खरंच गं बाई अगदी द्वाड…… धरबंध कशाचा तो नाहीच, कितीही समजावा, शिकवा, शहाणे करा, पण परत पहिले पाढे पंचावन्न.
आत्ता परवा एक मोठ्ठ lecture झाडलं. त्यानंतर दोन पुस्तकं वाचायला दिली , पण कशाचा काही उपयोग….. तर नाही!!! जरा काही महत्वाचा विषय कोणी बोलत असलं की ह्याचं आपलं सुरु.
जणू ह्यालाच काय ती माहिती सगळ्या जगाची.आई-बाबा कित्ती सांगतात, तब्येत बिघडते, अन्न-पाण्यावरचे लक्ष उडते, हे दुखतं आणि ते खुपत. पण नाही!! ऐकायचं नाहीच.
मग कोणी बोललं कि अपमान होतो, चेहरा पाडून बसायचा. मग राग तर इतका येतो की बाई, विचारायलाच नको.
आणखी परत दोन दिवसांनी इतकं प्रेम उतु जाईल एखाद्यावर. कसलं साधं कोणी कौतुक केलं की इतका आनंद होतो, आणि मग परत जास्त अंगात येतं.
अरे एक काहीतरी ठरव ना, काय करायचंय आयुष्यात!!
त्यादिवशी शेवटी खडसावून विचारलंच, तसं या आधी बऱ्याचदा खडसावलंय. परवाच्या दिवशी घाव अगदी वर्मी लागला. विचारलं…..
काय रे इतका मोठा आव आणतोस मोठ्ठ झाल्याचा, शांतीचं काय चाललंय, विचार केलास कधी. कुठे असते ती आज काल कधी विचारलंस प्रेमाने.
यावंस वाटतंय का?? अगदी weekend ला तरी तिला बोलवायला काही हरकत नाहीये. पण या सगळ्या नसत्या उपद्व्यापाच्या गराड्यातुन तुला वेळ मिळेल तेव्हा ना.
बसलं मग आमचं पात्र गप,तोंडाचा चंबू करून.
कोणा विषयी बोलतेय कळलं का, “मन” हो आपलं. (मनः)”शांती” शी हल्ली बिनसलंय मनाचं. कारण शोधायचं म्हंटल कि समर्थांची ती ओळ आठवते, “अचपल मन् माझे। नावरे आवरीता”.
हे असं नाही का वाटत कधी….. वाटतं ना, मग! घ्यावं असं कधीतरी फैलावर मनाला, आणि चांगलं धडधडीत तोंडावर विचारावं.
इतके विचार?? अगदी वाऱ्यासारखं पळतयं. कोण काय सांगेल त्या दिशेने….. जगभराचं टेन्शन, आणि मग परत हाव… सगळ्या गोष्टींचा विचार करायची सवय, सगळं हवं, हे सगळं करत असताना कोण आपल्याला काय म्हणतंय…. ते दुसऱ्याचं “मन” आपल्या विषयी काय बोलतंय….
ह्या पण चौकश्या हव्या असतात. लहान असे पर्यंत बरं होतं. गप्प बसून आई-बाबांचा ओरडा खाल्ला कि वठणी वर यायचं. पण मोठं झालंय आता.
त्यात त्या WhatsApp, Facebook वरचे फोटो बघायचे, व्हिडीओ बघायचे, इतरांकडे बघून, वाचून मग नसती खूळ भरवून घ्यायची. ज्ञानाचे भांडरच हो ते…. पण त्यातून काय उचलायचे ते कळत नाही अजून.
मी काय म्हणते करावं हे सगळं, काय उपद्व्याप करायचे ते…. व्यायाम होतो तेवढाच मनाला. नाहीतर स्वतःपुरता विचार करायची सुस्ती चढेल.
पण कधी तरी शांत बसून एखादं पुस्तक वाचून काढावं, गाणं ऐकावं, गुणगुणावं, नदी काठी फिरायला जावं, एखादं विनोदी नाटक किंवा सिनेमा पाहून खळखळून हसावं.
आठ्वड्यातले दोन, कशाला एक रविवारचा दिवस तरी निदान घरातल्या, ओळखीच्या, मित्र-मैत्रिणींच्या आवडत्या “मनां”बरोबर हितगूज करण्यात घालवावा.
अगदीच काही नाही तर सरळ एक मस्त झोप काढावी. तरच परत patch-up होईल ना “मनःशांती” चं.
आणि या सगळ्या पेक्षा एक सॉल्लिड उपाय काय माहितीये, “श्वास”… त्याला विश्वासात घ्यायचं!!! हो खरंच अगदी विश्वासातच घ्यायचं….
मग आता ठरलं तर, उद्या पासून रोज थोडा वेळ मनाशी संवाद… कसा साधायचा?….. काही नाही, बस मध्ये, ट्रेन मध्ये, घरी कुठेही दोन मिनिटं श्वासाकडे लक्ष द्यायचं….
नीट लक्ष द्यायचं, अगदी प्रामाणिकपणे….. इकडचे-तिकडचे विचार करत नाही. त्या श्वासाचं मनाशी डायरेक्ट कनेक्शन आहे. तोच पत्ता सांगतो, त्या प्रमाणे जायचं….. वाटेत शांती मिळते.
तिला पण घेऊन जायचं, मनाच्या गाभाऱ्यात बसवायचं देवसारखं आणि देवा कडे जशी बुद्धी मागतो, तसं मनाकडे मागणं ठेवायचं कि ह्या शांतीला…… मनःशांती ला असेच जप.
वाचण्यासारखे आणखी काही…..
टायटॅनिक….शोकांतिकेची गाथा..(भाग १)
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.
माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.