आपल्या आयुष्यातल सगळे दिवस सारखे नसतात. प्रत्येकाचा एक वाईट काळ असतो.
आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात असे दिवस आले असतील जेव्हा आपल्याला वाटते की बास! आपण जगू शकत नाही.
आपण करू त्या कामात अपयश मिळत असते, नवीन जबाबदारी स्वीकारली की त्यात अनेक अडथळे येत असतात.
अशामुळे प्रचंड निराशा जाणवते. हातात घेतलेली काही कामे पूर्ण होत नाहीत आणि नवीन कामे हाती घ्यायला उत्साह उरत नाही.
अशाने आपण पूर्णपणे खचून गेलेलो असतो. आपल्या आजूबाजूला मात्र आपले नातेवाईक, मित्रमंडळी, भावंड वेगवेगळ्या प्रकारे यशस्वी होताना आपण बघत असतो.
कोणाचे लग्न ठरते, कोणाला मुले होतात, कोणाचा नवीन बिझिनेस सुरु होतो, कोण नवीन घर घेते… आपले मात्र कशातच काही नसते.
पण.. हे ही दिवस सरणार असतात. वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येणार असतात.
या अवघड काळात, वाईट दिवसांत आपल्याला गरज असते ती चार आपुलकीच्या शब्दांची आणि प्रेमाने केलेल्या विचारपूसीची.
पण प्रत्येक वेळेला हे शक्य होईल असे नाही. काहीवेळा आपल्या आजूबाजूचे लोक इतरांच्या यशाचे कौतुक करण्यात रमून गेलेले असतील, त्यांना आपल्या मनस्थितीची जाणीव होईलच असे नाही.
पण अशाने आपल्याला अजून वाईट वाटते.
आपल्या जवळच्या लोकांना आपली मनस्थिती समजत नाही याचे दु:ख होते. आपल्याला भेटल्यावर लोक आपले सांत्वन करायचे सोडून इतरांचे कौतुक करत राहतात यामुळे काहीवेळा असूया सुद्धा वाटते.
सगळ्यात जास्त त्रास होतो तो जर आपण कोणत्या कौटुंबिक कार्यक्रमाला गेलो तर, कारण तिथे सगळेच आपल्याला आयुष्याबद्दल, आपल्या यशाबद्दल बोलत असतात आणि आपल्याकडे मात्र सांगण्यासारखे काहीच नसते.
आपल्या आयुष्यात काहीच चांगले घडत नसते. अशा वेळेला आपल्याला अगदीच डिप्रेस वाटते, काहीवेळा इतर लोकांचा राग सुद्धा येतो.
आपल्याला मनातून माहीत असते की हे असे वाटणे योग्य नाही पण अशा वेळी नक्की काय करायचे, कसा विचार करायचा हे आपल्याला उमगत नसते.
आपल्या अवघड काळातील दिवस पार पडावेत, आपल्याला आपल्या वाईट काळात मनोधैर्य मिळावे आणि न हरता, न कंटाळता आपण आपला प्रवास सुरु ठेवावा यासाठी दुसऱ्यांवर अवलंबून न राहणे आपल्याला शक्य आहे..
त्यासाठी आपण स्वतःशी संवाद साधून, स्वतःला या गोष्टी वारंवार सांगितल्या पाहिजेत. आपल्या जवळ कोणी नसताना स्वत: स्वतःची समजूत काढता यायला हवी, त्यासाठी या काही टिप्स खास तुमच्यासाठी.
१. तुमच्या जवळच्या तुम्हाला समजून घेणाऱ्या एखाद्या स्वकियाला फोन करा
असे म्हणतात की सुख हे वाटण्याने दुप्पट होते आणि दु:ख वाटण्याने हलके होते.
आपली कोणी विचारपूस करत नसेल याचा अर्थ असा नसतो की आपली कोणी दखल घेत नाही.
जो तो आपापल्या कामात व्यग्र असतो.
त्यामुळे लोकांबद्दल मनात गैरसमज निर्माण होऊ न देता आपण स्वतः एक पाऊल चालून पुढे गेलो तर?
आपणच आपल्या जवळच्या दोन व्यक्तींना फोन केला तर?
गप्पा मारून, मन मोकळे करून आपल्याला हलके वाटते.
कदाचित वर वर सुखी दिसणाऱ्या आपल्या मित्राला सुद्धा काही त्रास असतील.
आपण फोन केला तर त्याला सुद्धा ते त्रास बोलून दाखवायला हक्काची जागा मिळेल.
आपल्याला सुद्धा समजेल की प्रत्येकाला आपल्या वाटणीचे त्रास असतात.
आपण सुद्धा आपले त्रास शेयर करू शकू.
लोकांशी बोलणे, लोकांच्या संपर्कात राहणे हे आपले मनस्वास्थ्य जपण्यासाठी अतिशय महत्वाचे असते.
असे केल्याने दोन्ही बाजूने मनमोकळा संवाद होईल.
आणि इतरांबरोबर बोलल्याने आपल्या मनावरचा ताण कमी होईल आणि कोणी सांगावे, कदाचित बोलण्यातून आपल्या समस्येवरचा तोडगा सुद्धा मिळेल!
२. आयुष्यात ‘थॅन्क्यू म्हण्यासारख्या किती गोष्टी आहेत?
आपल्याला जेव्हा हारून गेल्यासारखे वाटते, कामात लक्ष लागत नाही, कसलीच उर्जा वाटत नाही..
थोडक्यात एकदम डिप्रेस वाटते तेव्हा हा प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.
खरेतर अशा अवघड मनस्थितीची वाट का बघा?
रोज जर दिवसाच्या सुरुवातीलाच आपण अशा तीन गोष्टी स्वतःला सांगितल्या ज्यामुळे आपले आयुष्य सुखकर आहे.
ज्या ती गोष्टी इतरांना सहजासहजी मिळत नाहीत पण आपल्याला मिळाल्या आहेत तर?
आपली परिस्थिती कितीही वाईट असली, तरी अशा काही गोष्टी असतातच.
मग रोज जर या गोष्टींची उजळणी केली तर आपली परिस्थिती इतकी सुद्धा वाईट नाही किंवा आपला वाईट काळ चालू असला तरी या काही गोष्टी आपल्या
आयुष्यात चांगल्या आहेत याची आपल्याला जाणीव होईल.
३. दुसऱ्यांसाठी काहीतरी चांगले करा
आपल्या दुखात आपण इतके खचून गेलेलो असतो की जो येईल त्याच्याजवळ आपण आपल्या अपयशाचा पाढा वाचत असतो.
आपण सुद्धा दिवसभर आपल्या विचारात मग्न असतो.
इतरांचा विचार करायला आपल्याजवळ ना वेळ असतो ना इच्छा.
पण इथेच आपले चुकते. सारखे स्वतःमध्येच असणे चांगले नाही.
यामुळे आपल्या डोक्यात सतत तेच ते विचार येत राहतात.
दुसऱ्यांसाठी काहीतरी केले तर आपण यातून बाहेर येऊ शकतो आपल्या मनात उत्साह निर्माण करण्यासाठी हा एक हमखास उपाय आहे.
इतरांसाठी काहीतरी करणे.
या गोष्टी अगदी साध्या असू शकतात. त्यासाठी जास्त वेळ, पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नसते फक्त मनात आपुलकीची भावना हवी.
आपल्याबरोबर आपल्या सहकाऱ्याला कॉफी आणून देणे, आपण घरात काही गोडाचे केले असेल तर ते शेजारच्यांना नेऊन देणे इतक्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याला आनंद देऊन आपले मनात उत्साह निर्माण करू शकता.
आपल्याला कितीही डिप्रेस वाटत असले तरी अशी एक तरी गोष्ट आपण दिवसातून एकदा केलीच पाहिजे हे स्वतःशी ठरवा आणि बघा तुमचे मन कसे प्रफुल्लीत होते.
४. तुम्हाला आवडेल तो व्यायाम करा
व्यायाम हे सगळ्या प्रश्नांवरचे उत्तर आहे. आपण सुद्धा अनेकदा व्यायामाला सुरुवात करतो पण काही महिन्यात सोडून देतो.
असे होते कारण आपण आपल्याला आवडेल असा व्यायामप्रकार निवडत नाही.
म्हणून दिवसातून किमान अर्धा तास तरी तुम्हाला जो आवडेल तो व्यायाम करा.
व्यायामाने आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारते.
व्यायाम केल्याने आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे आपल्याला उत्साहित वाटते.
५. झोपताना किमान १५ मिनिटे तरी वाचन करा
आपला वाईट काळ सुरु असेल तर एक गोष्ट आपला पिच्छा अजिबात सोडत नाही.
ती म्हणजे टेन्शन.
आपले कसे होणार, आपण काय करायचे हे प्रश्न सतत आपल्या सोबत असतात.
टेन्शन असले की त्याचा परिणाम आपल्या झोपेवर होतोच.
आपल्याला रात्रीची सलग ८ तास झोप ही गरजेची असते.
पण या टेन्शनमुळे कित्येकदा झोप लागत नाही.
मग आपण रात्रीच्या वेळी फोन, कॉम्पुटर बघून आपला स्क्रीन टाईम अजून वाढतो आणि झोपेचा पूर्णपणे नाश होतो.
पण याच्या ऐवजी रात्री एखादे हलके-फुलके, आपल्या आवडत्या विषयाचे पुस्तक, एखादी कादंबरी वाचली तर आपला स्कीन टाईम कमी होतो आणि झोप लागण्यासाठी मदत होतो.
मित्रांनो, लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे सगळे दिवस काही सारखे नसतात.
त्यामुळे खचून जाणे हा पर्याय असूच शकत नाही हे पक्के ध्यानात ठेवा आणि कठीण काळात सुद्धा या टिप्स वापरून आपले मनोधैर्य गळू देऊ नका!
https://manachetalks.com/12053/psychology-blog-marathi-vyktimttv-vikas-personality-development-manachetalks/
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
Wa.. Nice good