मुलांना शिस्त लावण्यासाठी पॉझीटीव्ह पॅरेंटिंगच्या या तीन टिप्स

लॉकडाउनच्या काळात पालक आणि मुलं सतत घरात असल्याने, पालकांना पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, या मुलांनी सांगितलेलं ऐकावं यासाठी काय करता येईल… वाचा या लेखात

मुलांना वाढवताना त्यांना शिस्त लावण्याचे सगळ्यात कठीण काम आई-बाबा आणि शाळेतील शिक्षक यांनाच करावे लागते.

शाळेतील शिक्षकांवर अनेक मुलांची जबाबदारी असते, त्यांना बऱ्याच वर्षांचा अनुभव सुद्धा असतो पण आईबाबांना मात्र पहिल्या मुलाच्या वेळेसच अनेक चुकांमधून शिकायला लागते. 

लहान मूल कधी आपल्या मनाविरुद्ध वागले, चुकीचे वागले, वारंवार सांगून सुद्धा आपले ऐकत नसेल तर आईबाबा म्हणून पहिल्यांदा एकदोनदा समजावून सांगितल्यावर क्वचित आपली चिडचिड होणे अत्यंत स्वाभाविक आहे.

मुलांना देखील आईबाबांचा काही प्रमाणात धाक हवा हे बरोबर आहे पण अशी चिडचिड झाल्यावर आपला आपल्या मनावरचा ताबा सुटतो आणि आपण मुलांना जोरात ओरडतो, ते दुखावले जातील असे बोलतो किंवा अगदी त्यांना धाक दाखवायला एखादा फटका सुद्धा मारतो. 

ती वेळ निघून जाते, मुलांना त्यांची चूक लक्षात येते आणि परत तसे वागायचे नाही हे सुद्धा समजते पण आपल्याकडून दुखावले गेलेले त्यांचे मन दुखावलेलेच राहते.

आणि आपल्याला सुद्धा आपल्या या वागण्याचा पश्याताप होतो.

नंतर मुलांना जवळ घेऊन, प्रेमाने समजावून सांगितले तरी आपले शब्द परत येणार नसतात. 

खरेतर आईबाबांकडून अशा चुका होऊ नयेत हे म्हणणे चूक ठरेल.

आईबाबा सुद्धा मुलांबरोबरच मोठे होत असतात. जगात कोणी परफेक्ट पालक, ज्याच्याकडून एक सुद्धा चूक झाली नाही, शोधणे अवघडच आहे.

आपला हेतू सुद्धा परफेक्ट पालक व्हायचा नसून एक चांगले पालक होण्याचा असायला हवा. 

यासाठी पॉझिटीव्ह पेरेंटिंगचा वापर करता येतो. 

आता हे पॉझिटीव्ह पेरेंटिंग काय आहे? 

तर मुलांना वाढवण्याचा एक सकारात्मक दृष्टिकोन.

यामध्ये मुलांना वाढवताना चांगल्या सवयी, चांगली शिस्त यावर इतका भर द्यायचा की वाईट सवयी आपोआप न सांगता, न ओरडता सुटल्या पाहिजेत. 

पॉझिटीव्ह पेरेंटिंगमध्ये कधी मुलांना रागवण्याची, त्यांच्यावर ओडरण्याची वेळ जरी आली तरी आपला आपल्या शब्दांवर, आवाजावर पूर्ण ताबा हवा.

मुले दुखावली जाणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्यायला हवी.

याचा अर्थ असा नाही की पॉझिटिव्ह पेरेंटिंग वापरून मुलांना शिस्त लावणारे पालक हे मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करत असतात.

ते फक्त मुलांच्या चुकांकडे लक्ष केंद्रित न करता त्यांच्या चांगल्या वागण्याकडे लक्ष केंद्रित करून त्यांना प्रोत्साहन देत असतात. 

पॉझिटीव्ह पेरेंटिंग पद्धतीचा वापर करून वाढवलेल्या  मुलांचे आईबाबांशी जास्त घनिष्ट नाते निर्माण होते.

इतरांशी वागताना सुद्धा या मुलांच्या मनात आदर, आपुलकी सतत असते.

अशी मुले आपल्या भावनांबरोबर इतर लोकांच्या सुद्धा भावना जपतात. 

पॉझिटीव्ह पेरेंटिंग करताना नेमके काय करायचे, आपण त्याबद्दल थेअरी तर बघितली पण प्रत्यक्षात ते कसे आणायचे?

१. मुलांचे म्हणणे ऐकून घ्या 

एखाद्या परिस्थितीत तुमचे मूल विचित्र वागत असेल, म्हणजे एरवी वागते त्यापेक्षा वेगळे किंवा सहसा ज्या गोष्टी तुमचे मूल करत नाही, ते जर ते अचानक करायला लागले तर त्यामागे काहीतरी कारण असते.

जसे की खेळताना आपली खेळणी दुसऱ्या मुलांना न देणे, एखाद्या मित्राशी भांडण करून घरी येणे, मोठ्यांना उलट उत्तर देणे किंवा आपल्या भावंडांशी नीट न वागणे.

ही सगळी वाईट वागणुकीची उदाहरणे आहेत आणि त्यासाठी त्यांना समजावून सांगायला हवे.

पण ते करण्याआधी आपले मूल असे का वागत असेल यामागचे कारण शोधणे जास्त महत्वाचे आहे.

त्यासाठी मुलांशी बोलून, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले पाहिजे.

त्यांना ओरडण्याआधी किंवा शिक्षा करण्याआधी ते तसे का वागले हे त्यांना विचारले तर त्यांच्या मनात तुमच्या बद्दल विश्वास निर्माण होतो. 

यामुळे काय होईल? तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे  मुलांना स्वतःच्या भावना ओळखायला जमेल.

आपण जसे वागलो ते चूक होते, पण त्यामागे कारण काय होते ते त्यांचे त्यांना समजेल.

याचबरोबर आपल्याला सुद्धा त्यांना कसे समजवायचे हे कळेल.

त्यांच्या वागणुकीबद्दल त्यांना न ओरडता त्यांच्या भावना समजून घेऊन त्याबद्दल बोलल्याने आपल्या आणि मुलांमध्ये चांगला, सकारात्मक संवाद घडेल. 

२. तुम्हाला मुलांच्या भावना समजतात याची त्यांना जाणीव करून द्या 

मुलांनी तुमच्याकडे मन मोकळे केले, त्यांच्या वागण्यामागचे कारण तुम्हाला समजले की त्यांच्याशी काय बोलायचे? 

तर यानंतर आपल्याला त्यांच्या भावना समजतात.

तसे वागणे अगदी सहाजिक आहे हे त्यांना समजावून सांगायला पाहिजे.

आपल्या आयुष्यातील एखाद दुसरी उदाहरणे देऊन आपल्याला सुद्धा काही वेळा तसेच वाटते हे सुद्धा त्यांना आवर्जून सांगितले पाहिजे.

यामुळे मुले स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक राहतील.

आपल्या भावनांशी प्रामाणिक राहण्याचा सवय ही, माणसाचा भावनिक बुध्यांक वाढवण्यास मदत करते.

त्यांना राग, दुःख काहीही वाटले तरी ते नैसर्गिक आहे, सगळ्यांनाच तसे वाटते हे समजेल.

कदाचित काही वेळेला आपल्या मुलांच्या मनात आलेली एखादी भावना, त्यांना वाटणारी एखादी गोष्ट चुकीची असेल, ही पण त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देण्या आधी तुम्ही त्यांच्या भावना, जरी त्या चुकीच्या असल्या तरी, समजू शकता याची जाणीव त्यांना करून दिली पाहिजे.

अशामुळे त्यांना स्वतःला त्यांच्या चुकीच्या विचारांची जाणीव होईल. 

यामुळे पुढे कधीही त्यांना आपले मन मोकळे करावेसे वाटले, तर ते तुमच्याजवळच येतील.

यामुळे अजून एक फायदा असा होईल की पुढच्या वेळेस राग आल्यावर, किंवा अजून काही कारणामुळे वाईट वागायच्या आधी ते तुमच्याशी बोलण्याला जास्त प्राधान्य देतील. 

३. मुलांना चांगल्या वागणुकीचे महत्व समजावून सांगा 

वरच्या दोन गोष्टी सातत्याने करत राहिल्याने मुलांना पालकांबद्दल एक विश्वास निर्माण होऊन त्यांच्यात विश्वासाचे नाते तयार होते.

या नंतर त्यांना गोष्टी सांगून, उदाहरणे देऊन चांगल्या वागण्याचे महत्व समजावून सांगितले पाहिजे. 

शिस्त ही मारून, फटके देऊन लावायची गोष्ट नसून शांत बसून, समजावून लावण्याची गोष्ट आहे हे आधी पालकांनी स्वतःला बजावायला हवे. 

त्यांना चांगल्या वागणुकीचे महत्व समजावून सांगताना फक्त सकारात्मक गोष्टी सांगाव्यात, सकारात्मक उदाहरणे द्यावीत.

यामुळे कसे वागायचे हे एकदा समजले तर कसे वागायचे नाही हे समजावण्याची वेळच येणार नाही. 

मुलांच्या मनात भीती निर्माण करून, त्यांना धाकात ठेऊन शिस्त लावणे हे पॉझिटीव्ह पेरेंटिंगमध्ये अपेक्षित नसते. 

याचबरोबर जेव्हा तुमचे मूल चिडलेले असते तेव्हा त्यांना समजावून सांगण्यात काही अर्थ नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.

मुलांना शांत व्हायला त्यांचा वेळ दिला की ते स्वतः विचार करतात ज्यामुळे त्यांना त्यांची चूक लवकर लक्षात येते. 

प्रत्येक मूल वेगळे असते त्यामुळे त्यांच्यासाठी वापरावी लागणारी उदाहरणे, त्यांना समजावून सांगताना सांगायच्या गोष्टी या वेगळ्या असू शकतात.

आई बाबांना आपल्या मुलाबद्दल पूर्ण माहिती असते त्यामुळे त्यांना कसे समजवायचे हे त्यांना बरोबर ठाऊक असते.

या लेखात दिलेले हे तीन मुद्दे हे पालकांना एका गाईडलाईनसारखे दिशा दाखवतील.

ज्यामुळे पॉझिटीव्ह पेरेंटिंग म्हणजेच सकारात्मक पालकत्त्व मुलांचा भावनिक आणि बौद्धिक विकास करण्यात महत्त्वाची भूमिका पार पडेल, काय पटतंय ना!!

https://manachetalks.com/12398/mulanna-mothe-krtana-kay-krave-palakttva-parenting-marathi/

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

1 thought on “मुलांना शिस्त लावण्यासाठी पॉझीटीव्ह पॅरेंटिंगच्या या तीन टिप्स”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।
बहीण माझी लाडकी योजना मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर! शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासने स्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा? नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।