तुम्हाला असा नक्कीच अनुभव आला असेल काही वेळेला सगळीच परिस्थिती तुमच्यासाठी प्रतिकूल असते.
तुम्ही कितीही प्रयत्न केले, कष्ट घेतले, मनापासून काम केले तरीही काहीतरी अडचण येते आणि तुमच्या मनासारखे होत नाही.
खरेतर प्रत्येक दिवस कोणासाठीच सारखा नसतो.
आयुष्याच्या प्रवासात असा काही अवघड काळ येऊच शकतो जेव्हा तुम्हाला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात पण तरीही त्याचे चीज होत नाही.
हा काळ कसोटीचा असतो. तो पार पडणार असतो यात काही शंकाच नाही.
आयुष्याचा हा फक्त एक टप्पा असतो.
ती वेळ जाऊन तुमच्या आयुष्यात तुमच्या मनासारख्या गोष्टी घडणार असतात.
तुमच्या प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार असते…
पण यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची असते.
ती म्हणजे या अवघड काळात सुद्धा तुमचे मनोधैर्य गळून पडू नये यासाठी काळजी घ्यायची असते!
आता तुम्ही म्हणाल की याबद्दल अनेक वेळा अनेक ठिकाणी वाचून झाले आहे.
सगळीकडून फक्त सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला जातो.
मनोधैर्य गळून जाऊ नये स्वतःला काय सांगायचे, कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या याची उजळणी केली जाते.
आयुष्याकडून तुम्हाला काय हवे आहेत ते तुमचे ध्येय लक्षात घेऊन तुम्ही आयुष्यात यशस्वी होऊ शकाल हा सल्ला सुद्धा दिला जातो.
पण हा सकारात्मक दृष्टीकोन नेहमी उपयोगी पडेलच असे नाही.
सहसा या गोष्टी बोलायला जितक्या सोप्या वाटतात तितक्या करायला नाही.
काही जणांना अशा सल्ल्यांचा फायदा ही होत असतो, नाही असे नाही.
पण प्रत्येकाची विचार करायची पद्धत निराळी असते.
काहींना या अशा सल्ल्यांचा फारसा उपयोग होत नसेल. सतत सकारात्मक राहणे, आयुष्य अनेपक्षितपणे वळणे घेत असेल तरीही मनात नकारात्मक विचार न येऊ देणे, प्रत्येक गोष्टीत चांगली बाजू बघणे हे काही सगळ्यांनाच जमत नाही.
आयुष्याशी लढण्याची प्रत्येकाची आपली पद्धत असते. त्यामुळे आपले मनोधैर्य वाढवण्यासाठी कोणता एक ठरलेला मार्ग नसतो.
तुम्हाला सुद्धा जर सतत सकारात्मक राहणे जमत नसेल तर त्यात काही वावगे नाही.
आयुष्यात तुमचे मनोधैर्य वाढावे यासाठी इतर अनेक गोष्टी तुम्हाला करता येण्यासारख्या आहेत.
सकारात्मक विचार करायचा आहे असे मनाशी ठरवून सुद्धा तुम्ही असफल होत आहात का?
मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.
आयुष्यात तुमचे मनोधैर्य वाढावे यासाठी काय करावे?
१. ‘याला जीवन ऐसे नाव’ हे लक्षात ठेवा
आयुष्यात अनेकदा असे होत असेल की तुम्ही ठरवता एक आणि होते दुसरेच.
कित्येकदा तुम्हाला अनेक गोष्टी हव्या असतात,त्यासाठी कष्ट करायची तुमची तयारी सुद्धा असते पण तरीही त्या तुम्हाला मिळू शकत नाहीत.
आयुष्यात सगळे मिळावे हा अट्टहासच खरेतर चुकीचा आहे. आयुष्यात कितीतरी गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध होत असतात पण त्याचबरोबर तुमच्या मनासारख्या सुद्धा इतर गोष्टी घडत असतातच हो ना?
मग एखाद्यावेळेला तुमच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली किंवा तुमचे नियोजन फसले तरीही काही हरकत नाही.
जर तुम्हाला अशा परिस्थिती सकारात्मक राहून तुमचे मनोधैर्य जपणे जमत नसेल तर काही हरकत नाही.
पण त्याचबरोबर तुमची निराशा होऊन, मनोधैर्य खचून गेले तरी ते चालणार नाही, हो ना?
कारण तसे झाले तर पुन्हा प्रयत्न करणे, नव्याने सुरुवात करणे यासारख्या गोष्टी होतील आणि आयुष्य प्रवाही राहणार नाही.
अशावेळेला तुम्ही एक गोष्ट करू शकता, “आयुष्य म्हणजे एक दोन गोष्टी कमी जास्त होणारच…”
असा विचार करून तुमचे आयुष्य प्रवाही ठेऊ शकता.
आयुष्यात काहीवेळा मनाविरुद्ध वागावे लागणार, ठरवलेल्या काही गोष्टी होणार नाहीत, नुकसान होणार या गोष्टी जर तुम्ही गृहीतच धरल्या तर निराशा येणार नाही..
उलट तुम्ही अशा अपयशांनी खचून न जाता केवळ तुमच्या या प्रॅक्टीकल विचारसरणीने तुमचे मनोधैर्य जपू शकाल.
२. गरजेचे महत्व लक्षात घ्या
आयुष्यात मनोधैर्य कसे वाढवावे हे जितके महत्वाचे आहे तितकेच, किंवा त्यापेक्षा जरा जास्तच महत्वाचे आहे ते आयुष्यात मनोधर्य कोणत्या गोष्टींसाठी वाढवावे.
आयुष्यात रोज अनेक गोष्टी घडत असतात.
काही मनासारख्या तर काही मनाविरुद्ध. त्यातील महत्वाच्या गोष्टी कोणत्या आणि कोणत्या नाहीत ते तुमचे तुम्हाला ठरवता आले पाहिजे.
तसे झाल्यावर कोणत्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मनावर होऊ द्यायचा आणि कोणत्या नाही हे तुम्हाला समजेल.
काही गोष्टी किरकोळ असतात त्यामुळे अशा गोष्टींसाठी आपले मनोधैर्य गाळून चालणार आहे का?
त्या तितक्या महत्वाच्या आहेत का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे.
तसे नसेल तर अशा बिनमहत्वाच्या गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवायचा का?
त्यापेक्षा आयुष्यात तुमच्या प्रायोरीटीज तुम्ही ठरवून घेतल्या तर तुमच्या दृष्टीने ज्या महत्वाच्या गोष्टी त्यावर तुमचे लक्ष अपोआपच केंद्रित होईल.
अशा महत्वाच्या गोष्टींवर, ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यावर अधिक लक्ष दिल्याने त्या पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बळ मिळेल.
गरज ही सगळ्यात महत्वाची असते. इच्छा, आनंद, हाव हे सुद्धा गरजेपुढे गौण ठरतात.
या प्रॅक्टीकल दृष्टीकोनाचा तुम्हाला नक्की फायदा होईल.
तुमची सगळी उर्जा या महत्वाच्या कामावर खर्च केली जाईल आणि या सगळ्यामुळे तुमचे मनोधैर्य वाढेल, तुम्हाला जास्तीतजास्त प्रयत्न करायचे मनोबल मिळेल.
३. “चलता है” हा दृष्टीकोन धोक्याचा असतो
मनोधैर्य वाढवण्यासाठी सकारात्मक विचारसरणी महत्वाची आहे, पण त्याचबरोबर तुमच्या काही सवयी सुद्धा तुमचे मनोधैर्य वाढवू शकतात.
सवयींचा आणि मनोधैर्याचा काय संबंध?
खरेतर तुमचे वागणे, बोलणे याचा तुमच्या विचारांवर परिणाम होत असतो.
नुसताच विचार करून काहीच उपयोग नसतो. ते विचार आचरणात आणणे, ठरवलेले सगळे निभावून नेणे हे महत्वाचे आहे.
या सगळ्यासाठी आयुष्याबद्दल तुमचा दृष्टीकोन फार महत्वाचा आहे.
आयुष्यात काही करताना त्याबद्दल जिद्द ठेवली पाहिजे. तुम्ही जे ठरवले आहे ते तसेच व्हायला हवे यासाठी मनाचा निग्रह असायला हवा?
हे सगळे कधी साध्य होईल? जेव्हा तुम्ही “चालून जाईल” हे दोन शब्द तुमच्या शब्दकोशातून काढून टाकाल.
हे समजायला जरा गुंतागुंतीचे आहे म्हणून आपण एक सोपे उदाहरण बघू.
समजा तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात.
तुम्हाला खरोखर तुमच्या वाढलेल्या वजनाची जाणीव झाली आहे आणि मनापासून तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायला तयार आहात.
तरीही जर तुमच्यासमोर एखादी तुमच्या आवडीची पण वजन कमी करण्याच्या तुमच्या निश्चयाच्या आड येणारी एखादी गोष्ट बघितली तर ती खायचा मोह तुम्हाला आवरत नाही.
अशावेळेला तुम्ही काय करता?
“जाऊदे, आत्ता एकदाच हे खाऊन घेऊ.. तेवढे चालते.. नंतर व्यायाम करता येईल?”
किंवा तुमच्या सोबत असणारी व्यक्ती तुम्हाला हे सांगू शकते.
इथेच तुम्ही चुकता. “चालून जाईल…” “जाऊदे ना… कधीतरी चालतय…” अशा गोष्टी तुम्ही जोवर स्वतःला सांगता तोवर तुमचे मनोधर्य गळून जायची शक्यता असते.
त्यामुळे तुम्हाला जर निग्रही राहायचे असेल, तुमचे मनोधैर्य वाढवायचे असेल तर तुमचा दृष्टीकोन बदलावा लागेल.
मित्रांनो, आयुष्यात विचारसरणी महत्वाची आहेच. सकारात्मकता ही अत्यंत गरजेची आहे पण त्याला जर या प्रॅक्टीकल दृष्टीकोनाची जोड मिळाली तर तुमचे मनोधैर्य नक्की वाढेल आणि तुम्ही तुमच्या आयुष्यात यशस्वी नक्की व्हाल!
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.
खुप छान टीप. मनःपूर्वक धन्यवाद आणि मनाचे talks टीमला या उपक्रमाबद्धल शुभेच्छा.