाईल बघितल्याने गाडी लागण्याचा त्रास जास्त होतो.
त्यामुळे गाडीत बसल्यावर या गोष्टी करणे शक्यतो टाळावे.
५. प्रवासाच्या आदल्या दिवशी व्यवस्थित झोप घ्यावी. दमल्यामुळे गाडी लागण्याचा जास्त त्रास होऊ शकतो.
६. प्रवासात तेलकट, तिखट पदार्थ खाणे टाळावे. यामुळे मळमळ वाटू शकते.
तसेच प्रवासात पचायला हलके पदार्थ खावेत.
खूप पोटभरीचे जेवण करून प्रवास करू नये पण त्याचबरोबर गाडी लागत असेल तर रिकाम्या पोटी सुद्धा प्रवास करू नये.
रिकाम्या पोटी प्रवास केला तर पित्त वाढून त्रास होऊ शकतो.
७. उग्र वासाची अत्तरे, परफ्युम तसेच सिगारेटचा वास यामुळे मळमळ वाढते.
म्हणून मोशन सिकनेस असेल तर या गोष्टी टाळाव्यात.
८. शक्य असल्यास गाडीच्या खिडक्या उघड्या ठेऊन बाहेरची ताजी हवा आत येऊ द्यावी जेणेकरून मळमळणार नाही.
९. विमान किंवा जहाजातून प्रवास करताना डोके मागे टेकून, डोळे बंद करून बसावे.
१०. आपल्या आजूबाजूच्या कोणाला उलटीचा त्रास होत असेल तर त्याला वाईट वाटणार नाही याची काळजी घेऊन आपण आपली जागा बदलावी.
कारण इतर लोकांचा त्रास बघून आपल्याला सुद्धा त्रास होण्याची शक्यता असते.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.